Leading International Marathi News Daily

रविवार , १ फेब्रुवारी २००९

प्रादेशिक

‘क्लीन अप’ योजनेबाबत प्रशासन आणि नगरसेवक आमने-सामने!
मुंबई, ३१ जानेवारी / प्रतिनिधी

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आर. ए. राजीव यांनी सुरू केलेली बहुचर्चित ‘क्लीनअप मार्शल’ योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या योजनेबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असल्यामुळे ही योजना गुंडाळावी, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी केली आहे. मुंबई अस्वच्छ ठेवायची असेल तर योजना बंद करा, असे राजीव यांनी संतापाने म्हटले आहे. काही नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांनाही अस्वच्छता करताना मार्शलने पकडल्यानेच नगरसेवकांनी या योजनेविरोधात दंड थोपटले आहेत, अशी चर्चा पालिकेत सुरू आहे. विशेष म्हणजे या योजनेला दोन महिन्यापूर्वीच स्थायी समितीने मुदतवाढ दिली होती. आता मात्र प्रशासन आणि नगरसेवक आमने सामने आले आहेत.

रिक्षा, टॅक्सीचे दर कमी करण्याची मागणी
मुंबई, ३१ जानेवारी / प्रतिनिधी

डिझेल, पेट्रोलचे दर कमी झाल्यामुळे आता रिक्षा, टॅक्सीचे दर कमी करावेत, अशी मागणी विविध पक्ष, संघटनांनी केली आहे. प्रत्येक वेळी डिझेल, पेट्रोलचे दर वाढताच रिक्षा, टॅक्सी युनियनने आपले दर वाढवून घेतले आहेत. तर आता डिझेल, पेट्रोलचे दर कमी झाल्यावर रिक्षा, टॅक्सी युनियनने स्वत:च दर कमी करण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते. मात्र एवढा समजसपणा दाखविण्याचा या युनियनचा इतिहास नाही, असे लोक भारतीचे नेते अरविंद सावला यांनी म्हटले आहे. त्यामुळे परिवहन आयुक्तांनी हा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष गौतम सोनवणे यांनीही परिवहन मंत्र्यांना एक निवदेन दिले असून आता रिक्षा, टॅक्सी दर कमी होणे गरजचे आहे, असे म्हटले आहे.

‘नॅनो’च्या उत्पादनाला एक वर्षांचा ‘ब्रेक’!
मुंबई, ३१ जानेवारी/वृत्तसंस्था

मागणीत झालेली घट तसेच कच्च्या मालाच्या गगनाला भिडलेल्या किमती याचा तडाखा बसल्याने टाटा मोटर्स कंपनीला गेल्या डिसेंबरच्या तिमाहीत तब्बल २६३. २६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. त्याच्या परिणामी गुजरातच्या साणंद येथील प्रकल्पातून होऊ घातलेले नॅनो कारचे उत्पादन आणखी एक वर्ष पुढे ढकलण्यात आले आहे. नॅनो कार सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा म्हणजे १ लाख रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून ती टाटा मोटर्सचे महत्त्वाकांक्षी उत्पादन मानले जाते.

चेंबूर येथील विचित्र अपघातात दोन ठार, एक जखमी
मुंबई, ३१ जानेवारी / प्रतिनिधी

चेंबूर येथील श्रमजीवीनगरजवळील पूर्वद्रुतगती महामार्गावर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कंटेनरने तीन रिक्षा आणि स्कूटरला ठोकर देऊन झालेल्या विचित्र अपघातात १३ वर्षांच्या मुलासह दोघेजण जागीच ठार झाले, तर एक गंभीररीत्या जखमी झाला. कंनेटरचा चालक महादेव फुंडे याला अटक करण्यात आली आहे. कंटेनरच्या समोर आलेल्या रिक्षाला वाचविताना हा विचित्र अपघात झाल्याचे फुंडेचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आदिवासी प्रकल्प विभागाकडून आश्रमशाळेतील शिक्षणाचा खेळखंडोबा
सोपान बोंगाणे, ठाणे, ३१ जानेवारी

आदिवासी मुलांची सर्वच बाबतीत हेळसांड करणाऱ्या आदिवासी विकास प्रकल्प विभागाने आश्रमशाळांतून शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचाही अक्षरश: खेळखंडोबा केल्याचे उघड होत आहे. आदिवासी आश्रमशाळांतून शिक्षकांच्या तब्बल २०० जागा रिक्त असूनही त्या न भरता तासिका पद्धतीने शिक्षकांची भरती करून ठाणे जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांतून शिक्षक मजूर हा नवा कामगार वर्ग तयार करण्याचा विक्रम केला आहे.

विक्रीकर उपायुक्तांना ९५ हजारांची लाच घेताना अटक
मुंबई , ३१ जानेवारी / प्रतिनिधी

कर निर्धारणाबाबत हिरवा कंदील देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागून त्यातील सुमारे ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना विक्रीकर उपायुक्त व त्याच्या सहकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. देवराव बावणे आणि दिलीप ढगे अशी ढगे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांनाही माझगाव येथील विक्रीकर कार्यालयात अटक करण्यात आली. बावणे आणि ढगे यांच्याविरुद्ध एका खाजगी कंपनीच्या लेखापालाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. सं

विद्यापीठ - मनविसेचे आरोप प्रत्यारोप
मुंबई , ३१ जानेवारी / प्रतिनिधी

‘ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने ’ ने मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात स्टींग ऑपरेशन केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठ आणि मनविसे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. विद्यापीठात अंदाधुंदी कारभार चालत असल्याचे सिद्ध झाल्याने कुलगुरू डॉ. विजय खोले , प्र-कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत व परीक्षा नियंत्रक विलास शिंदे यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा , अशी मागणी मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी केली आहे. तर विद्यापीठाची फसवणूक करून साईनाथ दुर्गे यांनी परीक्षा भवनात प्रवेश केल्याचा आरोप प्र-कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत यांनी केली आहे. या घटनेची आम्ही वांद्रे-कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याचेही त्यांनी ‘ लोकसत्ता ’ ला सांगितले.

आता ‘ एटीएस ’ च्या ‘ बोलोरो ’ चीही चोरी!
मुंबई , ३१ जानेवारी / प्रतिनिधी
अतिरिक्त महासंचालक जावेद अहमद यांच्या कार्यालयीन गाडीची चोरी होण्याच्या घटनेला महिनाही उलटलेला नसताना आता दहशतवादविरोधी पथकालाही (एटीएस) चोरांचा फटका बसला आहे. दहशतवादविरोधी पथकाची (ठाणे) ‘ बोलेरो ’ ही गाडीही आज सकाळी कांदिवली येथील ठाकूर गावातून चोरीला गेली. मुंबई हल्ल्यानंतर शहरभर ठेवण्यात आलेल्या कडेकोट बंदोबस्तामुळे गुन्ह्यांचे प्रमाण झाले असल्याचा मुंबई पोलीस करीत असलेला दावा या घटनेमुळे फोल ठरला आहे.
‘ बोलेरो ’ चा चालक सचिन सावंत याने समतानगर पोलिसांत गाडीच्या चोरीचा गुन्हा दाखल केल्यावर ही घटना उघडकीस आली. नागपाडा येथील दहशतवादविरोधी पथकाच्या मुख्यालयात सावंत नेहमी गाडी उभी करतो. मात्र आज सकाळी त्याला ठाण्याला कामानिमित्त जायचे असल्याने शुक्रवारी रात्री तो गाडी घेऊन घरी गेला. रात्री साडे अकराच्या सुमारास ठाकूर गाव येथील आपल्या घराबाहेर सावंतने गाडी उभी केली होती. मात्र सकाळी तो ठाण्याला जायला घरातून बाहेर पडला असता घराबाहेर उभी केलेली ‘ बोलेरो ’ गाडी त्याला कुठेच दिसली नाही. त्याने सर्वत्र गाडीचा शोध घेतला. पण गाडी सापडली नाही. शेवटी त्याने समतानगर पोलीस ठाणे गाठून गाडी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला. समतानगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एम. सावंत यांनी याप्रकरणी युद्धपातळीवर शोध सुरू असल्याचे सांगून शहरातील सर्व वायरलेस गाडय़ांना चोरीला गेलेल्या ‘ बोलेरो ’ संबंधी कळविण्यात आल्याचे सांगितले.

वांद्रे येथे आंतरराष्ट्रीय आरोग्य मेळावा
मुंबई , ३१ जानेवारी / प्रतिनिधी

महानगरपालिका आणि केंद्र सरकारच्या वतीने वांद्रे येथे आंतरराष्ट्रीय आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. २ फेब्रुवारी चालणाऱ्या या मेळाव्याला देशभरातील डॉक्टर आणि विविध विषयांतील तज्ज्ञ उपस्थित आहेत. महापौर शुभा राऊळ , भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थिीत या मेळाव्याचे उद्घाटन झाले. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या आयुष , फिकी या संस्था आणि पालिकेने संयुक्तपणे हा मेळावा आयोजित केला आहे. मुंबईतील अशा प्रकारचा हा पहिलाच मेळावा आहे. वांद्रे -कुर्ला संकुल येथे भरलेल्या या मेळाव्यात सर्वाना मोफत प्रवेश देण्यात येणार असून मुंबईकरांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा , असे आवाहन महापौर शुभा राऊळ यांनी केले आहे.

रिपब्लिकन पक्षाची निवडणूक तयारी सुरू
मुंबई, ३१ जानेवारी / प्रतिनिधी

रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले कोणत्या मतदारसंघातून्निवडणूक लढणार हे अजूनही स्पष्ट नाही, मात्र पक्षाने निवडणूक तयारी सुरू केली आहे. रामदास आठवले यांना कोणत्याही मतदारसंघातून उमेदवारी मिळाली तरी त्यांना विजयी करण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबई प्रदेशचे अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी आयोजित केली आहे. रिपब्लिकन पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती आहे. मात्र रिपब्लिकन मतांचा काँग्रेसलाही फायदा होत असून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने आठवले यांच्या उमेदावारीचा निर्णय घेतला पाहिजे, असे रिपब्लिकन पक्षाचे मत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असला तरी काँग्रेसने हा मतदारसंघ आठवले यांच्यासाठी सोडावा, अशी जोरदार मागणी पक्षाने केली आहे. या संदर्भात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी आठवले यांनी चर्चा केली असून शरद पवार यांच्यासोबतही आठवले यांची एक बैठक झाली आहे, असे आठवले यांनीच ‘लोकसत्ता’ला सांगितले. चेंबूर येथील भगवानदीप शुक्ल सभागृहात २ फेब्रुवारी रोजी बैठक होत आहे. या बैठकीत आठवले निवडणुकीबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच दिल्ली येथे २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीचा आढावाही या वेळी घेण्यात येणार आहे, असे सोनवणे यांनी सांगितले.

प्रशासकीय बदल्या ; अजयभुषण पांडे माहिती व तंत्रज्ञान सचिव
मुंबई , ३१ जानेवारी/प्रतिनिधी
राज्य शासनातील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या. महा वितरण कंपरनीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अजयभुषण पांडे यांना माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या सचिवपदी नेमण्यात आले आहे. अजयभुषण पांडे त्यांच्या जागी महा वीजनिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अजय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्याचे उर्जा सचिव सुब्रतो रथो यांची बदली महा वीज निर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी झाली आहे. नगरपालिका प्रशासनचे संचालक संजय सेठी यांची वीज पारेषण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक झाली आहे.

‘ फ्लोटिंग एफएसआय’बाबत पालिकेचा सावळागोंधळ
मुंबई, ३१जानेवारी / प्रतिनिधी

विकास आराखडय़ातील भूखंडावरील ‘फ्लोटिंग एफएसआय’ वापर कसा आणि कोणी केला याची माहिती पालिकेकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. माहितीच्या अधिकाराखाली पालिकेने हे मान्य केले आहे. विकास आराखडय़ाच्य् ाा अंतर्गत येणारे भूखंड पालिका प्रशासन ताब्यात घेते. अनेक खासगी मालकांचे भूखंडही पालिकेने ताब्यात घेतले आहेत. मात्र त्या बदल्यात देण्यात येणाऱ्या ‘फ्लोटिंग एफएसआय’चे काय झाले, हा एफएसआय कोठे आणि कोणत्या विकासकाने वापरला याची काहीच माहिती पालिकेच्या संबधित विभागाकडे नाही. अशोक गोयल यांनी या संदर्भात पालिकेकडे माहिती मागितली होती. विशेष म्हणजे सध्या कोणत्या भूखंडाची काय स्थिती आहे, कोणते भूखंड पालिकेने प्रत्यक्ष ताब्यात घेतले आहेत याचीही माहिती पुरविण्यात पालिकेने असमर्थता दाखविली आहे. मालवणी येथील एक भूखंड पालिकेने ताब्यात घेण्याची कागदी कारवाई केली मात्र प्रत्यक्ष ताबा मात्र घेतला नाही. हा भूखंड (सव्र्हे क्र.२६३) आताही असाच पडून आहे. या भूखंडाचा एफएसआय वापरला गेल्याने पालिकेचे मोठे नुकसान झाले, अशी तक्रार करण्यात आली आहे. या बाबतीतही पालिकेकडे माहिती नाही. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.