Leading International Marathi News Daily

रविवार , १ फेब्रुवारी २००९

अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात नवी मुंबईकर
विजय भोर

अधिकारी व सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने नवी मुंबई परिसरातील गाव, गावठाण, झोपडपट्टी, सिडको वसाहत इतकेच नव्हे, तर उच्चभ्रू वसाहतींमध्येही मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहेत. आता तर निवडणुका जवळ आल्याने अनधिकृत बांधकामविरोधी पथकाला टाळे ठोकल्यासारखी स्थिती आहे. अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक करणाऱ्या उल्हासनगर महापालिका आयुक्तांवर मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे मारले होते.

इये बॅनरचिये नगरी!
अनिरुद्ध भातखंडे

मोरू उठला, त्याने सर्व आन्हिके उरकली. नित्यनेमाप्रमाणे देवाची पूजा केली. आईवडिलांना नमस्कार केला. आईने केलेला मऊ भात बोटं चाटत खाल्ला व पाठीला दप्तर अडकवून तो शाळेत निघाला. मुख्य चौकात आल्यानंतर त्याला धक्का बसला. मुख्य चौकातील सर्व बॅनर, फ्लेक्स नाहीसे झाले होते. हात जोडून उभ्या असलेल्या एकाही ‘नम्र व कार्यसम्राट’ नेत्याची छबी तेथे दिसत नव्हती. हिंदी चित्रपटातील नायकाप्रमाणे किंवा एखाद्या मॉडेलप्रमाणे खास पोज देणाऱ्या एकाही तरुण, तडफदार, उदयोन्मुख कार्यकर्ता कम नेत्याचीही छबी आढळत नव्हती. मोरू गोंधळला. शाळेच्या चौकात त्याला दुसरा धक्का बसला. तेथेही विद्यार्थी संघटनांच्या नावाखाली नेतृत्व उभं करू पाहणाऱ्या व विद्यार्थ्यांमध्ये राजकीय कीड सोडणाऱ्या एकाही नेत्याचा, संघटनेचा, पक्षाचा फलक दिसत नव्हता.

भविष्याचा चेहरा.. इतिहासाचे जतन
जयेश सामंत

गेल्या महिन्याभरात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक जी.एस. गील यांनी नवी मुंबईच्या इतिहासात ऐतिहासिक ठरावेत असे दोन निर्णय घेतले. नवी मुंबईच्या मातीत रुजलेली आगरी-कोळी संस्कृती जतन केली जावी, यासाठी दिवसागणिक विकासाचे नवे टप्पे गाठणाऱ्या या शहरात आगरी-कोळी भवन उभारण्याचा निर्णय सिडकोने यापूर्वीच घेतला आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी नव्या वर्षांत गील यांनी वेगाने सुरू केली. देशातील एक अग्रगण्य असे शहर म्हणून नावारूपास येणाऱ्या नवी मुंबईला येथील भूमिपुत्रांचा एक सांस्कृतिक वारसा आहे, हे कदाचित भल्याभल्यांना ठावूक नसेल. काळाच्या ओघात हे शहर झपाटय़ाने विकसित झाले आणि आधुनिकीकरणाचा एक वेगळा शहरी बाज असलेली ‘कॉस्मोपॉलेटीन’ अशी किनार या शहराला आपोआपच मिळत गेली.

सिडको प्रकल्पग्रस्तांना ३८ वर्षांपासून गावठाण विस्तार योजनेची प्रतीक्षा
मधुकर ठाकूर

मुंबईवरील वाढता ताण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दुसरी मुंबई म्हणून सिडकोमार्फत नवी मुंबई शहराची निर्मिती केली. यासाठी ठाणे, पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरातील ३४४ चौरस किलोमीटरमधील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी कवडीमोल भावात संपादन केल्या. मात्र जमीन संपादन करताना प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या, साडेबारा टक्के विकसित भूखंड, गावांना नागरी सुविधा व गावठाण विस्तार योजना लागू करण्याचे ठोस आश्वासन सिडकोने दिले होते. मात्र इतर आश्वासने थोडय़ाफार प्रमाणात पाळली असली तरी गावठाण विस्तार योजना शासनाने वारंवार आदेश दिल्यानंतरही अमलात आणण्यात सिडको अपयशी ठरली आहे. गावठाण विस्तार योजना अमलात येत नसल्याने मात्र शासन, सिडकोविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.

लय, मात्रा आणि नादाची बेरीज- वजाबाकी!
प्रतिनिधी

सृष्टीतल्या चराचरात भरून राहिलेले संगीत लय, मात्रा आणि नादाच्या बेरीज- वजाबाकीने अगदी सहजतेने उलगडून दाखवत पंडित बिरजू महाराजांनी डोंबिवलीत सावित्रीबाई फुले रंगमंदिरात रविवारी संध्याकाळी आयोजित एका शानदार मैफलीत उपस्थित रसिकांना साक्षात नटराजाचे दर्शन घडविले.
कल्याणमधील अनंत वझे संगीत कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यात प्रथमच उस्ताद झाकीर हुसेन आणि पं. बिरजू महाराज हे दोन दिग्गज एकाच रंगमंचावर आले. ‘कैसी बजाऊ घनश्याम बसुरिया’ या ठुमरीने घुंगरू आणि तबल्याची ही अनोखा जुगलबंदी सुरू झाली. आजकाल झाकीरभाईंची गाठभेट अनेकदा परदेशातच होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर भारतात भेटण्याचा योग आला, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करीत बिरजू महाराजांनी झाकीरभाईंवर स्तुतीसुमने उधळली. आम्ही केवळ कलावंत नसून दिवाने आहोत. त्यामुळेच शास्त्रीय चौकटीत राहूनही नवनवे आविष्कार घडवू शकतो, असे त्यांनी नमूद केले. त्यानंतर समुद्राच्या लाटेतून उमटणाऱ्या गाजेपासून एरवी शून्यवत भासणाऱ्या शांततेपर्यंत विविध नाद बिरजू महाराजांनी आपल्या पदन्यासाने ऐकविले. मग मात्रांच्या विविध आवर्तनातून केलेल्या गिनतीने रोजच्या व्यवहारात दडलेल्या विविध तिहाई दाखविल्या. चुस्त आणि सुस्त, बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व या अवस्थांचे दर्शन या तिहाईंमधून घडविलेच, पण साध्या फोन करण्यातल्या क्रियेतील ‘टेलिफोन तिहाई’ ही त्यांनी पेश केली. पहिल्या सत्रात तब्बल दीड तास ७२ वर्षांंचे बिरजू महाराज नृत्य करीत होते. सध्या भारतात असलेली सुप्रसिद्ध सिनेतारका माधुरी दीक्षित या कार्यक्रमासाठी खास मुंबईतून डोंबिवलीत आली होती. आपल्या पंचतारांकित वलयाने कार्यक्रमाचा रसभंग होणार नाही, याची तिने दक्षता घेतली. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर हळूच ती पहिल्या रांगेत येऊन बसली. मध्यंतरानंतर रंगमंचावर तिचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर सत्रात बिरजू महाराजांची शिष्या शाश्वती सेन यांनी नृत्याविष्कार सादर केला. त्यानंतर पुन्हा उत्तरार्धात बिरजू महाराजांनी सुमारे तासभर रसिकांना नाद, लय आणि तालाचे विविध विभ्रम दाखविले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात संचालक डॉ. दीपक वझे, गौरी वझे, डॉ. प्रताप पानसरे आणि डॉ. ईशा पानसरे यांनी सर्वाचे स्वागत केले. म्हैसकर फाऊंडेशनच्या अनुया म्हैसकर, सुधा म्हैसकर, जयंत म्हैसकर, दिलीपकुमार वझे, मधुरा वझे, जगन्नाथ शिंदे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, पोलीस आयुक्त अनिल ढेरे, महापालिका आयुक्त गोविंद राठोड, ‘अनंत हलवाई’चे प्रफुल्ल गवळी आणि इतर व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र रसिकांना मूड पाहून फारसे कुणी भाषण करण्याच्या फंदात पडले नाहीत.