Leading International Marathi News Daily

रविवार , १ फेब्रुवारी २००९

राज्य

‘शिक्षक भारती’ संस्थेच्या वतीने ‘शिक्षकमित्र’ पुरस्कारांचे वितरण
ठाणे, ३१ जानेवारी/प्रतिनिधी
नव्या शैक्षणिक धोरणात सहा ते १० वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, शून्य ते सहा या वयोगटातच पुढील आयुष्याची खऱ्या अर्थाने पायाभरणी होत असल्याने त्यासाठीही नवीन धोरणात ठोस तरतूद असावी, अशी भूमिका घेऊन ‘शिक्षक भारती’ या संस्थेने ‘शैक्षणिक प्रजासत्ताक’ या नव्या लढय़ाची सुरुवात ठाण्यापासून केली.‘शिक्षक भारती’तर्फे शनिवारी गडकरी रंगायतन नाटय़गृहात भरविण्यात आलेल्या निर्धार मेळाव्याला मुंबई, ठाण्यातील शिक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. या संस्थेचे प्रमुख व शिक्षक-आमदार कपिल पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित या मेळाव्याला विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आगाशे स्मृती पुरस्कार प्रदान म
राठी भाषेचा वारसा चालवा -गिरिजा कीर

बुलढाणा, ३१ जानेवारी / प्रतिनिधी

अंत:करणातील भावना व्यक्त करताना इंग्रजी भाषेला शब्दाच्या मर्यादा आहेत. मात्र मराठी भाषेत अशा मर्यादा नसून भावना व्यापक, समर्पक शब्दात व्यक्त करता येतात, अशा वैभवशाली व समृद्ध मराठी भाषेचा वारसा चालवण्याचे आवाहन मराठी लेखिका गिरिजा कीर यांनी येथे केले. दी युथ लीग रिक्रिएशन सेंटर व भारत विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शशिकला आगाशे स्मृती बाल वाङ्मय पुरस्कार व विविध गुणगौरव पुरस्कार सोहोळ्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत विद्यालयाच्या व्यवस्थापिका सुधा कोरडे होत्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.टी. कुसुंबे, ‘लोकसत्ता’चे सोमनाथ सावळे, ‘लोकमत’चे राजेश शेगोकर यावेळी उपस्थित होते.

डॉ. राणी बंग यांना सुखात्मे पुरस्कार जाहीर
नागपूर, ३१ जानेवारी/प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊनतर्फे देण्यात येणारा मधुकर सुखात्मे पुरस्कार यंदा सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. राणी बंग यांना जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश पांढरे यांनी दिली. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार गेल्या वर्षीपासून देण्यात येत आहे. डॉ. राणी बंग या चंद्रपूर जिल्ह्य़ामध्ये डॉ. अभय बंग यांच्यासमवेत महिला, बाल आणि आदिवासी यांच्या जीवनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.

अनधिकृत बांधकामाचा शिक्का बसलेल्या मालमत्ताधारकांकडून दुप्पट करआकारणी
आयुक्तांच्या आदेशामुळे ठाण्यात खळबळ

ठाणे, ३१ जानेवारी/प्रतिनिधी

ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकाम असा शिक्का बसलेल्या इमारतीतील रहिवाशांकडून या वर्षांपासून मालमत्ताकराची दुपटीने वसुली करण्याचे आदेश आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी काढले आहेत. बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे अद्याप वापर परवाना न मिळू शकलेल्या ठाण्यात शेकडो जुन्या व नव्या इमारती असून, त्यात घरे घेऊन राहणाऱ्या हजारो निष्पाप कुटुंबांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे. येत्या ३ फेब्रुवारी रोजी ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा असून, या सभेत भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर व शिवसेनेचे राम रेपाळे यांनी लक्षवेधी सूचना मांडून पालिका प्रशासनाच्या या निर्णयाला तीव्र विरोध करणार असल्याचे स्पष्ट केले.

योजनांच्या आर्थिक तरतुदीत मागणीनुसार वाढ -वळसे पाटील
अमरावती विभागासाठी ५७ कोटींचा अतिरिक्त निधी

अमरावती, ३१ जानेवारी/ प्रतिनिधी

सर्वसामान्यांच्या जीवनात स्थर्य प्राप्त व्हावे यासाठी त्यांच्या उत्पन्नात वाढ करणाऱ्या ज्या योजना जिल्ह्यात राबवल्या जातात, त्या योजनांच्या आर्थिक तरतुदीत मागणीनुसार वाढ केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली. अमरावती विभागाच्या प्रारूप आराखडय़ा व्यतिरिक्त ५७ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीस आढावा बैठकीत मान्यता देण्यात आली. विभागातील पाचही जिल्ह्यांमधील वार्षिक प्रारूप योजनांचा आढावा अर्थमंत्र्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बठकीत घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला अमरावतीचे पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, बुलढाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रधान सचिव विद्याधर कानडे, विभागीय आयुक्त डॉ. शरद किनकर उपस्थित होते.

शैक्षणिक परिषदेने समाज घडवावा- वडेट्टीवार
राष्ट्रव्यापी शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन

गडचिरोली, ३१ जानेवारी / वार्ताहर

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कार्य मोठे आहे. त्यांच्याच प्रेरणेतून अस्तित्वात आलेल्या शैक्षणिक परिषदेने शिक्षकांसाठी काही न मागता समाजाला आपण काम देऊ शकतो या विचारातून या राष्ट्रव्यापी शैक्षणिक परिषद आयोजित केली आहे. या परिषदेच्या माध्यमातून धर्म, जात, पात यापलीकडे जाऊन समाज घडवण्याचे काम अव्याहतपणे सुरू ठेवावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाचव्या राष्ट्रव्यापी शैक्षणिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

‘वक्ता व अभिनेता होण्यासाठी श्वासाचे तंत्र शिकणे आवश्यक’
सोलापूर, ३१ जानेवारी/प्रतिनिधी

उत्तम वक्ता आणि अभिनेता होण्यासाठी श्वास घेण्याचे तंत्र, स्वत:च्या आवाजाची प्रत आणि स्वरयंत्राचे तंत्र माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी लहानपणापासूनच त्याची माहिती असणे व प्रशिक्षण आवश्यक असल्याचे मत हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांनी व्यक्त केले. येथील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीने आयोजित वाणी संस्कार कार्यशाळेचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. जी. एन. रजपूत यांनी दीपप्रज्वलनाने केले. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. देशपांडे बोलत होते. कार्यशाळेच्या संयोजक मीरा शेंडगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि आचरणावरून सभ्यता सिद्ध होते. तेव्हा विद्यार्थ्यांनी या गुणांचा आपल्या जीवनात अवलंब करावा, असे वाचनालयाचे कार्यवाह डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रीय बिल्डर्स फोरमच्या अध्यक्षपदी सुरेश हावरे
ठाणे, ३१ जानेवारी/प्रतिनिधी

शासनाच्या बांधकामविषयक धोरणात मदत करून महाराष्ट्रातील विकासकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्रीय बिल्डर्स फोरमच्या अध्यक्षपदी सुरेश हावरे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रीय बिल्डर्स फोरम ही राज्यभरातील बिल्डर्सचे प्रतिनिधित्व करणारी शिखर संघटना आहे. या संघटनेची नुकतीच माटुंगा जिमखाना येथे सभा झाली. त्यात मुख्य मार्गदर्शक माधव भिडे यांनी अध्यक्ष म्हणून हावरे यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीत हावरे यांनी विभागवार प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नावाचीही घोषणा केली. त्यात मोहन देशमुख (समिती सदस्य), विजय मच्छिंद्र (मुंबई विभाग), प्रकाश बाविस्कर (नवी मुंबई), शैलेश पुराणिक (ठाणे), प्रकाश पाटील (उत्तर महाराष्ट्र), एस. आर. कुलकर्णी (प. महाराष्ट्र), महेश नवाथे (कोकण) आणि विवेक देशपांडे (मराठवाडा) यांचा समावेश करण्यात आला आहे. सन २००९ या वर्षांंत एक हजारपेक्षा अधिक नवीन सदस्यांची नियुक्ती करणार असल्याचे यावेळी हावरे यांनी जाहीर केले.

तीन अट्टल घरफोडय़ांनासांगलीमध्ये अटक
सांगली, ३१ जानेवारी / प्रतिनिधी

सांगली परिसरात घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून १५ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले सर्व गुन्हेगार हे पारधी समाजातील आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला येथील सिटी पोस्टनजीक अट्टल गुन्हेगार मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांच्या या जाळ्यात नाग्या आरगडय़ा पवार (वय २५, रा. डोंगरवाडी, ता. वाळवा) व सरपंच्या श्रीरंग्या काळे (वय ५५, रा. चिकुर्डे) हे दोघे सापडले. त्यांच्याकडून अधिक चौकशी केली असता नोकिया कंपनीचा एक हँडसेट मिळून आला. या दोघांनी कवठेपिरान येथील घरफोडीत ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या दोघांची अधिक चौकशी करता त्यांचा तिसरा साथीदार शेळक्या उर्फ संजय पवार (वय ३९, रा. समडोळी) याचाही घरफोडीत सहभाग असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली. या तिघांनी पेठभाग, तासगाव रस्ता, महादेवनगर येथे घरफोडय़ा केल्याची कबुली दिली आहे.

नाशिक जिल्हा बँकेच्या व्यव. संचालकाचा राजीनामा
नाशिक, ३१ जानेवारी / प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश पाटील यांनी आज तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी गटाच्या दबावाला कंटाळून त्यांनी हा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सदस्यांमध्ये सुरू होती.
सहकार विभागाच्या निकषांची पूर्तता न करता जिल्हा बँक कोअर बँकींग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी उत्सुक होती. तथापि, निकषांचे पालन करूनच ही प्रक्रिया पार पडावी असे व्यवस्थापकीय संचालकांचे म्हणणे होते. या प्रक्रियेत काही नियमबाह्य़ निर्णय घ्यावे लागतील असे दिसू लागल्यावर पाटील यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती. दरम्यान, नाशिक जिल्हा बाजार समितीवर राज्य बँकेने अलिकडेच जप्तीची कारवाई केली. त्यानंतर जिल्हा बँकेच्या विरोधी गटातील संचालकांनी बाजार समितीला आपल्या बँकेने दिलेले कोटय़वधीचे कर्ज असुरक्षित झाल्याची तक्रार व्यवस्थापकीय संचालकांकडे केली होती.