Leading International Marathi News Daily                                  रविवार , १ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

डोंबिवलीचा विनोद पुनमिया

 

भगवान मंडलिक
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर यामधील शहिद जवानांना, नागरिकांना श्रध्दांजली वाहण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम देशभर झाले. परंतु, डोंबिवलीचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सायकलपटू विनोद पुनमिया (५०) याने प्रजासत्ताक दिनापासून ‘गेटवे ऑफ इंडिया ते नवी दिल्ली’ अशी ‘व्हिल टू हिल’ नावाची अनोखी सायकल यात्रा काढली. शहिद जवानांना श्रध्दांजली वाहणे आणि शांतता, एकात्मतेचा, तसेच गांधीजींचा उर्जा संवर्धनाचा संदेश देशभर पोहचविणे हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट होते. या यात्रेत पुनमिया यांनी दररोज सुमारे पाचशे किलोमीटरचे अंतर सायकलने कापले, दिल्ली गाठली नि देशभर शांततेचा संदेश पोहचविला.
चाळीशी उलटली की माणूस चाचपडायला लागतो, छाती भरून येते, डोळे तिरमिरायला लागतात. मग पन्नास वर्षांच्या तरूण विनोदजींमध्ये असे कोणते अजब रसायन आहे की ते वायू आणि वेगालाही मागे टाकते. केवळ व्यायामाने शरीर कमावून फक्त व्यावसायिक भूमिकेत राहायचे असेही विनोदजींचे नाही. इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय ते करतात. व्यवसाय, कुटुंब सांभाळून साहसी मोहिमा आखणारे, सामान्य कुटुंबातील विनोदजी असामान्यत्वाकडे कसे पोहचलेत त्याचा हा परिचय.
विनोद पुनमिया यांचा जन्म राजस्थानमधील गुंडोच गावचा. अभ्यासाचा कंटाळा असल्याने विनोद शाळेत प्रत्येक वर्गात दोन दोन वर्ष काढायचा. ‘अरे अभ्यास कर’ म्हणून आई,वडिल डोके आपटून थकायचे, पण या बाबाने कधी त्यांचे ऐकलेच नाही. अखेर आई, वडिलांनी विनोदला ‘तू तुझा काम धंदा कर’ म्हणून बजावले. सोळा वर्षांचा असताना विनोद घर सोडून निघाला तो थेट मुंबईत दाखल झाला. पोट भरले पाहिजे. लाज बाळगून भागणार नाही, म्हणून विनोदने मोलकरणीसारखी कामे करायला सुरूवात केली. मुंबईचा कंटाळा आल्यानंतर तो पुणे येथे गेला. एका झेरॉक्सच्या दुकानात काम मिळाले. दररोज सकाळी ते रात्री उशिरापर्यंत काम करायचे. फुटपाथवर कुठेतरी आडोसा शोधायचा हा विनोदचा नित्य उपक्रम. एक दिवस काम संपल्यानंतर विनोद विरंगुळा म्हणून एका फूटपाथवर बसला होता. त्याला समोरील घरातील टीव्हीवर सायकल शर्यत सुरू असलेली दिसली. बराच वेळ ते शर्यतीचे दृश्य पाहिल्यानंतर विनोदच्या मनात आपण सायकलपटू झालो तर. असा विचार डोकावला आणि तेथेच विनोदने सायकलबरोबर आपली जन्मगाठ बांधली.
रोजंदारीतून जे पैसे मिळायचे त्यामधून विनोदने साडे सातशे रूपयांची एक सायकल खरेदी केली. काम संपल्यानंतर सायकल चालविण्याचा सराव तो करायचा. असा नित्यक्रम सुरू झाला. एप्रिल १९८२ मध्ये पुणे जिल्हा सायकलिंग क्लबतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफीसाठी सायकलिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विनोदने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेपासून विनोदचा उत्साह वाढू लागला. पिंपरी चिंचवड पालिकेतर्फे आयोजित ११० किलोमीटरची सायकलिंग स्पर्धा, मुंबई-पुणे स्पर्धा,
मुंबई-लोणावळा, मुंबई-नाशिक, इटलीतील वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत भारताचा प्रतिनिधी म्हणून त्याने भाग घेतला. या सर्व स्पर्धावर कळस म्हणजे पुनमिया यांनी मार्च २००७ मध्ये पुणे-डोंबिवली १४० किमीच्या सायकल स्पर्धेत डेक्कन क्वीनला १८ मिनीटे मागे टाकून ही स्पर्धा जिंकण्याचा बहुमान मिळाला. या स्पर्धेची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली.
एक साधा पोरगा कष्ट, जिद्द, मेहनतीच्या बळावर सायकल स्पर्धेत यशस्वी होतो. हे पाहून विनोदच्या पडतीच्या काळात पुणे सायकलिंग असोसिएशनचे कमलाकर झेंडे, ‘प्रवीण मसाला’चे हुकुमीचंद चोरडिया, राजन कलनगुटकर यांनी मोलाची मदत केली. त्यामुळे विनोदमधील कलागुण विकसित होत गेले, बहरत गेले.
विनोद पुनमिया सांगतात, ‘अन्य खेळांविषयी मला दुस्वास नाही. पण सायकल हा एक खेळ आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपले करिअर करू शकतो. पण ज्या दृष्टीने सायकल खेळाकडे बघितले जाते त्यामुळे मनात रूखरूख वाटते. त्यामुळे सायकल स्पर्धेला महत्व आहे. हे पटवून देण्याचा आपला सतत आटापिटा सुरू असतो.’
‘सुरूवातीच्या काळात मी ट्रक, मारूती गाडय़ांच्या बरोबरीने सायकल स्पर्धा करायचो. या स्पर्धा ६० ते १०० किलोमीटरच्या असायच्या. त्यामुळे मला वाहनांचा, माझ्या सायकलच्या वेगाचा अंदाज येऊ लागला आणि मी मोठी आव्हाने स्वीकारू लागलो. सुपरफास्ट डेक्कन क्वीनला मागे टाकणे शक्य नव्हते. खंडाळा घाटात सायकलचा वेग तासाला १०० किलोमीटर कायम ठेऊन आपण २ तास १४ मिनिटे ४९ सेकंदात पुणे-मुंबई अंतर कापले. माझ्या लहान लहान अनुभवामुळे आणि सलग चार महिने केलेल्या सरावामुळे ते सहज शक्य झाले. या शर्यतीसाठी बँकॉक येथून ‘ट्रेक’ ही इटालियन पध्दतीची बारा गिअरची, कार्बनने बनविलेली, वजनाला हलकी अशी सायकल वापरली,’ असे पुनमिया यांनी सांगितले.
१९९२ मध्ये विवाह झाल्यानंतर सायकल स्पर्धेला विनोदजींनी पूर्णविराम दिला होता. परंतु, मूळ पिंड ‘सायकल आणि आव्हान’ या सूत्राचा असल्याने २००६ मध्ये त्यांनी पुन्हा आपल्या सायकल यात्रांना प्रारंभ केला. तो आजपर्यंत अखंड सुरू आहे. पत्नी, चिरंजीव अशा कुटुंबातील विनोदजी दररोज व्यायाम, पोहणे, योग, सायकलिंग करत असतात. वर्षांचे ३६५ दिवस डोंबिवली ते बालेवाडी आणि परत असा पहाटे अडीच ते सकाळी सात पर्यंतचा त्यांचा सराव सुरू असतो.
सतत उत्साह आणि चेहऱ्यावरील हास्य विनोदजींमधील चैतन्याच्या रसायनाची जाणीव करून देत असतात. तेच त्यांचे शक्तिपीठ आहे. पुढील काळात कोल्हापूर ते डोंबिवली हे ४०७ किलोमीटरचे, दिल्ली-लाहोर अशा आव्हानात्मक स्पर्धा त्यांना पार पाडायच्या आहेत. वायू-वेगावर मात करणारे, अडथळ्यांवर मात करून यश मिळविण्यात खरा आनंद मानणारे, विनोद पुनमिया या स्पर्धा लीलया पार पाडतील, अशी अपेक्षा करू या.