Leading International Marathi News Daily                                  रविवार , १ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

किड्स् अ‍ॅण्ड यूथ आयुर्वेद सर्वासाठी ८ फेब्रुवारी रोजी वाशीमध्ये

 

प्रतिनिधी
बाळाचा जन्म झाला की, आई-वडिलांसह सर्व नातेवाईकांच्या ओठांवर हसू उमलते आणि आनंदाने त्याच्या नामकरणाच्या विधीची सुरुवात होते. बाळ आईसारखं दिसते की, बाबांसारखं, नाही ते तर आजी-आजोबांची आठवण घेऊन आले आहे असे बाळाच्या अंगावरची एखादी जन्मखूण पाहून म्हटले जाते. परंतु बाळ जसजसे वयाने मोठे होऊ लागते तसे त्याच्यात हवामानाच्या बदलांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल चर्चा सुरू होते. बाळ आजारी असते ते अजून आपल्याला काय होत आहे हे सांगण्याच्या अवस्थेमध्ये नसते आणि मग घरातील प्रत्येकजण त्याच्या आजारपणाचा अंदाज घेत त्याच्या सर्वानाच काळजीत टाकणाऱ्या या रोगप्रतिकार शक्तींच्या अथवा अ‍ॅलर्जीचा चक्रव्यूह भेदण्यासाठी आयुर्वेदातील उपचार फायदेशीर ठरतात. आयुर्वेदाचे सुदर्शनचक्र आणि रसायनाने भरलेला अमृतकुंभ रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास, शरीरास सुदृढ, निरोगी ठेवण्यास कशाप्रकारे मदत करत असतो या विषयावर झंडु आणि लोकसत्ता प्रस्तुत आयुर्वेद अ‍ॅण्ड यू हा कार्यक्रम येत्या रविवारी ८ फेब्रुवारी २००९ रोजी सकाळी १० वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
लहान मुलांमध्ये होणारे नियमित आजार व या आजारांचे तरुणपणी दिसून येणारे दुष्परिणाम कशाप्रकारे टाळता येतात या विषयावर वैद्य उदय कुलकर्णी आणि वैद्य मधुरा कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. पोटात दुखत असेल किंवा त्याचे डोळे दुखत असेल, सर्दी झाली असेल किंवा त्याला दात येऊ लागले असतील. पण सभोवतालच्या वातावरणामुळे होणाऱ्या आजाराची संकल्पना कळण्यास खरं तर बाळ दोन ते पाच वर्षांचे व्हावे लागते. तोपर्यंत कधी कधी बाळाने बालरोगतज्ज्ञांच्या भेटीगाठी आणि काही दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतलेला असतो. बाळाच्या कमकुवत होत जाणाऱ्या रोगप्रतिकार शक्तीमुळे बाळ सारखं-सारखं आजारी पडतं. त्यामुळे ऑफिसला पोहोचण्यास आई-वडिलांना उशीर होत असतो किंवा वारंवार सुटय़ा घ्याव्या लागतात. नातेवाईक आणि डॉक्टरांना नेहमीच काळजीत टाकणारा रुग्णाचा आजार कधी कधी अँटिबायोटिक्स औषधांनासुद्धा काबूत ठेवता येत नाही. कुलकर्णी स्लाईड शोद्वारे उपस्थितांबरोबर संवाद साधणार आहेत. सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. यशवंत आमडेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार ते असून उपस्थितांबरोबर संवाद साधतील. येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डीन वैद्य प्रकाश ताथेड, वैद्य कुळकर्णी आणि वैद्य मधुरा कुळकर्णी मार्गदर्शन व संवादाच्या माध्यमातून उपस्थितांचे प्रश्नोत्तरांमधून शंकानिरसन करण्यात येईल. झंडु आणि लोकसत्ता प्रस्तुत आयुर्वेद अ‍ॅण्ड यू कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. रवींद्र नाटय़मंदिर येथे ‘आरोग्य कुंडली’ या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर उपस्थितांनी हा कार्यक्रम वाशी येथे आयोजित करण्यास सांगितल्यामुळे या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. आपल्या आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती देणारी ‘आरोग्य कुंडली’ मिळविण्यासाठी कार्यक्रमस्थळी विनामूल्य प्रश्नावली देण्यात येणार आहे. याशिवाय, ‘दीर्घायुष्यासाठी ऋतुनुसार जीवनशैली’ मिळणार आहे. उपस्थितांनी प्रश्नावलीमध्ये भरून दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रम संपल्यानंतर ‘आरोग्य कुंडली’ मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा जोगळेकर-कुळकर्णी करणार आहेत.