Leading International Marathi News Daily                                  रविवार , १ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

असे चित्रपट, अशी माणसे!
भारतीय चित्रपट नावाचं एक अजब रसायन जगातील इतर चित्रपटसृष्टींना नेहमीच अचंबित करतं. हिंदी चित्रपटांच्या या प्रकृतीकडे पाहण्याचा एक जागतिक दृष्टिकोण आपण अलीकडेच ‘स्लमडॉग मिलियोनर’मध्ये पाहिला. प्रत्यक्ष हिंदी चित्रपटसृष्टी, तेथील व्यवहार आणि माणसे हा सुद्धा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. यश, अपयश, नैराश्य, राजकारण, गॉसिप, प्रसिद्धी, पैसा यांच्या मिश्रणातून आकाराला येणारं हे एक आकर्षक विश्व आहे. दिग्दर्शिका झोया अख्तर हिने ‘लक बाय चान्स’ या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टी आणि तेथील व्यक्तिरेखांचे जग ज्या ताकदीने उभे केले आहे, ते एकाच वेळी मनोरंजक आहे आणि अंतर्मुख करणारेही आहे.
चित्रपटसृष्टीतील व्यक्ती आणि त्यांची मानसिकता यांची खिल्ली उडविण्याचा दिग्दर्शिकेचा हेतू नाही. प्रसिद्धी, पैसा आणि अनिश्चितता यातून माणसे कशी क्षणोक्षणी बदलत जातात याचे ते चित्रण आहे. तसे पाहिले तर चित्रपटसृष्टीत जे होते तेच इतरत्र सर्वत्र घडू शकते, घडतेही, परंतु पैसा आणि प्रसिद्धीची जी दोन भिन्न टोके चित्रपटसृष्टीत दिसतात

 

त्यामुळे तेथील नाटय़ अधिक गडद होते.
‘लक बाय चान्स’कडे कथेच्या अनुषंगाने पाहण्यापेक्षा व्यक्तिरेखांच्या अनुषंगाने पाहावे लागते. कथा ही तशी दुय्यम आहे, कारण मुळात चित्रपटाचा हेतूच ‘गोष्ट सांगणे’ असा नाही. चित्रपटात विक्रम जयसिंग (फरहान अख्तर) नामक एक संघर्षरत तरुण अभिनेता आहे. देहरादून येथील ‘अकौंटंट शुक्ला’ यांची एक कन्या सोना (कोंकणा सेन) ही सुद्धा यशस्वी अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत आलेली आहे. रोली (ऋषी कपूर) हा एक बडा निर्माता आहे, ज्याने ब्रेक दिलेला जफर खान हा आता सुपरस्टार झालेला आहे. एके काळी ‘जवाँ दिलोंकी धडकन’ असलेली आणि आता तरुण दिसण्याचा प्रयत्न करणारी नीना (डिम्पल कपाडिया) आपली मुलगी निक्की हिला ‘लाँच’ करण्यासाठी प्रयत्नशील आहे..’
या ‘व्यक्तिरेखा’ असल्यावर जे काही नाटय़ घडू शकते आणि घडायला हवे ते म्हणजे हा चित्रपट! त्यामुळेच दिग्दर्शिकेने कथा, कथेचा प्रवास, कथानकाचा शेवट यावर भर न देता ‘चित्रपटसृष्टी’ पडद्यावर जिवंत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मात्र अखेर, प्रेक्षक चित्रपट पाहायला येतात तेव्हा त्याला ‘नायिका-नायक’ असलेली एक गोष्ट हवी असतेच. हे लक्षात घेऊन एक बारीकसा कथेचा धागा त्यात कल्पकतेने गुंफलेला आहे.
व्यावसायिक चित्रपट निर्माते कसे असतात याची एक ढोबळ अशी प्रतिमा आता सगळ्यांपुढे आहे. आपल्या यशस्वी चित्रपटांचा अभिमान, आपण किंगमेकर असल्याचा दंभ, आपल्या चित्रपटावर ‘कलात्मक असा शिक्का बसू नये याची सदैव भीती आणि आपण कर्तेकरविते असूनही ‘स्टार्स’चे नखरे सहन करावे लागतात याची खंत! ‘निर्माता’ या व्यक्तीचे ‘कॅरिकेचर’ म्हणावे अशी यातली रोली ही व्यक्तिरेखा ऋषी कपूरने पडद्यावर अफलातून साकार केली आहे. लेखक आणि संवाद लेखकानेही मार्मिक निरीक्षणातून ही व्यक्तिरेखा आकाराला आणलेली आहे.
यश मिळाल्यावर कलावंत ते टिकून राहावे यासाठी कसे धडपडत असतात आणि निर्माता यशस्वी असला तरी तो एकदा ‘आऊटडेटेड’ झाला की त्याचे महत्त्व कसे संपते, हे चित्रपटात फारच सुंदररीत्या दाखवले आहे. जाफरला मोठय़ा दिग्दर्शकाचा चित्रपट मिळाल्यावर तो रोलीचा चित्रपट सोडतो, तिथे अचानक विक्रमला संधी मिळते. विक्रमच्या वागण्यातील बदल आणि नीनाची मानसिकता ओळखून त्याने केलेली तिची चापलुसी..!
खरेतर, खूप काही सांगण्यासारखे आहे आणि ते तपशीलात सांगायचे तर प्रत्येक व्यक्तिरेखेवर स्वतंत्र लिहावे लागेल. चित्रपटसृष्टीत एकमेकांच्या सहमतीने चालणारे शोषण, ‘शारीरिक पावित्र्या’ची नैतिकता-अनैतिकता, यश मिळताच अनुकूल वाहू लागणारे वारे.. वगैरे वगैरे! वास्तवाला व्यंगाचे स्वरूप देत साकारलेल्या या व्यक्तिरेखा ‘लक बाय चान्स’ची मोठी ताकद आहे. एरवी इतर सर्व व्यक्तिरेखांबाबत वास्तव आणि व्यंग यांचा उत्तमरीत्या तोल सांभाळणारा हा चित्रपट दिग्दर्शकांनी व्यक्तिरेखा रंगविताना व्यंगाकडे जरा जास्तच झुकला आहे हे मात्र खरे. या सर्व व्यक्तिरेखा स्थापित झाल्यावर पुढे घडणारे ‘कथानक’ अगदीच ‘अपेक्षेनुसार’ असल्याने उत्तरार्धात चित्रपट क्वचित पकड गमावून बसतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या दशकभरात चित्रपटसृष्टीत लागलेली बदलाची चाहूल आणि ज्या बदलांमुळे ‘लक बाय चान्स’सारखा चित्रपट होऊ शकला त्याचे सूतोवाच कुठेही होत नाही.
फरहान अख्तर आणि कोंकणा सेन हे अभिनय करीत आहेत की ‘खरेच जीवन’ जगत आहेत, असा प्रश्न पडावा इतपत त्यांची कामगिरी उत्तम आहे. ऋषी कपूरचा या चित्रपटातील ‘रोली’ जबरदस्त आहे. डिम्पल, इशा आणि इतर सर्वच उत्तम! हृतिक, आमीर, शाहरूख यांचे ‘पाहुणा’ म्हणून घडणारे दर्शनही प्रभावी आहे! जावेद अख्तर यांचे संवाद आणि गाणी हे या चित्रपटाचे वैभव आहे. ‘सूरज जब भी खिडकी से है झांकता, किरणोंको मिल जाता है एक रास्ता, निंद कमरेसे उडम् जाती है और उम्मीद जाते जाते मूड जाती है’ अशा सुंदर ओळी जावेद यांनी लिहिल्या आहेत. शंकर-अहसान लॉय यांचे संगीतही उत्तम आहे!
लक बाय चान्स
निर्माता- रितेश सिधवानी, फरहान अख्तर
दिग्दर्शक- झोया अख्तर
गीते- जावेद
संगीत- शंकर अहसान लॉय
छाया- कार्ल्स कॅटलान
कशासाठी पाहावा?- वास्तवाचे उत्तम व्यंग
कशामुळे टाळावा?- ‘संवेदनशील’ चित्रपट नको असेल तर!
थोडक्यात काय, तर- चान्स घ्या आणि लकी व्हा!