Leading International Marathi News Daily                                  रविवार , १ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘आम्ही सारे लेकुरवाळे’ - पवार मसाले = हास्यस्फोट
लेखक-दिग्दर्शक संतोष पवार हे सध्या मराठी व्यावसायिक रंगभूमीचे एकमेव तारणहार आहेत. खाजगीत त्यांना आणि त्यांच्या नाटकांना ‘थिल्लर’ म्हणून हिणवणारे बडे बडे नाटय़निर्मातेही मंदीचा कठीण समय येता संतोष पवार यांच्याच आश्रयाला जाताना दिसत आहेत. यावरून ‘पवार-महिमा’ किती अगाध आहे, याची कल्पना यावी. खुद्द संतोष पवार हे मात्र ‘कुणी निंदा, कुणी वंदा, करमणूक करणं हाच माझा

 

धंदा’ या आपल्या ब्रीदावर ठाम आहेत. त्यांच्याकडे जबरदस्त कल्पनाशक्ती आहे, दृश्यात्मकतेची रंगभाषा त्यांना चांगली अवगत आहे, संगीताचा कान आहे, नृत्यातील लय- ताल- ठेक्याची बऱ्यापैकी जाण आहे.. आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांची नाडी त्यांना अचूक सापडलेली आहे. असं सगळं असताना आपल्या काही मर्यादांवर मात करण्यासाठी जो ‘अभ्यास’ आवश्यक आहे, तो ते का करीत नाहीत, असा प्रश्न पडतो. आपल्या उपजत नैसर्गिक प्रतिभेला उत्तम कलाकृतींच्या अवलोकनाची, चौफेर वाचनाची, उत्तमोत्तम नाटकं, चित्रपट, चित्र-शिल्पकला, संगीत, नृत्य आदी कलांच्या आस्वादाची जोड त्यांनी दिली असती, तर त्यांच्या या प्रतिभेला आणखीन धुमारे फुटले असते, असं वाटल्यावाचून राहत नाही. मात्र, ते असल्या भानगडींत न पडता आपल्या ठायी असलेल्या उत्स्फूर्त प्रतिभेच्या मर्यादित रिंगणातच गिरक्या घेताना दिसतात, याचं वाईट वाटतं. तथापि, जेव्हा जेव्हा त्यांनी ‘ए भाऊ, डोकं नको खाऊ’, ‘भय्या हात-पाय पसरी’ यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या नाटकांना हात घातला, तेव्हा तेव्हा ते आपल्या या मर्यादांवर मात करण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत. त्यातून खरं तर त्यांनी काही बोध घ्यायला हवा होता. आपल्या तुटपुंज्या संचितावर किती काळ तग धरता येईल, याचा त्यांनी आता गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. असो.
असं एक हटके नाटय़बीज त्यांना ‘आम्ही सारे लेकुरवाळे’च्या रूपात मिळालं होतं. कथाकार रा. रं. बोराडे यांच्या मूळ इरसाल कथेवरचं हे नाटक तितकंच रांगडं, ठसकेबाज करण्याची संधी संतोष पवार यांना चालून आली होती. त्यांनी त्या दिशेनं बऱ्यापैकी प्रयत्नही केलेले जाणवतात. परंतु आपले हमखास यशस्वी ‘पवार मसाले’ वापरायचा मोह त्यांना काही ठिकाणी न आवरल्यानं या रगेल, रंगेल, रांगडय़ा नाटकातली गंमत काही अंशी उणावली आहे.
सरपंच अवचितराव हा गावच्या विकासाची कसलीही कामं न करता नेहमी बिनबोभाट निवडून येत असतो. ऐश करणं, तमाशातल्या बाया नाचवणं, यांतच तो सतत मश्गुल असतो. त्याच्या निकम्मेपणामुळे चिडलेली गावातली तरुण मंडळी चिमाजीला पुढारपण देऊन त्याला सरपंच बनविण्याचा घाट घालतात. त्यामुळे बिथरलेला अवचितराव साम-दाम-दंड-भेद असे सगळे मार्ग वापरून चिमाजीला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतो. पण गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे अवचितरावाचा पराभव करून चिमाजी निवडून येतो. तेव्हा पराभवानं संतप्त झालेला अवचितराव आपल्या गोठय़ात भरणारी शाळाच बंद करून टाकतो. त्यामुळे गावातील मुलांचं शिक्षण ठप्प होतं. लोक तक्रार घेऊन चिमाजीकडे येतात. तो अवचितरावला जाऊन भेटतो आणि हे वागणं बरं नव्हं, हे सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु अवचितराव काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतो. आपल्या गोठय़ात शाळा भरवू देण्यास तो साफ नकार देतो. तेव्हा अवचितरावच्या नाकावर टिच्चून आपण गावात नवी शाळा उभारू, असा चिमाजी विडा उचलतो.
पण शाळा उभी करायची तर पैसा हवा! आणि इथं तर दातावर मारायलाबी कुणाकडं पैका नाही. काय करावं? चिमाजी चिंतेत पडतो. त्याचवेळी तालुक्याच्या गावी निवडून आलेल्या सरपंचांची मंत्रिमहोदयांनी मीटिंग बोलावलेली असते. त्यात ते एक सरकारी योजना जाहीर करतात- ज्या गावात या संक्रांतीपासून पुढच्या संक्रांतीपर्यंत पाळणा हलणार नाही, त्या गावाला संततीनियोजनाचं २५ लाखांचं इनाम मिळेल. चिमाजी हे आव्हान स्वीकारतो. गावात वर्षभर पाळणा हलला नाही तर हे पारितोषिक आपल्याला मिळेल आणि त्यातून नवी शाळा बांधता येईल. गावात परतल्यावर तो जेव्हा गावकऱ्यांसमोर ही योजना मांडतो, तेव्हा ते एकच गिल्ला करतात. हे प्रकरण आपल्याला झेपणारं नाही, असं त्यांचं म्हणणं पडतं. परंतु गावाच्या विकासासाठी आपण एवढा त्याग करायलाच हवा, असं चिमाजी त्यांना बजावतो.
इकडे खुद्द चिमाजीची बायको रंजना आणि त्याची आई घरात पाळणा हलावा म्हणून चातकासारखी वाट पाहत असतात. त्यांना चिमाजीचा हा पण कळल्यावर त्या सगळं घर डोक्यावर घेतात. पण चिमाजी ढिम्म राहतो. गावाच्या विकासासाठी तुम्हीही थोडीशी कळ काढायला हवी, असं तो त्यांना सांगतो. पण त्या काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. तेव्हा चिमाजीचा मित्र सयाजी एक युक्ती करतो. तो त्या दोघींना सांगतो की, तुमच्या या थयथयाटानं चिमाजीनं डोक्यात राख घालून घेतलीय आणि तालुक्याच्या गावाला जाऊन संततीप्रतिबंधक शस्त्रक्रिया करायचं ठरवलंय. हे कळताच त्या गारेगार पडतात. कधीच नसण्यापेक्षा वर्षभर मुलासाठी कळ काढायला राजी होतात.
सयाजीचं प्रेमपाखरू सुनंदा हिलाही कधी एकदा आपलं लग्न होतंय आणि आपण आई होतोय, असं झालेलं असतं. तिनं आणि तिच्या बापानं वर्षांत पाळणा हलविण्याच्या बोलीवरच लग्नाला होकार दिलेला असतो. सयाजीच्या बापालाही नातवाचं तोंड बघण्याची घाई असते. स्वत: सयाजीही लग्नासाठी उतावीळ झालेला असतो. परंतु चिमाजीच्या विडय़ामुळे त्याचेही वांधे होतात. गावातल्या बायकांना मात्र किमान वर्षभर नवऱ्याची ब्याद टळणार म्हणून आनंद होतो.
अवचितरावाला हे कळताच तो चिमाजीला तोंडावर पाडण्यासाठी गावकऱ्यांना फितवायचा प्रयत्न करतो. चिमाजी त्याचा हा डाव हाणून पाडतो. परंतु हे असं किती दिवस ब्रह्मचर्य पाळणार? समस्त गावकरी घायकुतीला येतात. त्यांचं मन रमवण्यासाठी चिमाजी रात्री चावडीवर भजन सप्ताह आयोजित करतो. तेव्हा त्याला शह देण्यासाठी अवचितराव लावणी कलावंतीणीला बोलवून गावात तमाशाचा फड लावतो. भजनात रंगलेले गावकरी एकेक करून सटकतात आणि तिकडे लावणीची मजा लुटायला जातात. चिमाजीच्या हे ध्यानी येतं तेव्हा तो तिथं जाऊन तमाशा करतो. त्या नाचणारणीला गावातल्या बायकांच्या मदतीनं हाकलून देतो.
गावकऱ्यांना वर्षभर सांभाळायचं काम चिमाजीला वाटतं तितकं सोपं नसतं. चिमाजीला वारंवार त्याचा प्रत्यय येतो. इरसाल, डॅंबिस गावकरी त्याला हातोहात बनवतात. पण त्यांच्या कारवाया चिमाजी सतर्कतेनं हाणून पाडतो. आपल्या करणीला यश येत नाही असं पाहून अवचितराव मग आपल्या घरातच पाळणा हलवायचं ठरवतो. पण..
रा. रं. बोराडेंच्या मूळ कथेवरील ‘आम्ही सारे लेकुरवाळे’ हे नाटक धमाल रंगतं. कारण त्याच्या कथाबीजातच रगेल, रंगेलपणाच्या असंख्य शक्यता दडल्या आहेत. लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांनी त्या बऱ्यापैकी बाहेर काढलेल्या आहेत. खरं तर याही पलीकडे जाऊन त्यांना आणखीही धुमशान घालता आलं असतं. परंतु तितक्या खोलात ते शिरलेले नाहीत. त्याऐवजी त्यांनी आपले नेहमीचेच नाच-गाण्यांचे, अंगविक्षेपांचे ‘पवार मसाले’ वापरून नाटकात गंमत आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसा ते न करते तर नाटकाला एक वेगळं परिमाण प्राप्त झालं असतं. गावठी इरसालपणाचं अस्सल ‘लोक’नाटय़ रंगमंचावर पाहायला मिळालं असतं. आणि संतोष पवार यांच्या नावावरही एक चांगलं नाटक लागलं असतं. अर्थात त्यांनी प्रयोग रंगतदार करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. फोल्डिंग सेटचा त्यांनी केलेला वापर कल्पक आहे. तो नाटकाची लवचिकता वाढवतो. लावणी व अभंगाची जुगलबंदी, तसंच गावकऱ्यांनी चिमाजीकडून पैसे उकळण्यासाठी योजलेली युक्ती, गावातल्या बायकांनी पुरुषांना घराबाहेर हाकलताना विंगेतून चादरी, कपडे, उशा फेकण्याचा प्रसंग.. अशा काही प्रसंगांतून दिग्दर्शकाची कल्पकता जाणवते. मात्र, चिमाजीचं आपल्या आई तसंच सयाजीच्या वडिलांबरोबरचं वर्तन थिल्लरपणाच्या सीमा उल्लंघणारं आहे. जेवताना दातात खडा यावा तसं ते टोचतं. नाच-गाणी हा संतोष पवारांचा ट्रेडमार्कच आहे. प्रेक्षकांना रिझवण्यासाठी पं. सत्यदेव दुबे जसे आपल्या नाटकांत हिंदी गाणी पेरतात, तसंच संतोष पवारांच्या प्रेक्षकांनाही हे सवयीचं झालंय. शेवटचं उपदेशामृतही नेहमीचंच.
कलाकारांकडून शंभर टक्के रिझल्ट मिळवणं, ही दिग्दर्शक म्हणून पवार यांची ख्याती आहे. त्याकरता आपल्याला हवे ते कलाकार निवडणं आणि त्यांच्याकडून आपल्याला अभिप्रेत असलेलं काढून घेणं त्यांना उत्तम जमतं. इथं त्यांनी स्वत:च चिमाजीरावाची मध्यवर्ती भूमिका केली आहे. तीत टारगटपणाबरोबरच आंतरिक कळकळही जाणवते. अवचितराव झालेल्या सुदेश म्हशीलकर यांनी पठडीतला तालेवार सरपंच झोकात वठवला आहे. सुहास शिरसाट यांनी सयाजीचं खुळखुळेपण आणि चिमाजीची मन:पूर्वक भक्कम साथ केली आहे. स्नेहा माजगावकरांनी रंजनाचा फणकारा आणि प्रेमळपण दोन्हीही छान दाखवलं आहे. सुनंदाचं लाघवीपण पूजा कदम यांनी यथार्थपणे साकारलं आहे. भाग्यश्री बोडस यांनी सरपंचाच्या पत्नीचं दु:ख, नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणामुळं होणारी तगमग, त्यातून होणारा संतापाचा उद्रेक आणि त्याचवेळी नवऱ्यावरची अविचल निष्ठा उत्कटपणे व्यक्त केली आहे. चिमाजीची तुरतुरी आई ममता चातुर्य यांनी झक्कास उभी केली आहे. आदिती भडसावळे (नर्तकी), सुधीर रोकडे (सुनंदाचे बाबा), प्रशांत शेटे (सयाजीचे बाबा), ज्ञानेश पालव (पालकमंत्री), सुनील नऱ्हे पाटील (पालकमंत्र्याचा पी. ए.), प्रबोध शेटय़े (गावकरी), धनराज सरवदे (मास्तर) यांनी आपल्या छोटय़ा छोटय़ा भूमिकाही समरसून केल्या आहेत. नंदू होनप (संगीत), अंकुश कांबळी (नेपथ्य), किशोर इंगळे (प्रकाशयोजना), मृणाल देशपांडे (नृत्य व वेशभूषा) आणि संदीप नगरकर व प्रदीप दर्णे (रंगभूषा) यांनी नाटकाच्या तांत्रिक बाजू चोख सांभाळल्या आहेत.