Leading International Marathi News Daily                                  रविवार , १ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पॅकेजिंग नवे, माल जुनाच!

 

मराठी प्रेक्षकांचे मानसिक वय १० आहे, त्यांना काहीही चालते, चार विनोदी कलाकार एकत्र आणायचे, त्यांच्यात फिरणारे एक कथानक गुंफायचे, आठ विनोदी प्रसंग टाकायचे, भरत जाधवला चार वेगवेगळ्या वेशभूषा चढवून विविध आवाज काढायला लावायचे.. आणि एक विनोदी चित्रपट तय्यार अशी मानसिकता अलीकडे दिसून येत आहे. त्याच मानसिकेतून ‘जावईबापू झिंदाबाद’ चित्रपट तयार झाला आहे.
सलमान खान व करिश्मा कपूर यांचे एकमेकांवर प्रेम असते. करिश्मा कपूरच्या तीनही मामांना (परेश रावल, ओम पुरी, अनुपम खेर) यांना आपापल्या पसंतीनुसार जावई निवडायचा असतो. तिघांच्या पसंतीस उतरण्यासाठी सलमान वेगवेगळ्या रूपांत येऊन तिघांनाही पटवतो. नाही. नाही.. ‘दुल्हन हम ले जायेंग’ची कथा चुकून लिहिली नाही. ‘जावईबापू झिंदाबाद’चीही हीच कथा आहे. ऋषिकेश (भरत जाधव) आणि मिता (श्वेता मेहेंदळे) यांचे एकमेकांवर प्रेम असते. श्वेताचे दोन मामा (विजय चव्हाण, चेतन दळवी) आणि दोन माम्या (नयना आपटे आणि किशोरी आंबिये) यांना आपापल्या आवडीप्रमाणे जावई निवडायचा असतो. भरत चार वेगवेगळ्या सोंगांमध्ये चौघांना भेटतो आणि त्यांच्या पसंतीस उतरतो. त्याच्या या कामगिरीत नंदन (पुष्कर श्रोत्री) त्याला मदत करतो. शेवटी दोन मामे आणि दोन माम्या त्यांनी पसंत केलेल्या मुलाला म्हणजेच चार सोंगांमधील भरत जाधवला एकत्र भेटायला बोलावतात आणि गोंधळ उडतो.आणि शेवट मात्र गोड होतो.
‘सही रे सही’ नाटकाने भरत जाधव प्रसिद्धीच्या झोतात आला असला तरी आता त्याला तोच प्रकार सारखा सारखा करावा लागतोय. यापूर्वी ‘पछाडलेला’, ‘गोंद्या मारतंय तंगडं’ या चित्रपटांमध्येही त्याने अशी तीन विविध व्यक्तिरेखा रंगवल्या होत्या. याही चित्रपटात त्याने तिच री ओढली आहे. चित्रपटाची मध्यवर्ती कल्पनाच उचलल्यामुळे दिग्दर्शकाची बाकीची कामगिरी सोपी झाली आहे. किंबहुना दिग्दर्शकीय कौशल्य दाखविण्याची फार तसदी दिग्दर्शक विजय पाटकर यांनी घेतलेली नाही. अतिशयोक्तीला ना नाही पण भरत जाधव आणि वाघाच्या मारामारीचा प्रसंग अगदीच बालिश झाला आहे. सरळ सोपी कथा, सरळ सोपी दृश्ये आणि सरळ सोपा शेवट असा एक हलकाफुलका चित्रपट दिग्दर्शकाने तयार केलाआहे. चित्रपटात प्रत्येकाने आपापला हशा घेतला आहे. पण त्यात काहीच नावीन्य नाही. संदीप खरेची गाणी तात्पुरती श्रवणीय झाली आहेत. त्यानेही प्रेक्षकांना गृहित धरले आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला ‘इचक दाना बिचक दाना’सारखे एक गाणे आहे. त्यात संदीपने रॉबिनहूडच्या व्यक्तिरेखेचे कोडे घातले आहे, पडद्यावरही रॉबिनहूडच्या वेशातील भरत जाधव दिसतो, पण त्या कोडय़ाचे उत्तर मात्र ‘रोमियो’ असे दिले आहे. सलील कुलकर्णीचे संगीत ठीकठाक आहे. ‘बरं नव्हं’ हे उडत्या लयीतील गाणे यापुढे कदाचित तोंडी रुळू शकते. याच गाण्यातील नायक नायिकेची वेशभूषा मराठमोळी असली तरी नृत्यदिग्दर्शन मात्र दाक्षिणात्य चित्रपटांतील नृत्यांसारखे आहे. मराठी चित्रपट करमुक्त असतात. स्टॉलसाठी द्यावे लागणारे ३० रुपये कोणाच्या खिशाला जड नाहीत. असे असले तरी नवे पॅकेजिंग असलेला जुना माल का पाहावा ?
सुनील डिंगणकर
फाऊंटन प्रस्तुत
जावईबापू झिंदाबाद

निर्माता - कांतिलाल ओसवाल
दिग्दर्शक - विजय पाटकर
कथा - हेमंत एदलाबादकर
कलाकार - भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, श्वेता मेहेंदळे, विजय चव्हाण, नयना आपटे, चेतन दळवी, किशोरी आंबिये इत्यादी
संगीत - सलील कुलकर्णी
गीते - संदीप खरे