Leading International Marathi News Daily                                  रविवार , १ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मिशन मानवता रॅली
एक मूठ माती, फुलेल सृष्टी मानवतेची
पोलादपूर
- महाडदरम्यान मानवतेचा कलश वाहून नेणारं वाहन थांबवलं जातं, ८२ वर्षांची एक वृद्ध महिला मानवता कलशात एक मूठ माती अर्पण करते, कलशासोबतच्या युवकांना सांगते, ‘‘मुलांनो, मी ८२ उन्हाळे-पावसाळे पाहिले, आजवर भारतावरची सर्व आक्रमणं या मानवता धर्माने परतवून लावली आहेत, आता हा मानवतेचा संदेश तुम्हीच पुढे न्यायचा आहे.’’ मिशन मानवता रॅलीतला हा अनुभव सर्वच युवकांना एक अनोखी प्रेरणा देऊन जातो. किंबहुना त्यांच्यातली मानवतेची भावना आणखीनच दृढ

 

करतो आणि त्यांच्या अनोख्या प्रचारकार्याला बळकटी मिळवून देतो.
२६ नोव्हेंबरच्या हल्ल्याने दहशतवाद्यांनी भारतीयांच्या एकात्मतेवर कितीही धक्के द्यायचा प्रयत्न केला असला तरीही, धर्माच्या भिंती दूर व्हाव्यात व माणसा-माणसांतील दुरावा नष्ट व्हावा व मानवता धर्माची जोपासना व्हावी या हेतूने नुकतीच एक अनोखी ‘मिशन मानवता रॅली’ सावंतवाडी ते मुंबई या पट्टय़ात आखण्यात आली होती. विशेष म्हणजे मानवतेची भावना भारताच्या भावी पिढीमध्ये रुजावी या हेतूने काही युवकच पथनाटय़ाद्वारे हा संदेश देत होते. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित केलेल्या या यात्रेने २६ ते ३० जानेवारीदरम्यान तब्बल ४० महाविद्यालयांमध्ये मानवता धर्माचे पथनाटय़ सादर केले. माणसा-माणसांतील दुरावाच दहशतवादाला पोषक ठरतो, अतिरेक्यांचा धर्म एकच-विनाश, त्यामुळेच धर्माच्या भिंती दूर करा व मानवतेची जोपासना करा, हा संदेश हेच या छोटय़ाशा पण प्रभावी अशा पथनाटय़ाचं सूत्र होतं.
सावंतवाडी येथून प्रजासत्ताक दिनी सुरू झालेल्या या यात्रेने कुडाळ, ओरस, कणकवली, राजापूर, चिपळूण, खेड, महाड, पेण, रोहा, पनवेल, डोंबिवली, ठाणे, वसई, बोरिवली असा भला मोठा पल्ला गाठीत बापूजींच्या पुण्यतिथीदिवशी मुंबईकरांपर्यंत मानवतेचा संदेश पोहोचविला आहे. ‘एक मूठ माती, फुलेल सृष्टी मानवतेची’ असे ध्येयवाक्य असणाऱ्या या यात्रेत एका कलशात यात्रामार्गातील सर्व ठिकाणांहून मानवतेचे प्रतीक म्हणून एक मूठ माती आणण्यात आली होती. याच मातीमध्ये एकात्मतेचा व मानवतेचा धर्म साऱ्या अर्थाने जोपासणाऱ्या महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिवशी मानवतेच्या वृक्षाची प्रतिष्ठापना करण्यात आली. कोकण किनारपट्टीवरच्या या ४० महाविद्यालयांतून सर्वच युवावर्गाने या योजनेस भरभरून प्रतिसाद दिला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर महानगरांमधून बरीच मंडळी मेणबत्त्या घेऊन एकत्र आली. पण या सर्वापासून दूर असणाऱ्या पण मानवतेची भावना सदैवच जोपासणाऱ्या काही तरुणांनी यशस्वी केलेला उपक्रम सर्वानाच भावला आहे.
२० डिसेंबरच्या शहिद दिनाच्या कार्यक्रमानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी या युवकांना कसे एकत्र आणता येईल याविषयी आवाहन केले असता एनएसएसचे समन्वयक अतुल साळुंखे यांनी मिशन मानवता रॅलीची कल्पना मांडली आणि पालीच्या सेठ जेएन पालीवाला कॉलेजच्या एनएसएसच्या युनिटने पथनाटय़ाद्वारे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर कटू सत्य सांगणारं व एकात्मतेचा संदेश देणारं प्रभावी पथनाटय़च पालीवाला कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. अंजली पुराणिक यांच्या संवेदनशील लेखणीतून उतरलं. मग अमोल मोरेच्या दिग्दर्शनाखाली नीलिमा गायकवाड, सुहास पिंपळे, भरत रेवाळे, प्रसाद डाकी, संतोष घाटावकर या युवा कलाकारांनी हे पथनाटय़ प्रत्येक महाविद्यालयात अगदी प्रभावीपणे पोहोचविले व मानवतेची ध्वजा समर्थपणे पेलली. महाविद्यालयाच्या प्राचार्य आय. एन. महाजन, महाविद्यालयाचे एनएनएसएसचे प्राध्यापक एस. ए. पाटील यांच्या प्रोत्साहनामुळेच ही तरुण मंडळी या उपक्रमात अगदी समरसून गेली होती. ४ दिवस ४० ठिकाणं या सर्वाचा समन्वय साधला तो अतुल साळुंखे यांच्या नेतृत्वगुणांमुळे. विद्यार्थी कल्याण मंडळ व समीप प्रतिष्ठान यांचेही या उपक्रमात सहकार्य लाभले. ३० जानेवारीला सकाळी ८-३० वाजता विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात प्र-कुलगुरू अरुण सावंत यांच्यासमोर याचे सादरीकरण होऊन मुंबईतल्या अन्य काही महाविद्यालयांत पथनाटय़ाने आपला संदेश पोहोचविला. दुपारी कलिना येथे कुलगुरूंच्या हस्ते यात्रेसोबतच्या कलशातील मातीमध्ये मानवतेच्या वृक्षाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याच कार्यक्रमादरम्यान सेठ जे. एन. पालीवाला कॉलेज, पाली यांचा एनएसएस उपक्रमातील उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून गौरव करण्यात आला. या युवकांनी या अनोख्या वृक्षाची स्थापना तर केलीच आहे; आता सर्वानाच याची जोपासना करायची आहे.
सुहास जोशी