Leading International Marathi News Daily                                  रविवार , १ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मसाकली म्हणजे नेमकं काय?
काय अर्थ आहे या शब्दाचा ?

 

पण खरं तर अर्थाशी कोणाला काही देणे घेणे आहे काय ? आज छोटय़ा-छोटय़ा मुलांच्या तोंडी हा शब्द रुळला आहे. तरुण पिढीही ‘मसाकली उड मटाकली’ या गाण्याच्या प्रेमात पडली आहे. थेट २० वर्षांंपूर्वीचं ‘कबुतर जा जा’ गाणं आठवतंय? अगदी त्या गाण्यासारखी क्रेझ मसाकलीने टीव्हीवरील पहिल्या ‘प्रोमो’पासून निर्माण केली आहे. गेल्या दोन दशकांत हिंदी गीत- संगीतात, प्रसिद्धीच्या तंत्रात, पडद्यावरल्या सादरीकरणात,गीतांच्या शब्दांत एवढा बदल झालाय, की ते पूर्वीचं कबुतरसुद्धा आज ‘मसाकली’ हे नाव घेऊन गाण्यात अवतरलंय.. !
‘मसाकली’ गाण्यातील प्रसून जोशीचे शब्द, रेहमानची चाल, मोहित चौहानचा टीपेला जाणारा आवाज आपल्या मनाची पकड अधिक घेतो की सोनम कपूरभोवती फिरणारा कॅमेरा, याचं नक्की उत्तर कुणाला देता येईल? पण येवढं मात्र खरं की, ‘प्रोमो’ केवळ एकदा पहिला तरी लखनवी थाटाचं हे गाणं विसरू विसरता येणार नाही. दोन आठवडय़ांपूर्वी (१४ जानेवारी) या गाण्याचे ‘म्युझिक रिलीज’ झाले. त्याच्या बरोब्बर दुसऱ्याच दिवशी मोफत डाऊनलोडसाठीही उपलब्ध झाले. तेव्हा अक्षरश काही हजारांच्या संख्येने नेटवरून ते उतरविले जात होते. आजही नेटवरील डाऊनलोडसाठी लोकप्रिय असलेल्या सर्व हिंदी गाण्यांच्या साईट्सवर या एका गाण्याला सर्वाधिक मागणी आहे. तर आयपॉड, मोबाईल, एफएमवर ‘मसाकली’ची धूम आहे. ‘मसाकली’ गाण्याच्या ठेक्यावर वेगाने मागे-पुढे होणाऱ्या फ्रेम्स, अनेक दृश्यांचे तुकडे आणि त्याचबरोबर ‘हीच ती सावरियाँमधली सोनम कपूर’ हे पैजेवर सांगितलं तरी खरं वाटणार नाही, असं तिचं दिसणारं रुपडं. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे या गाण्याचा ऐकण्या-पाहणाऱ्यावर पडणारा प्रचंड प्रभाव.
चित्रपटाच्या यशापयशाला कारणीभूत ही त्यातली गाणी ठरतात हा समज गेल्या दशकभरातच कालबाह्य ठरला आहे. गाणी चांगली असोत किंवा नसोत,
लोकप्रिय संगीतकारांनी संगीतबद्ध केलंय का, किंवा प्रसिद्ध गायकांनी ती गायलीत का, याला शून्य महत्त्व आलंय. सुमार गाणंही चालवून दाखवायचं असेल, तर संगीत महत्त्वाचं राहिलेलं नाही. नायक- नायिकांच्या चित्रपटातील फक्कड दृश्यांना गाण्यासोबत मिसळून टीव्ही या सर्वात प्रभावी माध्यमातून त्यांचं सातत्याने ‘हॅमरींग’ करत राहीलं तर तर प्रेक्षकाला ‘पांडू’ बनवणे अवघड नाही, हे समीकरण रुढ होऊ लागलं आहे. हिमेश रेशमीयाची नाकातली असणारी गाणी, प्रितम या संगीतकाराच्या परदेशातून थेट जशाच्या तशा उचललेल्या चाली लोकप्रिय होण्यात याच समीकरणाचा तर वाटा आहे.
पूर्वी चित्रपट गीतांसाठी एकमेव पर्याय असलेल्या रेडियोची जागा एकाएकी टीव्हीने घेतली, चोवीस तास गाणी ओतणारी (की ओकणारी?)म्युझिक चॅनेल्स उदयाला आली. एफएमनाही मोबाईलमुळे मोठा श्रोतृवर्ग मिळविता आला. प्रेक्षकाकडे गाण्यांसाठी अपरिमित पर्याय उपलब्ध झाले. तरी गेल्या वर्षी आलेल्या ‘१० टॉप टेन’ गाण्याची यादी कुणाला करता येईल का? आपल्या लक्षातही आला नाही इतका हा बदल आपल्या भोवतीच्या चित्रपट संगीतविश्वात झाला आहे. चकचकीत प्रोमो, उडत्या चाली यांच्यामध्ये अर्थहीन शब्द पूर्णपणे झाकले गेले आणि गाण्यांचं ‘हिट या मिस’ हे सारं चालण्याचा कालावधी केवळ दोन ते तीन महिन्यांचा उरला. आठवा दीड वर्षांंपूर्वीच्या एफमवरील एखाद्या ‘टॉप टेन’ यादीमधील गाणी आणि त्या चित्रपटांचं नावं? एकतर तुमची गाणी आठवताना बोबडी वळेल किंवा यादी सातत्याने नक्कीच चुकेल. अगदी हेच झालं नाही तर मग त्यांच्या चित्रपटाच्या नावांमध्ये गल्लत व्हायला सुरुवात होईल. याला कारण टीव्हीवरून येणाऱ्या गाण्यांचा मारा, त्यांच्या प्रोमोचा पसारा येवढा वाढलाय, की त्याच्या गतीला थोपविणे अशक्य बनलंय.
मसाकलीबाबतही नेमकं हेच होतंय का?
लखनवी थाटाचं आणि रेहमानी बाजाचं हे गाणं जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून आपण टीव्हीवर पाहातोय. डाऊनलोड करून मोबाईलवर ऐकतोय. ट्रेनमध्ये ‘ब्लू टूथ’वरून त्या गाण्याचं आदान-प्रदान करतोय. रेहमानची गाणी ही लगेचच प्रभाव पाडणारी कधीच नसतात. दुसऱ्या, तीसऱ्या किंवा कधीकधी तर अगदी दहाव्या प्रयत्नात ती ऐकणाऱ्याच्या ओठावर रुळू लागतात. पण ‘मसाकली’ पहिल्यांदा ऐकणारा-पाहणारा काही क्षणानंतर हे गाणं त्याच्याही नकळत गुणगुणू लागतो. अशी काय जादू आहे, या गाण्यात?
कुठल्याही नव्या गोष्टीला भुलणाऱ्या आपल्या प्रेक्षकांना ‘मसाकली’ या शब्दाने आकर्षित केले नसते तर नवलच.
पण ज्या मीटरमध्ये ते बांधलं गेलंय ते पाहता यातल्या केवळ प्रोमोचा दृश्य भागच महत्त्वाचा नाही तर खरोखरीच गाण्याच्या आकर्षक शब्दांमध्ये ऐकणाऱ्याला पकडून ठेवण्याची शक्ती आहे. नाही तर अर्थ माहिती नसताना आणि प्रोमोत कबूतर ठळकपणे दिसत असतानाही हे गाणं कबूतराला उद्देशून लिहिलंय असा अंदाज कुणीही काढला असता. पण आता ते चित्रपटातील सोनम कपूरवर नव्हे तर तिच्या डोक्यावर बसलेल्या कबूतरावर लिहिलं गेलंय हे जगजाहीर असतानाही, त्याची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. उलट मसाकली हे गाणं सर्वच माध्यमांतून सर्व वयातील प्रेक्षकाच्या मनावर राज्य करीत आहे. थेट ‘कबुतरा’वरल्या ‘मैने प्यार किया’तल्या गाण्यासारखं. (तेही समारंभातला लाऊडस्पीकरचा जमाना संपल्याच्या काळात.)
रंगीला या पहिल्या स्वतंत्र हिंदी चित्रपटाच्या संगीतापासून इथल्या जुन्या- जाणकार संगीत समीक्षकांची शब्दांबाबत रेहमानवर टीका होऊ लागली. तरीही चांगल्या हिंदी शब्दांची फिकीर न करता त्याने एकापेक्षा एक हीट गाणी बनवून दाखविली. पुढे तक्षक, पुकार, १९४७- अर्थ, लगान,युवा, स्वदेस, रंग दे बसंती, जोधा अकबर या चित्रपटांपासून ठरवून त्याने खानदानी हिंदीचा वापर केला आणि टीकाकारांची तोंडे बंद केली.यातले सगळे सिनेमे चालले नसले तरी गाणी मात्र कित्येक वर्षे लक्षात राहतील.
मसाकली गाण्यासाठी मोहित चौहान हेच नाव निवडावे यातच रेहमानच्या ‘परफेक्शनिस्ट’ वृत्तीचे दर्शन घडते. लोकांना अपरिचित असलेल्या आवाजाला गाण्यासाठी निवडून त्याने ‘रोजा’मधील दिल है छोटासा (मिनमिनी), ‘बॉम्बे’मधील हम्मा, हम्मा (रेमो फर्नाडिस), ‘रंग दे बसंती’मधील रुबरू (नरेश अय्यर), ‘जाने तू या जाने ना’मधील आदिती (रशिद अली) या गाण्यांसाठी वापरलेल्या आपल्या जुन्याच पद्धतीची पुनरावृत्ती केली. तो परिणाम गाण्याच्या लोकप्रियतेसाठीही कारणीभूत ठरला आहे.
आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे गाणं ‘दिल्ली-६’ला हिट करेल का? तर हा प्रश्न कुणालाही मूर्ख आणि अप्रस्तूत वाटू शकेल. गाणं पहिल्यांदा पाहिल्यानंतरच ‘हा भारी चित्रपट असणार’ ही प्रतिक्रिया इतरांजवळ आणि स्वतशीच कितीतरीवेळा आपण दिली नाही का? चित्रपटाचं हिट होण्यातलं अर्थकारण आता पार बदलून गेलंय. ‘सिल्व्हर ज्युबली’, ‘गोल्डन ज्युबली’ हे शब्द इतिहासात जमा होऊन पहिल्या दोन आठवडय़ातच काय तो अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यावर चित्रकर्त्यांकडून भर दिला जात आहे . एखादं गाणं, आकर्षक प्रोमो, एखादा वाद अथवा अनेक चित्रपटबाह्य गोष्टींचा प्रसिद्धीत अंतर्भाव केल्यास सुमार चित्रपटही विक्रमी गल्ला बनवू शकतो, हे गजनीने नुकतेच आपल्या उदाहरणातून दाखवून दिले आहे. त्याधर्तीवर ‘मसाकलीने’ दिल्ली-६च्या पहिल्या दोन आठवडय़ांची चिंता तर साफ मिटवून टाकली आहे. प्रश्न उरतो तो ‘मसाकली’तील प्रसून जोशीचे शब्द, रेहमानची चाल, मोहित चौहानचा आवाज आपल्या मनाची पकड अधिक घेतो की सोनम कपूरभोवती फिरणारा कॅमेरा?
प्रत्येकाचं याबाबतीत वेगवेगळं मत असलं तरी ‘मसाकली’ हे गाणं सुपरहिट गाण्याची सगळी वैशिष्ट जपत वर उत्कृष्ट ‘हॅमरिंग’चं आपलं उदाहरण कित्येक वर्षे ठेवून जाणार यात शंकाच नाही. मग चित्रपट चालो की न चालो, याची पर्वा कुणाला आहे ?
पंकज भोसले