Leading International Marathi News Daily                                  रविवार , १ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

टीव्हीला पर्याय, टीव्ही बंदचा..
टीव्ही बंद करा आणि जगणं सुरू करा.. असे म्हटले की, सगळेजण समोरच्या व्यक्तीला नक्कीच मूर्खात काढतील. पण हे शक्य आहे, आणि ते सत्यातही उतरले आहे. अनेक सुजाण पालकांना या मार्गाचा अवलंब करुन आपल्या पाल्याचे भविष्य योग्य वळणावर नेण्यास सुरूवात केली आहे. हे सर्व शक्य झाले आहे ते महेश गोरडे यांच्या टीव्ही बंद अभियानातून.
टीव्हीतील कार्यक्रमांमधील जे जे वाईट ते ते सर्व विसरुन आचरणात आणण्याचा गुण जर तुमच्यात असेल तर या आंदोलनात सहभागी होऊ नका अन्यथा तुम्ही तुमच्या आयुष्यातील १५ वष्रे वाया घालवाल असे गोरडे यांनी सांगितले आणि अनेक सुजाण पालकांनी या अभियानात आपला सहभाग नोंदविला. मुलं टीव्ही पाहतात, आमची मुलं टीव्ही समोरुन ते उठतच नाहीत अशा एक ना अनेक तक्रारी पालक आपल्या मुलांच्या बाबतीत करीत असतात. पण याचा आपण सूक्ष्म अभ्यास केला तर याचे मूळ आपल्याला पालकांमध्येच दिसून येते. मुले लहान असताना अनेक पालक आपली कामे वेळेत होण्यासाठी मुलांना कार्टुनचे चॅनल लावून देतात. सुरुवातीला थोडावेळ असणारे हे व्यसन कालांतराने मुलांच्या अंगवळणी पडतं आणि याचा त्रास मुलांना व पालकांना सोसावा लागतो, या सर्व बाबींचा

 

विचार करुन टीव्ही बंद अभियान छेडल्याचे गोरडे यांनी सांगितले.
हे आंदोलन व्यापक व्हावे यासाठी जळगाव येथील गोरडे यांनी कुतूहल फाऊंडेशन नावाच्या संस्थेची स्थापना केली. टीव्हीला पर्याय देणाऱ्या अनेक बाबींचा त्यांनी शोध लावला. त्या सर्व पर्यायांची माहिती देणारं ‘या टीव्हीचं काय करायचं?’ या नावाचे महेश गोरडे यांचे पुस्तक मेघमल्हार प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकात टीव्ही न पाहण्याची कारणमीमांसा सर्वसामान्य पालकांनाही समजेल इतक्या सोप्या शब्दात मांडली आहे. त्याचबरोबर टीव्हीला पर्याय म्हणून देण्यात आलेली प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणणे सहज शक्य असल्याने हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस पडले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून गोरडे यांनी केलेले मार्गदर्शन अनेकांनी प्रत्यक्ष आयुष्यात अंमलात आणले असून त्याचे सकारात्मक परिणाम कुतूहल फाऊंडेशनपर्यंत पोहचविले आहेत. त्याचबरोबर स्वत:च्या मनावर संयम ठेवणाऱ्यांसाठी, म्हणजे ज्या व्यक्ती टीव्हीचा उपयोग वाईट कामासाठी करणार नाहित त्यांच्यासाठी टीव्ही पाहण्याचे काही नियम व शिस्त या पुस्तकाद्वारे गोरडे यांनी समाजासमोर आणले आहेत. शाळकरी मुलांनाही समजेल इतक्या सोप्या भाषेत लिहिलेले हे पुस्तक आता हिंदी आणि इंग्रजी भाषेतही प्रकाशित होणार आहे.
टीव्ही बंद अभियानाला गावागावामध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक शाळादेखील या अभियानात सहभागी झाल्याचे गोरडे यांनी सांगितले. या आंदोलनाचे चांगले परिणाम म्हणजे अनेक पालकांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसापासून टीव्हीबंद अभियानात सहभाग घेतला आहे तर अनेकांनी लग्न कार्यात हे ‘या टीव्हीचे काय करायचं?’ हे पुस्तक भेट देणे पसंत केले आहे. टी व्ही पूर्णपणे बंद करावा असे आम्ही सांगत नसल्याचे गोरडे यांनी स्पष्ट केले आहे. तर टीव्हीचा सदुपयोग कसा करावा तसेच त्याच्या वाईट परिणांमांपासून कसे दूर रहावे याचे ज्ञान आम्ही देत आहोत. त्याचबरोबर टीव्हीच्या माध्यमातून आपला विकास कसा साधायचा याचेही ज्ञान देत असल्याचे गोरडे यांनी सांगितले. टीव्हीच्या विषातून मुक्त होऊन त्यातील अमृताचा गोडवा चाखावयाचा असेल आणि आपल्या मुलांचे भविष्य उज्जव बनवायचे असेल तर टीव्ही बंद आंदोलनात सहभागी होण्यास काहीच हरकत नाही. अधिक माहितीसाठी महेश गोरडे यांच्याशी ९४२०७८७१७३ वर संपर्क साधावा.
नीरज पंडित
nirajpandit@in.com