Leading International Marathi News Daily                                  रविवार , १ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

अवघा मराठी एकचि झाला!
अमेरिकेत आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर फिलाडेल्फियात बृहन्महाराष्ट्र मंडळाचे चौदावे अधिवेशन २ ते ५ जुलै दरम्यान होते आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. मात्र अनिवासी भारतीयांच्या नोकऱ्यांना जागतिक आर्थिक मंदीची झळ फारशी सोसावी लागणार नाही, हे वास्तव आहे. खुद्द बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष गिरीश ठकार यांनीच अलीकडेच पुण्यात झालेल्या या विषयावरील परिसंवादात या वास्तवाचा उलगडा केला. त्यामुळे सातासमुद्रापलिकडे होणाऱ्या या चौदाव्या मऱ्हाटी सोहळ्याचे रंग आधीच्या संमेलनांइतकेच किंबहुना त्याहूनही अधिक उत्कट असेच असणार आहेत !
अलीकडेच मुंबईत येऊन संमेलनाच्या एकेका पसाऱ्याची जुळवाजुळव करीत असलेले पक्के मुंबईकर आणि त्यातही खास ‘शिवाजी पार्ककर’ किरण जोगळेकर हे तर या संमेलनाच्या यशाबाबत अगदी नि:शंक आहेत. जोगळेकर म्हणतात की, संमेलनातील कार्यक्रमांची निवडच इतक्या चोखंदळपणे झाली आहे की, त्यातच अर्धी बाजी मारून झाली आहे. राहिला प्रश्न प्रतिसादाचा. तो तर तुफानच असणार आहे. फिलाडेल्फिया हे अमेरिकेतील अन्य नऊ ते दहा प्रांतांपासून दोन ते तीस तासांच्या मोटारप्रवासाच्या अंतरावर असल्याने सुमारे सात हजार भारतीय आणि अर्थातच

 

अस्सल मराठी माणूस अधिवेशनाला गर्दी करणार हे जवळजवळ नक्की आहे.
किरण जोगळेकर हे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीचे एक प्रमुख सदस्य जरी आता पक्के अमेरिकन असले तरी शिवाजी पार्क परिसरात गेलेल्या बालपणाच्या आठवणी त्यांना अद्यापही हळव्या करतात. हीच तर गोष्ट आहे यार ! जोगळेकर म्हणतात. आम्हा अमेरिकेत गेलेल्या सर्व मराठी कुटुंबांना एक चिंता नेहमीच सतावत असते. आपल्या मराठीचं काय होणार ? आपली मातृभाषा आपल्या पुढच्या पिढीने जर झिडकारली तर ? या शंकेने आमच्यासारखे चळवळे कायम सावध राहतात. आणि अशा अधिवेशनातून मराठीचा जागर पुन्हा एकदा जोमदारपणे करता येतो ! अशाच अधिवेशनातूनच अमेरिकेतील अवघा मराठी एकचि झाला, हे चित्र साकारू शकतं. अन्यथा डोकं वर काढण्यासाठीही वेळ तेथे मिळत नाही. मात्र ठरवलं तर आपले छंद या धबडग्यातूनही जपता येतात. माझंच उदाहरण घ्या. माझ्या ढोलकीवादनाचा छंद मी अगदी अमेरिकेतही कडाडून जोपासला आहे. जोगळेकर सांगतात.
फिलाडेल्फियामध्ये आयोजिलेला हा सोहळा अतिभव्य अशा पेनसिल्व्हानिया कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजिण्यात आला आहे. विविध नामवंत कलावंत सादर करणार असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी पुस्तकांचे प्रदर्शन, व्यापारासंबंधीचे परिसंवाद, वैद्यकीय परिषद असा भरगच्च कार्यक्रम संयोजकांनी आयोजिला असला तरी अन्य काही सोहळे खास आहेत. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्हिडिओकॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांशी साधणार असलेला संवाद हा या अधिवेशनाचा केंद्रबिंदू आहे. या संवादाबाबत संयोजकांनी जेव्हा शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली तेव्हा बाळासाहेबांनी
या कल्पनेचे स्वागत केले. मराठी माणूस पार अमेरिकेत एकत्र येतोय तेव्हा आपण जरुर त्यांच्याशी बोलू, असा दिलखुलास शब्द बाळासाहेबांनी दिल्याने संयोजकांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे करणार असून ‘पन्नाशीतला महाराष्ट्र’ या विषयावरील परिसंवादासाठी अन्य वक्ते म्हणून राज ठाकरे, सुप्रिया सुळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या गाण्याचे कार्यक्रम आणि त्यांना तामीळ सुपरस्टार रजनीकांतच्या हस्ते दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार हेही या सोहळ्याचे एक आगळे वैशिष्टय़ आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान दिला गेला असून कल्याणी समुहाचे बाबा कल्याणी यांचे प्रमुख भाषण अधिवेशनात होणार आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही खास आमंत्रण देण्यात आले असून ते जर उपस्थित राहिले तर त्यांची एक आगळी हॅट्ट्रिक होईल. गेल्या दोन अधिवेशनात चव्हाण सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून उपस्थित राहिले आहेत. फिलाडेल्फिया सज्ज होते आहे. जुळवू नाते मनाशी मनाचे, असा या अधिवेशनाचा खास संदेश आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंतच अमेरिकेतील दोन हजारांहून अधिक मराठीजनांनी आपली नावनोंदणी केली होती. संयोजकांचा सात हजारांच्या गर्दीचा अंदाज कदाचित हे चौदावे अधिवेशन चुकवणार आहे !
रवींद्र पांचाळ
maharavindra@gmail.com