Leading International Marathi News Daily

रविवार , १ फेब्रुवारी २००९

क्रीडा

सेरेना विल्यम्सला दहावे ग्रॅण्डस्लॅम
टेनिस क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप

मेलबर्न , ३१ जानेवारी / एपी

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी कडव्या झुंजीची अपेक्षा होती पण , अमेरिकेच्या अनुभवी सेरेना विल्यम्सने रशियाच्या दिनारा सॅफिनाविरुद्ध ६-० , ६-३ ने लीलया विजयाची नोंद करत ही लढत अगदीच एकतर्फी ठरवली. ऑस्ट्रेलियन ओपनचे हे जेतेपद सेरेनाचे दहावे ग्रँड स्लॅम असून या विजयासह ती जागतिक महिला क्रमवारीत ‘ नंबर वन ’ वर पुन्हा विराजमान झाली. या स्पर्धेत दुसरे मानांकन असलेल्या सेरेनाने आजच्या अंतिम लढतीवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. आज सहज सुंदर खेळ करणारी सेरेना कोर्टवर अतिशय चपळ भासत होती , तर त्या तुलनेत तिसरे मानांकन असलेल्या सॅफिनाची कोर्टवरील हालचाल सुरुवातीपासूनच मंद वाटत होती. पहिल्याच गेममध्ये सॅफिनाने तीनवेळा दुहेरी चुका केल्या. त्यात एका ब्रेक पॉईंटचाही समावेश होता. शेवटच्या २० गुणांपैकी १८ गुण मिळवत सेरेनाने पहिला सेट अवघ्या २२ मिनिटातजिंकला.

धोनीच्या ‘ग्रीप’ला स्क्वॉश बॉलचा आधार!
विनायक दळवी, मुंबई, ३१ जानेवारी

क्रिकेटमध्ये डेनिस लिलीची अ‍ॅल्युमिनियमची बॅट आली, रिकी पॉन्टिंगची ग्राफाईटची बॅट आली. हॅन्सी क्रोनिएचा ‘इअरफोन आला. त्यांनी वादाची मोहोळ उठविली. गतविश्वचषक स्पर्धेत गिलख्रिस्टने डाव्या ग्लोव्हजमध्ये स्क्वॉशचा चेंडू भरला होता. त्यामुळे फलंदाजीसाठी गिलख्रिस्टला मदत झाली होती. गिलख्रिस्टने बार्बाडोसच्या अंतिम सामन्यात १०४ चेंडूत १४९ धावा फटकाविल्या होत्या. गिलख्रिस्टची ती शक्कल भारताच्या कप्तान महेंद्रसिंग धोनीने दम्बुलाच्या श्रीलंकेविरुद्ध लढतीत वापरली. उजव्या ग्लोव्हज्मध्ये धोनीने स्क्वॉशचा चेंडू ठेवला होता. धोनीने नाबाद ६१ धावांची खेळी करून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.धोनीच्या या कृतीविरुद्ध श्रीलंकेने तक्रार केली नाही. कारण याआधी गतविश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत, ऑस्ट्रेलियाचा गिलख्रिस्टच्या स्क्वॉशचा चेंडू ग्लोव्हज्मध्ये टाकून फलंदाजी केली तेव्हाचा त्यांचा दावा आयसीसीने फेटाळला होता.

जयसूर्या आजही ग्रेट!
मला वारंवार पडणाऱ्या स्वप्नांमध्ये मी मला आवडणाऱ्या स्थळांना भेट देत असतो व माझ्या माहितीतील लोकही तेथेच असलेली मला आढळतात व त्यांचा दिनक्रमही तसाच असतो. यावेळी मात्र चक्क जागेपणी न बदललेला भूतकाळ जयसूर्याला फलंदाजी करताना पाहायला मिळाला. आजही त्याने फटकावलेला चेंडू पॉईन्टवरील क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत जातो आणि थर्डमॅनला असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला आपण हा चेंडू अडवू असे वाटत असतानाच चेंडू चक्क सीमापार गेलेला दिसतो.

पश्चिम विभागाची उपान्त्य फेरीत धडक
प्रसाद लाड, मुंबई, ३१ जानेवारी

दुलीप करंडक स्पर्धेतील तिसऱ्या दिवशी पश्चिम विभागाने लौकिकाला साजेसा खेळ केला आणि पूर्व विभागाला धूळ चारत सहजपणे आंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. पूर्व विभागाला त्यांचा फलंदाजांकडून फार मोठय़ा अपेक्षा होत्या. पण पहिल्या सत्रात सिद्धार्थ त्रिवेदी, धवल कुलकर्णी यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांची भंबेरी उडाली आणि उपहारापूर्वीच त्यांचा संघ तंबूत परतला. उपान्त्य फेरीतआठ विकेट्स राखून विजय मिळविल्याने पश्चिम विभागाने अंतिम फेरीत धडक मारली असून चेन्नई येथे त्यांचा सामना दक्षिण विभागाशी होणार आहे.

हैदराबाद आणि उत्तर रेल्वेला विजेतेपद
रोहे , ३१ जानेवारी / क्री. प्र.
येथे झालेल्या छत्रपती शिवाजी चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे हैदराबाद व उत्तर रेल्वे यांनी अनुक्रमे महिला व पुरुष गटाचे विजेतेपद पटकाविले. दोन्हीही संघांना चषक आणि १ लाख ११ हजार रुपयांचे इनाम देऊन गौरविण्यात आले. अंतिम फेरीत हैदराबाद संघाने पुण्यावर ३६-१८ अशी मात केली तर उत्तर रेल्वेने एअर इंडियावर ३७-१६ असा विजय मिळविला. दोन्ही सामने पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. पण सामने फारशे चुरशीचे न होता , एकतर्फी झाले. सुनील तटकरे व पणन तसेच क्रीडा राज्यमंत्री मदन पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

यंदाच्या महापौर चषक स्पध्रेला ‘ खो ’ ?
मुंबई , ३१ जानेवारी/ क्री. प्र.

मुंबई उपनगर खो-खो संघटनेची स्थापना अधिकृतपणे १९९७-९८ या काळात झाली. सोसायटी रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट १८६०नुसार संस्थेची नोंदणीही करण्यात आली. परंतु संघटना नोंदणीची पूर्तता करणारी मुंबई पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्ट १९५०नुसार नोंदणी मात्र अद्याप झालेली नाही. तसेच संघटनेचे आजवर एकाही वर्षांचे ऑडिट झालेले नाही , ही वस्तुस्थिती पडताळून न पाहताच २००६-०७च्या महापौर चषक खो-खो स्पध्रेला हिरवा कंदील देण्यात आला. आता यंदाच्या स्पध्रेसाठी उपनगर खो खो संघटनेला यजमानपद मिळण्याची शक्यता आहे , परंतु मागील प्रकरणच अद्याप मिटले नसल्याने या घोषणेला दिरंगाई होत आहे.

ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशची स्थापना
मुंबई, ३१ नोव्हेंबर/क्री.प्र.

ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन या नव्या क्रीडा संघटनेचीस्थापना करण्यात आलेली असून या संस्थेच्या अध्यक्षपदावर राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
शारीरिक तंदुरुस्तीसाठी उत्तम पर्याय असलेल्या पिकलबॉल खेळाच्या प्रसारासाठी स्थापना केलेल्या या संघटनेच्या कार्यकारिणीच्या सदस्यांची नावं काल जाहीर करण्यात आली. असोसिएशनच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपद राजू परुळेकर यांना देण्यात आलेलं असून कंपनी सचिवपदी- सुहास गणपुले यांनी निवड करण्यात आली आहे. खजिनदारपदी- निखिल नाईक, सहखजिनदारपदी- समीर दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदस्य पदावर- अभिजित वैद्य, सलील सामंत, वैभव कुलकर्णी यांना कार्यकारिणीमध्ये सामील करण्यात आले असून मानद सचिवपदी- सुनील वालावलकर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सध्या या संघटनेचे ५० सक्रीय सदस्य असून मुंबईव्यतिरिक्त नवी दिल्ली, ठाणे, पुणे व नाशिक या भागात हा खेळ खेळला जातो.

नेमबाजी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
मुंबई, ३१ जानेवारी / क्री. प्र.

एअर रायफल शुटींग अ‍ॅकॅडमीच्या वतीने नेमबाजी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आले आहे. २ फेब्रुवारी पासून स्वामी विवेक आनंद विद्यालय नेहरू नगर कुर्ला (पू) या ठिकाणी घेण्यात येणार आहे. ३ फेब्रुवारी पासून राजा शिवाजी विद्यालय हिंदू कॉलनी दादर (पू) येथे घेण्यात येणार असून ४ फेब्रुवारी पासून शैलेंद्र विद्यालय दहिसर (पू) येथे घेण्यात येणार आहे. तर रविवार ८ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग राजा शिवाजी विद्यालय हिंदू कॉलनी दादर (पू)येथे होणार आहे. आधिक माहितीसाठी जवाहर जोशी ९८९२१९५७८७, नयना जोशी ९००४३६०४८० किंवा ९८२०३६८६५१ यांच्याशी संपर्क साधावा.

दक्षिणेचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित
राजकोट, ३१ जानेवारी/ वृत्तसंस्था

येथईल माधवराव सिंधीया मैदावरील दुलीप करंडक स्पर्धेच्या उपान्त्य फेरीतील सामन्यात दक्षिण विभागाने पुर्णपणे वर्चस्व मिळविले असून चेन्नई येथील अंतिम फेरीत त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. पहिल्या डावात उत्तर विभागाला स्वस्तात तंबूत पाठवून दुसऱ्या डावात सलामीवीर रॉबीन उत्थप्पाच्या स्फोटकी शतकाने तिसऱ्या दिवशी दक्षिणेकडे ५६७ धावांची आघाडी आहे. उद्या सामन्याच्या शेवटचा दिवस असून हा धावांचा डोंगर ओलांडणे उत्तरेसाठी जवळपास अशक्यप्राय समजले जात आहे. पहिल्या सत्रात दक्षिण विभागाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करीत उत्तर विभागाच्या फलंदाजांना झटपट तंबूत पाठवले आणि त्यानंतर रॉबीन उत्थप्पा नावाच्या झंझावाताने गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत स्फोटकी शतकी खेळी साकारली. त्याने १९ चौकार आणि ३ षटकाराच्या सहाय्याने १५९ चेंडूत १६० धावा ठोकत संघाला धावांचा डोगर उभारून दिला. दक्षिणेकडे ५६७ धावांची आघाडी आहे.

आयसीसी क्रमवारीत धोनी अव्वल स्थानावर
दुबई, ३१ जानेवारी / पीटीआय

श्रीलंका संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६१ धावांची अप्रतिम खेळी केलेल्या भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयसीसी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर आपला अधिकार दाखवला आहे. महेंद्रसिंग धोनीने ७९२ गुणांसह वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार आणि तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकत आयसीसी क्रमवारीतील प्रथम स्थान मिळविले आहे. तर ख्रिस गेल ७८३ गुणांसह दुसऱ्या स्थावर आहे. कोलंबोत पाच एकदिवसीय सामने असल्याने प्रथम स्थानावर टिकून राहण्यासाठी धोनीला पुष्कळ संधी मिळणार आहे. भारताचा डावखुरा फलंदाज युवराज सिंग सातव्या स्थानावर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दोन पायऱ्या मागे सरकत १२व्या स्थानावर आहे. तर डावखुरा सलामीचा फलंदाज गौतम गंभीरने कमालीची कामगिरी करत अव्वल २० जणांमध्ये प्रवेश मिळविला आहे. दक्षिण अफ्रिकेचा एबी डिव्हीलिअर्सने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर पुन्हा उत्कृष्ट दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना डिव्हीलिअर्सने चार एकदिवसीय सामन्यात ६३.६६च्या सरारसरीने धावा काढल्या होत्या. स्ट्रेलियाने जरी मालिका गमावली असली तरी मायकेल हसीने अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर पुन्हा पहिल्या पाच जणांमध्ये प्रवेश मिळविला आहे. दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस दोन पायऱ्या मागे सरकत १२ स्थानावरून १४व्या स्थानावर घसरला आहे. तर श्रीलंकेचा कुमार संगकाराने एक पाऊल पुढे टाकत पाकिस्तानच्या शोएब मलिक आणि सलमान बट्टच्या बरोबरीने १६वे स्थान मिळविले आहे.

भूपतीला दुहेरीचे उपविजेतेपद
मेलबर्न, ३१ जानेवारी / पीटीआय

पुरुष दुहेरी गटात भारताचा महेश भूपती आणि बहामाचा मार्क नोवेल्स या जोडीला अंतिम फेरीत अमेरिकेच्या बॉब आणि माईक ब्रायन या जोडीकडून ६-२, ५-७, ०-६ असा पराभव स्वीकारावा लागला. पहिला सेट ६-२ असा जिंकूनही भूपती- नोल्स या जोडीला पुढच्या दोन सेटमध्ये मात्र आपला खेळ उंचावता आला नाही. पहिल्या सेटमध्ये भूपती - नोल्स जोडीने ब्रायन जोडीची सव्‍‌र्हिस दोनदा भेदली. भूपती - नोल्स जोडीने पहिला सेट २७ मिनिटांतच जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये ब्रायन जोडीने आपला खेळ कमालीचा उंचावला. दुसरा सेट या जोडीने ५-७ असा खिशात घातला. तिसऱ्या सेटमध्ये तर ब्रायन जोडीने पूर्ण वर्चस्व गाजवित भूपती- नोवेल्स जोडीला निष्प्रभ केले. ब्रायन जोडीच्या जबरदस्त खेळापुढे भूपती- नोल्स जोडी इतकी नामोहरम झाली की, त्यांना तिसऱ्या सेटमध्ये एकही गेम जिंकता आला नाही. पुरुष दुहेरीतील भूपतीचे आव्हान संपुष्टात आले असले तरी मिश्र दुहेरीत त्याला विजेतेपद पटकाविण्याची संधी आहे. भारताच्या सानिया मिर्झासह तो मिश्र दुहेरीत खेळत आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचा जोर ओसरला - प्रसारमाध्यमांची टीका
मेलबर्न, ३१ जानेवारी / पीटीआय

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मालिकेत झालेल्या १-४ अशा दारुण पराभवामुळे ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघावर टीकेची झोड उठविली आहे. रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाचा जोर आता ओसरला आहे आणि आता हा विश्वविजेता संघ दक्षिण आफ्रिका आणि भारताच्यासह अव्वल स्थानासाठी स्पर्धेतही नाही.
सिडनी मॉर्निग हेराल्डने म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या क्रमांकासाठी सज्ज झाला आहे, या म्हणण्यात तसा अर्थ नाही, कारण ऑस्ट्रेलियन संघच मुळी त्यांच्याशी स्पर्धा करण्याच्या पात्रतेचा नाही. ऑस्ट्रेलियन संघाच्या शिरावरील तो शिरपेच केव्हाच गळून पडला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेशी तुलना करता हा संघ आता पिछाडीवर आहे. हेराल्डने असेही म्हटले आहे की, संघातील विजिगिषु वृत्ती, प्रतिस्पध्र्याच्या आव्हानातली हवा काढून घेण्याची क्षमता असलेली भागीदारी असे सगळेच ऑस्ट्रेलियन संघाकडून हिरावून नेले आहे. कूरियर मेलने ऑस्ट्रेलियन संघाच्या जखमेवर मीठ चोळणारे विधान करताना ऑस्ट्रेलियन संघातील वयोमानपरत्वे खेळण्यास असमर्थ असलेल्या खेळाडूंना लक्ष्य केले आहे. या खेळाडूंना बाहेर बसविण्याची वेळ आल्याचेही या वर्तमानपत्रात म्हटले आहे. द ऑस्ट्रेलियनने म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेच्या संघात जरी मखाया एनटिनी किंवा डेल स्टेन हे खेळाडू नव्हते तरीही त्यांनी बाजी मारली. द डेली टेलिग्राफने ऑस्ट्रेलियन संघाला त्यांची जागा दाखवून देताना लिहिले आहे की, दक्षिण आफ्रिकेने ४-१ अशी मालिका जिंकून क्रिकेटचे जग बदलत चालले असल्याची पावती दिली आहे. याच वर्तमानपत्राने लिहिले आहे की, दक्षिण आफ्रिकेच्या नीडर संघाने ऑस्ट्रेलियाचा अव्वल क्रमांक हिरावून घेतला आहेच, पण त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर असलेली पकडही ढिली केली आहे. शिवाय, त्यांच्या आत्मसन्मानालाही धक्का दिला आहे. हेराल्ड सनने कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेने गाजविलेल्या वर्चस्वाबद्दल कौतुकाचे उद्गार काढले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर जस्टीन लँगर याने म्हटले आहे की, अव्वल स्थान गमवावे लागल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग निराश झाला असेल. हे स्थान गमावणे म्हणजे विश्वासाला तडा जाण्यासारखेच आहे.