Leading International Marathi News Daily

रविवार , १ फेब्रुवारी २००९

ठाण्याच्या ब्रॅण्ड अम्बेसिडरला मिळणार ‘नवा लुक’
प्रतिनिधी

मुंबईचे नाक, अनधिकृत बांधकामांचे माहेरघर, वेडय़ांसाठी उपचाराचे केंद्र म्हणून जशी ठाण्याची ओळख होती, तशी उद्योगधंद्यांचे शहर, पहिली रेल्वे पोहचलेले शहर आणि तलावांचे शहर म्हणूनही या शहराची महती होती. मात्र कालौघात ठाण्याचे रूप आणि ओळखही बदलली. तरीही तलावांचे शहर ही ठसठसीत ओळख आजही कायम आहे. अर्थात पूर्वीइतके तलावांचे जाळे आज नसले तरी ठाणेकरांचे हार्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मासुंदा तलावाचे स्थान आणि महत्त्व मात्र आजही अबाधित आहे. सर्वार्थाने ठाण्याचा ब्रॅण्ड अम्बेसिडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तलावाला आता नवा लुक दिला जातोय. त्यामुळे या तलावास लवकरच नवी झळाळी मिळणार आहे.

‘नॅनो’ घरांच्या स्वप्नातील धोक्याची घंटा!
सोपान बोंगाणे

जागतिक मंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या गृहनिर्माण क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी बाजारात टिकून राहण्यासाठी नाईलाजास्तव आता ‘अफोर्डेबल’ घरांच्या निर्मितीकडे आपले लक्ष केंद्रित केल्याचे अलिकडे दिसून येत आहे. अशा ‘नॅनो’ घरांच्या योजना घेऊन अनेक मोठे बिल्डर्स बाजारात उतरत आहेत. त्यातही त्यांच्या दृष्टीने ठाणे व ठाणे जिल्ह्यातील पार कर्जत, कसाऱ्यापर्यंतचे आकाश मोकळे झाले आहे. मुंबईपेक्षा मुळातच जागांचे भाव कमी असल्याने अशा योजनांसाठी ठाणे हे आता समर्पक ठिकाण बनत चालले आहे, परंतु स्वत:ला स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांकडून होत असलेल्या या धडपडीत आपली फसवणूक तर होणार नाही ना, याची काळजी सामान्य ग्राहकाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

तलावांचे नव्हे ‘पोस्टर्स’चे शहर
संजय बापट

काही वर्षांंपूर्वी तलावांचे, उद्योगधंद्यांचे शहर असा ठाण्याचा लौकिक होता. मात्र नागरीकरणाच्या लाटेत या शहराचे रूपच पालटून गेले. स्वच्छ आणि सुंदर शहराचा बहुमान मिळालेल्या याच शहराला कधी अनधिकृत बांधकामांचे तर कधी खड्डय़ांचे शहर म्हणून संबोधले जाऊ लागले. एकीकडे नवनवीन प्रकल्प, रस्ते रुंदीकरण आणि सौर ऊर्जेला दिले जाणारे प्राधान्य यामुळे या शहराला नवीन ओळख मिळत असताना दुसरीकडे कचऱ्याचे, टपऱ्यांचे शहर ही दूषणेही ठाण्यामागे चिकटून आहेत. त्यातच आता या शहराची पोस्टर्सचे शहर अशी नवी ओळख राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर होऊ लागली आहे. एकीकडे सौर ऊर्जेबाबत महापालिकेने केलेल्या योगदानाला जागतिक सन्मान मिळत असताना दुसरीकडे मात्र पोस्टर- होर्डिग्जमुळे होणाऱ्या हाणामाऱ्यांनी या शहराची सर्वत्र छी थू होत आहे. या बदनामीला जबाबदार कोण?

(अन्) कॉमन मॅन
संपदा वागळे

ठाण्यातील आमच्या ‘अत्रे’ कट्टय़ावर अनेक कट्टेकरी येतात. त्यापैकी काही चेहरे नावागावासकट स्मरणात राहण्याजोगे, तर काहींची उपस्थिती/अनुपस्थिती लक्षातही न येणारी. अशाच एका सर्वसामान्य मुखवटय़ामागे दडलेलं हे असामान्यत्व. या (अन्) कॉमन मॅनचं नाव ‘श्रीनिवास महादेव भाटलेकर’. वय वर्षं ७८. राहणार प्रभात बंगला, ब्राह्मण सोसायटी, ठाणे. या सद्गृहस्थांना थोरामोठय़ांच्या सह्या जमविण्याचा छंद आहे. हा सोस तसा अनेकांना असतो, पण भाटलेकरांचा तो ‘ध्यास’ आहे आणि त्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे. त्यांच्या संग्रहात सर डॉन ब्रॅडमनपासून मार्टिना नवरातिलोव्हापर्यंत, अंतराळवीर राकेश शर्मांपासून राजेश खन्नापर्यंत आणि इंदिरा गांधींपासून माधुरी दीक्षितपर्यंत सर्वांच्या सह्या आहेत आणि बहुतेक साऱ्या फोटोसकट. आपल्याजवळील सह्यांची रेंज दृष्टिक्षेपात कळावी यासाठी त्यांनी एक स्पेशल रजिस्टर (हस्तलिखित) बनवलं आहे.

चक्रव्युहात सोपी भूमिती
भगवान मंडलिक

इतिहास विषयातील सनावळ्या, अर्थशास्त्रातील सिध्दांत आणि भूमितीमधील प्रमेय अनेक विद्यार्थ्यांना ताप आणतात. ढ विद्यार्थी तर हे आव्हानाच नको म्हणून शाळा सोडण्याची तयारी करतात. अशा विद्यार्थ्यांना साधने, दृकश्राव्य माध्यम, चित्रफिती, चित्राच्या सहाय्याने शिकवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित विद्यार्थ्यांमध्ये त्या विषयाची आवड निर्माण होऊ शकते. भूमिती विषय वर्गात शिकवत असताना अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून हा विषय जात असल्याचे निदर्शनास येत होते. साधनाच्या माध्यमातून हा विषय शिकवला तर, असा विचार करून दादर नायगाव येथील सरस्वती हायस्कूलमधील गणिताचे शिक्षक भाऊसाहेब शिंदे यांनी आपला भूमिती हा विषय साधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्याचा विचार १९९० मध्ये सुरू केला. सहकारी शिक्षक, तज्ज्ञांशी चर्चा केली. छत्रीच्या काडय़ा, लाकडी वस्तू, कार्ड बोर्ड यांच्या माध्यमातून शिंदे यांनी वर्गात भूमितीमधील प्रमेय शिकवण्यास सुरूवात केली.

टिप्स- नवरदेवासाठी
सुचित्रा साठे

त्याचं लग्न आता चार दिवसांवर येऊन ठेपलं होतं. आज ग्रहमुख आणि घरचं केळवण होतं. साठ-सत्तर जवळच्या नातलगांनी हॉल भरून गेला होता. आधी देवदेवकं, मग देणीघेणी उरकली होती. मस्त जेवणाचा आस्वाद घेऊन सर्व मंडळी जरा सैलावली होती. या लग्नाच्या निमित्ताने भेटीगाठी झाल्या होत्या. त्यामुळे कोंडाळ करून आपापसात गप्पांचे फड रंगले होते. सकाळपासून दगदग झाली असली तरी आतापर्यंत योजलेला कार्यक्रम व्यवस्थित झाल्याचं समाधान ‘वरमाई’च्या चेहऱ्यावर विलसत होतं. एक लेखिका, सूत्रसंचालिका या भूमिकांत ती सतत वावरत असल्यामुळे काहीतरी नावीन्यपूर्ण कल्पना तिच्या डोक्यात आली. ध्वनिक्षेपकाचा ताबा घेत सर्वाचे लक्ष तिने आपल्याकडे वेधून घेतलं. गप्पांचे सगळे गोल विस्कटले आणि सगळ्या उत्सुक नजरा वरमाईकडे वळल्या.

ओबामांचा शपथविधी ऑनलाइनच्या जाळ्यात
डॉ. प्र.ज. जोगळेकर

ओबामांच्या शपथविधी सोहळ्यास जमलेल्या वीस लाखांहूनही अधिक जनसमुदायाला मोबाइल फोन सेवा अबाधितपणे पुरविण्यासाठी कसे शर्थीचे प्रयत्न केले होते, याची सविस्तर चर्चा २५ जानेवारीच्या लेखात केली होती. जे लोक या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, अशांसाठी तो सोहळा इंटरनेटद्वारा दाखविण्याची सोय सी.एन.एन. डॉट कॉम आणि इतर कंपन्यांनी केली होती, पण त्यांनाही सर्व लोकांना एकाच वेळी शपथविधीची दृश्ये दाखविता आली नाहीत आणि ग्राहकांना ‘कृपया प्रतीक्षा करा, आपण रांगेत आहात’ असा संदेश पाठवावा लागला. इंटरनेटच्या माध्यमातून टीव्ही दाखविण्यावर बॅन्डविड्थच्या मर्यादा पडतात. तशा मर्यादा टीव्हीच्या प्रक्षेपणावर पडत नाहीत. हा काय प्रकार आहे? ही दोन माध्यमे वेगळ्या तत्त्वांवर काम करतात अशा मोघम खुलाशावर ज्यांचे समाधान होणार नाही त्यांना या दोन माध्यमांची कार्यपद्धती कशी असते, हे समजून घेणे आवश्यक आहे.