Leading International Marathi News Daily

रविवार , १ फेब्रुवारी २००९

विविध

मराठी संगीत रंगभूमीने दिल्ली जिंकली
सुरेंद्र कुलकर्णी

राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारोहानिमित्त आयोजित ११ व्या भारत रंग महोत्सवात शुभारंभाच्या प्रयोगाचा मान मराठी संगीत रंगभूमीला मिळाला. दिल्लीतील सात विविध नाटय़गृहात आयोजित या समारोहात देश-विदेशांतील नाटय़संस्थांनी एकूण ६४ नाटय़प्रयोग सादर केले. यात कामानी नाटय़गृहात, उद्घाटनानंतर मुंबईच्या ‘नाटय़संपदा’ नाटय़संस्थेने ‘अवघा रंग एकचि झाला’ हा नाटय़प्रयोग सादर करताना महाराष्ट्राच्या सशक्त संगीत रंगभूमीचे दर्शन घडविले. स्वरांगी मराठी हिने अतिशय तयारीने सादर केलेल्या पदांसाठी वाहवा मिळविली. ८१ वर्षीय ज्येष्ठ कलाकार प्रसाद सावकार यांच्या अभिनयाच्या विविध छटा, दमदार आवाजातील नाटय़पदे आणि विलक्षण चपळाईच्या हालचाली प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. तरुण गायक कलाकार अमोल बावडेकर याने उत्कृष्ट अभिनयासह आपल्या खडय़ा आवाजात म्हटलेल्या पदांनी ‘जुने विरुद्ध नवे विचार’ या नाटकाच्या संकल्पनेला खुलवून उत्तरोत्तर रंग आणला. नाटय़प्रयोगाच्या शेवटी नाटकाच्या लेखिका, निर्माता व कलाकारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी उद्घाटन समारंभात नव्वदी पार केलेल्या भारतीय रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार झोहरा सेहगल यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रीय रंगभूमीच्या आवश्यकतेवर भर दिला. विद्यालयाच्या अध्यक्षा अमाल अल्लाना, संचालिका अनुराधा कपूर आणि प्रमुख पाहुणे केंद्रीय सांस्कृतिक कार्य सचिव जवाहर सरकार यांचीही या प्रसंगी भाषणे झाली.

मुंबई हल्ल्यासंदर्भात अडवाणींनी केलेली चौकशीची मागणी केंद्राने फेटाळली
नवी दिल्ली , ३१ जानेवारी/पीटीआय

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासाठी कारणीभूत ठरलेल्या विविध यंत्रणांतील त्रुटी व योग्य समन्वयाचा अभाव या गोष्टींची चौकशी करण्यात यावी ही भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केलेली मागणी आज केंद्र सरकारने फेटाळून लावली. मुंबईवर झालेल्या हल्ल्याची मुंबई पोलीस चौकशी करीत आहेत असे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तेथील पोलीस चौकशी करीत आहेत असे सांगून या चौकशीचा अहवाल न्यायालयाला सादर करण्यात येईल. त्यानंतर या प्रकरणी अटक केलेल्यांवर आरोपपत्र बजावण्यात येऊन न्यायालयात खटला चालविण्यात येईल असे सांगून पी. चिदम्बरम पुढे म्हणाले की , भारताने सादर केलेल्या पुराव्यांची छाननी करून मुंबई हल्ल्यासंदर्भात सखोल चौकशी करण्यात येईल असे पाकिस्तानने जाहीर केले होते. या चौकशीच्या अहवालाची माहिती भारताला देण्यात येईल असेही या देशाने जाहीर केले होते. आता प्रत्यक्षात काय होते हे येत्या काही दिवसांत दिसून येईल. मुंबईवरील हल्ल्यात सहभागी असलेला व पोलिसांनी अटक केलेला दहशतवादी अजमल आमीर खान कसाब हा मरण पावला असल्याच्या बातम्या पाकिस्तानात प्रसारित झाल्या आहेत. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पी. चिदम्बरम म्हणाले की , अशा बातम्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य नाही. दरम्यान नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय धोरण आखण्याची आवश्यकता नाही असे यासंदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना पी. चिदम्बरम म्हणाले. आसाममध्ये हिंसाचार सुरुच असल्याच्या पाश्र्वभूमीवर बंदी घातलेल्या उल्फा या संघटनेशी चर्चा करण्याचा कोणताही विचार नाही असेही ते म्हणाले. काश्मिरमधील एका व्यावसायिकाला दिलेल्या पद्मश्री पुरस्कारावरून उठलेल्या वादळासंदर्भात ते म्हणाले की , पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांची निवड करताना कोणताही गैरप्रकार झालेला नाही.

अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदीही आता कृष्णवर्णीय
वॉशिंग्टन, ३१ जानेवारी/पीटीआय

बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आणि अमेरिकेने इतिहास घडविला. यानंतर ओबामा यांच्या विराधी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सदस्यांनी कृष्णवर्णीय मायकेल स्टील यांना पसंती दर्शविली.
आफ्रिकन-अमेरिकन असणारे मायकेल स्टील यांची रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख पदी नेमणूक करण्यात आली आहे. स्टील हे पक्षाचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष ठरले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे ओबामा यांनी केवळ व्हाईट हाऊसच नव्हे तर अमेरिकेतील काँग्रेसच्या अनेक जागा बळकाविण्यात यश मिळविले होते. त्यांना शह देण्यासाठी स्टील हे उत्तम दावेदार असल्याचे पक्षातर्फे बोलले जात आहे. स्टील यांच्या समोर पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी केटॉन डावसॉन उभे होते. स्टील यांना त्यांचा ९१ विरुद्ध ७७ मतांनी पराभव केला. आपल्या निवडीनंतर भाषण करताना स्टील यांनी पक्षातील सर्व सदस्यांचे आभार मानले.

पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक देश - अल्ब्राईट
वॉशिंग्टन, ३१ जानेवारी/पीटीआय

पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत आणि त्या देशात दहशतवादही आहे. त्यामुळे तो जगाला डोकेदुखी असलेला एक अत्यंत धोकादायक देश बनला आहे, असे अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री मॅडेलीन अल्ब्राईट यांनी नुकतेच येथे म्हटले. पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत; दहशतवाद तेथे फोफावला आहे, यामुळे तो धोकादायक आहेच, त्याशिवाय दारिद्रय़ व भ्रष्टाचाराने तो देश पोखरला गेला आहे व तेथील राजकीय व्यवस्था अत्यंत ठिसूळ आहे. पाकिस्तान हा सामरिक दृष्टीनेही अतिशय नाजूक व अवघड भूभागावर आहे. या सर्व बाबींमुळे तो जगासाठी एक मोठी डोकेदुखी बनलेला आहे, असे अल्ब्राईट यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले. ‘अमेरिकेचे मुस्लिम जगताशी संबंध’ या विषयावर त्या एका परिसंवादात बोलत होत्या. बिल क्लिंटन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अल्ब्राईट या परराष्ट्रमंत्री होत्या. ‘जगातील सर्वात धोकादायक देश कोणता, हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारला जातो. याबाबतीत मी पाकिस्तानचेच नाव घेईन,’ असे सांगून अल्ब्राईट पुढे म्हणाल्या, ‘पाकिस्तान व अफगाणिस्तान या देशांकरिता विशेष प्रतिनिधी म्हणून रिचर्ड हॉलब्रुक यांची अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नियुक्ती केली आहे, यावरूनच ओबामा हे या देशांविषयी किती गंभीरपणे विचार करतात, हे दिसून येते.’पाकिस्तानचे अध्यक्ष आसीफ अली झरदारी यांची प्रशंसा अल्ब्राईट यांनी केली. फगाणिस्तानच्या संदर्भात अमेरिकेला मदत करण्याचे झरदारी यांचे धोरण आहे, यावरून त्यांना अमेरिकेशी चांगले संबंध ठेवायचे असल्याचे दिसून येते, असे त्या म्हणाल्या. ‘मात्र पाकिस्तानचे सैन्य व आयएसआय ही गुप्तहेर संघटना यांनी अमेरिकेचे हे संबंध समजून घेतले पाहिजेत,’ असेही त्यांनी नमूद केले.