Leading International Marathi News Daily                                सोमवार , २ फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

अग्रलेख

शेतीवाडी

लाल किल्ला

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

सानिया-भूपतीला मिश्र दुहेरीचे विजेतेपद
मेलबर्न, १ फेब्रुवारी / पीटीआय

युकी भांब्रीने ज्युनियर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावून भारतीय टेनिसचा ठसा उमटविलेला असताना याच स्पर्धेत मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांनीही विजेतेपद पटकावून भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला. भूपतीचे हे दुहेरी, मिश्र दुहेरीतील असे ११वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे.
सानिया आणि महेश भूपतीला या स्पर्धेत वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता. मात्र मिळालेल्या या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करीत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आणि विजेतेपदासाठी झालेल्या लढतीत अ‍ॅन्डी राम व नताली डेकी यांना ६-३, ६-१ असे नमवित विजेतेपदाला गवसणी घातली.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ पोलीस शहीद गडचिरोलीतील जंगलात चकमक सुरूच
गडचिरोली / चंद्रपूर, १ फेब्रुवारी/ वार्ताहर/प्रतिनिधी

गडचिरोली जिल्हय़ात छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या ग्यारापत्ती पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मरकेगावजवळ आज पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत एका पोलीस अधिकाऱ्यासह पंधरा पोलीस शहीद झाले. गेल्या दहा वर्षांतील ही सर्वात मोठी घटना असल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गेल्या दहा वर्षांत नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. याआधी तीन वर्षांपूर्वी भामरागड येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या सुरूंग स्फोटात आठ जवान शहीद झाले होते. गडचिरोली जिल्हय़ातील धानोरा तालुक्यात ग्यारापत्ती पोलीस ठाणे येते. छत्तीसगडच्या सीमा लागून असलेल्या या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावरगाव ते कोटगुल मार्गावर दोन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी एक रोलर व एक ट्रॅक्टर जाळले होते. या मार्गावर एका पुलाचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे, यासाठी नक्षलवाद्यांनी ही जाळपोळ केली होती.या घटनेची चौकशी करण्यासाठी ग्यारापत्ती पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भूपेंद्र गुडघेकर त्यांच्या चौदा सहकाऱ्यांसह आज सकाळी घटनास्थळाकडे पायीच रवाना झाले.

अमेरिकेतील वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी गिरविणार आयुर्वेदाचे धडे
सुनील डिंगणकर, मुंबई, १ फेब्रुवारी

भारतीय आयुर्वेदाची परंपराही सुमारे पाच हजार वर्षांपासूनची आहे. असे असूनही भारत वगळता इतर देशांमध्ये त्याबद्दल एवढी माहिती नव्हती. मुंबईस्थित डॉ. एच. एस. पालेप यांच्या प्रयत्नांतून येत्या काही काळात मात्र अमेरिकेतील वैद्यकीय संस्थांमध्ये आयुर्वेदाचा अभ्यास शिकवला जाईल, असे संकेत मिळाले आहेत. याबद्दलचे पहिले पाऊल म्हणजे बोस्टन युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलचा विद्यार्थी आयुर्वेदाचे शिक्षण घेण्यासाठी गुजरात आयुर्वेदिक विद्यापीठात प्रवेश घेणार आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने आयुर्वेदाचा अभ्यासक्रम अमेरिकेतील वैद्यकीय संस्थांमध्येही सुरू होणार आहे.

मराठा आरक्षणकरिता प्रसंगी बलिदानाची तयारी - विनायक मेटे
मुंबई, १ फेब्रुवारी/प्रतिनिधी

अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाचे हित जपण्याकरिता बलिदान दिले. त्याचप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याकरिता बलिदान देण्याची आपली तयारी आहे, अशी ग्वाही मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज दिली. मराठा आरक्षणाला विरोध करणारे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांना मेटे यांनी टीकेचे लक्ष्य केले. रस्ता रोको, मंत्र्यांना घरात कोंडणे व त्यानंतर आरपारची लढाई, असा भावी आंदोलनाचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला.

पृथ्वीवरील जीवसृष्टीचा स्रोत अंतराळातूनच - प्रा. विक्रमसिंघे
मुंबई, १ फेब्रुवारी / प्रतिनिधी

पृथ्वीवरील जीवसृष्टी ही पृथ्वीवर निर्माण झाली नसून त्याचा स्रोत अंतराळात आहे, असे प्रतिपादन कार्डिफ विद्यापीठातील खगोलजैवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. एन. चंद्रा विक्रमसिंघे यांनी आज केले. ‘नेहरू तारांगण’ या संस्थेतर्फे ‘माईलस्टोन इन अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या व्याख्यानमालेअंतर्गत वरळी येथील नेहरू केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रोग्रेस टुवर्ड्स अनरॅवेलिंग अवर कॉस्मिक अ‍ॅन्सेस्ट्री’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. सुमारे ३५ वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेल्या सिद्धांताविषयी आज त्यांनी विस्तृतपणे माहिती दिली आणि हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी त्यांनी शोधलेले पुरावेही आज त्यांनी सादर केले.

जास्त जागांवर दावा करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी सज्ज !
मुंबई, १ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

निम्म्या-निम्म्या की २७ व २१ किंवा २६ व २२ हे लोकसभेच्या जागांचे सूत्र ठरविण्याकरिता काँग्रेस व राष्ट्रवादीचे तयार गडी सज्ज झाले आहेत. उद्यापासून मुंबईत सुरू होणाऱ्या जागावाटपाच्या चर्चेत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे प्रयत्न असून, प्रत्यक्ष चर्चा सुरू होण्यापूर्वीच कोणी किती जागा लढवायच्या यावरून उभय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप व टीकटिप्पणी सुरू झाली आहे. लोकसभेसाठी जागावाटपाची चर्चा करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने समित्या स्थापन केल्या आहेत.

मनमोहन सिंग ‘एम्स’मधून घरी परतले
नवी दिल्ली, १ फेब्रुवारी/पीटीआय
कोरोनरी बायपास शस्त्रक्रियेनंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती सुधारली असून, त्यांना आज अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून (एम्स) घरी जाऊ देण्यात आले. आठवडाभराहून जास्त काळ ते रुग्णालयात होते. केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदोस यांनी सांगितले, की एम्समधून घरी जाऊ देण्यात आल्यानंतर पंतप्रधान अतिशय आनंदात होते. त्यांनी सध्याच्या घडामोडींबाबत चौकशीही केली. त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. रामदोस म्हणाले, की आणखी २ ते ३ आठवडय़ांनी ते त्यांच्या कार्यालयात यायला लागतील व काम सुरू करतील अशी आशा आहे. सध्या ते घरात बसूनच काम करणार आहेत. घरी जाण्यासाठी मोटारीत बसताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सर्व डॉक्टर व परिचारिका यांचे आभार मानले.

तहलका स्टिंग ऑपरेशन पूर्ण खोटे नव्हते -जेटली
नवी दिल्ली, १ फेब्रुवारी / पीटीआय
तत्कालिन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस व त्यांच्या सहकारी जया जेटली यांच्याबरोबर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला २००१ मध्ये अडचणीत आणणाऱ्या तहलका स्टिंग ऑपरेशनचा अहवाल पूर्णपणे खोटा नव्हता, असे मत त्यावेळचे कायदामंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार मधू त्रिहान यांना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. त्रिहान यांनी ५८७ पानांचे ‘तहलका अ‍ॅज मेटॅफोर’ या नावाचे पुस्तक लिहिले असून त्यासाठी दिलेल्या मुलाखतीत जेटली म्हणतात, फर्नाडिस, जेटली यांनी इन्काराचा सूर लावला असला तरी भाजपचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण निर्दोष नव्हते याची आपणाला खात्री होती. पक्षासाठी निधी स्वीकारत असल्याची तहलकाची टेप पाहिल्यावर हा अहवाल पूर्ण खोटा नसल्याचे आपले मत झाले. त्यावेळी वाजपेयी यांनी प्रमोद महाजन, व्यंकय्या नायडूसह आपणाला त्यांच्या निवासस्थानी बोलावले, लक्ष्मण यांनाही बोलावले. त्यापूर्वी लक्ष्मण यांच्याकडे चौकशी करण्यात आली व त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय झाला.

नदाल ऑस्ट्रेलियन ओपनचा जेता; फेडररची संधी हुकली
चौदा ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदे जिंकण्याचे रॉजर फेडररचे स्वप्न आज उद्ध्वस्त झाले. राफेल नदालने फेडररला पाच सेटपर्यंत अत्यंत रोमांचक अशा सामन्यात कडवी झुंज देत विजेतेपद पटकविले. स्पेनच्या खेळाडूने जिंकलेले हे ऑस्ट्रेलियन ओपनचे पहिले विजेतेपद होते.

केनयात पेट्रोल टँकरचा स्फोट; १११ ठार
मोलो (केनया), १ फेब्रुवारी/ए.पी.

केनयात एका उलटलेल्या पेट्रोल टॅन्करचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत १११ जणांचा मृत्यू झाला असून एकूण २०० जखमी झाले. या टॅन्करमधून अनेक जण पेट्रोल पळवून नेण्याच्या प्रयत्नात असतानाच हा स्फोट झाल्याने मृतांची संख्या जास्त आहे. अनेक लहान मुलांना भाजल्याच्या तीव्र जखमा झाल्या असून सर्व रुग्णालये भरून गेली आहेत. स्फोट झाल्यानंतर अनेकांच्या शर्टाने पेट घेतला आणि ही आग विझविण्यासाठी अनेक जण आजूबाजूच्या झुडपांमध्ये जाऊन लोळण घेत होते असे या भागातून व्हॅन घेऊन जाणाऱ्या चालक चार्ल्स कामाऊ याने सांगितले. एक माणूस सिगरेट ओढत होता व त्याच्याचमुळे या टॅन्करचा स्फोट झाल्याचे केनियाचे पंतप्रधान रैला ओडिंगा यांनी एका वार्ताहर परिषदेत सांगितले.

‘माहिती अधिकारातून मंत्री व त्यांच्या नातेवाइकांच्या मालमत्तेची माहिती देता येणार नाही’
नवी दिल्ली, १ फेब्रुवारी/पीटीआय

मंत्री व त्यांच्या नातेवाइकांच्या मालमत्तेचा तपशील माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या विनंतीनुसार देता येणार नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. सुभाष चंद्र अग्रवाल यांनी माहितीच्या अधिकारात सादर केलेल्या अर्जावर पंतप्रधान कार्यालयाने असे सांगितले, की आरटीआय अ‍ॅक्टच्या कलम ८ अन्वये मंत्री व त्यांच्या नातेवाइकांच्या मालमत्तेचा तपशील देता येणार नाही. पंतप्रधान कार्यालयाने सुरुवातीला अशा प्रकारची माहिती मंत्रिमंडळ सचिवालयाला दिली होती जेणेकरून माहिती अधिकारातील अर्जाना उत्तरे देणे सोपे होईल, पण नंतर अचानक घूमजाव केले. अग्रवाल यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज सादर करून केंद्रीय मंत्री व त्यांच्या नातेवाइकांच्या मालमत्तेची गेल्या दोन वर्षांतील माहिती मागवली होती. त्यांचे हे पत्र पंतप्रधान कार्यालयाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले असता त्यांना ही माहिती देण्यास नकार मिळाला. १९ मे २००८ रोजी पंतप्रधान कार्यालयाने मंत्र्यांची मालमत्ता व दायित्व यांची माहिती मंत्रिमंडळ सचिवालयाला दिली होती व त्याचा उद्देश आरटीआय अर्जाना उत्तरे देता यावीत हाच होता, असे सांगून अग्रवाल म्हणाले, की कुठल्याही कार्यालयाकडून मला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सहा महिन्यांनी पंतप्रधान कार्यालयाने १७ डिसेंबर २००८ रोजी एक पत्र पाठवले. त्यात असे म्हटले होते, की मंत्री व त्यांच्या नातेवाइकांच्या मालमत्तेची माहिती देता येणार नाही. माहिती अधिकार कायद्यातील कलम ८ (१) (इ) व ८(१)(जे) अन्वये आम्ही अशी माहिती देऊ शकत नाही.

प्रवाशाच्या धमकीमुळे विमानाचे ‘इमर्जन्सी लॅण्डिंग’
नवी दिल्ली, १ फेब्रुवारी/पीटीआय

दिल्लीहून गोव्याकडे जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानाचे आज दोन प्रवाशांच्या त्रासदायक वागण्यामुळे इमर्जन्सी लॅण्डिंग करावे लागले. सुरक्षा व हवाई वाहतूक सूत्रांनी सांगितले की, काही प्रवासी बेशिस्त वागून त्रास देत असल्याचे वैमानिकाने नियंत्रण कक्षाला कळवले होते. हे विमान सायंकाळी साडेपाच वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. हवाई वाहतूक सचिव एम.माधवन नंबियार यांनी सांगितले की, दोन प्रवाशांनी विमानात आक्रमक रूप धारण केले व अपहरणाची धमकी दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या विमानाचे इमर्जन्सी लॅन्डिंग करण्याचे आदेश दिले व नंतर हे विमान उतरवण्यात आले. या प्रकरणी त्या त्रासदायक प्रवाशांची चौकशी सुरू असल्याचे रात्री उशिरा सांगण्यात आले.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८