Leading International Marathi News Daily
सोमवार , २ फेब्रुवारी २००९

आर्थिक मंदी! संकटात दडलेली संधी!!
जगभरात आलेल्या आर्थिक मंदीची लाट सर्वत्र असल्यामुळे कोणीही त्यास अपवाद नाही. आपल्यावरसुद्धा तिचे सावट आले आहे. हे संकट अटळ असल्यामुळे त्यास सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही. मंदीवर मात करणे अवघड असले तरी अशक्य नाही. या संकटाकडे संधी म्हणून पाहून या संधीचा पुरेपूर फायदा घेणे आपल्या हातात आहे. मंदी संपून तेजी कधी येणार व मंदीची तीव्रता किती वाढेल हे आपणास माहीत नाही.
म्हणून हे आव्हान आपण सर्वानी मिळून त्वरित पेलायचे आहे. कंपनी व व्यवसाय यामधील प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने भार उचलू शकेल. गरज आहे सकारात्मक विचाराची व एकजुटीने काम करण्याची. आम्ही या मंदीमधून सुखरूप बाहेर पडणार असाच विचार सतत करा. हा विचार आपणास आधार देईल व आपली मानसिकता बदलल्यामुळे हळूहळू तसे घडेल. आपणास याचा मुकाबला

 

कसा करता येईल हे उद्योजक व त्याचे सहकारी यांच्या संवादातून पाहूया.
आर्थिक मंदीबद्दल सर्वच बोलतात.
पण तिची लक्षणे काय?
मंदीची लक्षणे
मंदी आलेली आहे हे आपणास खालील लक्षणांवरून समजते :
उत्पादनास मागणी कमी होत आहे.
तयार झालेल्या मालास उठाव नाही.
उत्पादन, उत्पन्न व नफा यात घट होते.
प्रत्येक ग्राहक उत्पादन कमी किमतीत मागत आहे.
पुरवठा केलेल्या मालाचे ग्राहकाकडून वेळेत पैसे मिळत नाहीत.
ग्राहक स्वत:कडे आपल्या मालाचा साठा करीत नाही.
ग्राहक त्वरित पुरवठय़ाची व तत्पर सेवेची अपेक्षा करतात.
ग्राहक दिलेल्या Orders सुद्धा Hold करत आहे.
ही लक्षणे दिसतात.
पण मंदी येण्याची कारणे काय?
मंदीची कारणे
कोणतीही समस्या सोडविताना तिच्यामागील मूळ कारणे समजणे आवश्यक असते. समस्या कायमस्वरूपी सुटण्यासाठी परिणामावर तात्पुरते उपाय व कारणांवर कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज असते.
बाजारपेठेच्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन होणे.
बाजारपेठ संपृक्त (Saturated) होणे.
ग्राहकांची क्रयशक्ती (Purchase Power) कमी होणे.
क्रयशक्ती असलेल्या ग्राहकांनी दक्षता म्हणून खरेदी थांबविणे.
जागतिकीकरणामुळे व्यवसायाने सर्व देश एकमेकांशी जोडले आहेत. इतर देशांतील मंदी आपल्या देशातील मंदीस कारणीभूत असू शकते.
सतत मंदीबद्दल प्रसारित होणाऱ्या बातम्यांचा ग्राहकांच्या मानसिकतेवर प्रभाव होऊन ग्राहक खर्चाबद्दल दक्ष होतो.
देशातील व्यवसायाची सर्व क्षेत्रे एकमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निगडित असल्यामुळे एका क्षेत्राचा दुसऱ्यावर प्रादुर्भाव होतो.
व्यवसायात प्रत्येक वर्षी सातत्याने वाढीची अपेक्षा अनैसर्गिक आहे.
काही वर्षे तेजीत उपभोगल्यानंतर मंदी येणे नैसर्गिक आहे.
धोरणात नवनिर्मिती करणाऱ्या क्षेत्रास प्राधान्य नाही; परंतु भोगवाद वाढविणाऱ्या उत्पादनास मात्र उत्तेजन मिळते.
काही क्षेत्रांसाठी अवाजवी पगार, परतफेडीची क्षमता नसताना दिलेले कर्ज, व्याजदर कमी, जाहिरातींची प्रलोभने यामुळे ग्राहकांनी गरजेपेक्षा प्रतिष्ठेसाठी खरेदी केली. त्याची परतफेड न झाल्यामुळे खरेदी केलेल्या वस्तू विक्रीस निघाल्या व विक्री न झाल्यामुळे वित्तसंस्थेस त्याचा फटका बसला; असे चक्र सुरू होऊन त्याचे रूपांतर मंदीत झाले.
ही कारणे समजली.
पण त्याचे परिणाम काय होणार?
मंदीचे परिणाम
या कारणाचे उत्पादक व व्यावसायिक यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होतात. काही परिणाम त्वरित दिसतात तर काही उशिराने एवढेच.
उत्पादनास मागणी कमी झाल्यामुळे कच्च्या मालाची खरेदी कमी होऊन बदलता खर्च (Variable Cost) कमी होते; परंतु स्थिर खर्च (Fixed Cost) कमी न करता आल्यास व्यवसायातील नफ्याचे प्रमाण कमी होते.
मंदी अधिक काळ राहिल्यास किंवा तिची तीव्रता वाढल्यास तोटाही होऊ शकतो.
ग्राहकाकडून पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे कंपनीची आर्थिक घडी विस्कळीत होते.
ग्राहकाने मालाची त्वरित अपेक्षा केल्यामुळे साठा उत्पादकास करणे क्रमप्राप्त असते. वर या साठय़ामध्ये त्याची गुंतवणूक होते.
मंदीमुळे उद्योजकाची मानसिकता खचण्याची शक्यता असते.
अत्यावश्यक गरजांच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्यावर याचा परिणाम होत नाही. मूलभूत गरजांसाठी उत्पादन करणाऱ्या उत्पादकावर त्याचा परिणाम कमी होतो. भांडवली मालाचे उत्पादन करणाऱ्यावर त्याचा जास्त परिणाम होतो. तर चैनीच्या वस्तू निर्माण करणाऱ्यावर त्याचा परिणाम सर्वाधिक होतो.
हे परिणाम समजले.
पण ते सुसह्य़ करण्यासाठी कोणत्या दक्षता घ्याव्यात?
मंदीच्या काळात दक्षता
मंदीच्या काळात खर्च होणाऱ्या प्रत्येक बाबीची दक्षता घ्यावी लागेल. ज्या गोष्टीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पैसा खर्ची पडतो त्या प्रत्येक बाबतीत बचत! बचत! बचत! करा. हा पैसा स्वत:, कंपनीने किंवा इतर कोणीही खर्च केलेला असला तरी तो वाचवा. ही बचत आपणास तीन पातळीवर करता येईल.
वैयक्तिक बचत
बचतीचा हा पंचक आपण वैयक्तिक, कंपनी व घर या तीन ठिकाणी राबवू शकता.
परिवर्तन (Reform) बचतीसाठी विचारात, कामाच्या पद्धतीत, राहणीमानात व जीवनशैलीत बदल करा.
अनावश्यक वापर टाळा. (Refuse)
अनावश्यक कोणतीही वस्तू वापरू नका. वस्तू किंवा सेवा घेण्यापूर्वी ती आवश्यकच आहे का, हा प्रश्न दोन वेळा विचारा.
कमीत कमी वापर. (Reduce) वस्तू आवश्यक असली तरी तिचा वापर कमी करा. ती वस्तू आवश्यक आहे असे समजल्यास ती कमीत कमी किती वापरून काम होईल हे पाहा.
पूर्ण वापर. (Complete Use)
घेतलेल्या वस्तूचा पूर्ण वापर झाला आहे का हे पाहा.
पुनर्वापर. (Reuse)
घेतलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करा. या वस्तूंचे राहिलेले अंश दुसऱ्या कशासाठी वापरता येतील याचा विचार करा.
कंपनीत बचत
कंपनीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी काम करताना प्रत्येकाने बचत केल्यास कमीत कमी खर्चात उत्पादन तयार होईल किंवा सेवा देता येईल. त्यामुळे बाजारपेठेत किमतीच्या पातळीवर आपल्या उत्पादनास प्राधान्य मिळेल.
कच्चा माल-खरेदी करताना, वापर करताना, साठविताना व साठा करताना प्रत्येक पायरीवर बचत करता येईल.
वेळ- आपल्या प्रत्येक मिनिटास मूल्य आहे. म्हणून एकही मिनिट वाया न घालविणे. ज्यादा वेळात (Overtime) काम करणे थांबविणे, खूप तातडीचे झाल्यासच ही सुविधा वापरणे.
वीज, इंधन व पाणी- गरजेपुरताच वापर. याची बचत करण्याचे मार्ग प्रत्येकाला सापडतील.
यंत्रसामुग्री व हत्यारे यांचा काटेकोर व काळजीपूर्वक वापर करा.
फोन व कार्यालयातील स्टेशनरी गरजेपुरतीच वापरा.
घरगुती बचत
आपल्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवून किमान खर्चावर आधारित कुटुंब व्यवस्थापन राबवा. त्यात घरच्या सभासदांना सहभागी करा. जाहिरातीस भुलून अनावश्यक खरेदीचा मोह टाळा.
गरजा व खर्च यासाठी करा-टाळा आचारसंहिता
ही बचतीची दक्षता आम्ही बांधीलकी म्हणून स्वीकारतो.
पण तेवढय़ाने मंदीवर मात करता येईल काय?
मंदीवर उपाय
वर सांगितलेली दक्षता घेतल्यास मंदीच्या काळात जास्त दिवस तग धरता येईल. परंतु मंदीवर मात करण्यासाठी ठोस उपायांची गरज आहे. जगामधील अशी कोणतीही समस्या नाही की ज्यावर उपाय नाही. गरज आहे खचून न जाता वेळेत त्यावर नियोजन व कृती करण्याची. हे उपाय आपणास बळ देतील व मंदीवर मात करता येईल.
आपल्याकडील ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य, क्षमता, अनुभव, वेळ, साधनसामुग्री, सुविधा व प्रतिमा यांचा पुरेपूर वापर करणे.
या काळात नवीन भांडवली गुंतवणूक अजिबात नको.
विचाराधीन असलेली उत्पादने विकसित करणे.
भविष्यात लागणारे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे.
उत्पादन मालिकेमध्ये मूल्यवृद्धी करणे.
उत्पादन मालिकेमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करणे.
उत्पादन मालिका निर्मितीसाठी सुलभ करणे.
उत्पादन मालिकेचे Documentation अद्ययावत करणे.
मंदी नसलेल्या क्षेत्रामध्ये उत्पादनास बाजारपेठ प्रस्थापित करणे.
आक्रमक विक्री व्यवस्थापन राबविणे व Order मिळविण्यासाठी उत्पादनाच्या किमतीत लवचिकता ठेवणे.
ग्राहकांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे.
कंपनीस व उत्पादनास अवश्य ते सर्व प्रामाणपत्र मिळविणे.
कच्च्या मालासाठी असलेले भांडार (Stores) व्यवस्थित लावणे.
अधिक मागणी असलेल्या उत्पादनाच साठा करणे.
उत्पादकता व दर्जा नियंत्रणासाठी लागणारी उपकरणे तयार करणे.
कंपनीच्या कामात सुसूत्रता येण्यासाठी पद्धत, प्रणाली व सुसंवाद प्रस्थापित करणे.
तेजी असताना न करता आलेली आवश्यक कामे हातात घ्या.
कंपनीतील प्रत्येक विभागात स्वच्छता व टापटीप राखणे.
कंपनीसाठी उपलब्ध संधी (Opportunity) व त्यातील धोके (Threats) विचारात घेऊन उपाययोजना करणे.
कंपनीमधील सहकार्याची ताकद (Strength) व कमजोरीचा (Weakness) ताळेबंद मांडून आवश्यक तेथे प्रशिक्षणाद्वारे सबलीकरणे करणे.
मंदीवर मात करण्यासाठी ही उपाययोजना राबविण्याचा आम्ही ध्यास घेत आहोत.
सामूहिक भूमिका
या मंदीच्या काळाच सर्वानी धीर न सोडता सांगितलेली दक्षता व उपाय प्रत्यक्ष आचरणात आणल्यास आपण या संकटावर मात करू शकतो याची खात्री बाळगा.
सांगितलेली दक्षता घेतल्यास त्यातून होणारी छोटीशी बचत आपणास मंदीत तग धरण्यासाठी आधार देईल. त्यासाठी एवढय़ाशा बचतीने काय होणार, ही कल्पना सोडून देण्याची गरज आहे.
वरील उपायांमध्ये आपण कितीतरी अधिक भर घालू शकाल. हे उपाय मंदीवर मात करण्यासाठी बळ देणार आहेत. आपला उपलब्ध वेळ तुंबलेली कामे करण्यास व आपली क्षमता-कौशल्ये वाढविण्यास वापरल्यास तेजीमधील आव्हाने पेलणारा कार्यक्षम संघ तयार होईल. या लेखातील दक्षता व उपाय हे केवळ मंदीसाठी नसून नियमित सरावाचे आहेत. त्याचा सराव केल्यास ती आपली कार्यपद्धती व जीवनशैली होईल. यासाठी मंदी ही एक संधी आहे. मनुष्यबळात मार्गाचा शक्यतो वापर करू नये. आपल्याकडील अनुभवी मनुष्यबळ हा एक ठेवा (Assets) आहे. त्याची उभारणी करताना आपण त्यांच्यामध्ये गुंतवणूक केलेला आहे. हा ठेवा जपणे हे आपले कर्तव्य आहे. अन्यथा मंदीतून बेरोजगारी जन्म घेईल. या मनुष्यबळाच्या योगदानातूनच आपला व्यवसाय वाढलेला आहे. तेही आपल्या कुटुंबातील सभासद आहेत. तेजीनंतर मंदी येणे हे जसे नैसर्गिक आहे तसेच मंदीनंतर पुन्हा तेजी येणार हेसुद्धा नैसर्गिकच आहे. तेव्हा धीर न सोडता शेवटपर्यंत बरोबर राहण्याची सामाजिक बांधीलकी स्वीकारून एक भाकरी दोघात खाण्याची संस्कृती जपूया
पांडुरंग शितोळे