Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

लोकमानस

‘लिटल चॅम्प्स’ला विस्मरण महात्म्याचे, हुतात्म्यांचे .. !
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने झी टीव्हीवर सादर झालेल्या ‘शूरा मी वंदिले’ या लिटल चॅम्प्सच्या विशेष भागाची एकंदर संकल्पना लक्षात घेता ती खूपच चांगली होती. नेहमीप्रमाणेच या मुलांनी कठीण गाणी गाण्याचे आव्हान लीलया पेलले. परंतु तिथे उपस्थित असलेली एक प्रेक्षक म्हणून मनाला न पटलेल्या व टीव्हीवरील कार्यक्रमात न दाखवलेल्या काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. हृदयनाथ मंगेशकरांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडताना टिळक, भगतसिंग, सावरकर, वासुदेव बळवंत फडके यासारख्यांची नावे आवर्जून घेतली. परंतु त्या कार्यक्रमानंतर तीनच दिवसांनी (३० जानेवारी) गांधीहत्येचा स्मृतिदिन, हुतात्मा-दिवस होता, याचे त्यांना विस्मरण झाले. हे विस्मरण चुकून झाले नसावे.

 


अजूनही महात्मा गांधींच्या नावाविषयीही नफरत असलेले अनेक महाभाग देशात आहेत. महाराष्ट्रात तर ‘मी नथूराम बोलतोय’ या नाटकाचे प्रयोगही या मराठी वर्गासमोर मोठय़ा ‘अभिमाना’ने सादर केले जातात. परंतु ‘सारेगमप’च्या संयोजकांनाही गांधीजींचे नाव घ्यावेसे वाटू नये हे मात्र खेदजनक आहे. अजूनही जगभर गांधीजींचीच जयंती व पुण्यतिथी साजरी होते, नथूरामची नव्हे. त्यामुळे नाव सावरकरांचे घेतले तरी मनातला उच्चार नथूरामचा होता.
जसजसा कार्यक्रम पुढे गेला तसतसा हा क्रांतिकारकांना अर्पण केलेला भाग होता की फक्त शिवाजी महाराज व सावरकर या दोन व्यक्तींपुरताच मर्यादित होता याबद्दल संभ्रम निर्माण झाला. या दोन क्रांतिकारकांबद्दल कोणात्याही भारतीय माणसाच्या मनात किंतू असण्याची सुतराम शक्यता नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकांबद्दल जेवढा अभिमान भारतीयांच्या मनात आहे, तेवढाच अभिमान सध्या जे सीमेवर पहारा ठेवत आहेत, त्या तिशी-पस्तिशीच्या तरुण सैनिकांबद्दलही आहे. त्यांना प्रोत्साहन देणारे वा त्यांच्या शौर्याची महती गाणारे गाणे या भागात असायला हवे होते, असे मनापासून वाटले.
या भागात शहीद सैनिकांचे पालक उपस्थित होते. शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या आई अनुराधा गोरे यांनी कार्यक्रमाच्या दरम्यान, आम्हाला नवीन पिढीची गाणी ऐकायला आवडतील असे सांगितले. त्यावर, आम्ही संगीत द्यायला तयार आहोत, पण नवीन पिढीत असे कवीच नाहीत असे हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी सांगितले. उद्याची तरुण पिढी झोकात आपली कला सादर करत असताना, त्यांच्यासारख्या मोठय़ा माणसाने तरुणांवर अशी टीका करावी, हे मनाला अजिबात पटले नाही.
एक प्रेक्षक

‘आयडिया’ आणि ‘झी’ने चालवलीय मुलांची पिळवणूक
प्रजासत्ताक दिन आणि ‘सारे’चे ‘तारे’ या पत्राशी (३१ जाने.) मी सहमत आहे. झी मराठीचे निर्माते इथून पुढे तरी काळजीपूर्वक कार्यक्रम आखतील, ही आशा.
‘सबकुछ हृदयनाथ’ असणाऱ्या त्या ‘..सारेगमप’च्या एपिसोडमध्ये मुलांना धाप लागेतो गायला लागलं. लांबवलेल्या कार्यक्रमात मोठय़ांना कसनुसं हसत बसणं किंवा ललकारी देणं, एवढंच करता येण्याजोगं होतं. जे सावरकरवादी विचारांचे भक्त होते, ते कानांत प्राण आणून कार्यक्रम अनुभवत होते. इतरांनी मात्र पंडितजींचं निवेदन हा ‘मोठा ब्रेक’ मानला. हा कार्यक्रम अनेक देशांत बघितला जातो. तिथपर्यंत या निमित्तानं पुन्हा एकदा आपली जुनी गाणी ‘झी’च्या खर्चानं जावीत, असा विचार यामागे असावा! तो निश्चितच सफल झाला. सेकंड इनिंगमधला पंडितजींचा उत्साह मात्र वाखाणण्याजोगा होता. सगळ्यात कौतुक वाटलं ते लिटल चॅम्प्सचं. ‘बाळच्या चाली गायला खूप अवघड..’ असं खुद्द लताजी व आशाजीच म्हणतात. ती सगळी गाणी प्रथमेश, रोहित वआर्यानं आपापल्या परीनं पेलली व कार्तिकी व मुग्धानं उत्तम साथ दिली. आता तरी या मंचावर येऊन ‘दीदी’ मुलांचं कौतुक करतील का?
सुरेश चांदवणकर, नेव्हीनगर, मुंबई

अमेरिकेची आणखी माहिती हवी
‘त्रिकालवेध’ सदरातील ‘कोलंबस ते ओबामा’ (२४ जाने.) हा लेख फारच भावला. एवढय़ा छोटय़ा लेखात अमेरिकेचा राजकीय प्रवास अत्यंत समर्थपणे मांडला आहे. त्यामुळे कॉलेजच्या वर्षांत पाहिलेल्या अमेरिकन सिनेमातील रेड इंडियन्स, कृष्णवर्णीय इत्यादींबद्दलच्या शंकांची उत्तरे मिळाली.
मी स्वत: २००७ साली जुलै ते ऑक्टोबर या दरम्यान अमेरिकेत होतो. तेथे स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याजवळील बेटावर इमिग्रेशनचा इतिहास व अमेरिकेत जगभरातून येऊन स्थायिक होणाऱ्यांची आकडेवारी वगैरेबद्दल बरीच माहिती मिळाली, पण वारंवार उल्लेख होत असलेले स्वातंत्र्ययुद्ध मात्र कोणाचे कोणाबरोबर झाले हे आपला लेख वाचल्यावरच कळले. हे युद्ध ब्रिटिश राजवटीविरुद्ध पुकारलेले युद्ध होते. पण अमेरिकेची राष्ट्रभाषा इंग्रजीच राहिली. तसेच पुढे महायुद्धात ब्रिटिश-अमेरिकनांची दोस्ती कायम राहिली.
भारताच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर आपल्या मनात ब्रिटिशांबद्दल जो सुप्त कडवटपणा राहिला तो अमेरिकनांमध्ये आढळत नाही, हे कसे? या अनुषंगानेच अमेरिकेत येऊन स्थायिक झालेल्या इतर युरोपियनांचे प्रमाण व त्यांचे प्राबल्य असलेली राज्ये कोणती? या इतर युरोपीय लोकांच्या वंशजात त्यांची मूळची वैशिष्टय़े आढळतात का? का ती मेल्टिंग पॉटमध्ये पूर्ण वितळून गेली? अमेरिकेत कृष्णवर्णीयांचे प्रमाण फक्त १३ टक्के आहे हे वाचून आश्चर्य वाटले, कारण विमानतळ, टॅक्सीज, बसेस, पोलीस दल, प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी असणारा स्टाफ आणि रस्त्यावर व तेथील टीव्ही कार्यक्रमात दिसणारे त्यांचे प्रमाण ३०-३५ टक्के असावे, असा ग्रह होत होता.
भारतातून थोडय़ा काळासाठी जाणाऱ्या माझ्यासारख्यांना मुलांकडून जी ‘गाइडेड टूर’ घडते त्यात सतत इतर भारतीय वा अमेरिकेबाहेरून आलेले टूरिस्टच बहुसंख्येने दिसतात. प्रत्यक्ष अमेरिकन लोकांशी येणारा संबंध नगण्य असतो. त्यामुळे अशा भेटी अमेरिकन मानसिकता समजण्यासाठी फारशा उपयुक्त नसतात. माझ्या मुलाच्या सूचना न मानता मी बऱ्याच वेळा कृष्णवर्णीयांचे प्राबल्य असलेल्या भागात फिरायचो. मला कधीही काही धोकादायक जाणवले नाही. मी सुदैवी होतो की इथून जाणाऱ्या भारतीयांमध्येसुद्धा कृष्णवर्णीयांबद्दल एक प्रकारची तुच्छता असावी?
ओबामांची निवड, त्यांचे सत्ताग्रहण, भारत-पाकमधील युद्धसदृश परिस्थितीत अमेरिकेच्या भूमिकेला आलेले महत्त्व यामुळे अमेरिकेबद्दल आणखी जाणून घेण्याची उत्सुकता वाटते.
श्रीराम बापट, दादर, मुंबई