Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

परस्पर ठेका दिल्याचा आरोप; प्रकल्पच रद्द करण्याची नगरसेवकांची तयारी
कोल्हापुरातील २२० कोटींच्या रस्ते प्रकल्पात शिंकली माशी!
कोल्हापूर, २ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या २२० कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पाच्या भूमिपूजनापूर्वीच कोल्हापूर महापालिकेत माशी शिंकली आहे. या प्रकल्पाचा ठेका देताना जिल्ह्य़ातील प्रमुख लोकप्रतिनिधींनी आपणास विश्वासात न घेता मुंबईत परस्पर व्यवहार केल्याचा ठपका ठेवून नगरसेवकांनी बंडाचे निशाण हाती घेतले आहे.

वाळव्यात जयंत पाटील यांचे बेरजेचे राजकारण
आष्टा, २ फेब्रुवारी / शीतल पाटील

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याचे औचित्य साधून त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी गृहमंत्री जयंत पाटील यांनी पाटील-नायकवडी गटातील दुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न करीत पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. त्याला नागनाथअण्णांनीही प्रतिसाद दिल्याने वाळवा तालुक्याच्या राजकारणात नवी समीकरणे जुळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांगलीतील संस्थांनी केलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत शंका- मेतके
सांगली, २ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सांगली महापालिकेची विविध विकासकामे मजूर सोसायटय़ा व सुशिक्षित बेरोजगार संघटनांना देण्याबाबत आपण पदाधिकाऱ्यांशी निश्चितपणे चर्चा करणार असल्याचे सांगत या संस्थांनी केलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकता असल्यानेच त्यांना कामे देण्यास मनाई करण्यात आल्याचे आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

खोटय़ा कागदपत्रांद्वारे वाहनकर्ज काढून फसविले
लातूरच्या टोळीचा शोध
सोलापूर, २ फेब्रुवारी/प्रतिनिधी
खोटी व बनावट कागदपत्रे दाखल करून एका फायनान्स कंपनीला सहा लाखांचा गंडा घालणाऱ्या लातूरमधील एका टोळीचा छडा लावण्यास सोलापूर शहर पोलिसांना यश आले असून, त्यापैकी एका तरुणाला पकडण्यात आले आहे.विशाल विजयकुमार वाघमारे (वय ३२, रा. पोचम्मा गल्ली, लातूर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, त्याला ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टोप मार्गावरील केएमसी वाहतूक पुन्हा सुरू
कोल्हापूर, २ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर-वडगाव मार्गावर टोप ग्रामस्थांच्या दगडफेकीला कंटाळून बंद करण्यात आलेली परिवहन सेवा संरक्षणाची हमी मिळाल्याने पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सुमारे आठ खेडय़ांतील २५ हजार प्रवाशांचा ४० दिवसांचा वनवास संपुष्टात आला अशी माहिती कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन समितीचे सभापती उदय जगताप यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

परभणीकर व लखनगावकर संघांना मोहिते स्मृती चषक
परभणीकर संघाची हॅटट्रीक
माळशिरस, २ फेब्रुवारी/वार्ताहर
अकलूजच्या १७ व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत मोडनिंबच्या सागर कला केंद्रातील आशा रुपा वैशाली परभणीकर व सुनीता शामल लखनगावकर या दोन संघांनी संयुक्तिकपणे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती चषक मिळवला. परभणीकर संघाने तर तिसऱ्यांदा चषक जिंकून हॅटट्रीक साधली. अकलूज येथील स. म. शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने ३० जानेवारीपासून स्मृतीभवनमध्ये या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

किचन शेडवर पाणी मारण्यासाठी विद्यार्थी वेठीस
मासिक बैठकीत मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी
शाहूवाडी, २ फेब्रुवारी / वार्ताहर
शाळेत बांधण्यात येणाऱ्या किचन शेडवर पाणी मारण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या ओकोली शाळेतील मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी शाहूवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती भाग्यश्री गायकवाड होत्या. प्रारंभी गटविकास अधिकारी श्री.आबासाहेब पवार यांनी स्वागत केले.

एसटी-कारची समोरासमोर धडक; दोघे ठार, दोघे जखमी
सांगली, २ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सांगली- पलूस रस्त्यावरील कर्नाळ गावानजीक ओव्हरटेक करताना एसटी बस व मारूती कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडला.
मृतांमध्ये शंकर जयसिंग पाटील (वय ३५, रा. मिरज) व संजय अशोक माणगावे (वय ३६, रा. हसूर, ता. हातकणंगले) यांचा समावेश आहे. अनिल वसंत कोरे (वय ३२, रा. मिरज) व एक अनोळखी असे दोघेजण गंभीर जखमी झाले. माणगावे यांचा खताचा व्यवसाय असून शंकर पाटील हे विमा प्रतिनिधी आहेत. याशिवाय हे चौघेही ‘एमएलए’ मार्केटिंग करतात. हे सर्वजण कराड येथील एका बैठकीसाठी गेले होते. हे सर्वजण पलूस- कुंडलमार्गे मारूती कार (क्रमांक एमएच १२- व्ही ००३५) ने सांगलीकडे येत होते. भरधाव वेगाने कार पॅगो रिक्षाला ओव्हरटेक करून निघाली होती. याचवेळी पलूसकडे जाणारी एसटी बस (क्रमांक एमएच १२- सीएच ८२००) ला या मारूती कारने समोरून जोराची धडक दिली.

शासनाच्या अनास्थेविषयी ढोलकीपटू घोटकर नाराज
माळशिरस, २ फेब्रुवारी/वार्ताहर

स्वत: अशिक्षित असताना पांडुरंग घोटकर या ढोलकीपटूने चारशेच्या वर ढोलकीवादका बरोबरच मधू कांबीकरांसारखे अनेक दिग्गज कलाकार घडवले. परंतु गेल्या कित्येक महिन्यापासून या गुणी कलावंतास शासनाचे मिळणारे तुटपुंजे मानधनही मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.दै. लोकसत्ता शी बोलताना घोटकर म्हणाले, की केवळ दुसरी शिक्षण झाले असून वयाच्या दहाव्या वर्षांपासून ते वडिलांबरोबर ढोलकी वाजवीत होते. गोंधळी समाजाचे असणारे घोटकर ६५ वर्षांचे झाले आहेत. अशिक्षित असतानाही केवळ कलेच्या जोरावर इंग्लंड, अमेरिका अशा परदेशवाऱ्याही करता आल्या. त्यांनी मधू कांबीकरांसारखे अनेक दिग्गज कलाकारही घडविले. याशिवाय सध्या ते पुण्यात ढोलकी वादनाचे धडे देत असून त्यातूनही आतापर्यंत सुमारे ४०० च्या वर निष्णात ढोलकी वादक तयार झाले आहेत. शंकरराव मोहिते पाटील स्मृती पुरस्कार आतापर्यंत मिळणाऱ्या सर्वाबरोबर मी काम केल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्व. शंकरराव मोहिते पाटलांना कलाकारांची जाण होती. ते तमाशा परिषदेचे अध्यक्ष असताना १९७५ साली सोलापूरला भरलेल्या तमाशा स्पर्धेमध्ये माझे ढोलकी वादन पाहून त्या काळात त्यांनी दिलेलं १०० रुपयांचं बक्षीस वरील या आयुष्याची पुंजी असल्याचे ते आवर्जुन सांगतात. एवढय़ा कालावधीत आर्थिकदृष्टय़ा मात्र आपण फाटकेच राहिल्याचे सांगत स्वत:साठी घरही बांधता न आल्याची खंत व्यक्त करताना त्यांना केंद्र शासनाकडून त्यांना मिळणारे १२०० रुपयांचं मानधन केव्हाच बंद झालंय. महाराष्ट्र शासन दर महिना ५०० रुपयाचे अनुदानही बंद झाल. त्यामुळे राज्य व केंद्र शासन कलावंतांना उपेक्षित ठेवले आहे. कलावंतांच्या कोटय़ातून घर मिळाले यासाठी केंद्र शासनाकडे अनेक वेळा अर्ज विनंत्या केल्या मात्र उत्तर तर राहोच परंतु साधी पोचही कधी मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

‘कर्जमाफी योजना यशस्वीपणे राबवा’
सातारा, २ फेब्रुवारी / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफी / कर्ज परतफेड सवलत योजना-२००९ यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सहकार व वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी महाबळेश्वर तालुक्यातील श्रीराम-भिलार, पाचगणी व गोडवली या प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्थांना व बँकेच्या भिलार, पाचगणी शाखांना भेटीप्रसंगी केले.केंद्र शासनाचे कृषी कर्जमाफी व कर्ज परतफेड सवलत योजना-२००८ योजनेतून वंचित, थकीत राहिलेल्या शेतक ऱ्यांची, वंचित नियमित तसेच थकीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतक ऱ्यांची यादी संबंधित संस्थेने तयार केली आहे का? योजना अंमलबजावणीचे वेळापत्रक पाळले जाते का? यादी फलकावर प्रसिद्ध केली जाते का? याबाबतची पाहणी डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी केली. तालुक्यातील प्राथमिक वि.का.स. सेवा संस्थांनी हंगामात केलेले कर्जवितरण व केंद्र शासन कर्जमाफीतील सभासदांना केलेले कर्जवितरण याचा आढावा सदर भेटीत घेऊन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या योजनेचा, परिपत्रक पोस्टर्स व मेळावे याद्वारे प्रचार व प्रसार केला असून, याबाबत केलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. केंद्र सरकारच्या गतवर्षीच्या कर्जमाफी व कर्जसवलत योजनेपासून वंचित राहिलेल्या सर्व पात्र लाभार्थीना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व बँकांनी बिनचूक याद्या तयार कराव्यात. या योजनेचा फायदा शेतकरी सभासदांना करून देण्यास्तव सदर योजनेची यशस्वी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

वाळू तस्करीविरूध्द कठोर कारवाई करणार-अशोक धिवरे
सोलापूर, २ फेब्रुवारी/प्रतिनिधी

कोल्हापूर परिक्षेत्रात वाढत असलेल्या वाळू तस्करीची गंभीर दखल घेण्यात आली असून त्या विरोधात कठोर कारवाईचे पाऊल उचलले जाईल, असा इशारा परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक धिवरे यांनी दिला. सोलापूर ग्रामीण पोलीस दलात वार्षिक तपासणीसाठी आले असता धिवरे यांनी रविवारी दुपारी पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप केला. वाळू तस्करीतून गुंडगिरी वाढते आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरणार आहे. सोलापूर जिल्ह्य़ात वाळू तस्करांकडून उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ले झाले. कराड येथे खुनाचा प्रकार घडला. त्यामुळे परिस्थितीची तीव्रता जाणवते. यापुढे वाळू तस्करी रोखण्यासाठी क्रेनसह संपूर्ण यंत्रसामग्री घेऊन कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.स्वातंत्र्योत्तर काळात पोलीस यंत्रणेमध्ये लोकसहभागाचा मुद्दा चर्चेत आला नाही. त्याबद्दल खंत व्यक्त करताना धिवरे यांनी लोकसहभागाशिवाय पोलिसांना चांगले काम करता येणे अशक्य आहे. त्यासाठी अलीकडे ग्रामसुरक्षा दलासारखा प्रयोग केला जात आहे. गुंडगिरी, अवैध धंदे रोखणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे यात दुमत नाही. पण त्यात सर्व समाजघटकांचा योगदान तितकाच महत्त्वाचा आहे. दुष्टांच्या बाजूने जनमत उभे राहता कामा नये. त्यासाठी समाजातील बुध्दिजीवी वर्गाने पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर फडतरे हे उपस्थित होते.

बेकायदा अमली पदार्थ बाळगणाऱ्या तरुणाला अटक
वाई, २ फेब्रुवारी/वार्ताहर

बेकायदा अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी आज साकेवाडीतील एका तरुणास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून बारा हजार रुपये किमतीचा नऊ किलो गांजा जप्त करण्यात आला.
रात्री साकेवाडी येथील नारायण झागडे आपला मुलगा आपल्याला मारतो, अशी तक्रार देण्यासाटी आले असता त्याचा तपास करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांचा मुलगा प्रमोद नारायण झागडे (वय २७) हा पोत्यातून काही तरी घेऊन पळत असल्याचे दिसले. रात्र गस्तीवरील हवालदार जाधव व बोबडे यांनी त्याला पकडून अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली.

बंद पाडलेल्या रस्त्याच्या कामासाठी काँग्रेस नगरसेवकाचे उपोषण
मिरज, २ फेब्रुवारी / वार्ताहर

राजकीय आकसातून बंद पाडलेले रस्त्याचे काम सुरू करावे, या मागणीसाठी काँग्रेसचे नगरसेवक अजित दोरकर यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याप्रकरणी विकास महाआघाडीचे नेते गृहमंत्री जयंत पाटील यांना नागरिकांनी घेराव घालून लक्ष घालण्याची विनंती केली.भारतनगर व शांतिसागर सोसायटीतील रस्त्याच्या डांबरीकरणास पणनमंत्री मदन पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यावर दबाव आणून हे काम बंद पाडले. विकासकामात सत्ताधारी राजकारण करीत असल्याचा आरोप करून प्रभाग क्रमांक आठचे नगरसेवक अजित दोरकर यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मिरज विभागीय कार्यालयासमोर त्यांनी उपोषण सुरू केले असून प्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

वाठार गावात महिलांचा दारूबंदी करण्यासाठी मोर्चा
पेठवडगाव, २ फेब्रुवारी / वार्ताहर

एकीकडे ग्रामसभेने तब्बल सोळा बिअरबार सुरू करण्यास ना हरकत दाखले देण्याचा निर्णय घेतला असताना महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून निवेदनाद्वारे वाठार गावात दारूबंदीची मागणी सरपंच सुनीता शिंदे यांच्याकडे केली.पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग आणि पेठवडगाव-कोडोली-रत्नागिरी महामार्गावरील चौकातील वाठार (ता. हातकणंगले) हे गाव. रहदारी व मध्यवर्ती ठिकाणामुळे गजबजलेल्या या गावच्या ग्रामसभेत मागणीनुसार १६ जणांना बिअरबार परमीट रूमसाठी ना हरकत दाखले देण्याचा निर्णय घेतला. त्यावर चर्चा गाजून अखेर महिलांनीच जनजागृती रॅली काढून गावात दारूबंदीच करण्याची मागणी केली. सहायक पोलीस अधीक्षकपदी निवड झालेली स्वाती क्षीरसागर हिच्यासह अनेक महिलांच्या पुढाकारातून ही मागणी करण्यात आली.