Leading International Marathi News Daily                                मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

व्यापार - उद्योग

क्रीडा

अग्रलेख

विशेष लेख

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्षभरात भारत अवकाशात धाडणार वेधशाळा
विनायक परब
मुंबई, २ फेब्रुवारी
चांद्रयान-एक या मोहिमेच्या यशानंतर येणाऱ्या काळात भारत हा काही केवळ चंद्रावर सुरुवातीस रोव्हर (चांद्रयान- दोन) आणि त्यानंतर चंद्रावर भारतीयास (चांद्रयान- तीन) पाठवून गप्प बसणार नाही तर आता भारतीय अंतराळ वैज्ञानिकांना वेध लागले आहेत ते या विश्वाच्या पलीकडेही असणाऱ्या दीर्घिकांचे आणि विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्याचे. त्यामुळे यंदाच्या वर्षअखेरीस किंवा २०१०च्या सुरुवातीस भारत एक अनोखा प्रयोग करणार आहे तो आपली अंतराळ वेधशाळा थेट अवकाशात नेऊन ठेवण्याचा आणि तिथून अंतराळाचा वेध घेण्याचा. मल्टिवेव्हलेंथ अ‍ॅस्ट्रोनॉमी मिशन असे नाव या मोहिमेस देण्यात आले आहे. ही प्रयोगशाळा अंतराळा घेऊन उडणाऱ्या यानाचे नाव असेल अ‍ॅस्ट्रोसॅट. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (क्षो) निवृत्त प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी लोकसत्ताशी बोलताना ही माहिती दिली.

नक्षलवाद्यांच्या क्रौर्याची परिसीमा
देवेंद्र गावंडे
मरकेगाव (ता. धानोरा), २ फेब्रुवारी

कुणाच्या डोळ्यात लोखंडाची पहार खुपसलेली तर कुणाच्या डोक्यात दगडाने घाव घातलेला, कुणाचे हात तोडलेले तर कुणाचे पाय, कुणाचा गळा कापलेला तर कुणाचे डोके चेंदामेंदा केलेले! क्रौर्याची परिसीमा गाठलेले हे दृश्य होते ग्यारापत्तीच्या जंगलात वसलेल्या मरकेगावला लागून असलेल्या एका झोपडीतले. आता तेथे कुणाचेही मृतदेह नाहीत पण, क्रूर गुंडांनाही लाजवेल अशा पद्धतीने पंधरा पोलिसांची हत्या करणाऱ्या २०० नक्षलवाद्यांच्या दहशतीची छाया मात्र कायम आहे. गडचिरोलीहून छत्तीसगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सावरगावपासून आत वळले की ८ किलोमीटर अंतरावर ४०० लोकवस्तीचे मरकेगाव लागते. या गावापासून केवळ २०० मीटर अंतरावर असलेल्या एका झोपडीत १५ पोलीस तावडीत सापडल्यानंतर नक्षलवाद्यांनी अक्षरश: हैदोस घातला. आज सकाळी या घटनास्थळाला भेट दिली असता तेथील दिसणारे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.

एचआयव्हीबाधित मुलांना कुठेही सोडा पण सांभाळू नका;
महिला व बालकल्याण खात्यातील ‘बाजीरावां’चा फतवा
मुंबई, २ फेब्रुवारी/प्रतिनिधी
एचआयव्ही बाधित बालके कुठेही सोडा परंतु आमची परवानगी नसल्याने तुम्ही अजिबात सांभाळू नका, अशी नोटीस महिला व बालकल्याण विभागातील ‘सरकारी बाजीरावांनी’ सोलापूर जिल्ह्यातील डॉ. विनायक वागळे ट्रस्ट या संस्थेला दिली आहे. शासकीय अनुदानाची अपेक्षा न ठेवता गेली १८ वर्षे नगर जिल्ह्यात एचआयव्ही बाधित मुलांकरिता काम करणाऱ्या स्नेहालय या संस्थेचा संख्यावाढीचा प्रस्तावही बाजीरावांनी रोखून ठेवला आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील आणखी एक गैरप्रकार उघडकीस
मुंबई, २ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गैरकारभाराच्या ‘स्टिंग ऑपरेशन’ची घटना ताजी असतानाच आज चार संघटनांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन एका विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांतील गुणांमध्ये फेरफार झाल्याचे नवे प्रकरण उजेडात आणले. या प्रकरणातील पुरावाच सादर केल्याने विद्यापीठ आता आणखी एका नव्या वादात सापडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा विभागातील अनेक गैरप्रकार उघड होत असल्यामुळे कुलगुरू डॉ. विजय खोले, प्र-कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत व परीक्षा नियंत्रक विलास शिंदे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी या संघटनांनी केली. ‘मनविसे’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’चेही या संघटनांनी जाहीर समर्थन केले.

नारायण राणे यांना मंत्रिपद नक्की
मुंबई, २ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

निलंबन मागे घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्याचे आश्वासन काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नारायण राणे यांना दिले असले तरी खाते कोणते द्यायचे यावरून खल सुरू आहे. राणे यांचे लक्ष महसूल खात्यावर असले तरी डॉ. पतंगराव कदम हे खाते सोडण्यास तयार होणार नाहीत. यातूनच उद्योग वा गृहनिर्माण खात्याच्या पर्यायावर सध्या नवी दिल्लीत विचार सुरू असल्याचे समजते.
निलंबन मागे घ्यावे म्हणून राणे यांनी गेल्या आठवडय़ात नवी दिल्लीत राज्याचे प्रभारी ए. के. अ‍ॅन्टोनी यांची भेट घेतली.

सोन्याला सोनियाचे दिवस
सोळा हजार रुपयांचा टप्पा गाठणार?
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी / पीटीआय

सोने खरेदी करण्याचे मनसुबे आखणाऱ्या तमाम भारतीयांनो सावधान. तुम्ही आत्ताच सोने खरेदी करून टाका. कारण एप्रिलपर्यंत थांबाल तर ‘सोळा हजारांत.. सोनेरी?’ हे म्हणण्याची पाळी तुमच्यावर येईल. जागतिक वित्त बाजारपेठेतील अनिश्चिततेचे वातावरण आणि विनिमय दरातील चढ-उतार यामुळे येत्या तीन महिन्यांत सोन्याचा १० ग्रॅमचा भाव विक्रमी १६ हजार रुपयांच्या पलीकडे जाण्याची शक्यता दागिने विक्रेते आणि जाणकारांनी व्यक्त केली आहे. २ फेब्रुवारीला नोंदविण्यात आलेला सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १४,१७५ रुपये आहे. गतवर्षी याच कालखंडात १० ग्रॅमचा भाव ११,७२० रुपये होता. त्यामुळे सध्या सोन्याच्या भावात २० टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास येते. सध्या सोन्याच्या किंमतीत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. येत्या आठवडय़ाभरात किंवा आसपास सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १५ हजार रुपयांची मर्यादा गाठेल. येत्या तीन महिन्यांत भाव १६ हजारांवर गेल्यासही आश्चर्य वाटू नये, असे गीतांजली ग्रुपचे अध्यक्ष मेहुल चोकसी यांनी सांगितले. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि रुपयाच्या विनिमयातील चढ-उतार या घटकांमुळे सोन्याच्या दरात वाढ होईल. किंमतीत वाढ झाल्यामुळे दुकानांमधून सोन्याची मागणी कमी झाली आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

अणुइंधन मिळविण्याचा भारताचा मार्ग मोकळा
व्हिएन्ना, २ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

देशातील नागरी अणुभट्टय़ांची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून तपासणी करून घेण्यास परवानगी देणारा महत्त्वपूर्ण करार करून भारताने गेली सुमारे साडेतीन दशके आंतरराष्ट्रीय समुदायाने टाकलेला ‘अणुबहिष्कार’ उठवण्याच्या प्रयत्नांतील निर्णायक पाऊल आज उचलले. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेबरोबर (आयएईए)झालेल्या या करारामुळे भारताला आता अन्य देशांकडून अणुइंधन आणि तंत्रज्ञानाचा पुरवठा विनाव्यत्यय होऊ शकणार आहे. आयएईएचे महासंचालक अल् बरादेई व भारताचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत सौरभ कुमार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

आयपीएलमध्ये खेळण्यास पाकिस्तानी क्रिकेटपटूंना मनाई
कराची, २ फेब्रुवारी / पीटीआय

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होण्यापासून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मनाई केली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंना भारतात जाणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने कळविल्याचे पाकिस्तानचे क्रीडामंत्री आफताब जिलानी यांनी सांगितले. पाकिस्तानचा युनूस खान, शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर, सोहेल तन्वीर व उमर गुल हे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. पण या सर्व खेळाडूंना तसेच जे खेळाडूंच्या लिलावात सहभागी होणार आहेत, त्यांना आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याच्या स्पर्धेत खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. १० एप्रिल ते २४ मे या कालावधीत होणाऱ्या आयपीएलचा कार्यक्रम अद्याप निश्चित नाही. कारण याच कालावधीत भारतात निवडणुका होणार असल्यामुळे या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही.

भाऊ साठे यांना जीवन गौरव पुरस्कार
मुंबई, २ फेब्रुवारी/प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार सदाशिव तथा भाऊ साठे यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचा ५० हजार रुपयांचा पहिलाच जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ११९ वर्षांचा इतिहास असलेल्या बॉम्बे आर्ट सोसायटीने दृककला क्षेत्रातील एका नामवंत कलाकाराला प्रतिवर्षी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय अलीकडेच घेतला होता. यंदापासूनच या पुरस्काराचा प्रारंभ होत असून पुरस्कार निवडीसाठी नेमलेल्या समितीने एकमुखाने तो मान यंदा भाऊ साठे यांना देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सोसायटीच्या पत्रकात म्हटले आहे. येत्या बुधवारी, ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जहांगीर आर्ट गॅलरीत भरणाऱ्या सोसायटीच्याच ११७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि ५० हजार रुपये रोख असा हा पुरस्कार आहे. भाऊ साठे ५० वर्षांहून अधिक काळ शिल्पकलेशी संबंधित असून मुंबई-दिल्लीसह देशभरातील अनेक प्रमुख शहरात साठे यांनी बनविलेले राष्ट्रनिर्मात्यांचे पुतळे उभे आहेत.

नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देऊ
मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
नागपूर, २ फेब्रुवारी / प्रतिनिधी

अस्तित्व दाखवण्यासाठी नक्षलवाद्यांनी काल केलेल्या भ्याड हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा देत, शहीद पोलिसांना मुंबईच्या धर्तीवर अधिक मदत देण्याचा निर्णय येत्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.
नक्षलवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री चव्हाण यांनी गृहमंत्री जयंत पाटील यांच्यासह आज तातडीने गडचिरोली जिल्ह्य़ास भेट देऊन शहिदांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. तसेच, पोलीस दलाचे मनोबलही उंचावले. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या मरकेगावजवळील घटनास्थळाची हेलिकॉप्टरने पाहणी करण्यास सुरक्षा यंत्रणेने मनाई केली.
गडचिरोलीचा दौरा आटोपल्यानंतर मुंबईला रवाना होण्यापूर्वी नागपूरच्या विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, नक्षलवाद्यांनी स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी शेजारच्या राज्यातून येऊन हा हल्ला केला. फक्त १५ पोलिसांना सुमारे १५० नक्षलवाद्यांनी घेरून मारणे, ही धक्कादायक घटना आहे. शहिदांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून सरकार गप्प बसणार नाही तर, नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देईल. मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश या नक्षलवादग्रस्त राज्यांशी चर्चा करून ठोस पावले उचलण्यात येतील. शहीद पोलिसांना मदतीसाठी ८ ते १२ लाख रुपये मदत देण्यात येते पण, मुंबईत दहशतवाद्यांच्या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना दिलेल्या मदतीएवढी मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल.

पालिकेचा आज अर्थसंकल्प
मुंबई, २ फेब्रुवारी / प्रतिनिधी

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या मांडला जाणार आहे. गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही शिलकी अंदाजपत्रक सादर होईल, असे समजते. तसेच या अर्थसंकल्पातही मुंबईकरांवर कोणतेही नवे कर लादण्यात आलेले नाहीत, असे कळते.यंदा विकास कराचे उत्पन्न कमी झाले असले तरी जकात उत्पन्नात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मालमत्ता कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्नही वाढत आहे. गेल्या वर्षी आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांसाठी जास्तीत जास्त तरतूद करण्यात आली होती. या वर्षीही हेच सूत्र कायम राहील.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८