Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

वर्षभरात भारत अवकाशात धाडणार वेधशाळा
विनायक परब
मुंबई, २ फेब्रुवारी

 

चांद्रयान-एक या मोहिमेच्या यशानंतर येणाऱ्या काळात भारत हा काही केवळ चंद्रावर सुरुवातीस रोव्हर (चांद्रयान- दोन) आणि त्यानंतर चंद्रावर भारतीयास (चांद्रयान- तीन) पाठवून गप्प बसणार नाही तर आता भारतीय अंतराळ वैज्ञानिकांना वेध लागले आहेत ते या विश्वाच्या पलीकडेही असणाऱ्या दीर्घिकांचे आणि विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्याचे. त्यामुळे यंदाच्या वर्षअखेरीस किंवा २०१०च्या सुरुवातीस भारत एक अनोखा प्रयोग करणार आहे तो आपली अंतराळ वेधशाळा थेट अवकाशात नेऊन ठेवण्याचा आणि तिथून अंतराळाचा वेध घेण्याचा. मल्टिवेव्हलेंथ अ‍ॅस्ट्रोनॉमी मिशन असे नाव या मोहिमेस देण्यात आले आहे. ही प्रयोगशाळा अंतराळा घेऊन उडणाऱ्या यानाचे नाव असेल अ‍ॅस्ट्रोसॅट. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (क्षो) निवृत्त प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी लोकसत्ताशी बोलताना ही माहिती दिली. आजपासून मुंबईत इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन प्लॅनेटरी सायन्सला सुरुवात झाली. या परिषदेत सहभागी होण्यासाठी डॉ. कस्तुरीरंगन मुंबईत आले होते. आपल्या बीजभाषणानंतर ‘लोकसत्ता’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ते म्हणाले की, एका बाजूला चांद्रयान आणि त्यानंतरच्या मोहिमांची तयारी सुरू असतानाच गेली तीन ते चार वर्षे भारतीय अंतराळ वैज्ञानिकांना असे वाटत होते की, आपण अखिल विश्वाच्याही पलीकडे जावून काही गोष्टींचा वेध घेणे गरजेचे आहे. विश्वनिर्मितीचे गूढ आपल्याला त्यातूनच उकलेल. चांद्रयान-एक या मोहिमेने आपल्या सर्व क्षमता सिद्ध केल्या आहेत. चांद्रयान- दोन त्यानंतर तीन आणि त्याहीनंतर आपण मंगळावर जाण्याच्या प्रयत्नात असतानाच आपण समांतरपद्धतीने अंतराळाचा वेध घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपण येणाऱ्या काळात खूपच मागे पडू. त्यामुळे खूप वेगळे असे काही करावे असे संशोधकांना वाटत होते. म्हणूनच त्यांनी चार वर्षांपासून या प्रकल्पावर काम करण्यास सरुवात केली. त्याची प्राथमिक तयारी म्हणून आपण १९९६ साली एक्स-रे अ‍ॅस्ट्रॉनॉमी प्रयोगही करून पाहिला. त्यात यश आल्यानंतर आपण या प्रयोगशाळेच्या प्रकल्पावर शिक्कामोर्तब केले. आजवर आपण अंतराळाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो तो केवळ पृथ्वीवरून. हबलसारखे काही प्रयोग थेट अंतराळात केल्यानंतर अंतराळात टेलिस्कोप नेऊन बसविण्याचा फायदा सर्वानाच लक्षात आला. म्हणूनच त्याची पुढची पायरी म्हणून आपण अंतराळ प्रयोगशाळेचा निर्णय घेतला. भारताच्या या मल्टिवेव्हलेंथ अ‍ॅस्ट्रोनॉमी मिशनचे वैशिष्टय़ हे असेल की, यात विविध प्रकार एकत्रितपणे संशोधकांना उपलब्ध होतील. म्हणजेच ही प्रयोगशाळा बहुविध आणि बहुआयामी असणार आहे. आजवरची ही सर्वाधिक प्रगत अशी प्रयोगशाळा असेल. पृथ्वीवरूनच आपल्याला या प्रयोगशाळेतील उपकरणांची हालचाल नियंत्रित करता येणार आहे, असेही डॉ. कस्तुरीरंगन यांनी सांगितले. या प्रयोगशाळेमध्ये पाच महत्त्वाच्या यंत्रणा कार्यरत असतील. त्यात ४० सेमी.च्या दोन अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप, तीन लार्ज एरिया झेनॉन प्रपोर्शनल काऊंटर्स, सॉफ्ट एक्स-रे टेलिस्कोप, कॅडमियम-झिंक-टेल्युराईड कोडेड मास्क इमेजर, आकाशाचेच स्कॅनिंग करणारी यंत्रणा यांचा समावेश असणार आहे. या अंतराळ प्रयोगांसाठी त्याचा वापर होणार असल्याने त्याला अ‍ॅस्ट्रोसॅट असेही नाव देण्यात आले आहे. या उपकरणांचे वजन ७५० किलोठॉम्स असेल तर यानाचे वजन १६५० किलो असेल, असे सांगून डॉ. कस्तुरीरंगन म्हणाले की, श्रीहरिकोटा येथील क्षोच्या सतीश धवन अंतराळ स्थानकातून या यानाचे उड्डाण होईल. पृथ्वीपासून सुमारे ६०० ते ६५० किलोमीटर्स अंतरावरून ते पृथ्वीप्रदक्षिणा करेल. त्यातून येणारी माहिती इंडियन स्पेस सायन्स डेटा सेंटरमध्ये जमा करण्यात येईल. तो कार्यान्वित होऊन वर्ष झाल्यानंतर त्याने पाठविलेल्या माहितीवर संशोधन करण्यासाटी जगभरातून अर्ज मागविण्यात येणार आहेत. भारतीय संशोधकांनी अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात घेतलेली ही मोटीच आघाडी असेल.