Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

नक्षलवाद्यांच्या क्रौर्याची परिसीमा
देवेंद्र गावंडे
मरकेगाव (ता. धानोरा), २ फेब्रुवारी

 

कुणाच्या डोळ्यात लोखंडाची पहार खुपसलेली तर कुणाच्या डोक्यात दगडाने घाव घातलेला, कुणाचे हात तोडलेले तर कुणाचे पाय, कुणाचा गळा कापलेला तर कुणाचे डोके चेंदामेंदा केलेले! क्रौर्याची परिसीमा गाठलेले हे दृश्य होते ग्यारापत्तीच्या जंगलात वसलेल्या मरकेगावला लागून असलेल्या एका झोपडीतले. आता तेथे कुणाचेही मृतदेह नाहीत पण, क्रूर गुंडांनाही लाजवेल अशा पद्धतीने पंधरा पोलिसांची हत्या करणाऱ्या २०० नक्षलवाद्यांच्या दहशतीची छाया मात्र कायम आहे.
गडचिरोलीहून छत्तीसगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सावरगावपासून आत वळले की ८ किलोमीटर अंतरावर ४०० लोकवस्तीचे मरकेगाव लागते. या गावापासून केवळ २०० मीटर अंतरावर असलेल्या एका झोपडीत १५ पोलीस तावडीत सापडल्यानंतर नक्षलवाद्यांनी अक्षरश: हैदोस घातला. आज सकाळी या घटनास्थळाला भेट दिली असता तेथील दिसणारे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.
जाळपोळीचा पंचनामा करण्यासाठी ग्यारापत्तीवरून निघालेले १५ पोलिसांचे पथक सकाळी १०.३० च्या सुमारास या झोपडीजवळ पोहोचले. एरवी पोलीस जंगलात अंतर ठेवून चालतात. रविवारी मात्र पाणी पिण्यासाठी म्हणून हे सारेजण या झोपडीजवळ एकत्र जमले. तेवढय़ात त्यांच्याभोवती नक्षलवाद्यांचा वेढा पडला. प्रारंभी नक्षलवाद्यांनी तुरळक गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनीही गोळीबार केला. अध्र्या तासात पोलिसांजवळचा दारूगोळा संपला. नेमके हेच नक्षलवाद्यांना हवे होते. नंतर नक्षलवाद्यांनी तुफानी गोळीबार सुरू केला. आपल्याकडील दारूगोळा संपला हे लक्षात येताच चार पोलिसांनी या झोपडीत आश्रय घेतला तर तिघे दोन झाडामागे लपले. उर्वरित आठ पोलीस नक्षलवाद्यांच्या गोळीने गंभीर जखमी होऊन आजूबाजूला पडले होते. नक्षलवाद्यांनी झाडामागे लपलेल्या तीन पोलिसांना प्रथम ताब्यात घेतले व नंतर त्यांचे हाल हाल करून ठार मारले. काही नक्षलवादी झोपडीत शिरले व त्यांनी तेथे असलेल्या पोलिसांना गळे चिरून ठार मारले. झोपडीच्या मागील बाजूला दबा धरून बसलेल्या एका पोलीस जवानाने झोपडीभोवतीचे कुंपण तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच नक्षलवाद्यांनी त्याला तेथेच पकडले व एक मोठा दगड त्याच्या डोक्यात घातला. एकाही जखमीला गोळी घालू नका, प्रत्येकाला दगडाने, लोखंडी सळईने ठार मारा, असे दलमचा कमांडर साऱ्यांना ओरडून सांगत होता. सर्व पोलीस ठार झाले आहेत हे लक्षात आल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांच्या शस्त्राकडे मोर्चा वळवला. कालच्या घटनेत नक्षलवाद्यांनी सहा ए.के.४७ रायफली, सहा एसएलआर, तीन बॉम्ब, एक पिस्तूल, चार वॉकीटॉकी व दोन ग्रेनेड डागणाऱ्या बंदुका पळवून नेल्या. सुमारे दोन तास नक्षलवाद्यांचे हे अमानुष क्रौर्य सुरू होते.
नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून जाताना मरण पावलेल्या प्रत्येक पोलिसाच्या मृतदेहाजवळ बॉम्ब दडवून ठेवले. त्यामुळे नंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना मृतदेह उचलण्यास बराच उशीर लागला. एका जवानाच्या खिशात दडवून ठेवलेला बॉम्ब तर शवविच्छेदनगृहात काढण्यात आला. आज सकाळीही या झोपडीच्या आजूबाजूला ठिकठिकाणी रक्ताचे थारोळे साचले होते. न फुटलेले चार-पाच बॉम्ब पडलेले होते. रक्ताने माखलेले पोलिसांचे काळे दुपट्टे, अस्ताव्यस्त पडलेले बुट, डोक्यावरच्या कॅप या वस्तू या भीषण हत्याकांडाची जाणीव करून देणाऱ्या होत्या. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या १५ पोलीस जवानांपैकी सहा अविवाहित आणि दोन वर्षांपूर्वी ते पोलीस दलात दाखल झालेले होते. या हल्ल्यात शहीद झालेल्या रूपेश पेंदोर या जवानाचे गेल्या मे महिन्यात लग्न झाले. सुरेंद्र नैताम या शहीद जवानाची पत्नी काल ग्यारापत्तीलाच होती. तीन महिन्यांपूर्वीच त्याला मुलगा झाला. छत्तीसगडच्या सीमेपासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्यारापत्तीच्या पोलीस ठाण्यात काल १७ पोलीस कामावर होते. त्यापैकी १५ पोलीस उपनिरीक्षक भूपेंद्र उघडेकर यांच्या नेतृत्वाखाली मरकेगावकडे रवाना झाले. या भागात कोणतेही पथक जंगलातून प्रवास करत असेल तर त्याला कव्हर देण्यासाठी सी-६० ची काही पथके काही अंतर ठेवून वाटचाल करत असतात. काल या १५ जवानांना कव्हर देण्यासाठी केवळ एक पथक काही अंतरावरून चालत होते. गोळीबार सुरू होताच हे पथक परत फिरले. मात्र, त्यांना नक्षलवाद्यांनी मुख्य रस्त्यावर सापळा रचून ठेवला आहे, असा संदेश मिळाला. त्यामुळे गोळीबाराची माहिती मिळूनही या पथकाला हालचाल करता आली नाही.