Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

एचआयव्हीबाधित मुलांना कुठेही सोडा पण सांभाळू नका;
महिला व बालकल्याण खात्यातील ‘बाजीरावां’चा फतवा
मुंबई, २ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

एचआयव्ही बाधित बालके कुठेही सोडा परंतु आमची परवानगी नसल्याने तुम्ही अजिबात सांभाळू नका, अशी नोटीस महिला व बालकल्याण विभागातील ‘सरकारी बाजीरावांनी’ सोलापूर जिल्ह्यातील डॉ. विनायक वागळे ट्रस्ट या संस्थेला दिली आहे. शासकीय अनुदानाची अपेक्षा न ठेवता गेली १८ वर्षे नगर जिल्ह्यात एचआयव्ही बाधित मुलांकरिता काम करणाऱ्या स्नेहालय या संस्थेचा संख्यावाढीचा प्रस्तावही बाजीरावांनी रोखून ठेवला आहे.
‘एचआयव्ही बाधित मुलांच्या पोषणाकरिता पैशांची मागणी करणारे बाजीराव’ या वृत्ताद्वारे सूर्योदय या भय्यू महाराजांच्या संस्थेच्या अकोला येथील निवासी शाळा व उपचार केंद्राला मंजुरी देण्यात महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी खोडा घातल्यासंबंधीची वस्तुस्थिती प्रकाशात आल्यानंतर याच क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच अनाथालय, बालसदन व बालगृह चालविणाऱ्या संस्थांनी त्यांना महिला व बालकल्याण खात्यातील ‘बाजीरावा’ंकडून आलेल्या कटू अनुभवांची माहिती दिली. याच संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तांतरानंतर या खात्यातील अधिकाऱ्यांनी बालगृह, बालसदन यांची खैरात सुरू केली आहे. नगर जिल्ह्यात २३०० बालकांसाठी बालगृह, बालसदन मंजूर केली असून ५०, १०० व १५० बालकांचे प्रस्ताव मंजूर झालेल्या संस्थांपैकी काहींकडे एक चौरस फूट जागा अथवा बांधकाम नाही. तसेच या कामात पूर्वानुभव नाही. धाबा अथवा हॉटेल टाकल्याप्रमाणे काही राजाश्रित संस्थाचालकांनी बालगृहे, बालसदन टाकली आहेत, अशी काही संस्थांची तक्रार आहे.
सूर्योदय संस्थेप्रमाणेच एचआयव्ही बाधित बालकांसाठी काम करणाऱ्या अनेक नामांकित संस्थांचे प्रस्ताव झारीतील शुक्राचार्यानी अडवून ठेवल्याची या संस्थांची तक्रार आहे. नगरची स्नेहालय संस्था एचआयव्ही बाधित बालकांवर निवासी उपचार आणि पुनर्वसन याकरिता काम करणारी आद्य संस्था आहे. या संस्थेत सध्या १५० एचआयव्ही बाधित बालके व महिला आहेत. संस्थेने शासकीय अनुदानाची आशा न बाळगता १८ वर्षांपूर्वी ही संस्था सुरू केली. संस्थेने २० खाटांचे सुसज्ज रुग्णालय, संगणक अभ्यासक्रमासह इतर अभ्यासक्रम असलेली शासनमान्य तंत्र शिक्षण संस्था आदी सुविधा पुरवल्या आहेत. महाराष्ट्रात ८०० बालकांची प्रतिक्षा यादी असल्यामुळे स्नेहालयने संख्यावाढीचा प्रस्ताव दिला. तो आजमितीस प्रलंबित आहे. कुर्डुवाडी, ता. म्हाडा, जिल्हा सोलापूर येथील डॉ. विनायक वागळे ट्रस्ट ५० एचआयव्ही बाधित मुलांचा सांभाळ करू इच्छिते. वागळे ट्रस्टकडे दोन एकर जागा आणि आठ हजार चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल आहे. ही संस्था सध्या २५ बालकांचा सांभाळ करीत आहे. मात्र महिला बालकल्याण विभागाने या संस्थेला बालके कुठेही सोडा परंतु आमची परवानगी नसल्याने अजिबात सांभाळू नका, अशी नोटीस संस्थेला बजावली आहे. राज्यातील सत्ताबदलानंतर सत्तेच्या पदांवर बसलेल्यांना येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर दिसत असल्याने आपापल्या खात्यातून निधी संकलनाकरिता ‘सरकारी बाजीरावां’च्या हातात फावडी सोपविली आहेत. महिला व बालकल्याण खात्याने बालगृह व बालसदन यांची खैरात सुरू केली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूष करण्याबरोबर ‘चौथाई’ देणाऱ्या संस्थांना तात्काळ मंजुरी दिली जात असल्याचे राज्यातील काही सामाजिक संस्थांनी निदर्शनास आणले.