Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील आणखी एक गैरप्रकार उघडकीस
मुंबई, २ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गैरकारभाराच्या ‘स्टिंग ऑपरेशन’ची घटना ताजी असतानाच आज चार संघटनांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन एका विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांतील गुणांमध्ये फेरफार झाल्याचे नवे प्रकरण उजेडात आणले. या प्रकरणातील पुरावाच सादर केल्याने विद्यापीठ आता आणखी एका नव्या वादात सापडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा विभागातील अनेक गैरप्रकार उघड होत असल्यामुळे कुलगुरू डॉ. विजय खोले, प्र-कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत व परीक्षा नियंत्रक विलास शिंदे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी या संघटनांनी केली. ‘मनविसे’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’चेही या संघटनांनी जाहीर समर्थन केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, समतावादी छात्रभारती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक अन्याय निवारण कृती समिती व मुंबई युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टिचर्स असोसिएशन (मुक्ता) या चार संघटनांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. तृतीय वर्ष फार्मसी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राची परीक्षा दिलेल्या विशाल कृपलानी या विद्यार्थ्यांच्या चार विषयांतील उत्तरपत्रिकेच्या गुणांमध्ये फेरफार करण्यात आली आहे. ही बाब लक्षात आल्याने परीक्षा विभागाने संबंधित विद्यार्थ्यांला २०१० (पाच परीक्षा) सालापर्यत परीक्षा देण्यास मनाई केली. मात्र, हा प्रकार विद्यापीठाच्या परीक्षा भवनात झाला असतानाही याबाबत कोणत्या कर्मचाऱ्यावर विद्यापीठाने कारवाई केली हे विद्यापीठाने जाहीर केलेले नाही. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या गंभीर प्रकाराची कुणकुणही विद्यापीठाने लागू दिली नाही, असा आरोपही या संघटनांनी केला आहे.
या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करणे अपेक्षित असतानाही विद्यापीठाने दोन महिन्यांपासून हे प्रकरण दडपले असल्याचा आरोप अधिसभा सदस्य सुभाष आठवले व समतावादी छात्रभारतीचे अध्यक्ष गजानन काळे यांनी केला. परीक्षा विभागातील एका मागोमाग एक गैरप्रकार बाहेर येत असताना कुलगुरू, प्र-कुलगुरू व परीक्षा नियंत्रक आपली खूर्ची का सोडत नाहीत. ‘स्टिंग ऑपरेशन’ करून मनविसेने विद्यापीठाला परीक्षा विभागातील गैरप्रकारांमध्ये सुधारणा करण्याची संधी दिली आहे. पण सुधारणा करण्याऐवजी विद्यापीठाने मनविसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात अधिसभा सदस्य वैभव नरवडे यांनाही गोवण्यात आले आहे. नरवडे यांच्यावरील कारवाई ताबडतोब मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.