Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

नारायण राणे यांना मंत्रिपद नक्की
मुंबई, २ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

निलंबन मागे घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्याचे आश्वासन काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नारायण राणे यांना दिले असले तरी खाते कोणते द्यायचे यावरून खल सुरू आहे. राणे यांचे लक्ष महसूल खात्यावर असले तरी डॉ. पतंगराव कदम हे खाते सोडण्यास तयार होणार नाहीत. यातूनच उद्योग वा गृहनिर्माण खात्याच्या पर्यायावर सध्या नवी दिल्लीत विचार सुरू असल्याचे समजते.
निलंबन मागे घ्यावे म्हणून राणे यांनी गेल्या आठवडय़ात नवी दिल्लीत राज्याचे प्रभारी ए. के. अ‍ॅन्टोनी यांची भेट घेतली. अ‍ॅन्टोनी हे काँग्रेसच्या शिस्तभंग समितीचेही अध्यक्ष असल्याने निलंबन मागे घेण्याची प्रक्रिया त्यांच्याकडूनच केली जाणार आहे. राणे यांनी याशिवाय पक्षाध्यक्षांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचीही भेट घेऊन चर्चा केली. यानंतर राणे यांनी आज टिळक भवनमध्ये प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची भेट घेतली. याप्रसंगी माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी हे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीबरोबर जागावाटपाची चर्चा आजच सुरू झाली. काँग्रेसने कोणत्या जागांवर दावा करावा याबाबत राणे यांनी ठाकरे यांच्याशी चर्चा केली. राणे यांची सदिच्छा भेट होती व त्यात विद्यमान राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
राणे यांचे निलंबन मागे घेण्याची प्रक्रिया येत्या तीन-चार दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश केला जाणार आहे. राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची इच्छा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नवी दिल्लीत व्यक्त केली आहे. नांदेड व लातूर वादात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे विरोधात गेल्याने चव्हाण यांना पक्षात एखादा प्रभावी नेता बरोबर असण्याची गरज आहे. राणे बरोबर आल्याने अशोक चव्हाण यांना त्याचा राजकीय फायदा होऊ शकेल. राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर खाते कोणते द्यायचे हे अद्याप निश्चित होऊ शकलेले नाही. राणे यांचे लक्ष अर्थातच महसूल खात्यावर आहे. युती सरकारच्या काळात तसेच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर राणे यांनी महसूल खाते सांभाळले होते. अशोक चव्हाण यांना खातेवाटप करताना महसूल खाते कोणाला द्यायचे यावरून बरीच कसरत करावी लागली होती. शेवटी डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे हे खाते सोपविण्यात आले. राणे यांच्यासाठी डॉ. कदम हे महसूल खाते सोडण्यास अजिबात तयार होणार नाहीत. डॉ. कदम यांची ज्येष्ठता लक्षात घेता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी त्यांना नाराज करणार नाहीत, अशी चिन्हे आहेत. महसूल खाते मिळणार नसल्यास नगरविकास खात्यावर राणे यांचा डोळा आहे. मात्र नगरविकाससारखे महत्त्वाचे खाते सोडण्यास मुख्यमंत्री तयार नसल्याचे समजते. यामुळे गृहनिर्माण किंवा उद्योग या दोन खात्यांचा विचार राणे यांच्यासाठी होऊ शकतो, असे काँग्रेसमधील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले.