Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

प्रादेशिक

बापट यांच्या आमदारनिधीतून केलेल्या कामांना आक्षेप
मुंबई, २ फेब्रुवारी/प्रतिनिधी

पुण्यातील कसबा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गिरीश बापट यांच्या आमदार निधीतून खासगी वाडय़ांमधील शौचालये व स्नानगृहांच्या दुरुस्तीची गेली चार वर्षे केली गेलेली कामे व यंदाच्या वर्षांसाठीही मंजूर केलेली कामे यांच्या वैधतेस आव्हान देणारी रिट याचिका त्याच मतदारसंघातील एका मतदाराने उच्च न्यायालयात केली आहे.

नव्या ओळखपत्रासाठी एसटीचा कर्मचाऱ्यांच्या खिशात हात!
मुंबई, २ फेब्रुवारी / प्रतिनिधी

गतवर्षी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर एसटी प्रशासनाने राज्यातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना नवी ओळखपत्रे देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नव्या ओळखपत्रासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून वीस रुपये शुल्क कापण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. एसटीचे उपमहाव्यवस्थापक (नियोजन) आर. आर. पाटील यांच्या सहीने जारी परिपत्रकात नव्या ओळखपत्रासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला दोन फोटो जमा करण्यास सांगितले आहे.

काँग्रेसला हव्यात २७ जागा; तर राष्ट्रवादीचा दावा २४ जागांवर
मुंबई, २ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणूक २७ व २१ या सूत्रानुसार लढवावी, असा आग्रह काँग्रेसने धरला असतानाच राष्ट्रवादीने निम्म्या म्हणजेच २४ जागा मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका आज घेतली. राष्ट्रवादीची ही मागणी काँग्रेसला अमान्य असल्याने जागावाटपाचा घोळ पुढील महिनाभर सुरू राहिल अशी चिन्हे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीने नेमलेल्या जागावाटप समितीची पहिली बैठक सह्य़ाद्री अतिथीगृहात पार पडली.

खुल्या ऑफर नियमात ‘सेबी’ सुधारणा करणार
मुंबई, २ फेब्रुवारी/व्यापार प्रतिनिधी

आय.टी. कंपनी सत्यम ताब्यात घेण्याची प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून शेअर बाजार नियंत्रक ‘सेबी’ ने ओपन ऑफरच्या नियमात सुधारणा करण्याचे ठरविले आहे. ‘सेबी’ च्या नवीन नियमांमुळे कंपनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, अशी माहिती ‘सेबी’ चे अध्यक्ष सी.बी. भावे यांनी पत्रकारांना दिली. एखादी कंपनी ताब्यात घेताना संबंधीत कंपनीला समभागांच्या सरासरी २६ आठवडय़ाच्या किमतीएवढी किंमत ठरविण्याची सूचना सत्यमच्या संचालक मंडळाने अलीकडेच केली होती. यातून कंपनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल अशी अपेक्षा करुन भावे म्हणाले की, ‘सेबी’ कायद्यात बदल केवळ सत्यमसाठी करीत नसून हे नियम सर्व कंपन्यांसाठी लागू होतील. हे नियम कधी बदलण्यात येतील, या प्रश्नाला उत्तर देताना भावे म्हणाले की, याचे उत्तर लगेचच देता येणार नाही. मात्र याची गरज लक्षात घेऊन झटपट निर्णय अपेक्षित आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीची कंपनी एल.अँड टी.चा सत्यममधील भांडवली वाटा सध्या १२ टक्के आहे. हा वाटा १५ टक्क्यांवर गेल्यावर एल.अँड टी. आणखी २० टक्के समभाग खुल्या बाजारातून खरेदी करण्यासाठी पात्र होईल. ‘सेबी’ च्या संचालक मंडळाने लाभांश व बोनस संबंधी नियमातही बदल केले आहेत.

सहाव्या वेतन आयोगासाठी आंदोलन
मुंबई, २ फेब्रुवारी/प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्याबाबत निर्णय झाला नाही तर शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्यावतीने मंत्रालयासमोर निदर्शने करण्यात येतील, असा इशारा महासंघाचे सरचिटणीस सुभाष गांगुर्डे यांनी दिला. सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी उद्या ३ फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे नेते र. ग. कर्णिक या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. दरम्यान, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या येत्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज पुणे येथे दिली.