Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

नवनीत

नवनीतसंत हे विश्वाचे नागरिक आणि मानवतेचे दीपस्तंभ असतात. कुठल्याही एका समाजाची, प्रांताची किंवा देशाची ते मिरासदारी नसतात. संकुचिततेची बंधने पार केल्यामुळे ते संतपदाला पोहोचलेले असतात. ते साऱ्यांचे सोयरे असतात. हे विश्वच त्यांचे घर असते. असे असले तरी आपल्या प्रदेशातील महात्म्यांबद्दल आपल्याला आपुलकी वाटते आणि हे साहजिक आहे. महाराष्ट्र हा दगडांचा देश, राकट देश असला तरी संतांची निपज करणारी ही सुपीक भूमीसुध्दा आहे.

 


महाराष्ट्राच्या संतांच्या मांदियाळीत संत गोन्सालो गार्सिया या वसईकर महात्म्याचाही समावेश आहे, ही बाब मराठी मनाला सुखावणारी आहे. गोन्सालोंचा जन्म १५५६ साली वसईत झाला. त्यांचे वडील पोर्तुगीज आणि आई वसईकर होती. वसईच्या किल्ल्यातील ‘जेजुईट कॉलेज ऑफ बसीन’ या संस्थेत त्यांचे शिक्षण पार पडले. वयाच्या सोळाव्या वर्षी ते फादर सेबॅस्टीयन घोन्सालवीस यांच्यासमवेत जपानला गेले. तिथे त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याचबरोबर जपानी भाषेवर प्रभुत्व मिळवले. धर्मगुरू होण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, परंतु त्यांना जेजुईट संघामध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी व्यापारउद्योगात लक्ष घातले. १५८६ साली ते व्यापारानिमित्ताने फिलिपाईन्सला गेले; परंतु त्यांचे मन धंद्यात रमेना. संन्यस्त जीवनाची हाक त्यांना अस्वस्थ करू लागली. १५८६ साली त्यांनी फ्रान्सिस्कन संघात प्रवेश केला. १५९२ साली मिशनरी म्हणून ते जपानला गेले. गोरगरीब, अनाथ, अपंग आणि कुष्ठरोगी यांची सेवा हा ख्रिस्ती धर्मश्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. त्याच प्रेरणेतून प्रेरित होऊन गोन्सालो यांनी रुग्णसेवेला वाहून घेतले. उच्च आध्यात्मिक उद्दिष्ट उराशी बाळगल्याशिवाय कुणीही कुणाची सेवा करू शकत नाही. रक्ताच्या नात्यासंबंधात अनेकदा हेळसांड होते. मग जे ना आपल्या नात्यागोत्याचे, त्यांची सेवा करण्यासाठी माणुसकीवर आणि देवावर नितांत श्रद्धा असावी लागते. ते दान गोन्सालो यांना मिळाले आणि त्यांनी ते जोपासले. त्यासाठी त्यांनी ५ फेब्रुवारी १५९७ ला आत्मबलिदान केले. जपानमध्ये नागासाकी शहरावर वसईकर संत गोन्सालोंचे स्मारक उभारलेले आहे.
फादर फ्रान्सिस दिब्रेटो
francisd43@gmail.com

शुक्र स्वतभोवती इतर ग्रहांच्या तुलनेत उलटा का फिरतो? आणखी कोणत्या ग्रहांच्या स्वतभोवती फिरण्याच्या कक्षा अशा विचित्र आहेत?
शुक्राच्या अनेक चमत्कारिक वाटणाऱ्या गोष्टींपैकी शुक्राचे स्वतभोवतालचे भ्रमण हे सर्वात मोठे कोडे मानले जाते. शुक्र स्वतच्या अक्षाभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. त्यामुळे शुक्रावर सूर्य पश्चिमेला उगवतो. आपल्या पृथ्वीचा अक्ष जसा साडेतेवीस अंशांनी कलला आहे, तसा शुक्राचा अक्ष तब्बल १७७ अंशांनी कललेला आहे. म्हणजे शुक्र हा आपल्यासापेक्ष जवळजवळ उलटाच झाला आहे. त्यामुळेच त्याचे स्वतभोवतालचे भ्रमण उलटे दिसते. भ्रमणअक्षात आमूलाग्र बदल होण्याकरिता मोठे आघात कारणीभूत असू शकतात. त्यानुसार शुक्रनिर्मितीनंतर कधीतरी त्यावर प्रचंड मोठा आघात झाला असावा, असा कयास आहे. शुक्राचे स्वतभोवती अत्यंत संथ गतीने भ्रमण, शुक्राला उपग्रह नसणे व स्वतभोवती उलटे फिरणे या सर्वाचे मूळ कदाचित त्यावर लघुग्रहाकडून झालेल्या दोन मोठय़ा आघातांत असावे, असा सिद्धांत २००६ साली मांडला गेला. या सिद्धांतानुसार पहिल्या आघातामुळे शुक्राला एक उपग्रह मिळाला असावा. यानंतर सुमारे एक कोटी वर्षांनी झालेल्या दुसऱ्या आघाताने शुक्राची भ्रमणदिशा बदलली असावी व उपग्रह शुक्रात विलीन झाला असावा. युरोपीय अंतराळ संस्थेचे ‘व्हीनस एक्स्प्रेस’ हे यान सध्या शुक्राचा अभ्यास करीत आहे. या अभ्यासाद्वारे कदाचित येत्या काही वर्षांत शुक्राच्या अंतरंगातील हे गूढ व्यवस्थित उकलले जाईल, असे वाटते. युरेनस या ग्रहाच्या अक्षाचा कल ९८ अंश इतका आहे. त्यामुळे तो सूर्याभोवती फिरताना आडवा घरंगळत गेल्यासारखा मार्गक्रमण करीत असतो. युरेनसच्या बाबतीतही त्याला ‘आडवा’ करण्यास एखाद्या लघुग्रहाचाच आघात कारणीभूत ठरला असावा.
अभय देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

३ फेब्रुवारी १८८१ रोजी पंजाबातील जालंदर जिल्ह्य़ात सरदार अजितसिंग यांचा जन्म झाला. इंग्रज-शीख युद्धात त्यांचे पूर्वज इंग्रजांविरुद्ध लढले होते. तोच वारसा त्यांनी आणि त्यांच्या पुढच्या पिढीने चालवला. शहीद भगतसिंग हा त्यांचा पुतण्या. अजितसिंग लाहोरला उच्च शिक्षणासाठी गेले असता तेथे त्यांची लाला लजपतराय यांच्याशी भेट झाली. मग ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. ‘भारतमाता’ नावाची जहाल क्रांतिकारी संघटना त्यांनी स्थापन केली. ब्रिटिशांनी त्यांची रवानगी मंडालेच्या तुरुंगात केली. तेथून सुटल्यावर क्रांतिकार्यासाठी त्यांनी भारत सोडला. पर्शिया, तुर्कस्तान, जर्मन, फ्रान्स, इटली, रशिया येथील क्रांतिकारकांशी त्यांनी संपर्क साधला. त्या काळात भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे जागतिक पातळीवर एक प्रतिनिधी सरदार अजित सिंग होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात क्रांती घडवून आणण्याची त्यांची योजना जर्मनी, जपान, इटलीचा पराभवामुळे बारगळली. मातृभूमीत पाय ठेवण्याची ओढ त्यांना आता लागली होती. सन १९०९ साली त्यांनी देश सोडला होता. जवळजवळ चार दशके ते भारताबाहेर होते. ते देशात परतले. मात्र स्वातंत्र्य मिळाले त्याच दिवशी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

आजी माझी मैत्रीण आहे. ती मला रागवत नाही, ओरडत नाही. हे कर, ते करू नको, असे सांगत नाही. उलट आम्ही दोघी मिळून कितीतरी मज्जा-मज्जा करतो. बाबांचा वाढदिवस जवळ आला होता. बाबांना एक वेगळीच भेट देऊन चकित करायचे मी आणि आजीने ठरविले. दर सोमवारी आई हॉस्पिटलमधून उशिरा येते अन् दादाची बेसबॉलची प्रॅक्टिस असते. मी घरी एकटी असते म्हणून मला सोबत करायला आजी येते. ती गावात मंडईजवळ राहते, तिथून सात नंबर बसने येते. बस आली की, मी धावत गेटपाशी जाते. दादा मॅचसाठी मुंबईला गेला, तो दोन आठवडय़ांनी यायचा होता. आमचा बेत नक्की झाला. आजीने ‘एबीसीडी’ची चित्रे असलेले पुस्तक आणले. अभ्यास सुरू झाला आमचा. हळूहळू काही दिवसांत आजी अख्खी इंग्रजी कविता वाचायला लागली. मी तिला बक्षीस म्हणून माझी आवडती गोष्टींची पुस्तकं देऊन टाकली. आजीने माझा छानसा पापा घेतला. मग आम्ही दोघींनी व्हीसीडी लावून इंग्रजी पिक्चर पाहिला. हां हां म्हणता बाबांचा वाढदिवस जवळ आला. शुक्रवारी बाबा बरोबर सकाळी घरी पोहोचले. नंतर तासाभरातच दादाही मुंबईहून आला, तेही मॅच जिंकून. रात्रभर प्रवास करून आलेले बाबा म्हणाले, ‘‘तासभर जरा झोप काढतो.’’ मी अन् दादा कामाला लागलो. मी चित्र काढलं. दादाने ग्रीटिंग कार्ड तयार केलं. पाकिटात घालून त्यांना दिसेल असं ते ठेवलं. फुलांचा गुच्छ करून त्याच्याजवळ ठेवला. बाबांचा आवडता वाटाणेभात, बासुंदी-पुरी करण्यात आई गर्क होती. आजी यायची मी सारखी वाट पाहात होते. दारावरची घंटी वाजली. आजी पिशवी घेऊन दारात उभी होती. ती जड पिशवी कोचामागे दडवून ठेव, असं आजीने सांगितलं. जेवताना बाबा म्हणाले, ‘‘आई, तुझे गुडघे कसे आहेत? तुझी बिलं, टॅक्स, पत्रं आता उद्या-परवापर्यंत वाचतो. वेळच झाला नाही मला.’’ आजी आणि मी गालात हसलो. जेवणं झाली. दादाने बाबांना नमस्कार केला. छानशी चष्म्याची कातडी डबी भेट दिली. आईने स्वत विणलेला स्वेटर दिला. मी म्हटलं, ‘‘आता माझी आणि आजीची खास भेट!’’ पिशवीतले इंग्रजीचे पुस्तक काढून आजीने ‘द मॅजिक लॅम्प’ वाचायला सुरुवात केली आणि सगळे थक्क झाले. आई म्हणाली, ‘‘अगंबाई, कधी शिकलात?’’ बाबा म्हणाले,‘‘चमत्कारच झाला!’’ आजीने मला जवळ घेतलं. ‘उमामुळे हा चमत्कार झाला. तुला किती दिवस माझा इंग्रजी पत्रव्यवहार वाचायचा त्रास द्यायचा? उमाला विचारलं, ‘मला शिकवशील का?’ ..आणि माझं सगळय़ात आवडतं पुस्तक पाहायचंय? हे पाहा’, म्हणत आजीने मला मिठीत घेतले.
जिद्द असेल तर कुठल्याही वयात आपण नवी गोष्ट शिकू शकतो आणि आपल्याला त्यासाठी मदत करायलाही अनेकजण पुढे येतात.
आजचा संकल्प- आज मी मला अवघड वाटणारी एखादी गोष्ट शिकण्याचा संकल्प करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com