Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

मुख्यालयाची १२३ कोटींची निविदा फेटाळली
नवी मुंबई/प्रतिनिधी : नवी मुंबई महापालिकेच्या नियोजित मुख्यालयासाठी सुमारे १२३ कोटी रुपयांची निविदा भरणाऱ्या ठेकेदाराला आयुक्त विजय नाहटा यांनी अखेर लाल बावटा दाखविला आहे. ऐन मंदीच्या काळातही मुख्यालयाच्या बांधणीसाठी भरण्यात आलेली तब्बल ६२ टक्के जादा दराची ही निविदा मंजूर करण्याचे प्रयत्न महापालिकेतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सुरू केले होते. या संदर्भातील वृत्त ‘वृत्तान्त’ने सर्वप्रथम दिले होते. अखेर अव्वाच्या सव्वा दराची ही निविदा नाहटा यांनी फेटाळली आहे.

नवी मुंबई परिसरात शनिवारपासून रिक्षा भाडेकपात!
नवी मुंबई/प्रतिनिधी

केंद्र सरकारने पेट्रोल तसेच डिझेलच्या दरात सातत्याने कपात केल्याने नवी मुंबईतील रिक्षांच्या भाडेदरात अखेर कपात होण्याची चिन्हे दिसू लागली असून येत्या ७ फेब्रुवारीस या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवी मुंबईतील शिवसेनाप्रणीत रिक्षा संघटनांनी ग्राहकांना दिलासा म्हणून मीटरमागे दोन रुपयांच्या कपातीची घोषणा केली आहे. मात्र, रिक्षा सेनेच्या या घोषणेस सर्वच रिक्षा संघटनांनी पाठिंबा दर्शविला नसल्याने अजूनही जुन्याच दराने भाडे आकारले जात आहे.

पालकमंत्र्यांनी उद्या बोलाविलेल्या मित्रपक्षांच्या बैठकीत काँग्रेसचे शरसंधान?
नवी मुंबई/प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (बुधवारी) वाशी येथे होणाऱ्या मित्रपक्षांच्या बैठकीकडे सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात मित्रपक्ष म्हणून सत्तेत असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवी मुंबईत मात्र विस्तवही जात नाही. मागील तीन वर्षांत महापालिकेत विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसला नेहमीच स्थापत्य वागणूक देणाऱ्या राष्ट्रवादीला आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आपलेसे करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार असून, बुधवारी होणारी बैठक म्हणूनच महत्त्वाची ठरणार आहे.

‘अंतुले- ठाकूर गटांना एकत्र आणू’
उरण/वार्ताहर

भविष्यात शिवसेना- शेकाप- भाजप आघाडी एकत्रित येऊनही शेतकऱ्यांचे भले करणार नाही. यामुळे रायगड विकासासाठी काँग्रेसमध्ये सुरू असलेली गटबाजी मोडीत काढण्यासाठी बॅ. ए. आर. अंतुले व रामशेठ ठाकूर यांनाच एकत्र आणणार असल्याची प्रतिक्रिया अ‍ॅड. दत्ता पाटील यांनी येथे आयोजित आगरी- कोळी- कराडी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली.

‘श्रीराज चषक’ स्पर्धेत जी. पी. स्पोर्टस्ला चषक
उरण/वार्ताहर : समिधा स्पोर्टस्तर्फे आयोजित जिल्हास्तरीय मर्यादित क्रिकेट स्पर्धेत जी. पी. स्पोर्टस् फंडे संघाने समरझोन इलेव्हन नवगाव अलिबाग संघाचा पराभव करून ‘श्रीराम चषक’ पटकाविला. विजेते व उपविजेत्यांना टीम इंडियाचे माजी कर्णधार अजित वाडेकर व सुप्रसिद्ध संगीतकार, गायक अवधूत गुप्ते यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. क्रिकेटच्या आयोजनाबद्दल व स्पर्धा निकोपपणे शांततेत पार पडल्याबद्दल वाडेकर यांनी समाधान व्यक्त केले. श्रीराज काका पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने त्यांच्या कुटुंबियांनी समिधा स्पोर्टस्च्या माध्यमातून जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. जेएनपीटी कामगार वसाहतीतील भव्य क्रीडांगणावर आयोजित स्पर्धेच्या समारोपप्रसंगी टीम इंडियाचे माजी कर्णधार अजित वाडेकर, अवधूत गुप्ते, कामगारमंत्री नवाब मलिक, मुंबई संघाचे क्रिकेटपटू उमेश कुलकर्णी, अमेय खोपकर, अमेय दाते व इतर उपस्थित होते.अंतिम लढत जीपी स्पोर्टस् फुंडे व समरझोन इलेव्हन नवगाव संघ अलिबाग यांच्यात झाली. या चुरशीच्या व अटीतटीच्या लढतीत जी. पी. स्पोर्टस्ने समरझोन इलेव्हन संघाला धूळ चारून ‘श्रीराज चषका’वर नाव कोरले. विजेत्यांना एक लाख रोख व चषक व उपविजेत्यांना ५० हजार व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी सुमारे दीड ते दोन हजार क्रिकेट रसिक उपस्थित होते. चाहत्यांनी गाण्याचा आग्रह धरताच अवधूत गुप्ते यांनी ‘डिबा दी डिचपान’ गाणे गाऊन रसिकांची फर्माईश पूर्ण केली. रसिकांनीही आनंद व्यक्त केला.

कोपरखैरणे, ऐरोली येथे चोरीच्या घटना
बेलापूर/वार्ताहर

घरफोडी, तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरटय़ांनी चोरल्याची घटना कोपरखैरणे येथे घडली. या प्रकरणी फिर्यादी व्यंकटेश शिवप्पा व छाया सीरसीम यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवप्पा हे कामानिमित्त बाहेर गेले असता, चोरटय़ांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून २७ हजारांचे दागिने चोरून नेले.दुसऱ्या एका प्रकरणी फिर्यादी छाया या सेक्टर-१४ येथील रस्त्याने जात असताना रात्री नऊ वाजता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील पाच हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून चोरून नेले. ऐरोली, सेक्टर-४ येथून रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ३६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरटय़ांनी चोरून नेले. या प्रकरणी फिर्यादी शीला नाईक यांनी रबाले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

उरण मनसे अध्यक्ष भगत यांना अटक
उरण/वार्ताहर : येथील कंपनी अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या उरण तालुका मनसेचे अध्यक्ष अतुल भगत व त्यांच्या अन्य नऊ साथीदारांना उरण पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. खोपटे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कॉन्टीनेण्टल कंटेनर यार्डच्या व्यवस्थापकांना मनसेचे तालुका अध्यक्ष अतुल भगत व त्यांच्या साथीदारांनी दहशत माजवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच काही कामगारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून स्थानिकांना नोकरी द्या, या आधीची कामगार भरती रद्द करा, अन्यथा दरमहा ४० हजार रुपये हप्ता द्या, अशी मागणी केल्याची तक्रार अजय म्हापसेकर यांनी उरण पोलीस ठाण्यात नोंदविली होती.या तक्रारीची दखल घेऊन उरण पोलीस ठाण्याचे पो.नि. आर. के. कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुंडूराव बांगर यांनी भगत व त्यांच्या अन्य नऊ सहकाऱ्यांना अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

महापालिका आयुक्तांचा आज नागरी सत्कार
बेलापूर/वार्ताहर

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त विजय नाहटा यांचा नागरी सत्कार मंगळवारी नवी मुंबई स्वयंसेवी संस्था समन्वय मंचातर्फे वाशी येथे करण्यात येणार आहे. भावे नाटय़गृहात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास साक्षेपी पत्रकार व ग्रंथाली चळवळीचे अध्वर्यू दिनकर गांगल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांच्या हस्ते नाहटा यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

‘समाजाला दिशा देण्याची ताकद वाचकपत्रांत’
बेलापूर/वार्ताहर : लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणाऱ्या वाचकांच्या पत्रांत समाजाला दिशा देण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर यांनी वाशी येथे केले. साप्ताहिक वार्तादीपच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी पत्रकार अनंत पाटील, स्वाती नाईक व मनीषा ठाकूर यांचा पात्रुडकरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आगरी समाजातून आलेल्या पत्रकारांच्या उदाहरणातून एकूणच हा समाज काळाची गती जलदपणे आत्मसात करण्यास यशस्वी ठरत आहे, असे मत वार्तादीपचे संपादक राजेंद्र घरत यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक ज्ञानेश्वर गावडे यांसह अन्य नवोदित वृत्तपत्र लेखकांचा सत्कार करण्यात आला.