Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

बेशिस्त वाहतुकीस आळा घालण्यासाठी मोहीम
प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांची उद्या बैठक
प्रतिनिधी / नाशिक
शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांबरोबर क्षमतेहून अधिक विद्यार्थी व प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहनांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस शाखा यांनी संयुक्तरित्या विशेष धडक मोहीम आखण्याचे प्रयत्न सुरू केले असून या पाश्र्वभूमीवर, येत्या बुधवारी उभय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा केली जाणार आहे.

हिंदू शिक्षण मंडळाचे आता महिला सैनिकी विद्यालय
प्रतिनिधी / नाशिक

भारतीय लष्करात महिलांना उपलब्ध असणाऱ्या विविध संधींचा लाभ घेता यावा यासाठी शालेय जीवनातच त्यांची त्यादृष्टीने तयारी व्हावी, या उद्देशाने येथील हिंदू मध्यवर्ती सैनिकी शिक्षण मंडळ संस्थेने महिला सैनिकी विद्यालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षांपासून या विद्यालयात विद्यार्थिनींना घोडेस्वारी, नेमबाजी, नकाशा वाचनासह तत्सम विषयांचे पाठ मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यात सध्या एक-दोन ठिकाणी सैनिकी शिक्षण मिळत असले तरी त्यांची प्रवेश क्षमता मर्यादित असल्याने अनेक युवतींना इच्छा असूनही प्रवेश मिळू शकत नाही.

नाशिकमध्ये उद्यापासून ‘नवनीत ज्ञानसागर’ प्रदर्शन
प्रतिनिधी / नाशिक

विविध पुस्तके, ग्रंथ, शैक्षणिक साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक डिस्ट्रीक्ट बुकसेलर्स अ‍ॅन्ड स्टेशनर्स असोसिएशनतर्फे येथे चार ते आठ फेब्रुवारी या कालावधीत ‘नवनीत ज्ञानसागर २००९’ भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनानिमित्त मान्यवर चित्रकार प्रात्यक्षिक दाखविणार असून याशिवाय विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्यानेही होणार आहेत.
सकाळी ११ ते रात्री नऊ ही या प्रदर्शनाची वेळ असून डोंगरे वसतीगृह मैदानात त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शहादा बसस्थानक स्थलांतरीत करणार - सुरूपसिंग नाईक
शहादा / वार्ताहर

शहादेकर नागरिकांसाठी प्रस्तावित असलेल्या पाणी पुरवटा योजनेचा पाठपुरावा करून केंद्र शासनाकडून ती मंजूर करून प्रत्यक्षात अंमलात आणू तसेच बसस्थानक शहराबाहेर हलवून वाहतुकीचा प्रश्न सोडवू असे प्रतिपादन परिवहन आणि पालकमंत्री सुरूपसिंग नाईक यांनी केले. नगरपालिकेच्या नवीन शॉपींग सेंटरचे उद्घाटन तसेच नियोजित बांधकामाचे भूमीपूजन नाईक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी माजी आमदार पी. के. पाटील हे होते. प्रमख पाहुणे म्हणून तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. चंद्रकांत रघुवंशी, आ. अ‍ॅड. पद्माकर वळवी, नगराध्यक्षा रमाबाई वसावे, जि. प. सदस्य दीपक पाटील, तुकाराम पाटील, उपनगराध्यक्ष युनुस बागवान आदी उपस्थित होते. तापी नदीवरील सारंगखेडा व प्रकाशे येथील लघु प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी देवून बंद पडलेल्या उपसा जल सिंचन योजना नव्याने कार्यान्वित करण्यासाठी शाशन दरबारी प्रयत्न सुरू असल्याचे नाईक यांनी सांगितले. महिला बचत गटांच्या आर्थिक उन्नतीसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत दुकान परवाना उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाची बैठक घेण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. पी. के. पाटील यांनी अध्यक्षीय भाषमात शहरात वाढलेली वाहतूक समस्या लक्षात घेता एस. टी. बसस्थानक शहराबाहेर नेण्याची गरज असल्याचे सांगून शहरवासियांसाठी पाणी पुरवठा, गटार बांधकाम याचे नियोजन करण्यात आले आहे असे सांगितले.

स्पर्धा परीक्षांचा ‘सटाणा पॅटर्न’ नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न : दिघावकर
वार्ताहर / सटाणा

शिक्षणाचा लातूर पॅटर्न, फेस्टिव्हलचा पुणे पॅटर्न, विकासाचा बारामती पॅटर्न यांचा गवगवा होत असताना आता स्पर्धा परीक्षांसाठी ‘सटाणा पॅटर्न’ सर्वदूर पोहोचविण्याची जबाबदारी तालुक्यातील मूळ रहिवासी व सध्या रायगड जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक असलेले प्रताप दिघावकर यांनी स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. स्पर्धा परीक्षांचा ‘सटाणा पॅटर्न’ नावारूपास आणण्यासाठी सर्वकाही करण्याची आपली तयारी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.येथील ना. म. सोनवणे महाविद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. अ‍ॅड. नितीन ठाकरे हे अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी एस्. चोक्कलिंगम, जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ. निखील गुप्ता, डॉ. विलास बच्छाव, भरत कापडणीस, नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, रामचंद्र पाटील, तहसीलदार इंदिरा चौधरी, मनोहर देवरे व्यासपीठावर उपस्थित होते. स्पर्धापरीक्षांबाबत मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, इंग्रजीचा बाऊ न करता इंग्रजी भाषेत उत्तरपत्रिका लिहिता येत नसेल तर मातृभाषेतून उत्तरे द्या, पण परीक्षेला सामोरे जा, असे आवाहन करतानाच पाया भक्कम असेल तर परीक्षेत निश्चित यश मिळेल, असेही ते म्हणाले. यावेळी चोक्कलिंगम व गुप्ता यांनीही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रा. बी. जे. शेवाळे यांनी केले.