Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

पाच वाजेपर्यंत अधिकार द्या;अन्यथा ‘पुणे पॅटर्न’ तोडणार
शिवसेनेचा अंतिम इशारा
पुणे, २ फेब्रुवारी/प्रतिनिधी
स्थायी समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे यांचे सर्वाधिकार उद्या (मंगळवार) सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यांना सन्मानाने परत न दिल्यास शिवसेना ‘पुणे पॅटर्न’ तोडेल, तसेच देशपांडे आणि उपमहापौर चंद्रकांत मोकाटे पदाचा राजीनामा देतील, असा निर्वाणीचा इशारा सेनेतर्फे आज राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला. शिवसेनेचे शहरप्रमुख नाना वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. स्थायी समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे यांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे व ते मांडण्याचे सर्वाधिकार गेल्या मंगळवारी काढून घेण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने एकत्र येऊन केलेल्या या खेळीला आता पूर्ण राजकीय रंग आला असून ‘पुणे पॅटर्न’चे भवितव्यही पणाला लागले आहे.

दीड लाखातील घर योजनेतील लाभार्थींची यादी अखेर जाहीर
पिंपरी, २ फेब्रुवारी / प्रतिनिधी

बऱ्याच काळापासून रखडलेली घरकुल योजनेतील लाभार्थीची यादी अखेर आज महापौर अपर्णा डोके आणि आयुक्त आशिष शर्मा यांनी जाहीर केली. त्यामुळे दीड लाखाच्या घरकुलात राहण्याचे स्वप्न रंगविलेल्या सर्वसामान्य नागरिकांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान, घरकुल योजनेतील घर मिळविण्यासाठी बोगस नावे नोंदविणाऱ्या नागरिकांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. केंद्र सरकारच्या ‘जेएनएनयूआरएम’ योजनेअंतर्गत पिंपरी पालिकेच्या वतीने ‘दीड लाखात घर’ ही घरकुल योजना जाहीर करण्यात आली.

‘चक्रधरां’च्या हाती आता दहावी अभ्यासाची लेखणी!
पुणे, २ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

कुलपती, कुलगुरूंचे सारथ्य करणारे ‘चक्रधर’ आता शैक्षणिक महामार्गावरही दौड करणार असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, राष्ट्रीय मुक्त विद्यालयाच्या सहकार्याने दहावी अभ्यासाकरिता लेखणी हाती धरीत आहेत! कॅन्टीनमधील वेटर, माळी-सेवकही आता विद्यायात्रेत सहभागी झाले आहेत. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या पत्नी संजीवनी यांच्या पुढाकारातून विद्येच्या माहेरघरात ही शिक्षणक्रांती घडत आहे.

जन्मदात्यांनीच केले मुलीला ‘बेवारस’ !
ससून रुग्णालयातून मुलीस नेण्याचे आवाहन
मुस्तफा आतार
पुणे, २ फेब्रुवारी

‘त्या’ चिमुरडीला वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षीच धनुर्वाताच्या आजाराने ग्रासले.. उपचारांसाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात तिला दाखलही केले.. उपचारानंतर बरे होऊन आपण पुन्हा एकदा फुलपाखरासारखे मुक्त पणे बागडू, असेच तिला वाटत होते.. पण तिच्या ‘दुर्दैवाचा फेरा’ अद्यापही संपला नव्हता.. कारण आजारातून मुक्ती मिळाली खरी पण ज्यांनी मायेचा आधार द्यायचा तेच माता पिता निर्दयपणे तिला रुग्णालयात बेवारस सोडून निघून गेले..!

प्रमुख चौकांतील खास सिग्नल काढून टाकण्यास सुरुवात
पुणे, २ फेब्रुवारी / प्रतिनिधी

इंडियन रोड कॉँग्रेसचे निकष डावलून शहरातील प्रमुख चौकांतील रुग्णालये, हॉटेल, कार्यालयांसाठी दिलेले खास ‘सिग्नल’ काढून टाकण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, जहांगीर रुग्णालय, हॉटेल ब्ल्यू डायमंड व संचेती रुग्णालय येथे देण्यात आलेल्या अशा सिग्नलवर याची प्रथम अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यामुळे प्रत्येक चौकामध्ये वाहनांना हिरवा दिव्याचा दहा ते पंधरा सेकंदांचा जादा वेळ मिळणार आहे.

डॉक्टरांवरील हल्ले चुकीचे - अजित पवार
पिंपरी, २ फेब्रुवारी / प्रतिनिधी

डॉक्टरांवर हल्ले करणे चुकीचे आहे, असे मत व्यक्त करीत असे हल्ले करणाऱ्यांची गंभीर दखल शासनाकडून घेतली जाईल, असा इशारा पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
थेरगाव येथील डॉ. संजय गव्हाणे यांच्या गव्हाणे हॉस्पिटलचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी महापौर अपर्णा डोके, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष आझम पानसरे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, स्थायी समितीच्या अध्यक्षा उषा वाघेरे, माजी महापौर संजोग वाघे, डॉ. वैशाली घोडेकर, नगरसेवक श्रीरंग बारणे, अजित गव्हाणे, संतोष बारणे, अण्णा बनसोडे, प्रभाकर वाघेरे, नाना काट, डॉ. सुहास परचुरे, डॉ. दिलीप कामत आदी उपस्थित होते.
शेतकरी कुटुंबातील मुले शेती सोडून वेगळे काहीतरी करीत असल्याचे सांगत पवार यांनी आपणास त्यांचा अभिमान आहे, असे नमूद केले. डॉ. गव्हाणे व डॉ. भोईर तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचे पवार यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन डॉ. मीनल लाड यांनी केले. डॉ. गणेश भोईर यांनी आभार मानले.

वाहतूकदारांना शहरालगत अधिकृत जागा देणार
पुणे, २ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

प्रवासी व माल वाहतूकदारांना शहरालगतच्या विविध ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीने अधिकृत जागा देण्यास महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती दी पूना डिस्ट्रीक्ट मोटार गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर आज परदेशी यांची बैठक झाली. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील, संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रेय हाळंदे, प्रसन्न पटवर्धन, बाळासाहेब खेडेकर आदी त्या वेळी उपस्थित होते. बैठकीमध्ये वाहतूकदारांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. गणेश पेठ, नाना पेठ, भवानी पेठ येथील वाहतूकदारांना असोसिएशनच्या माध्यमातून धनकवडी ट्रक टर्मिनस येथे वाहतूकनगरीसाठी जागा देण्याचे परदेशी यांनी मान्य केले. त्याचप्रमाणे बालेवाडी जकातनाका, शेवाळवाडी जकातनाका, हडपसर, वाघोली व शहरातील इतर भागातील बस, ट्रक पार्किंग व वाहतूकदारांना व्यवसाय करण्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागा देण्याचेही बैठकीत मान्य करण्यात आल्याचे असोसिएशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.

मंगलाताई फडणीस यांना ‘आदर्श आई पुरस्कार’
पुणे, २ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

रंगत-संगत प्रतिष्ठान व साहिल फाऊंडेशन तर्फे दिला जाणारा ‘आदर्श आई पुरस्कार’ मंगलाताई फडणीस यांना प्रतिष्ठानच्या विश्वस्त मैथिली आडकर यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी. म. भा. चव्हाण होते.चव्हाण म्हणाले, की सृष्टी आणि स्त्री काही वेगळी नाही. एखाद्या स्त्रीचा गौरव करणे म्हणजे संबंध सृष्टीचाच गौरव केल्यासारखे आहे. आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा घटक कुटुंब असून त्याचा प्रमुख आधार आईच असते. त्यामुळे तिला समाजात मानाचे स्थान देणे आवश्यक आहे. स्त्रीच आपल्या मुलांना कठीण परिस्थितीशी लढा देण्यास शिकवते.पुरस्काराला उत्तर देताना फडणीस म्हणाल्या, की आईने मुलांवर चांगले संस्कार केले तरच मुलगा भविष्यात काहीतरी करून दाखवेल. केवळ जन्म देऊन थांबू नये, तर परिस्थितीनुरूप वागले पाहिजे.

लोणकर विद्यालयाला हरित शाळा पुरस्कार
हडपसर, २ फेब्रुवारी/वार्ताहर

राष्ट्रीय हरित सेना आणि सामाजिक वनीकरणाच्या वतीने देण्यात येणारा पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार मुंढवा येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या लोणकर माध्यमिक विद्यालयाला पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला.या वेळी महापौर राजलक्ष्मी भोसले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैशाली आबणे, नगरसेवक, पोलीस पदाधिकारी आणि शाळांमधील शिक्षक, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.पर्यावरणविषयक जनजागृती, वृक्षलागवड व संवर्धन, पाणी साठवण, परिसर स्वच्छता व कचऱ्याची विल्हेवाट आणि पर्यावरणविषयक अनेक प्रकल्पांविषयी २००८ मध्ये अनेक प्रकल्प राबविले आहेत. या स्पर्धेमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्य़ातील शाळांनी सहभाग घेतला होता.या शाळेमध्ये गेल्या पाच वर्षांपासून पर्यावरणाचे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसन समितीवर किशोर रिठे
पुणे, २ फेब्रुवारी/प्रतिनिधी

देशातील व्याघ्र प्रकल्पामधील गावांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत महाराष्ट्रातील पर्यावरण अभ्यासक किशोर रिठे यांची निवड करण्यात आली आहे. व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. राजेश गोपाल यांनी नवी दिल्ली येथे नुकतीच याबाबत घोषणा केली.दिल्ली येथील ‘सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हानर्मेट’ या संस्थेच्या प्रमुख सुनीता नारायण या समितीच्या अध्यक्ष आहेत. याशिवाय मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्रसिंह राणा, दिल्ली येथील रघु चुडावत, आर. श्रीधर, बिजेंद्रसिंग, कर्नाटकमधील संजय गुब्बी, राजस्थानचे व्ही. डी. शर्मा यांचाही या समितीत समावेश आहे. किशोर रिठे यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील तीन गावांच्या यशस्वी पुनर्वसनासाठी मदत केली होती.

कुत्र्यांमुळे लागला मृतदेहाचा शोध
चाकण, २ फेब्रुवारी/वार्ताहर

चाकण-आळंदी रस्त्यालगत माझगाव फाटा (ता.खेड) या निर्जन रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांमुळे एका मृतदेहाचा शोध लागला असून, हा मृतदेह मोशीमधील रिक्षाचालकाचा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांनी दिली.येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण-आळंदी रस्त्याने माझगाव फाटा या रस्त्याने विठ्ठल शंकर पाठारे (वय ४१, रा.माझगाव, ता.खेड) काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना काही अंतरावर दोन-तीन कुत्री जोरजोरात भुंकत होती. या निर्जन रस्त्यावर कुत्री भुंकताहेत याबाबत संशय आल्याने पाठारे यांनी आपली दुचाकी थांबवून प्रत्यक्ष जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी २५ वर्षे वयाच्या एका तरुणाचा मृतदेह त्यांना दिसला.सदरचा प्रकार पाहून घाबरलेल्या पाठारे यांनी सरळ घर गाठले व घरुनच चाकण पोलिसांना हा प्रकार कळविला. पोलीस निरीक्षक घाडगे यांच्यासह त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक विलास पुजारी, पोलीस हवालदार राजेश मोहिते, संतोष घोलप आदींनी घटनास्थळी जाऊन हा मृतदेह ताब्यात घेतला. प्रकाश रोहिदास थोरात (वय २५, रा.गणेशनगर, मोशी, ता.हवेली, जि.पुणे) असे या युवकाचे नाव असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलीस निरीक्षक घाडगे यांनी सांगितले. येथील ग्रामीण रुग्णालयात थोरात यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले.