Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

राज्य

शिर्डी-पुणतांबे मार्गावर ‘झुकझुक आगीनगाडी..’!
शिर्डी-मुंबई सेवा पंधरवडय़ात
राहाता, २ फेब्रुवारी/वार्ताहर
शिर्डी-पुणतांबे या १७ किलोमीटर अंतराच्या मार्गावरून अखेर रेल्वे धावली आणि मुंबई-शिर्डी रेल्वेसेवेच्या दृष्टीने पहिला ‘सिग्नल’ मिळाला! येत्या १५ दिवसांत शिर्डी-मुंबई रेल्वेसेवा सुरू होणार असून, त्याची चाचणी आज घेण्यात आली. शिर्डीत रेल्वे धावण्याचे साईभक्तांसह जनतेचे स्वप्न आता साकारले आहे. शिर्डीतील रेल्वेस्थानकाचे साईनगर असे नामकरण करण्यात आले आहे.
मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक डी. बी. मुदगल आज दुपारी इंजिनासह ४ डब्यांची रेल्वे घेऊन शिर्डीत आले. दि. १० ते १३ फेब्रुवारीदरम्यान या मार्गाची चाचणी होणार आहे.

जयंतराव साळगावकर हा एक सांस्कृतिक ठेवा - बाबासाहेब पुरंदरे
सावंतवाडी, २ फेब्रुवारी/वार्ताहर
ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर म्हणजे साक्षात ज्ञान आणि योग्यतेचा प्रचंड निधी आहे. त्यांच्या ज्ञानाचा शोध अद्भुत आहे. साळगावकर एक सांस्कृतिक खजिनाच असल्याचे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मालवण येथे केले. ‘आम्ही मालवणी’च्या वतीने जयंतराव साळगावकर यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण येथील मामा वरेरकर नाटय़गृहात जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा भव्य सत्कार बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीफळाने साळगावकर यांची तुला करण्यात आली. जीवन गौरव पुरस्कार आणि मानपत्र पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

वेतन आयोगाचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवणार -अर्थमंत्री
यंदा अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान प्रस्ताव
पुणे, २ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या येत्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुकांमुळे यंदा राज्य सरकारला अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान प्रस्ताव ठेवावा लागण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने सहावा वेतन आयोग लागू केला आहे. राज्य सरकारने नेहमीच केंद्राशी सुसंगत अशीच भूमिका घेतली आहे. केंद्राप्रमाणे राज्यातही वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली जात आहे.

शासनाच्या निष्काळजीपणामुळे महिला बचत गटांवर उपासमारीची वेळ!
ठाणे, २ फेब्रुवारी/प्रतिनिधी

बचत गटांच्या माध्यमातून आदिवासी महिलांच्या उन्नतीसाठी शासन विविध योजना राबवित असले तरी महिला बालकल्याण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आजवर पदरमोड करून अंगणवाडय़ांना आहार पुरविणाऱ्या बचत गटांवरच उपासमारीची वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील अंगणवाडय़ांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण होणाऱ्या लाखो मुलांच्या हिताचा विचार करून तसेच उपेक्षित महिला वर्गाच्या आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने अंगणवाडय़ातील मुलांचा आहार शिजविण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला.

नवीन घंटागाडय़ांचा वापर सुरू न केल्यास आंदोलन
दक्षता अभियानचा इशारा
नाशिक, २ फेब्रुवारी / प्रतिनिधी
शहरातील घंटागाडय़ांची अवस्था अतिशय बिकट झाली असून मोडकळीस आलेल्या व गळक्या गाडय़ांमुळे रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी कचरा पडलेला दिसतो, अनेक भागात ही गाडी नियमितपणे येत नाही असा आरोप करीत ही परिस्थिती बदलण्यासाठी खरेदी केलेल्या नव्या घंटागाडय़ा त्वरित वापराव्यात अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दक्षता अभियानतर्फे देण्यात आला आहे.

कोकण वैधानिक विकास मंडळाचा मुद्दा कळीचा!
अभिमन्यू लोंढे
सावंतवाडी, २ फेब्रुवारी

कोकण वैधानिक विकास महामंडळ स्थापन झाल्यास कोकणचा विकास झपाटय़ाने होईल, अशी भावना सर्वाचीच बनली असताना केंद्र सरकारने महामंडळ स्थापनेस नकारघंटा दर्शविल्याने हा विषय राजकीय पटलावर चर्चेला आला आहे. लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा अग्रभागी राहील, असे बोलले जात आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये त्यानिमित्ताने जुगलबंदी सुरू झाली आहे.

बुधल येथील वीज प्रकल्पावर रेसी प्रोकेटिंग पंपाची उभारणी
चिपळूण, २ फेब्रुवारी/वार्ताहर : गुहागर तालुक्यातील बुधल येथे सागरी लाटांवर उभारण्यात येणाऱ्या प्रायोगिक तत्त्वावरील जगातील पहिल्याच वीज प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी रेसी प्रोकेटिंग पंप आ. डॉ. विनय नातू यांच्या हस्ते आज बसविण्यात आला.
हा प्रकल्प अपार ऊर्जा प्रा. लि. या कंपनीकडून उभारण्यात येत आहे. वीजटंचाई लक्षात घेता अशा नैसर्गिक स्रोतांवर वीजनिर्मिती प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. जगातील या पहिल्याच प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पांमुळे गुहागरचे नाव जागतिक स्तरावर जाणार असल्याचे आ. नातू यांनी स्पष्ट केले. या पंपाद्वारे सुमारे ६० हजार लि. टाकीतील पाणी १२ इंच व्यासाच्या पाइपलाइनने ७२ मी. उंचावर नेऊन सहा इंच व्यासाच्या पाइपलाइनमधून ते पाणी वीजनिर्मिती करणाऱ्या टर्बाईनवर सोडले जाणार आहे. जोडलेल्या टर्बाईनची क्षमता ५४ किलोव्ॉट वीजनिर्मितीसाठी फिरू शकणाऱ्या वेगाएवढी आहे. मात्र प्रायोगिक तत्त्वावरील २५ किलोव्ॉटच्या या प्रकल्पामुळे जोडण्यात येणारे ‘अल्टरनेट’ हे २५ किलोव्ॉट वीजनिर्मिती करू शकतील एवढय़ाच क्षमतेचे आहे. यावेळी अपार ऊर्जाचे संचालक प्रा. गोपाळ बापट, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, डॉ. आनंद खरे, अ‍ॅड. मंगेश जोगळेकर, सभापती दीप्ती असगोलकर, जि. प. सदस्य प्रशांत शिरगावकर, गायकवाड आदी उपस्थित होते.

कर्जतमध्ये व्यापाऱ्याची घरात शिरून हत्या
कर्जत, २ फेब्रुवारी / वार्ताहर

कर्जतमधील एक व्यापारी हसमुख ओसवाल यांची आज पहाटे त्यांच्या घरात शिरून निर्घृण हत्या करण्यात आली. हा खून आग्रा येथील भोला शर्मा या कांदा आणि बटाटय़ाचा घाऊक व्यापार करणाऱ्या व्यक्तीने केला असल्याची तक्रार ओसवाल यांच्या पत्नीने केली आहे. ‘केसरिया अपार्टमेण्ट’मध्ये राहणारे हसमुख ओसवाल हे कर्जत रेल्वे स्थानकातील उपहारगृह चालवित होते. त्यासाठी लागणारा बटाटा ते आग्रा येथील भोला शर्मा या घाऊक व्यापाऱ्याकडून मागवीत असत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी काही बटाटा ओसवाल हे कल्याणपर्यंतच्या अनेक उपहारगृहांना पुरवित होते. याच व्यवहारावरून शर्माने आपल्या पतीचा खून केला असल्याची तक्रार ओसवाल यांची पत्नी लता यांनी केली आहे. आरोपी भोला शर्मा हा रात्री एकच्या सुमारास ओसवाल यांच्या घरी आला होता. स्टेशनवर डास चावत असल्यामुळे आज रात्री आपण तुमच्या घरी झोपणार असे त्याने सांगितले. त्यानुसार ओसवाल यांनी त्यांची झोपण्याची व्यवस्था हॉलमध्ये केली. त्यानंतर पहाटे तीनच्या आसपास ओसवाल हे झोपेतच असताना भोलाने बटाटे कापण्याच्या धारदार सुरीने त्यांच्या गळ्यावर वार करून त्यांची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद वायसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रावसाहेब सरदेसाई तपास करीत आहेत. दरम्यान, या हत्येच्या निषेधार्थ आज व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे सुनील गावस्कर यांना डॉक्टरेट
बेलापूर, २ फेब्रुवारी /वार्ताहर

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे तिसऱ्या वार्षिक पदवीदान समारंभात क्रीडा क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना बुधवारी ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलम यांनाही डॉक्टर ऑफ सायन्स, तर निवृत्त प्रशासकीय अधिकारी रमेशचंद्र सिन्हा यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर या पदवीने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे संचालक विजय पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्यपाल एस. सी. जमीर हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. वाय. पाटील हे राहणार असून, मॉरिशसच्या सामाजिक सुरक्षामंत्री शीलाबाय बापू या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या ७२७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी विविध विषयांत अव्वल येणाऱ्या १६ जणांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येणार असल्याचे उपकुलगुरू डॉ. जेम्स थॉमस यांनी सांगितले.

मनसे कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी
नाशिक, २ फेब्रुवारी / प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनी उत्तर भारतीयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमस्थळी गोंधळ घातल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या मनसेच्या २३ कार्यकर्त्यांंची आज येथील न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या कार्यकर्त्यांपैकी दोन जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोजपुरी गाण्यांचा कार्यक्रम उधळून लावल्याने पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर विविध कलमांखाली गुन्हे नोंदवत त्यांना अटक केली होती. त्यातील १८ जण आधी पकडले गेले तर उर्वरित कार्यकर्त्यांना नंतर अटक करण्यात यश मिळाले. या सर्वाना प्रथम ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. नंतर त्यांच्या पोलीस कोठडीत दोन फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली. या कोठडीची मुदत आज संपुष्टात आल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

चिपळूण पालिकेकडून माहितीचा अधिकार धाब्यावर
चिपळूण, २ फेब्रुवारी/वार्ताहर

येथील नगर परिषदेकडे माहितीच्या अधिकाराखाली मागविलेली माहिती मुदत संपल्यानंतर तब्बल २५ दिवसांनी देण्यात आल्यामुळे माजी नगरसेवक अरुण भोजने यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या विरोधात ते लवकरच पालिकेच्या अपिलीय अधिकाऱ्यांकडे अपील करणार आहेत. भोजने यांनी ४ डिसेंबर रोजी नगरपालिकेकडे घनकचरा प्रकल्प जागेत लावण्यात आलेली झाडे, सॅटेलाईटद्वारे सव्‍‌र्हेक्षण करणारी प्रणाली व त्याची निविदा आणि वृक्षसंवर्धनाची माहिती मागितली होती. शासनाच्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीने माहितीच्या अधिकाराखाली मागविण्यात आलेली माहिती ३० दिवसांच्या आत देणे गरजेचे आहे. मात्र असे असतानाही नगरपालिकेच्या प्रशासनाने ही माहिती मुदत संपून २५ दिवसांनी भोजने यांना दिली. दंड लागू नये यासाठी जाणूनबुजून बंद लखोटय़ात ही माहिती शिपाईमार्फत त्यांना देण्यात आली. तसेच ती माहितीही खोटी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भोजने यांनी आज येथील प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत व संजय गोडबोले यांची खरडपट्टी काढली. या सर्व प्रकाराबाबत भोजने हे अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील करणार आहेत.