Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

क्रीडा

लाराच सवरेत्कृष्ट डावखुरा फलंदाज - सौरव गांगुली
कोलकाता, २ फेब्रुवारी / पीटीआय

वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा हाच जगातील सवरेत्कृष्ट डावखुरा फलंदाज असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने म्हटले आहे. जगातील सर्वात महान डावखुरा फलंदाज कुठला, असा प्रश्न सौरव गांगुलीला केला असता ‘‘युवा क्रिकेटपटू असताना इंग्लंडचा डावखुरा फलंदाज डेव्हीड गोवर हा आपला आवडता खेळाडू होता; पण मी ज्यांच्या विरुद्ध खेळलोय त्यांच्यात ब्रायन लारा हाच सर्वात महान आहे,’’ असे सौरव गांगुली सांगितले. एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आला असता तो पत्रकारांशी बोलत होता. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिटल मास्टर सुनील गावसकर हे आपले सार्वकालीन आवडते फलंदाज असल्याचेही सौरव गांगुली म्हटले आहे.

टीम इंडियाचे ‘लक्ष्य’ मालिका विजय
कोलंबो, २ फेब्रुवारी / पीटीआय

सलग दोन विजयांमुळे मनोधैर्य उंचावलेला भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेवर उद्या, होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातच मालिका विजयाची मोहर उमटवतो का, हीच उत्सुकता तमाम क्रिकेटरसिकांना आहे. प्रेमदासा स्टेडियमवर उद्या, मंगळवारी दिवस/रात्र रंगणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचेही नेमके हेच लक्ष्य आहे. पहिल्या दोन लढतीतील विजयानंतर महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाचे ध्येय उद्या, मालिका विजयाचे असले तरी शनिवारी झालेल्या दुसऱ्या लढतीतील निसटत्या विजयामुळे कुठलाही धोका पत्करण्यास ते तयार नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग सात विजयांची नोंद केली आहे पण, ‘यशाने हुरळून जाऊ नका’, असा इशारा देत त्याने संघसहकाऱ्यांना मालिका विजयासाठी सावध केले आहे.

कर्णधार पॉन्टिंगला विश्रांती; दुखापतग्रस्त मार्शची माघार
न्यूझीलंडविरुद्धच्या दोन लढतींसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर
मेलबर्न, २ फेब्रुवारी / पीटीआय
न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या व तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतींसाठी आज ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर झाला. दोन सामन्यांसाठी जाहीर झालेल्या १३ खेळाडूंच्या संघातून कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि दुखापतग्रस्त सलामीवीर शॉन मार्श यांना स्थान देण्यात आलेले नाही. कर्णधार पॉन्टिंगला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

विश्रांती घेण्याचा पॉन्टिंगचा निर्णय चुकीचा - स्टीव्ह वॉ
मेलबर्न, २ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत विश्रांती घेतल्यामुळे कर्णधार रिकी पॉन्टिंग याच्या संघाशी असलेल्या बांधीलकीबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने म्हटले आहे. कर्णधाराने एखाद्या मालिकेत तेही न्यूझीलंड संघासारख्या संघाविरुद्ध विश्रांती घेणे ही गोष्टच अगम्य आहे, अशा शब्दांत वॉ याने पॉन्टिंग याच्यावर टीका केली आहे.

ईशांतचे भवितव्य उज्ज्वल झ्र् झहिर
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी / पीटीआय

आपल्या कामगिरीने सर्वाना प्रभावित करणाऱ्या ईशांत शर्माचे क्रिकटमधील भवितव्य उज्ज्वल असल्याचे सांगत तो प्रदीर्घ काळ खेळत राहील , असा विश्वास भारताचा जलदगती गोलंदाज झहिर खान याने व्यक्त केला आहे. ज्यावेळी भारतीय संघात स्थान मिळवणेच अवघड होते अशावेळी स्थान मिळवून ते मजबूत करणे म्हणजेच तुमच्यात क्षमता असल्याचे सिद्ध होते.

ऑस्ट्रेलियन ओपनवर नदाल, फेडररचा वरचष्मा
मेलबर्न,२ फेब्रुवारी / पीटीआय

जागतिक क्रमवारीतील राफेल नदाल व रॉजर फेडरर या पहिल्या दोन मानांकित खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अनुक्रमे विजेतेपद व उपविजेतेपद मिळवित वर्चस्व गाजविले. फेडरर याला पीट सॅंम्प्रस याच्या १४ ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी करता आली नाही. नदाल याने उपान्त्य व अंतिम फेरीत पाच सेट्सच्या लढतीनंतर संघर्षपूर्ण विजय मिळविला. या दोन्ही तुल्यबळ खेळाडूंमधील अंतिम लढतही प्रेक्षणीय ठरली. नदाल याने अव्वल मानांकनास साजेसा खेळ केला. त्याने उपांत्य व अंतिम या दोन्ही फेरीत पराभवाच्या छायेतून विजय मिळविला होता. अंतिम फेरीची लढत त्याने चार तास २३ मिनिटांनी जिंकली. गतविजेता नोव्हाक जोकोविच व अ‍ॅन्डी मरे यांच्याकडून मोठी अपेक्षा होती. मात्र त्यांनी निराशा केली. अनेक समीक्षकांनी मरे याची संभाव्य विजेता म्हणून गणना केली होती. मात्र त्यांचा अंदाज साफ चुकला. समीक्षकांच्या अंदाजाविषयी मत व्यक्त करताना फेडरर याने सांगितले, संभाव्य विजेत्यांमध्ये मरे याचा समावेश झाला हे त्याचे भाग्यच म्हणावे लागेल. मात्र त्याचा तो फायदा घेऊ शकला नाही. मरे म्हणाला, मी अशा अंदाजांवर विश्वास ठेवत नाही. तथापि मी अपेक्षेइतकी कामगिरी करू शकलो नाही. या स्पर्धेत १९३६ नंतर एकही ब्रिटिश खेळाडू विजेतेपद मिळवू शकलेला नाही.

सानिया फेडरेशन चषक स्पर्धेला मुकणार
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी / पीटीआय

पोटाला झालेल्या दुखापतीमुळे भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आगामी फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेला मुकणार आहे. त्यामुळे आशिया-ओशनिया गटाच्या या लढतीत भारतीय संघाला तिची उणीव जाणवणार आहे. सानियाऐवजी आता अन्य कोणत्याही खेळाडूला पाठविता येणार नाही, कारण अन्य खेळाडू पाठविण्याची मुदत संपली आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळत असताना सानियाला ही दुखापत झाली होती, असे अखिल भारतीय टेनिस महासंघाने कळविले आहे. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘काल आम्हाला सांगण्यात आले की ती या स्पर्धेत खेळू शकणार नाही.’ गेल्या वर्षीही संघात असूनही सानिया या स्पर्धेत खेळू शकली नव्हती. या स्पर्धेसाठी भारतीय संघात साना, अंकिता या भांब्री भगिनी व रश्मी चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

डेव्हिस चषक स्पर्धेत खेळण्याची भांब्रीची इच्छा
नवी दिल्ली,२ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत कुमार गटाचे विजेतेपद मिळविणाऱ्या युकी भांब्री याला आता डेव्हिस चषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. टेनिस खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न असते. माझेही तेच स्वप्न आहे, असे भांब्री याने आज पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.तो पुढे म्हणाला की, माझे स्वप्न प्रत्यक्षात केव्हा येते, हे मला सध्यातरी ठाऊक नाही. कदाचित त्याला एक दीड वर्षांचा कालावधीही लागू शकेल. माझी संघात निवड करण्याचा मुद्दा निवड समितीच्या हातात आहे. तोपर्यंत खेळात सुधारणा करण्यासाठी मी कठोर मेहनत घेणार आहे. भांब्री याचे आज ऑस्ट्रेलियाहून येथे आगमन झाले. येथील विमानतळावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.या स्वागताने युकी भारावून गेला होता. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात माझे स्वागत होईल याची मला कल्पनाही नव्हती, असे त्याने सांगितले.तो म्हणाला की, ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला जाण्यापूर्वी मी भारतात झालेल्या स्पर्धेत वरिष्ठांच्या स्पर्धेत खेळलो होतो. वरिष्ठ खेळाडूंविरुद्ध खेळल्याचा मला ऑस्ट्रेलियात खेळताना मोठा फायदा झाला. गेल्या दोन महिन्यांत माझी कामगिरी चांगली झाली होती. वरिष्ठ खेळाडूंविरुद्ध खेळल्याने माझा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता. त्यामुळे यापुढे वरिष्ठ गटातच खेळण्याचा निर्णय मी घेतला आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत पहिल्या फेरीतील सामन्यानंतर मी काहीसा निराश झालो होतो. पहिल्या फेरीतील अडथळा पार केल्यानंतर विजेतेपद आपलेच आहे याची मला खात्री होती, असेही त्याने सांगितले.

मानांकन यादीत भूपती सहावा तर सानियाची घसरण सुरूच
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी / पीटीआय.

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एटीपी मानांकन यादीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीत विजयी ठरलेल्या भूपतीला सहावे स्थान मिळाले असून सानिया मिर्झाची १२७ व्या स्थानावर घसरण झाली आहे. महेश भूपतीने ७०९० गुणांसह सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे तर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीत महेश भूपतीची सहकारी असलेल्या सानिया मिर्झाला मात्र मानांकनात १२७ व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. लिएंडर पेसने चांगल्या कामगिरीच्या जोरावर तीन क्रमांकाने पुढे सरकत ६६४० गुणांसह सातवे स्थान मिळविलेआहे. पुरुष ऐकरीत सोमदेव देववर्मन आपल्या कारकीर्दीतील उत्कृष्ट कामगिरीच्या सहाय्याने दोन स्थान पुढे सरकत १५३व्या स्थानावर आहे.

वॉर्डन हाऊस-पंतभवन संघाला विजेतेपद
मुंबई, २ फेब्रुवारी / क्री. प्र.

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरकार्यालयीन मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत वॉर्डन हाउस- पंतभवन संघ अजिंक्य ठरला. अंतिम फेरीच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत त्यांनी न्यू इंडिया सेंटर ‘अ’ संघावर १२ धावांनी विजय मिळवीत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मान मिळवला. फलंदाजी आणि गोलंदाजी अशी अष्टपैलू कामगिरी करणारे अतुल खेडेकर व मंगेश दरेकर या विजयाचे शिल्पकार ठरले. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून मंगेश दरेकर व अतुल खेडेकर यांची संयुक्त निवड करण्यात आली.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून दिनेश बोभाटेची तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून शैलेश शेट्टीची निवड करण्यात आली. अतुल खेडेकर आणि राजेंद्र राणे यांना अनुक्रमे सर्वोत्तम गोलंदाज व सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांना माजी क्रिकेटपटू संजय पाटील, खासदार मोहन रावले व शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या वेळी न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सचे महाव्यवस्थापक ए. आर. सेकर, उपमहाव्यवस्थापक आर. पी. समळ व क्रिकेटपटू प्रफुल्ल वाघेला आदी उपस्थित होती.

पाकिस्तानी क्रिकेटपटूंऐवजी बदली खेळाडूंची निवड करण्याची परवानगी
आयपीएल क्रिकेट
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी / पीटीआय

इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्यास पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने नकार दिल्यामुळे आयपीएलमधील संघांच्या मालकांना बदली खेळाडूंना संघात घेण्यासाठी पैसे वापरण्याची मुभा देण्यात येणार आहे, असे आयपीएलचे प्रमुख ललित मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी यांनी सांगितले की, शुक्रवारी खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या मालकांच्या संघात पाकिस्तानी खेळाडू असतील त्यांना तेवढय़ाच रकमेत बदली खेळाडू घेण्याची परवानगी असेल. मोदी म्हणाले की, पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा आयपीएल संघांशी तीन वर्षांचा करार झालेला असून ते दुखापतग्रस्त असतील तरच खेळू शकणार नाहीत. पण आता तशी परिस्थिती नाही. आयपीएलमधील संघांच्या मालकांना खेळाडू निवडण्यासाठी आणि त्यांची खरेदी करण्यासाठी किमान २० लाख अमेरिकन डॉलर इतकी मर्यादा आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष असलेल्या मोदी यांनी गोवा येथे शुक्रवारी ज्या खेळाडूंचा लिलाव होणार आहे, त्या अंतिम ४३ खेळाडूंची यादी जाहीर केली. मोदी म्हणाले की, आम्ही ११४ खेळाडूंची यादी क्लब आणि आयपीएल मालकांकडे दिली होती व त्यातील कोणते खेळाडू लिलावासाठी असावेत, याची माहिती मागविली होती.

मुनाफऐवजी बालाजीला संधी
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी / पीटीआय

श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल याच्याऐवजी तामिळनाडूच्या लक्ष्मीपती बालाजीला संघात स्थान देण्यात आले आहे. मुनाफ पटेल दुखापतग्रस्त असून येत्या ७ ते १० दिवसांत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल. बालाजी आज रात्री श्रीलंकेला रवाना होणार आहे. मुनाफ पटेलला पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती.

बेंगळे स्मृती कॅरम : जाधव, कासारे विजयी
मुंबई, २ फेब्रुवारी / क्री. प्र.

मुंबई जिल्हा कॅरम संघटना व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित जगन बेंगळे स्मृती बँक ऑफ महाराष्ट्र सहपुरस्कृत १८ व्या मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत सतीश जाधव, मंगेश कासारे, वैशाली तांबे यांनी आपापल्या लढती जिंकल्या. पुरुष एकेरी पहिली फेरी निकाल : सतीश जाधव वि. वि. आर. एल. ओझा १०-१७, १७-१३, १७-११. मंगेश कासारे वि. वि. संतोष पानवलकर २२-१५, २५-१४, २५-४. संतोष पुजारे वि. वि. नितीन बोरीचा २२-१५, १९-११. मनोज भोज वि. वि. सुधीर कांबळे ९-२५, १९-१७, २५-१९. अनिकेत कांबळे वि. वि. अभिषेक जोगाडिया २५-११, ६-२५, २५-९. विवेक भारती वि. वि. रोहित कदम २५-४, २४-११, २५-१. महिला एकेरी पहिली फेरी निकाल : वैशाली तांबे वि. वि. ज्योती लोखंडे २१-१२, १७-१४.
१८ वर्षांखालील कुमारिका एकेरी उपउपान्त्य फेरी- प्रणाली गमरे वि. वि. श्रद्धा नारकर २५-१, २५-१. सुस्मिता काळे वि. वि. निशा तांबे २५-०, २५-०. मिताली पिटकर वि. वि. जाई सावंत २५-०, २५-०. वैदेही सुर्वे वि. वि. पूजा गमरे २५-४, २३-०, २५-११. १२ वर्षांखालील मुले : उपउपान्त्य फेरी- चेतन सोळंकी वि. वि. ओमकार खामकर १८-१३, २५-१, श्रेयस शिंदे वि. वि. आकाश नारकर १५-११, १७-११. शुभम पालदे वि. वि. सौरव तांबे २५-०, २५-६. अभिषेक भारती वि. वि. अमेय मेहता २५-०, २५-०.