Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

कल्याण येथे ज्युनियर महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा रविवारी पार पडली. पिंपरी चिंचवडचा सागर काटे यावर्षीचा ज्युनियर महाराष्ट्र श्री ठरला. स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे- ५५ किलो- रामा मायनाक (सातारा), गौरव सरनोबत (मुंबई उपनगर), निलेश मोडक (सातारा), बाळा बाबर (ठाणे), रविंद्र सुर्यवंशी (नगर). ६० किलो- चंद्रशेखर पवार (कोल्हापूर), कुणाल धात्रक (नाशिक), प्रसाद राणे (मुंबई), समीर सावंत (मुंबई) मोहित सॅलियन (ठाणे) ६५ किलो- मुकेश खलशे (ठाणे), संजय हिलगे (कोल्हापूर), सुतार मोरे (ठाणे), सुयोग पातकर (ठाणे), निलेश उभे (पुणे), ७० किलो- प्रणय झगडे (मुंबई), किरण पाटील (कोल्हापूर), चंद्रशेखर नंदनवार (पिंपरी चिंचवड), सुरेश बाहुले (औरंगाबाद), प्रमोद जाधव (पिंपरी चिंचवड), ७५ किलो- दुर्गाप्रसाद दासरी (कोल्हापूर), सर्जेराव पाटील (कोल्हापूर), सचिन डोंगरे (मुंबई), रमेश सोनावणे(ठाणे), अवधेश यादव (ठाणे) ७५ किलोवरील- सागर काटे (पिंपरी चिंचवड), राजू कवडे (पुणे), शैलेंद्र शुक्ला (पुणे), कमलाकर शिंदे (पिंपरी चिंचवड), अमित मोकाशी (पुणे), अमित मोकाशी (ठाणे)

पोस्टर्सविरोधात पालिकेची धडक मोहीम
ठाणे/प्रतिनिधी
शहरातील सर्व पोस्टर्स-होर्डिंग्ज ताबडतोब काढून टाका, तसेच ही पोस्टर्स व होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश आयुक्तांनी देताच अतिक्रमण विरोधी विभागाने शहरात धडक मोहीम हाती घेतली आहे. तलावांचे नव्हे, पोस्टर्सचे शहर अशी ठाण्याची नवीन ओळख होत आहे.

खाडीत कचरा टाकणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
ठाणे/प्रतिनिधी : घोडबंदर रोडला लागून असलेल्या खाडीत महापालिका घनकचरा टाकीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस येताच महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. आयुक्तांनी त्या ठिकाणी कचरा टाकण्यास स्थगिती दिली असून, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपायुक्तांना दिले आहेत.

जनमतावर ठरणार कोपरी स्कायवॉकचे भवितव्य
ठाणे/प्रतिनिधी

स्थानिक रहिवाशांच्या प्रचंड विरोधामुळे अडचणीत आलेल्या कोपरी स्कायवॉकचे भवितव्य आता जनमतावर ठरणार आहे. सुमारे २८ कोटी रुपये खर्च करून कोपरीत रेल्वे स्टेशन ते बारा बंगला, कोपरी गाव आणि स्टेशन ते अष्टविनायक चौक-लोकमान्य टिळक पथ असे दोन स्कायवॉक बांधण्यात येणार आहेत.

लोकपूरम विद्यालयाचा अनोखा विक्रम
ठाणे/प्रतिनिधी

राष्ट्रध्वजातील तीन रंगांप्रमाणे गणवेष परिधान करून लोकपूरम शाळेतील विद्यार्थ्यांनी ६५ बाय ४५ मीटरचा भारताचा नकाश तयार करून नव्या विक्रमाची नोंद केली असून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होईल, असा दावा संयोजकांनी केला आहे. जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्यासाठी येथील कॅस्बर डान्स अ‍ॅकॅडमीतर्फे दरवर्षी आंतरशालेय ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. गतवर्षी या स्पर्धेदरम्यान ऐरोली, नवी मुंबई येथील डीएव्ही पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ५१.५ बाय ३६.९ मीटरचा भारताचा नकाशा तयार करून लिम्का बुकमध्ये नोंद केली होती. दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये रविवारी या स्पर्धांच्या निमित्ताने ठाण्यातील लोकपूरम विद्यालयाने नवा विक्रम नोंदविला. या शाळेतील एक हजार १०० विद्यार्थी आणि १५० शिक्षकांनी ६५ बाय ४५ मीटरचा भारताचा नकाशा तयार केला. यावेळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी तिरंग्याप्रमाणे कपडे परिधान केले होते.

गदारूपी अस्त्राने काँग्रेसला भुईसपाट करा-उद्धव ठाकरे
भिवंडी/वार्ताहर

गदा हे हनुमानाचे प्रतीक आहे. या अस्त्राचा जनतेनेच आता दळभद्री राज्यकर्त्यांंविरुद्ध वापर करावा, असे आवाहन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भिवंडीत व्यक्त केले.
शहरातील कणेरी येथे भिवंडीभूषण आर. व्ही. पवार प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त उद्धव ठाकरे यांनी भिवंडीत भेट दिली. यावेळी त्यांना हनुमानाचे अस्त्र असणारी गदा नगरसेवक साईनाथ पवार यांनी भेट दिली. उपस्थितांसमोर ही गदा उचलताना या अस्त्राने आता जनतेनेच केंद्रात व राज्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेस सरकारला जमिनीत गाडावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनतेला केले. यावेळी ठाकरे यांनी राजनोली नाका ते सभास्थळ असणाऱ्या धामणकर नाका असा रोड शो केला. या रोड शोमध्ये ५०० मोटारसायकलस्वार व हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते.

आयआयएमएमए संस्थेचा वार्षिकोत्सव
ठाणे/प्रतिनिधी

इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिटेटिव्ह मार्शल आर्ट (आयआयएमएमए) संस्थेचा वार्षिक समारंभ आणि पारितोषिक वितरण समारंभ रविवारी पार पडला. आयआयएमएमए ही केइमोडो-मेडिटेटिव्ह मार्शल आर्ट स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणारी ठाण्यातील नावाजलेली संस्था आहे. संस्थेच्या विविध केंद्रांतील विद्यार्थ्यांनी संस्थेच्या वार्षिक सामन्यांमध्ये उत्साहाने भाग घेतला. सामन्यांमधील विजेत्यांना पालिकेचे नगर अभियंता के.डी. लाला यांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य, कांस्यपदक आणि ग्रँड चॅम्पियन ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.संस्थेचे संस्थापक मास्टर योग आचार्य डॉ. एम.जे. पिल्लई यांनी सुब्रता एस. रॉय यांना ब्लॅक बेल्ट दोन डॅन आणि प्रतीक्षा आर. गाडा यांना ब्लॅक बेल्ट तीन डॅन प्रदान केले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी कार्यक्रमामध्ये योगासने आणि केइमोडो मार्शल आर्टची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी मास्टरांनी मार्शल आर्टच्या सरावाचे आजच्या काळातील महत्त्व व त्याचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक गुण विशद केले.

डॉ. मनू लोखंडेची अटक अटळ
कल्याण/वार्ताहर

डॉ. मृणाली लोखंडे यांच्यावऱील हल्ल्यास तब्बल महिना होत आला तरी डॉ. मनू लोखंडे याचा शोध महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांना लावता आला नाही. आता डॉ. मनू लोखंडे अटकपूर्व जामीन मिळविण्यात अयशस्वी झाल्याने पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी राजकीय पुढाऱ्याच्या शोधात असल्याचे एका पोलीस सूत्राने सांगितले. डॉ. लोखंडे अटकेच्या भीतीने सैरावैरा पळत आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत, परंतु गुन्ह्याच्या दुसऱ्या दिवशी तो हजर झाला असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखविल्याने डॉ. लोखंडे फरार झाला. महात्मा फुले पोलीस ठाण्यात कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांची वानवा आहे. पोलीस खात्याचा दरारा कालबाह्य झाला असून, यामुळे गुन्हेगारीचा आलेख वाढत असताना त्याला पायबंद घालण्यासाठी म्हणावे तसे उपाय योजले जात नसल्याने शहरातील नागरिक मात्र असुरक्षित जीवन जगत आहेत. शहर संवेदनशील असल्याने वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आयपीएस कॅडरचा पोलीस उपायुक्त मिळावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

खेळातील राजकारण थांबवा- धनराज
ठाणे/प्रतिनिधी

आपल्या देशात खेळांमध्ये मोठय़ा प्रमाणात राजकारण होत असल्यामुळे अव्वल दर्जाचे खेळाडू मैदानात विजयी होऊ शकत नाहीत. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेप थांबायला हवा, असे प्रतिपादन हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी रविवारी येथे केले.वाघबीळ नाका परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुकुल माईल रेस’ पिल्ले यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी बोलताना त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नवी मुंबईचे माजी महापौर संजीव नाईक, अ‍ॅथलेटिक्स रचिता मिस्त्री, होमियार मिस्त्री उपस्थित होते. या स्पर्धेत १२ वर्षांंखालील गटात उरण जिमखान्याचा करण पाटील याने प्रथम तर निखिल राऊत याने दुसरा क्रमांक पटकावला. मुलींमध्ये अंबरनाथची दामिनी पेडणेकर प्रथम तर चेंबूरची साक्षी मिश्रा दुसरी आली. प्रौढ गटात राकेश यादव तर महिला गटात संगीता यादव विजयी झाले.

शेखर चिटणीस यांचे निधन
ठाणे/प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस पंच व ठाणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे माजी सचिव शेखर चिटणीस यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. ते ५९ वर्षांंचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे.एक उत्कृष्ट खो- खो पटू, टेबल टेनिस खेळाडू व निष्णात क्रिकेटपटू म्हणून ठाणे शहरात ते प्रसिद्ध होते. ते एक क्रीडा संघटक म्हणूनही नावाजलेले होते. १९८४-८५ च्या सुमारास झालेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस पंच परीक्षेत ते १२ वे आले, तर महाराष्ट्रात ते प्रथम क्रमांकाने ही परीक्षा उत्तीर्ण झाले. १९८६ मधील नवी दिल्ली येथे झालेल्या ‘इंटॅब ८६’ या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेमध्ये त्यांनी पंच म्हणून कामगिरी बजावली. मुंबई क्रिकेट संघटनेचे ते क्रियाशील सदस्य होते. भारतात व मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये त्यांनी परदेशी संघाचे संपर्क अधिकारी म्हणून बऱ्याच वेळा कामगिरी पार पाडली आहे. ठाण्याच्या कलरकेम कंपनीमधून व्यवस्थापकीय पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती.