Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

व्यक्तिवेध

अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक ओबामा यांची निवड झाल्यानंतर त्यांनी जे भाषण केले, ते तर अविस्मरणीय होतेच; मात्र पराभूत झालेल्या जॉन मॅक्केन यांचे भाषणही कमी महत्त्वाचे नव्हते! ओबामा यांचा विजय म्हणजे अमेरिका बदलल्याचा पुरावा आहे, असे त्यांनी सांगितले. या बदलाचा आणखी एक पुरावा अमेरिकेला मिळाला आहे. ‘ग्रॅन्ड ओल्ड पार्टी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मायकेल स्टील या कृष्णवर्णीय नेत्याची निवड झाली आहे. प्रतिगामी म्हणून सर्वज्ञात असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाने अखेर लिंकन यांचा वारसा सांगितला आहे. त्यांचा

 

सर्वसमावेशकतेचा वारसा रिपब्लिकन पक्ष विसरला होता. त्यामुळे अमेरिकेतील गौरवर्णीयांचा, कॉर्पोरेट लॉबीचा आणि उच्चभ्रूंचा पक्ष म्हणून तो ओळखला जाऊ लागला होता. या पाश्र्वभूमीवर स्टील यांच्याकडे राष्ट्रीय समितीचे अध्यक्षपद जाणे ही घटना ऐतिहासिक आहे. १६८ सदस्यांच्या या समितीमध्ये ज्यांचे नावही नव्हते, ते मायकेल स्टील आज मात्र अध्यक्ष झाले आहेत. खरे म्हणजे, स्टील यांचे नाव राष्ट्रीय राजकारणात सर्वप्रथम आले, ते २००४ मध्ये. ओबामा डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बीजभाषण करीत असताना, स्टील हे रिपब्लिकन पक्षाच्या तशाच अधिवेशनात त्याच स्वरूपाचे भाषण देत होते. हे तेच अधिवेशन, ज्यामुळे ओबामांना अमेरिकेने खऱ्या अर्थाने स्वीकारले! स्टील यांचे भाषणदेखील गाजले आणि त्यानंतर त्यांचे नाव सर्वत्र झळकू लागले. दोन वर्षांनी त्यांनी सिनेटची निवडणूक लढवली; मात्र ते पराभूत झाले. तरीही पक्षातील त्यांचा प्रभाव वरचेवर वाढत गेला. ओबामांपेक्षा दोन-तीन वर्षांनी मोठे असणाऱ्या स्टील यांचा प्रवासही फार वेगळा नाही. जन्मानंतर काही दिवसांनीच त्यांचे वडील आईला सोडून गेले आणि त्यानंतर सावत्र वडिलांनी त्यांना वाढवले. (माईक टायसन यांची पूर्वीची पत्नी मोनिका ही स्टील यांची सावत्र बहीण.) असा खडतर प्रवास करत असताना त्यांची महत्त्वाकांक्षा मात्र कमी झाली नाही. उलटपक्षी प्रतिकूलतेच्या प्रमाणात ध्येयासक्ती वाढत गेली. आंतरराष्ट्रीय राजकारणात बी.ए. आणि एलएल.बी. केल्यानंतर सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला, त्या वेळी अनेकांनी वेडय़ात काढले. मात्र, अब्राहम लिंकन यांच्या चरित्राने झपाटून गेलेल्या या नेत्याने राजकारणाच्या आखाडय़ात उडी मारली. त्यानंतर कितीतरी पदे त्यांच्या वाटय़ाला आली. राज्याच्या गव्हर्नरपदापासून ते पक्ष समितीच्या अध्यक्षपदापर्यंत विविध जबाबदाऱ्या सांभाळताना स्टील यांनी पक्षाचे धोरण प्रसंगी बाजूला ठेवले; पण मानवतावादी समग्र दृष्टिकोनापासून ते दूर गेले नाहीत. रिपब्लिकन पक्षातील प्रतिगाम्यांचा त्यांना नेहमीच विरोध होता. इराक आक्रमणाच्या मुद्दय़ावरून त्यांनी बुश यांचीच कानउघाडणी केल्यानंतर तर विरोध आणखी वाढला. पक्षाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ते पराभूत व्हावेत यासाठी बुश-मॅक्केन लॉबीने जंग जंग पछाडले. रिंगणातील पाचजणांपैकी माईक डंकन यांना बुश यांचा उघडपणे पाठिंबा होता. चार गौरवर्णीय रिंगणात असताना स्टील निवडून येऊच शकत नाहीत, असे माध्यमे ंम्हणत. मात्र, सर्वाचे अंदाज चुकले. रिपब्लिकन पक्षातदेखील काही प्रागतिक विचारांचे नेते आहेत, हे त्यामुळे स्पष्ट झाले. स्टील यांच्याच शब्दांत सांगायचे, तर ‘हा लिंकन यांचा पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाकडे पुरोगामी विचार आहेच. मी फक्त त्याला हाक दिली.’ अर्थात, त्याला आणखी एक संदर्भ आहे. ओबामांच्या विजयानंतर रिपब्लिकन पक्ष अगदीच निष्प्रभ झाला आहे. त्याला नवचैतन्य प्राप्त करून देण्यासाठी असे काही करणे भाग होते. ते प्रभावी वक्ते व अर्थतज्ज्ञही आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्यांचा व्यासंग दांडगा आहे. लोकसंख्येच्या शास्त्राचा विचार करता, काही वर्षांनी अमेरिकेत गौरवर्णीय बहुमतात नसतील, फक्त गोऱ्यांचे राजकारण करता येणार नाही, याची जाणीवही सर्वाना होऊ लागल्यानेही आफ्रिकन-अमेरिकन उमेदवाराकडे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद गेले आहे. जग बदलत चालले आहे आणि अमेरिकाही बदलू लागली आहे..!