Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३ फेब्रुवारी २००९

विविध

लोकसभेसाठी प्राधान्याने मुस्लिम उमेदवार उभे करण्याची बसपची खेळी
सपा-कल्याणसिंग यांच्या मैत्रीचा फायदा उचलण्यास मायावती सज्ज
लखनौ, २ फेब्रुवारी / पीटीआय
सोशल इंजिनिअरींगच्या बळावर उत्तर प्रदेशमध्ये सत्ता खेचून आणणाऱ्या मायावती यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत बसपच्या एकूण उमेदवारांपैकी २५ टक्के मुस्लीम उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कल्याणसिंग यांच्यासमवेतच्या वाढत्या मैत्रीमुळे उत्तर प्रदेशमधील मुस्लीम समाज समाजवादी पक्षापासून दूर चालला आहे. हे ओळखून याचा फायदा उचलण्यासाठी मायावतींनी ही नवी राजकीय खेळी खेळण्याचे ठरवले आहे.

दहशतवादाशी सामना करताना प्रणव यांनी आक्रमकता दाखवावी
तोगडिया यांचे आवाहन
जयपूर, २ फेब्रुवारी / पीटीआय
पाकिस्तानला वारंवार इशारे देण्याऐवजी पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या छावण्यांवर थेट कारवाई करून रॉकेट लाँचर्सच्या सहाय्याने ती उद्ध्वस्त करण्याचा आक्रमकपण दाखविणे गरजेचे आहे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठे नेते प्रवीण तोगडिया यांनी केले आहे.परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अतिरेकी आणि पाकव्याप्त काश्मीरबाबत पाकिस्तानशी योग्य धोरण आणि नीती अंमलात आणली आहे.

नवीन चावला हेच भावी मुख्य निवडणूक आयुक्त!
केंद्र सरकारचे स्पष्ट संकेत
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
नवीन चावला हेच पुढचे मुख्य निवडणूक आयुक्त असतील, असे स्पष्ट संकेत आज केंद्रीय विधी व न्यायमंत्री हंसराज भारद्वाज यांनी दिले. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी चावला यांना हटविण्याविषयी राष्ट्रपतींकडे केलेल्या शिफारशीची केंद्र सरकार दखल घेणार नाही, हेही स्पष्ट झाले. गोपालस्वामी यांनी राजकीय पक्षाच्या प्रमुखाप्रमाणे वागू नये, असा सल्लाही भारद्वाज यांनी दिला. केंद्राचे मनसुबे लक्षात घेऊन चावलांना हटविण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार भाजप करीत आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा वाद उपस्थित झाल्याने भाजप-रालोआत मतभेद निर्माण होण्याचीही चिन्हे आहेत.

‘स्लमडॉग मिलेनियर’चा डायरेक्टर गिल्डनेही गौरव
लॉस एंजेलिस, २ फेब्रुवारी/पी.टी.आय.

डॅनी बॉयल दिग्दर्शित स्लमडॉग मिलेनियर चित्रपटाची ‘ऑस्कर’ पुरस्काराकडे वेगाने घोडदौड सुरू असून ऑस्कर मिळणाऱ्या बहुतांश चित्रपटांनी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पुरस्कारावर आधी आपली मोहर उमटवली, त्या ‘डायरेक्टर गिल्ड ऑफ अमेरिका’च्या पुरस्काराचा सन्मानही याच चित्रपटाला लाभला आहे. ‘डायरेक्टर गिल्ड’च्या आत्तापर्यंतच्या ६० वर्षांंच्या कालावधीत हा पुरस्कार मिळविणाऱ्या चित्रपटाने एकूण ५५ वेळा ‘ऑस्कर’ पटकावला आहे.

पंतप्रधानपदासाठी लालूंचा दलित व्यक्तीला पाठिंबा
पटणा, २ फेब्रुवारी / पी.टी.आय.

देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याची मनीषा बाळगून असलेले केंद्रीय रेल्वेमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी या सर्वोच्च पदासाठी वेळप्रसंगी दलित व्यक्तीलाही पाठिंबा देण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.बिहारमध्ये गेली पाच वर्षे युपीएचे नेतृत्व लालूप्रसाद यादव यांनी केले. आता त्यांनी राज्यात युपीएचे नेतृत्व माझ्याकडे द्यावे. संधी मिळाल्यास देशाचेही नेतृत्व करायला आवडेल, असे सांगत रामविलास पासवान यांनी काल पंतप्रधानपदासाठी उत्सुक असल्याचे सूतोवाच केले होते. त्यावर लालूप्रसाद यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.लोकसभेसाठी ४० पैकी २० जागांची पासवान यांची मागणी गैर नसल्याचे सांगत लालूप्रसाद यांनी पासवान हे बिहारमधील प्रभावी नेते असल्याचे मान्य केले आहे. मात्र केंद्रीय मंत्री व राजद नेते रघुवंशप्रसाद सिंग यांनी पासवान यांच्या मताशी असहमती दर्शवली आहे. २००४ मधील लोकसभा निवडणुकाीत बिहारमध्ये ४० पैकी २९ जागा युपीएने जिंकल्या. त्यापैकी २६ पैकी २२ ठिकाणी राजदचे उमेदवार विजयी झालेत. तर केवळ ८ जागा लढवणाऱ्या पासवान यांच्या पक्षाला चार जागांवर विजय मिळाला. चार जागा लढवणाऱ्या काँग्रेसला तीन ठिकाणी विजय मिळाला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले व पासवान यांची मागणी फेटाळली.

२५ अफगाणी पोलीस ठार
कंदाहार, २ फेब्रुवारी / एएफपी

पोलिसांच्या वेशातील आत्मघाती हल्लेखोराने अफगाणिस्तानातील उरुझगान परगण्यांत आज केलेल्या बॉम्बस्फोटात २५ पोलीस ठार आणि आठ गंभीररीत्या भाजले आहेत. हल्लेखोराने तिरिन कोट भागातील पोलिसांसाठीच्या राखीव क्षेत्रात हा स्फोट घडविला.

हमासांच्या तळांवर इस्राएलचे पुन्हा हल्ले
जेरुसलेम, २ फेब्रुवारी / पी. टी. आय.

इस्राएलने शस्त्रसंधी पाळत आठवडय़ापूर्वी गाझापट्टीतून लष्कर मागे घेतल्यानंतर हमास अतिरेक्यांनी अग्निबाण डागणे चालूच ठेवल्याने आता पुन्हा इस्राएली विमानांनी गाझा-इजिप्त सीमेवरील हमासांच्या तळांवर व भुयारांवर जोरदार बॉम्बफेक केली.हमास अतिरेक्यांनी पुन्हा कुरापती सुरू केल्याने इस्राएलचे पंतप्रधान इहुद ऑलमर्ट यांनी हल्ले परतवून लावण्याचा इशारा दिला होता, त्याला न जुमानता १० अग्निबाण डागले यात तीन ज्यू जखमी झाले. गाझातील हमासांना घातलेला वेढा इजिप्तने उठविल्याशिवाय इजिप्तच्या मध्यस्थीने झालेली शस्त्रसंधी आम्हाला मान्य नाही, असा अतिरेक्यांचा पवित्रा होता.

तीन नक्षलवाद्यांना गावकऱ्यांनी ठेचले
रांची, २ फेब्रुवारी / पी.टी.आय.

दोन नागरिकांना जखमी करणाऱ्या तीन नक्षलवाद्यांना संतप्त गावकऱ्यांनी आज ठेचून मारले.या नक्षलवाद्यांनी रांची जिल्ह्यापासून २५ किमी अंतरावरील कोरबार गावात काल रात्री एक व्यक्तीला ओलीस ठेवून खंडणीची मागणी केली होती. या नक्षलवाद्यांनी गोळीबारात दोन नागरिकांना जखमी केल्यानंतर खवळलेल्या गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांवर हल्ला केला. घटनास्थळी एक पिस्तुल, दोन मोबाइल्स आणि बाइक सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘मुशर्रफ यांच्यावर खटला भरा’
इस्लामाबाद, २ फेब्रुवारी/पी.टी.आय.

देशावर २००७ मध्ये आणीबाणी लादणाऱ्या आणि लाल मशिदीवर लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर खटला चालवावा अशी मागणी पाकिस्तानच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी केली आहे. निवृत्त पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संघटनेने रावळपिंडीमध्ये काल घेतलेल्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर केला. या बैठकीत पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल असाद दुरानी आणि माजी लष्कर प्रमुख हमीद गुल यांचा समावेश होता. २००६मध्ये अकबर बुग्ती या बलुची नेत्याच्या हत्येप्रकरणी, मूलतत्त्ववाद्यांचे आश्रय बनलेल्या लाल मशिदीवर लष्कर घालणाऱ्या तसेच देशावर आणीबाणी लादणाऱ्या परवेझ मुशर्रफ यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या अधिकाऱ्यांनी केली.

राजू बंधूंच्या चौकशीसाठी ‘सेबी’ सुप्रीम कोर्टात
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी/पी.टी.आय.

‘सत्यम’मध्ये झालेल्या ७ हजार ८०० कोटींच्या गैरव्यवहाराबाबत कंपनीचे संस्थापक बी. रामलिंगा राजू आणि त्यांचे भाऊ राम राजू यांच्या चौकशीसाठी शेअर बाजार नियंत्रक ‘सेबी’ने सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे.