Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

व्यापार - उद्योग

‘अ‍ॅम्युझमेंट पार्क्‍स क्षेत्राला ‘उद्योगा’चा दर्जा मिळावा’
व्यापार प्रतिनिधी: दरसाल १५०० कोटी रुपयांची उलाढाल आणि सध्याच्या खडतर काळातही वार्षिक २० टक्क्यांचा वृद्धी दर नोंदविणाऱ्या, सुमारे ४००० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असलेला आणि देशभरात सुमारे ३० हजार लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रोजगार पुरविणाऱ्या अ‍ॅम्युझमेंट पार्क क्षेत्राला आता तरी ‘उद्योगा’चा दर्जा मिळावा आणि सरकारकडून आवश्यक ते पाठबळ लाभावे, असा मानस ‘इंडियन असोसिएशन ऑफ अ‍ॅम्युझमेंट पार्क्‍स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज (आयएएपीआय)’चे अध्यक्ष अरिजित सेनगुप्ता यांनी व्यक्त केला.

स्टेम सेल बँकिंग कंपनी ‘क्रायो-सेव्ह’चा मुंबईत प्रवेश
व्यापार प्रतिनिधी:
क्रायो-सेव्ह ग्रुपची भारतातील साहाय्यक कंपनी क्रायो- सेव्ह इंडियाने मुंबईतील संपूर्ण मार्केटिंग सेटअपसह देशाच्या पश्चिम क्षेत्रामध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये कंपनीचे स्थान अधिक बळकट करण्याचे यामागे उद्दिष्ट आहे. आपल्या अपत्यांना जैव-विमा (बायो-इन्शुरन्स) प्रदान करण्याच्या पालकांच्या वाढत्या गरजेसह, क्रायो- सेव्ह इंडिया देशातील प्रमुख केंद्रांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरुवात करणार आहे. महाराष्ट्रामध्ये केवळ मुंबई शहरात दरवर्षी ५०,००० बाळे जन्माला येतात. पुणे शहरातील नवजात अर्भकांची संख्या दरवर्षी २०,००० हून अधिक असते. कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, पुणे इत्यादी शहरांमध्ये आपली प्रातिनिधिक केंद्रे उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. बंगळुरूमध्ये आपल्या कॉर्पोरेट कार्यालयासह क्रायो-सेव्ह इंडियाची नुकतीच १८ लाख युरोच्या गुंतवणुकीसह सुरुवात करण्यात आली. क्रायो-सेव्ह समूह आपल्या भारतीय साहाय्यक कंपनीमधील गुंतवणूक कामकाजाच्या पहिल्याच वर्षांत २० लाख युरोपर्यंत वाढवेल. या समूहाचे कामकाज तीन खंडांमधील ३७ देशांमध्ये चालते. क्रायो-सेव्हकडे स्टेम सेल बँकिंगमधील कौशल्य आणि अनुभव आहे. डय़ुअल स्टोअरेजप्रणाली प्रदान करणारी ही भारतातील एकमेव कंपनी आहे. नाळेच्या रक्तातून वेगळे करण्यात आलेले अ‍ॅडल्ट स्टेम सेल्स जमा करणे आणि त्यांची साठवण करणे या सेवा कंपनी प्रदान करेल.

दादरमध्ये पैठणी साडय़ांचे ‘ब्रायडल कलेक्शन’
व्यापार प्रतिनिधी: शिल्पा आनंद यांच्या ऋगवेद कलेक्शनने विशेष ब्रायडल कलेक्शनच्या पैठणी साडय़ांचे प्रदर्शन येत्या शुक्रवार ते रविवार - ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान वैभव हॉल, रानडे रोड (सुजाता हॉटेलच्या वर), दादर (प.) येथे सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत भरविले जाणार आहे. ३० पेक्षा जास्त रंगांच्या व १६ पेक्षा जास्त डिझाइन्समधील पैठणी साडय़ा येथे रु. ३९०० पासून पुढील किमतीत उपलब्ध असतील. बरोबरीने पैठणीतील विशेष भेटवस्तू, स्त्री व पुरुषांसाठी रेडीमेड्स, पैठणीतील पारंपरिक कुडते, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, पैठणीच्या पर्सेसही येथे पाहायला मिळतील.

‘बृहन्मुंबई सह. बँक्स असोसिएशन’च्या अध्यक्षपदी फोवकार
व्यापार प्रतिनिधी:
बृहन्मुंबईतील ८० नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘दी बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन’च्या अध्यक्षपदी नागेश फोवकार यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आहे. फोवकार हे नॉर्थ कॅनरा जीएसबी को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक तसेच सुश्रुषा हॉस्पिटलचे उपाध्यक्ष आहेत. मुंबईतील अनेक सामाजिक संस्थांचे ते पदाधिकारी व संचालक आहेत. त्याचप्रमाणे असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बंकेच्या संचालिका प्रतिभा दिनकर पाटील यांचीही बिनविरोध निवड केली गेली आहे.

नॉर्मा समूहाचा तळेगावमध्ये प्रकल्प
व्यापार प्रतिनिधी:
वाहन उद्योग, तसेच इतर उद्योगांसाठी क्लॅम्प, प्लॅस्टिक टय़ूबिंग आणि कनेक्टर्सचे उत्पादन करणाऱ्या जर्मनीतील नॉर्मा उद्योग समूहाने तळेगाव येथे अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प उभारला असून, कंपनीने भारतामध्ये ३० लाख युरोची गुंतवणूक केली आहे. या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन नॉर्मा समूहाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी वर्नर डेगिम आणि वाहन उद्योग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक बर्नड क्लाइनहेन्स यांच्या उपस्थितीत साजरे झाले. आगामी दोन वर्षांत कंपनी भारतातील उलाढाल सुमारे ८० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे, असे डेगिम यांनी सांगितले. नॉर्मा ग्रुप प्रॉडक्ट्स इंडिया प्रा. लिमिटेड ही नॉर्मा समूह आणि टॉरस फ्लेक्सिकेबल्स यांची ८०:२० अशा प्रमाणात मालकी असलेली कंपनी आहे. भारतीय वाहन उद्योगासाठी आणि विशेषत: व्यापारी आणि प्रवासी वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी तळेगाव येथील कारखान्यात प्लॅस्टिक टय़ूबिंग्ज आणि क्लॅम्प बनविणे हे या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
कंपनीच्या या ३० हजार चौ. फूट कारखान्यातील उत्पादन मुख्यत: भारतीय ग्राहकांसाठी होणार असले तरी भविष्यात तेथे नॉर्मा समूहाच्या जागतिक पातळीवरील इंजिनिअरिंग प्रकल्पांना साह्य़ करणारे इंजिनिअरिंग केंद्र सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीची भारतातील गुंतवणूक ३० लाख युरो एवढी असेल.