Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

‘अ‍ॅम्युझमेंट पार्क्‍स क्षेत्राला ‘उद्योगा’चा दर्जा मिळावा’
व्यापार प्रतिनिधी: दरसाल १५०० कोटी रुपयांची उलाढाल आणि सध्याच्या खडतर काळातही वार्षिक

 

२० टक्क्यांचा वृद्धी दर नोंदविणाऱ्या, सुमारे ४००० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असलेला आणि देशभरात सुमारे ३० हजार लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रोजगार पुरविणाऱ्या अ‍ॅम्युझमेंट पार्क क्षेत्राला आता तरी ‘उद्योगा’चा दर्जा मिळावा आणि सरकारकडून आवश्यक ते पाठबळ लाभावे, असा मानस ‘इंडियन असोसिएशन ऑफ अ‍ॅम्युझमेंट पार्क्‍स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज (आयएएपीआय)’चे अध्यक्ष अरिजित सेनगुप्ता यांनी व्यक्त केला. असोसिएशनच्या वतीने मुंबईत येत्या २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित होत असलेल्या नवव्या ‘अ‍ॅम्युझमेंट एक्स्पो २००९’ची घोषणा त्यांची उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
सध्या भांडवलाच्या चणचणीचा काळ असतानाही अ‍ॅम्युझमेंट उद्योगात भारतात ४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे आणि २०२० सालापर्यंत या क्षेत्रातील उलाढाल १०,००० कोटी रुपयांवर जाईल, असा विश्वास सेनगुप्ता यांनी पुढे बोलताना व्यक्त केला. यंदा आयोजित होत असलेल्या नवव्या प्रदर्शनात गेल्या वर्षांपेक्षा दुप्पट प्रतिसाद अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची संख्या अडीच हजारांवरून ५,००० होईल, तर विदेशातून प्रदर्शक म्हणून होणारा सहभागही ४५ टक्क्यांवर जाईल, असे त्यांनी सांगितले. यंदा प्रदर्शनातील दालनांची संख्या १४० वर गेली आहे.
कॅनडा, चीन, जर्मनी, हाँगकाँग, इटली, जपान, सिंगापूर, स्वित्र्झलड, थायलंड, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन आणि अमेरिका अशा १३ देशांतून अम्युझमेंट सेवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ब्रॅण्ड्सचा प्रदर्शनात सहभाग असेल. जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय मानदंडांच्या राइड्सच्या निर्यातीत ४० टक्क्यांनी वाढ झाली असून, भारतातील त्यांच्या निर्मात्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अरिहंत इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लि., निक्को पार्क्‍स अ‍ॅण्ड रिसॉर्ट्स लि., हिंदुस्तान अ‍ॅम्युझमेंट मशीन्स, बॉम्बे अ‍ॅम्युझमेंट राइड्स प्रा. लि., डॉमनिक फन राइड्स प्रा. लि. आदींचाही निर्यातीत लक्षणीय वाटा आहे, अशी माहिती असोसिएशनचे सदस्य आणि एस्सेल समूहाचे सीईओ शिरीष देशपांडे यांनी दिली. प्रदर्शनाच्या दरम्यान या उद्योगाशी निगडित विविध घटकांमध्ये परस्पर तसेच देशी व आंतरराष्ट्रीय स्तरावर आदानप्रदान व लक्षणीय व्यवसाय होणे अपेक्षित असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. १० वर्षांपासून कार्यरत असलेल्या या असोसिएशनचे देशभरात २०० च्या आसपास सदस्य आहेत.