Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

अग्रलेख

क्रिकेटचे ‘बिग बॉस’!

 

होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते, असे घडू शकते. कालपर्यंत ज्यांना अनधिकृत म्हणून हिणवण्यात आले, ते कुणी सांगावे, उद्या अधिकृत होऊ शकतात. कदाचित त्यांना ‘अधिकृत क्रमांक-२’ म्हटले जाऊ शकले. त्यातून क्रिकेटचा खेळ हा पैसा देणारा खेळ म्हटल्यावर त्यासाठी दोन बडय़ांनी आपापल्या मर्यादा ओळखणे अपरिहार्य आहे. ‘इंडियन प्रीमिअर लीग’ ही मर्यादित २० षटकांची स्पर्धा भरवणारी क्रिकेट नियामक मंडळाची अधिकृत संघटना. गेल्या वर्षी ‘झी टीव्ही’ आणि ‘एस्सेल वर्ल्ड’चे मालक सुभाषचंद्र गोयल यांनी आपली ‘इंडियन क्रिकेट लीग’ स्थापन केली आणि विश्वचषक विजेता माजी कर्णधार कपिलदेव याला त्यांनी त्यांच्या लीगच्या स्पर्धेचे प्रमुखपद देऊन टाकले. त्या वेळी शरद पवार अध्यक्ष असणाऱ्या क्रिकेट नियामक मंडळाने कपिलदेवच्या लीगला नुसते अनधिकृतच ठरवले असे नाही, तर त्यांच्या लीगशी संबंध ठेवणाऱ्यांबरोबरचे सर्व तऱ्हेचे संबंध तोडून टाकले. त्यातल्या सर्व खेळाडूंचे निवृत्तिवेतन थांबवून ठेवले. कपिलदेव हा भारतीय क्रिकेट संघाचा काही काळ प्रशिक्षक होता, त्यामुळे त्याला खाली मान घालायला लावणारे काही प्रश्न नियामक मंडळाच्या म्हणजेच पवारांच्या लीगने विचारले. कपिल प्रशिक्षक असणाऱ्या संघाने पाच कसोटी सामने गमावले आणि एकच जिंकला, तर एक दिवसाच्या २५ सामन्यांपैकी १६ सामने गमावले, तेव्हा त्याच्या लीगला काय अर्थ उरतो, असेही त्याला डिवचण्यात आले. इंडियन क्रिकेट लीगमध्ये भाग घेणाऱ्या संघांना मार्गदर्शन करायची जबाबदारी कपिलवर टाकण्यात आलेली नव्हती. कपिलच्या म्हणजेच गोयल यांच्या लीगशी संबंध ठेवणारे एकदम बंडखोर ठरले. २० षटकांची अशी ही झंझावाती स्पर्धा भरवायची मूळ कल्पनाच गोयल यांच्या या लीगची आहे, हे मात्र मंडळाचे कर्तेकरविते विसरले. आपल्याविषयी ही खुन्नस आहे, असे त्यांनी मानले आणि मग सुरू झाले ते एक डाव धोबीपछाड! ज्यांना नियामक मंडळाने अनधिकृत ठरवले, त्यांची स्पर्धाही चालली आणि ज्यांना त्यांनी अधिकृत स्पर्धेचा किताब बहाल केला होता, त्यांनी तर सोन्याच्या खोऱ्यानेच पैसा खेचला. गेल्या वर्षी झालेल्या प्रीमिअर लीगमध्ये भले भले खेळले आणि जाताना पोत्याने पैसे घेऊन गेले. देशी-विदेशी असे सगळेच खेळाडू प्रचंड खूश आणि क्रिकेटवेडा प्रेक्षक त्यांच्यावर खूश! २०-२० षटकांच्या सामन्यांनी आता ५०-५० मर्यादित षटकांचे आणि पाच दिवसांचे कसोटी झाकोळून जाणार असे वाटले होते, पण तसे काही घडले नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे संघ भारतात येऊन गेले. भारतीय संघही सध्या श्रीलंकेत चांगली कामगिरी करतो आहे. म्हणजे कोण संपणार, हा भेडसावणारा प्रश्न संपून गेला. प्रीमिअर लीगच्या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी हप्त्याहप्त्याने खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. प्रत्येक खेळाडूची बोलीची पायाभूत रक्कम निश्चित झाली आहे. त्यापैकी काहींची डोळे फिरवायला लावणारी कमाई होणार आहे. आता नेमक्या याच काळात सार्वत्रिक निवडणुका येऊ घातल्या असल्याने दोन्ही बाजूंना धास्ती वाटते आहे. प्रचार रंगात असताना आपले २०-२० षटकांचे सामने पाहायला प्रेक्षक लाभेल का, असे प्रीमिअर लीगच्या संयोजकांना वाटते. त्यांचे मुख्य सूत्रधार आणि नियामक मंडळाचे उपाध्यक्ष ललित मोदी यांनीच तसे बोलून दाखवले आहे. क्रिकेट स्पर्धेत एवढी भन्नाट षटकारांची आतषबाजी चालू असताना प्रचारातले तारे मोजायला कोण येणार, हा कदाचित राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पडणारा प्रश्न असू शकतो. कदाचित त्यामुळेही असेल, नियामक मंडळाला दुसऱ्या अनधिकृत लीगलाही आपलेसे करावेसे वाटले असायची शक्यता आहे. गोयल आणि पवार हे एकत्र येऊन या दोन्ही लीगचा विचार करणार आहेत म्हणे! हे दोघे मित्र होते आणि आहेत, मग दोन लीगमध्ये वैरभाव कशाला, असेही आता विचारण्यात येत आहे. आपल्या सोयीचा सुविचार सुचायला काळवेळ शोधावी लागत असेल असे वाटत नाही. आता हे दोघे आणि क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर एकत्र बसून दोन्ही लीग एकमेकांच्या पायात पाय घालण्याचा खेळ कसा करणार नाहीत, हे पाहणार आहेत. त्यांना मित्रत्वाचा हा सामना काल का खेळता आला नाही आणि आज ते का असे अचानक बदलले, हा प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. या लीगमधला खेळाडू त्या लीगमध्ये खेळू शकेल का, असेही विचारून चालणार नाही. त्यांना हवा आहे तो खेळापाठोपाठ येणारा पैसा! क्रिकेटचे भले तो खेळला गेला नाही तरी होत असतेच, त्यामुळे ताकाला जाऊन भांडे लपवण्यात अर्थ नाही. याच दरम्यान सिंध उच्च न्यायालयाने इंडियन क्रिकेट लीगमध्ये म्हणजेच गोयल यांच्या लीगमध्ये भाग घेतलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर लादण्यात आलेली बंदी उठवली आहे. म्हणजे त्या लीगमध्ये खेळलेले खेळाडू पाकिस्तानी संघाकडून एरवीही खेळू शकतात, असा त्याचा अर्थ! पाकिस्तान जर अशी बंदी उठवू शकतो, तर मग आपण असा खरखरमुंडेपणा करण्यात काय अर्थ आहे, हा त्या सुविचारामागून आलेला एक बारीकसा विचार. तथापि दोन्ही लीगकडून खेळलेले पाकिस्तानी खेळाडू या खेपेला मात्र कोणत्याच लीगकडून सुरक्षिततेच्या कारणास्तव खेळू शकणार नाहीत, हा पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाने काढलेला फतवा आहे. यापूर्वी ते ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर भारतात खेळायला जायला हरकत नाही असे सांगत होते, पण भारतही या खेळाडूंना आता व्हिसा द्यायच्या मन:स्थितीत नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यातही गेल्या वर्षभरात पाकिस्तानी खेळाडूंचे कोणत्याच संघाशी मोठे सामने होऊ न शकल्याने त्यांना योग्य तो सराव नाही, हा भाग पाकिस्तानी क्रिकेट मंडळानेही लक्षात घेतला आहे. झाकली मूठ म्हणतात ते यालाच! भारतात होणाऱ्या प्रीमिअर लीगच्या स्पर्धा १० एप्रिल ते २४ मे या दरम्यान खेळवल्या जाणार आहेत. या तारखांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे ललित मोदींनी जाहीर केले आहे. प्रीती झिंटा, शाहरुख खान यांच्या बरोबरीने आता शिल्पा शेट्टीनेही एका संघाची मालकी घ्यायचे ठरवले आहे. ती आणि तिचा लंडनचा मित्र राज कुंद्रा हे ‘राजस्थान रॉयल्स’चे ‘बिग बॉस’ ठरतील. पुढल्या दोन-तीन वर्षांत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला इंडियन प्रीमिअर लीग एक अब्ज अमेरिकी डॉलर एवढे उत्पन्न मिळवून देईल, असा आशावाद प्रकट होत असताना या गंगेत हात धुऊन घ्यायला कुणाला आवडणार नाही? या स्पर्धेत कोणते खेळाडू कोणत्या संघाकडून भाग घेतील, त्यांचे मालक कोण असतील, हा प्रश्न सध्या तरी विचारण्यात अर्थ नाही. पाकिस्तानी खेळाडू नसले तरी गेल्या खेपेला सहभागी नसलेले इंग्लंडचे खेळाडू यंदा भाग घेणार आहेत. केव्हिन पीटरसनची पायाभूत रक्कमच साडेतेरा लाख डॉलर एवढी, तर अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफची साडेनऊ लाख डॉलर आहे, असे सांगण्यात येते. महेंद्रसिंह धोनी हा या दोघांपेक्षा काही रकमेने पुढे असेल, असा कयास आहे. पूर्वीच्या खेळाडूंचे संघही बदलतील. इथे एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. ब्राझिलच्या विश्वचषक विजेत्या फुटबॉल संघातला काका हा इटालियन लीगमध्ये एसी मिलानकडून खेळतो त्याला इंग्लिश लीगमध्ये खेळण्यासाठी मँचेस्टर सिटीने ९५ लाख पौंड एवढी रक्कम देऊ केली, पण ती त्याने नाकारली. आपल्याकडे लीग कोणतीही असो, पैसा हा त्यांना अधिक महत्त्वाचा आहे. प्रीमिअर लीग आणि क्रिकेट लीग या दोन्ही ‘इंडियनां’ना एकत्र यायचे असेल तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाचा त्यास आक्षेप असणार नाही, असे जाहीर झाले आहे. गेल्या वर्षी ते गोयलांच्या म्हणजेच कपिलदेवच्या लीगला ‘बेकायदेशीर’ म्हणत होते. आता त्यांनी हा चेंडू भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या हद्दीत टोलवून लावला आहे. ‘प्रीमिअर’वाल्यांएवढी पसंती दुसऱ्या लीगला नसली तरी अगदीच सावत्रपणाची वागणूक देणार नाही, ही आंतरराष्ट्रीय मंडळींनी दिलेली कबुली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्षपद ज्यांच्या डोळय़ांसमोर आहे, त्यांना आता हा समेटही गरजेचा वाटू लागला आहे. शेवटी राजकारण काय आणि खेळ काय, जिथे तिथे ‘बिग बॉस’गिरीचीच गरज असते ना!