Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

यशवंत हो!
लाघवं कर्मसामथ्र्य दीप्तोग्निमेंदस: क्षय:।
विभक्त घनगात्रत्वं मल्लखांबात उपजायते ।।

भारतीयांना पाश्चात्यांचे आकर्षण अधिक. पाश्चिमात्य राष्ट्रांमधून येणारे जे जे काही ते ते सर्व चांगले, अशी मानसिकताच निर्माण झाली आहे. क्रीडा क्षेत्रही त्यास अपवाद नाही. त्यामुळे अस्सल भारतीय खेळ मागे पडत असून विदेशी क्रीडा प्रकारांचे भूत मानगुटीवर बसल्यासारखी स्थिती आहे. जिम्नॅस्टिकसाठी अत्याधुनिक व्यायामशाळांमधून विशेष व्यवस्था करण्यात येत असताना त्यापेक्षा काकणभर सरस असलेल्या मराठमोळ्या मलखांबचा खुंटा मात्र हलताना दिसत आहे. त्यामुळेच मलखांबाची महती सांगणारा हा श्लोक शाळाशाळांच्या भिंतींवर लावण्याची गरज आहे. शासनाकडून दुर्लक्ष होत असतानाही विपरीत परिस्थितीत हलणारा हा खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न काही जण प्रयत्नपूर्वक करीत आहेत.

 

यशवंत जाधव हे नाव त्यापैकीच एक.
कमीतकमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार असे मलखांबचे वर्णन केले जाते. मलखांबचे जमिनीत पुरलेला, टांगता व दोरीचा (रोप) असे तीन प्रकार आहेत. जमिनीत पुरलेल्या मलखांबसाठी शक्यतो सागवान किंवा शिसवाचा वापर केला जातो. शरीराचे खांबाशी होणारे घर्षण कमी व्हावे व आसन करणे सोपे जावे, यासाठी सागवानाला एरंडेलचे तेल लावले जाते. टांगता मलखांब हा पुरलेल्या मलखांबप्रमाणेच असला तरी याची उंची ही पुरलेल्या मलखांबपेक्षा कमी असते. हा मलखांब दोरीने अथवा साखळीने जमिनीपासून ठराविक उंचीवर टांगलेला असतो. दोरीच्या म्हणजेच रोप मलखांब प्रकारात पूर्वी वेताचा वापर करण्यात येत असे. अलीकडे सुती धाग्याभोवती नववारीचे आवरण घालून जमिनीपासून १५ फूट उंचीवर बांधलेल्या दोरीला गाठ न मारता आसने केली जातात.
एकेका गल्लीत क्रिकेटचे शेकडो प्रशिक्षक सहज सापडतील, परंतु संपूर्ण शहरात हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच मलखांबचे प्रशिक्षक सापडतील. त्यातही परिपूर्ण माहिती असणारे किती, हा प्रश्नच आहे. आतापर्यंत ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना राज्यस्तरापर्यंत नेणारे यशवंत जाधव हे मलखांब या खेळाप्रमाणेच दुर्लक्षित राहिलेले व्यक्तिमत्व. आबा घाडगे, रमेश वझे, दत्ता शिरसाठ, दीपक पाटील, विवेक तापकिरे यांच्यानंतर मलखांबमध्ये नाशिकची परंपरा पुढे कोण सुरू ठेवणार, या प्रश्नाचे उत्तर म्हणून यशवंतकडे पाहिले जात आहे.
पेठे विद्यालयात इयत्ता पाचवीत असतानाच रबराप्रमाणे अंग लवचिक असणाऱ्या यशवंतला मलखांबने आकर्षित केले. यशवंत व्यायामशाळेत जमिनीत रोवलेल्या लाकडी दांडुक्याचा आधार घेत विद्युतवेगाने हलणारी शरीरे पाहून आपणही हे करू शकतो, ही उर्मी त्याच्यात निर्माण झाली. त्यावेळी मुलांचा जिम्नॅस्टिककडे अधिक ओढा होता. परंतु मलखांबच्या तीनही प्रकारांमध्ये आपण जिम्नॅस्टिकपेक्षा उत्कृष्ट कामगिरी करू शकतो, असा विश्वास निर्माण झालेल्या यशवंतने व्यायामशाळेत नियमितपणे मलखांबचा सराव सुरू केला आणि अल्पावधीतच त्याने प्रावीण्य मिळविले. १९९२ मध्ये पुणे येथे दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे आयोजित खुल्या स्पर्धेत १४ वर्षांआतील गटात ‘बेस्ट प्लेअर’ म्हणून त्याची निवड झाली. मलखांबमधील त्याची प्रगती पाहून यशवंत व्यायामशाळेतील विद्यापीठ स्तरापर्यंत मजल मारणारे मलखांबपटू दीपक पाटील यांनी त्यास इतर मुलांना मलखांब शिकविण्याची सूचना केली आणि इयत्ता आठवीत असतानाच यशवंत हा यशवंत व्यायामशाळेत प्रशिक्षक बनला. अवघ्या दोनशे रूपयांवर त्याने ही जबाबदारी स्वीकारली. शंभर रूपये तो स्वत:साठी ठेवीत असे, तर शंभर रूपये घरात देत असे. पुढे त्याच्या मार्गदर्शनामुळे काही मुलांनी राज्यस्तर गाठल्यावर त्याच्या मानधनात ५०० रूपयांची वाढ करण्यात आली. पुढे के. टी. एच. एम. महाविद्यालयातून त्याने कला शाखेची पदवी घेतली. तीन भावांपैकी घरातील मोठा मुलगा असल्याने आलेली जबाबदारी व संसार दोन्ही सांभाळण्याची कसरत तो करू लागला. विशेष म्हणजे त्याची पत्नी प्रमिला ही के. टी. एच. एम. महाविद्यालयाची रोईंगमधील राष्ट्रीय खेळाडू असल्याने संकटाच्या लाटांना न डगमगता संसाराची नौका पैलतीरावर कशी न्यावी, हे त्यांना मुळातच अवगत.
आपण आज जे काही आहोत, त्यामागे वडिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे यशवंत मानतो. वडील रमेश नारायण जाधव हे मोहन मास्तर तालीम संघात कुस्तीचा सराव करीत. यशवंतच्या सरावाकडेही त्यांचे बारीक लक्ष. कधी यशवंतने मलखांबचा सराव चुकविलाच तर व्यायामशाळेत येऊन झोडपण्यास त्यांनी कमी केले नाही. कुसुमाग्रजांवर रमेश जाधव यांचा विशेष लोभ. ते त्यांना देवस्थानीच मानत. कुसुमाग्रजांच्या सान्निध्यात शक्य तितका वेळ घालविण्याची संधी मिळावी, यासाठी ते सतत धडपडत. यशवंतची आजी भाकरी व वांग्याचे भरीत अत्यंत फर्मास बनवित असे. कुसुमाग्रजांनी एकदा त्याची चव चाखली आणि ते प्रचंड खुश झाले. मग घरात वांग्याचे भरीत झाले की कुसुमाग्रजांच्या घरी डबा घेऊन जाण्याची डय़ुटी बजाविण्याचे काम आपोआपच यशवंतला करावे लागे. मुळात जाधव परिवाराची आर्थिक कमाई बेताची. नेहरू गार्डनजवळील सलून दुकान हाच त्यांचा आर्थिक आधार. मिळकत फारशी नसल्याने मुलांचे अतीलाड होण्याचा प्रश्नच आला नाही. आपल्या परीने जे शक्य होईल ते मुलांना देण्याचा प्रयत्न वडिलांनी केला. आपल्या मुलांनी कोणतेच व्यसन करू नये व व्यायामाकडे लक्ष द्यावे, याकडे मात्र त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळेच ज्या वाटेने चालण्यास सहसा कुणी धजावत नाही, अशा मलखांबसारख्या कठीण वाटेने यशवंतची वाटचाल सुरू झाली. दोन इंचाच्या लाकडी बोंडावर उभे राहून तोल सावरत विविध आसनांची कसरत करणाऱ्या यशवंतला जीवनातील वेगवेगळी आव्हाने पेलण्याचे बळच जणू काही मलखांबने दिले. आज नाशिकमधील आघाडीचा मलखांबपटू म्हणून यशवंतचे नाव घेतले जात असले तरी एक उत्तम प्रशिक्षक म्हणून त्यास मान्यता मिळाली आहे. भोसला मिलिटरी स्कूल, यशवंत व्यायामशाळा, आदर्श विद्यालय, फ्रावशी अकॅडमी, नॅब कार्यशाळा येथे यशवंतने प्रशिक्षण केंद्र सुरू केले असून १०० मुली व ५० मुलांना तो प्रशिक्षण देत आहे. त्र्यंबकेश्वर येथे तीन वर्षांपूर्वी डॉ. सत्यप्रिय शुक्ल यांच्या आग्रहास्तव राजे शिवछत्रपती व्यायामशाळेतही त्याने महिनाभर मार्गदर्शन केले. या कालावधीत रोज सायंकाळी तो नाशिकहून त्र्यंबकेश्वरला ये-जा करीत होता. रमेश जाधव हे ‘नॅब’ कार्यकारिणीचे सभासद असल्याने आपल्या मुलाने अंध मुलींना मलखांबचे धडे द्यावेत, ही त्यांची इच्छा. या इच्छेला खतपाणी घातले कुसुमाग्रजांनी. सध्या आमदार असलेले हेमंत टकले तसेच रामेश्वर कलंत्री यांनीही त्याच्यापुढे तसा प्रस्ताव ठेवला. त्यांच्या इच्छेला मान देत यशवंतने हे शिवधनुष्य उचलण्याचे ठरविले. नॅब कार्यशाळेत तो प्रशिक्षण देण्यासाठी जाऊ लागला. स्पर्शज्ञान तसेच टाळी वाजवून तो त्यांना रोप मलखांबवरील आसने शिकवू लागला. आठच दिवसांत दहा मुलींना त्याने चांगल्यापैकी तयारही केले. २००२ मध्ये सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय मलखांब स्पर्धेत नॅबची विद्यार्थिनी सुनंदा आंधळे हिने सहभाग घेतला आणि राज्यस्तरापर्यंत पोहोचणारी ती पहिली अंध मलखांबपटू ठरली. स्पर्धेसाठी ९० सेकंदात १५ ते २० आसनांचे प्रकार स्पर्धकाला करावे लागतात. पुणे, कोल्हापूर येथील राज्य स्पर्धासह २००७ मध्ये कोईम्बतूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही नाशिकच्या मलखांबपटूंनी सहभाग घेतला. २००८ मध्ये अमरावतीत झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तर नाशिकच्या ३२ खेळाडूंनी सहभाग घेतला. संघाचा व्यवस्थापक, प्रशिक्षक असे सबकुछ अर्थात यशवंत जाधव. या स्पर्धेत अभिषेक कोळपे, अमोल येळे यांनी ‘सर्वोत्कृष्ट सहा’ मध्ये स्थान मिळविले. रमेश जाधव यांच्या अमीन र्मचट या मित्राच्या आग्रहामुळे यशवंतला शारजाचीही वारी करता आली. तेथे त्याने दोन महिने वेगवेगळ्या ठिकाणी प्रात्यक्षिके दाखवली. सध्या नाशिक जिल्हा मलखांब संघटनेचा सहसचिव म्हणून काम पाहत असलेल्या यशवंतने प्रशिक्षण दिलेल्या मेघा ठोंबरे, तेजस्विनी जोशी, श्रद्धा भालेराव या सध्या उच्च पदांवर कार्यरत आहेत. मॉरिशस येथील विश्व मलखांब स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या पूनम कुलथेला तर यशवंतने तिच्या घरी जाऊन शिकवले. सारडा कन्या विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या पूनमची कामगिरी थक्क करणारी आहे. याच शाळेच्या मिथिला पैठणकर व उत्तरा खानापुरे या दहावीतील विद्यार्थिनींनी सलग दोनवेळा राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे. त्र्यंबकेश्वरच्या कविता मुंजे या विद्यार्थिनीकडूनही यशवंतला भविष्यात अधिक अपेक्षा आहे.
‘मलखांबच्या इतिहासामध्ये डोकावले असता काही संदर्भ थेट नाशिक जिल्ह्य़ातील वणीपर्यंत येऊन मिळतात. बाळंभट्ट देवधर हे पेशव्यांचे शिक्षक वणी येथे पूजा करीत असताना एक माकड एका झाडाच्या दांडक्यावर चढ-उतर करीत वेगवेगळ्या कसरती करीत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनीही मग लाकडाचा एक दांडका जमिनीत रोवून त्याप्रमाणे करण्यास सुरुवात केली. हाच मलखांबचा जन्म बहुतेक जण मानतात. कुस्तीचे डावपेच शिकण्यासाठी मल्लांना या खांबाचा उपयोग होत असल्याने पुढे मल्ल व खांब यावरून मलखांब हे नाव रूढ झाले. त्यामुळेच आजही अनेक व्यायामशाळांमध्ये कुस्तीचा आखाडा तिथे मल्लखांब दिसून येतो..’
आपण जो खेळ विद्यार्थ्यांना शिकवतो, त्याविषयी स्वत:ला परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, याविषयी काळजी घेणारा यशवंत खेळातील बदलणाऱ्या नियमांविषयीही जागरूक आहे. प्रजासत्ताकदिनी पोलीस कवायत मैदानात होणारी मलखांबची प्रात्यक्षिके कार्यक्रमाचे आकर्षण असे. त्यासाठी मुले स्वत:च मलखांब आणायची. पोलिसांकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने यशवंतने पाच वर्षांपासून प्रात्यक्षिक करणेच बंद केले. एकीकडे मलखांब प्रशिक्षक तर सलूनमध्ये आल्यावर कारागीराच्या भूमिकेत शिरणाऱ्या यशवंतमध्ये ठासून गुणवत्ता भरली आहे. परंतु या गुणवत्तेचा अजूनही फारसा तसा उपयोग नाशिककरांना करून घेता आलेला नाही. शिक्षणाप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांकडे लक्ष देणाऱ्या नाशिकमधील इंटरनॅशनल शाळा किंवा इतर बडय़ा शैक्षणिक संस्था एक नियमित खेळ म्हणून मलखांबला स्थान देऊ शकतात. प्रशिक्षण देण्यासाठी यशवंतची तयारी आहे. इच्छुक ९८९०९९९८९४ या भ्रमणध्वनीवर यशवंतशी संपर्क साधू शकतात. नॅबच्या सुनंदा आंधळेच्या राज्यस्तरावरील यशानंतर पुरस्कार सोहळ्यात उपस्थित जैन नावाच्या एका व्यक्तीने उत्स्फूर्त शेर उपस्थितांना ऐकवला होता. हा शेर अंधांचा गौरव करणारा तर आहेच, शिवाय इतरांना जाग आणणाराही आहे -
चाँद सूरज को हो खुद मोहताज
भीक न माँगो उजालो की
बंद आँखो से ऐसा काम करो
आँख खुल जाये, आँखोवालों की !

यशवंतकडून कटिंग करणारे व मलखांबचे प्रशिक्षण घेणारे सर्वजण यशवंतच्या हातात जादू आहे, असे म्हणतात. यशवंतला गरज आहे अशाच शब्दांची. ‘यशवंत हो’ अशा प्रोत्साहनात्मक आशीर्वादाची !