Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

लोकमानस

मनुष्यमात्रांतील दहशतवाद

 

३१ जानेवारीच्या त्रिकालवेध या सदरातील ‘कलियुगाचे आव्हान’ हा लेख वाचला. मला वाटते की, आपल्या पृथ्वीवर मानव हा असा एकमेव प्राणी आहे की जो इतर मानवांची फार मोठय़ा प्रमाणावर हत्या करतो. पृथ्वीवरील इतर सजीव असे वर्तन करीत नाहीत. एका कावळ्याने दुसऱ्या कावळ्याला ठार मारले असे क्वचितच घडते. अगदी हिंस्र गणले गेलेले वाघ, सिंह, लांडगे असे वर्तन करीत नाहीत. इतर सजीवांच्या तुलनेत अत्यंत प्रगत मेंदू व बुद्धी असूनही मानव इतर सजीवांची आणि इतर मानवांची खूप मोठय़ा प्रमाणावर हत्या करतो.
नैसर्गिक कारणांमुळे (वार्धक्य, पूर, सुनामी, वगैरे) होणारे मृत्यू अटळ आहेत. परंतु, मानवी करणीमुळे म्हणजेच माणसाच्या हातून इतर माणसांची प्रचंड संख्येत होणारी हत्या आपण टाळू शकतो. केवळ पोटाची भूक भागविण्यासाठी नाही तर देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने, राष्ट्राच्या नावाने, भाषेसाठी माणूस माणसाला ठार मारतो. मानवी व्यवहारातील नियम व शिस्त न पाळल्यामुळेही प्रचंड प्रमाणात माणसे मरतात. भारतात रस्त्यांवरील अपघातात दरवर्षी ८० हजार माणसे मरतात.
गेल्या काही शतकांत उदयाला आलेला राष्ट्रवाद हे मानवनिर्मित संहाराचे आणखी एक नवीन कारण. विसाव्या शतकात या राष्ट्रवादाने किती माणसांचे बळी घेतले ते आपण आपल्या लेखात लिहिलेच आहे. मानवाचा हा वेडाचार थांबविण्यासाठी एक उपाय मला सुचतो तो म्हणजे सार्वभौम जागतिक सरकारची स्थापना.
इतिहासकाळात भारतात कधीही सध्या आहे तसे एकच सार्वभौम सरकार नव्हते. भारतात फोडा आणि झोडा अशी नीती अवलंबिली असा आरोप इंग्रजांवर केला जातो. परंतु, आजचा एकच सार्वभौम सरकार असलेला भारत निर्माण झाला तो इंग्रजांमुळेच हे ऐतिहासिक सत्य आपण नाकारू शकत नाही. तत्पूर्वी, या देशातील विविध संस्थानिक एकमेकांशी लढत होते. सम्राट अशोकाने कलिंगातली माणसे मारली. अगदी अलीकडचा इतिहास पाहिला तर काय दिसते? सातारचे छत्रपती आणि कोल्हापूरचे छत्रपती यांची लढाई. पुण्याचे पेशवे बडोद्याच्या गायकवाडांवर स्वारी करतात. नागपूरकर भोसले पुणे लुटतात. भारतातल्या या अंतर्गत लढाया थांबल्या त्या इंग्रजांनी एकछत्री अंमल बसविल्यानंतर. तसे झाले नसते तर आज बेळगाव, कारवारचे निमित्त करून महाराष्ट्राने कर्नाटकावर स्वारी केली असती! भारताच्या (आणि युरोपच्याही) इतिहासातून काही शहाणपण शिकायचे असेल तर ते हेच की लवकरात लवकर सार्वभौम जागतिक सरकार स्थापन झाले पाहिजे. सध्याची वाहतुकीची व संपर्काची प्रगत साधने विचारात घेता जागतिक सरकार ही काही अशक्य गोष्ट नाही. सैन्य केवळ त्या ‘वसुंधरा सरकार’जवळ असेल; इतर देशांत असतील केवळ पोलीस. आज भारतात केंद्र सरकारजवळ सैन्य आहे, राज्यांत पोलीस आहेत. हेच जागतिक पातळीवर प्रत्यक्षात आले पाहिजे.
याकरिता मनातील द्वेष नष्ट झाला पाहिजे, फाजिल अस्मितांना आवर घालावा लागेल. ठिकठिकाणच्या राज ठाकरेंना लगाम घालावा लागेल. या पृथ्वीवरील सर्व मानव आपण एक आहोत व येथे गुण्यागोविंदाने राहण्यातच मानवाचे हित आहे हा विचार मना-मनात रुजविला पाहिजे.
मुकुंद गोंधळेकर, पनवेल

अयोग्य पायंडा पाडू नये
झी मराठी वाहिनीवरील लहान मुलांच्या गुणांचे कौतुक होणे आवश्यक आहे. पण या कौतुकात एक गोष्ट विसरून गेलो आहोत. अंतिम फेरीत पोहोचलेली ही लहान मुले गेल्या जुलै महिन्यापासून शाळेत जाऊ शकली नसल्यामुळे त्यांचा अभ्यास मागे पडला आहे. ती मुले सहामाही परीक्षेलाही बसू शकलेली नाहीत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल शिक्षण विभागाचे, शैक्षणिक प्रगतीचे काही नियम-निकष आहेत. पण त्याकडे शिक्षण संस्थांनी कानाडोळा करत या मुलांना अनुपस्थितीची परवानगी दिली आहे.उद्या या मुलांना निश्चितपणे उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात पाठवले जाईल. याबाबतीत शिक्षण मंत्रालयाने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. वाहिनीच्या कार्यक्रमावर नेमके नियंत्रण कोणाचे आहे? एखादी स्पर्धा किती महिने चालावी याला मर्यादा हवी. कलेचे कौतुक हवेच पण शिक्षणाच्या बाबतीत अयोग्य पायंडा पडणे घातक आहे.
कुमार नेवरेकर, रत्नागिरी

प्रजासत्ताकदिन दिसलाच नाही
झी मराठी वाहिनीवर २६ जानेवारी रोजी झालेला ‘शूरा मी वंदिले’ हा कार्यक्रम पाहिला. कार्यक्रमाबद्दल काही बोलणे मला योग्य वाटत नाही. पण नेहमीच प्रसंगानुरूप सजावटीवर कार्यक्रम करणाऱ्या झी कडून झालेल्या नकळत चुकीबद्दल खेद वाटतो. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहीदांना सलाम करताना बाळगलेले गांभीर्य, तसेच भान यावेळी सुटल्यासारखे वाटले. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताकदिनाचे चित्रीकरण करताना कुठेही तिरंगी ध्वजाची वातावरण निर्मिती दिसली नाही. सारेगमपच्या शीर्षकाजवळ, स्पर्धक, वादक, उपस्थित व्यक्ती किंवा परीक्षक यांच्याजवळ प्लास्टिकचे अथवा कागदी तिरंगी झेंडे दिसले नाहीत. किमान परीक्षक व मान्यवर यांच्या पुढय़ातील टेबलवर तरी तिरंगी ध्वज हवा होता. ही चूक झाली की मुद्दामहून टाळले गेले?
प्रवीण देशमुख, गोरेगाव, मुंबई

झी मराठी वाहिनीचा औचित्यभंग
झी टी. व्ही. चॅनेलवरील ‘लिटल चॅम्प्स’चा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाला आहे. लहानग्यांच्या प्रतिभेला मिळालेल्या या संधीबद्दल धन्यवाद. परंतु या लोकप्रियतेचा उपयोग स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे गुणगान करण्यासाठी २६ जानेवारी या दिवसाकरिता लहानग्यांनी केलेल्या कार्यक्रमाद्वारे व्हावा, हे उचित झाले नाही. ज्या दिवशी भारतीय जनतेने आपण प्रजासत्ताक राज्य स्वीकारीत आहोत, असे जगाला सांगितले, त्या भारतीयांच्या लोकशाहीवरील विश्वासाचा व हिटलर-मुसोलिनी या फॅसिस्टांना मानणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा काहीही संबंध नाही. मंगेशकरांनी आपली भक्ती स्वत:पुरती जपणे वेगळे व लहानग्यांना त्यासाठी वेठीस धरणे वेगळे.स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भारताच्या भूमीवरील प्रेम सर्वमान्य आहे; परंतु त्या भारताच्या भूमीवर राहणाऱ्या सर्व लोकांविषयीच्या प्रेमाबद्दल काय? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगामध्ये असह्य़ हालअपेष्टा भोगल्या हे खरे पण त्यांच्याबरोबरच्या तीनशेहून अधिक भारतीय राजबंद्यांनी ब्रिटिशांच्या मेहेरबानीने तुरुंगाच्या बाहेर न येता आपले देह तिथल्याच मातीत मिसळले हे सत्य मधू आडेलकर यांनी अलीकडेच मांडलेल्या अंदमानवरच्या प्रदर्शनातून लक्षात येते.मुंबईमधील दहशतवादी घटनेच्या पाश्र्वभूमीवर हा २६ जानेवारीचा कार्यक्रम झी मराठी वाहिनीने घेतल्यामुळे तो प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम न राहता युद्धज्वर निर्माण करणारा कार्यक्रम वाटला. कार्यक्रमाकरिता प्रामुख्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याच कवितांची केलेली निवड त्यातील, म्लेंछांशी लढणाऱ्या शिवाजीमहाराजांचे संदर्भ व त्या कवितांवर मंगेशकरांनी केलेले भाष्य, यातून देशप्रेमाचा आविष्कार केवळ युद्धातील प्रत्यक्ष सहभागानेच होतो, असा संदेश मिळत होता. तरुण मुलगे युद्धात शहीद झाले आहेत, अशा दोन मातांची निवेदने या संदेशाला अहेतुकपणे छेद देणारी ठरली. श्रीमती कापडिया व श्रीमती गाडगीळ या त्या दोन माता. आपल्या पुत्रविरहाच्या वेदनांना त्यांनी विधायक वळण दिले. सियाचिनचे हवामान मनुष्याला जगण्याला अयोग्य असल्याने त्या प्रदेशात संरक्षणासाठी टाकलेल्या तळावरील सैनिक युद्ध चालू नसतानाही कसे मृत्युमुखी पडत असतात, याचे श्रीमती कापडियांनी वर्णन केले. त्यामुळे सियाचिन हा भाग ना-युद्धभूमी जाहीर व्हावी, असा प्रयत्न त्या सर्व पातळ्यांवर करीत असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीमती गाडगीळ यांचा मुलगा मिग विमानाच्या अपघातात गेला. काम कोणतेही असो, ते प्रामाणिकपणे करावे, म्हणजे देशप्रेम! हा त्या मातेचा संदेशही युद्धज्वर निर्माण करण्याच्या प्रयत्नांना नकळतपणे छेद देणारा होता.
चंद्रकांत केळकर, मुंबई