Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

सांगलीचा विकास करणारच- जयंत पाटील
सांगली, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सांगली महापालिका क्षेत्राचा विकास करण्याची ग्वाही निवडणुकीत दिली होती. आपण जे बोलतो, ते करूनही दाखवितो. गेल्या दहा वर्षांत महापालिका क्षेत्राच्या विकासाचा आलेख खालावल्यानेच जनतेने परिवर्तन केले आहे. जनतेचा हा विश्वास निश्चित सार्थ करून गुणात्मक सुधारणा केली जाईल, असे प्रतिपादन गृहमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केले. सांगली महापालिकेच्या वतीने विश्रामबाग परिसरात बसविण्यात येणाऱ्या एक्स्प्रेस फीडरचा पायाभरणी कार्यक्रम गृहमंत्री पाटील यांच्या हस्ते आज झाला.

फरारींना पकडण्यासाठी गेलेल्यापोलीस पथकावर सशस्त्र हल्ला
तिघे पोलीस जखमी; दोन दरोडेखोर जेरबंद
मिरज, ३ फेब्रुवारी / वार्ताहर
फरारी आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला केल्याने पोलीस निरीक्षकासह तिघेजण जखमी झाले. या तिघांनाही उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघा दरोडेखोरांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद केले आहे. यातील एकजण फरारी झाला असला तरी त्याच्या शोधासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग पिंजून काढण्यात येत आहे.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती कुंदन पाटील यांच्या घरावर दोन वर्षांपूर्वी आठ दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे चार लाख रुपयांची लूट केली होती.

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण उपेक्षितच
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर, ३ फेब्रुवारी

ज्यांनी लावणीला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि ज्यांच्या लावण्या घेऊन नवशिक्या कलाकारांनी अनेक परदेशवाऱ्या केल्या, त्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या वाटय़ाला शासकीय स्तरावर सदैव उपेक्षा आली आहे, अशी उपेक्षा ही कलेचा पोशिंदा असलेल्या महाराष्ट्राला आणि जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना शोभणारी नाही. यामुळे मान-सन्मानांपासून वंचित राहिलेल्या सुलोचनाबाईंचा यथोचित सन्मान करून शासनाने हे उणेपण भरून काढावे अशी मागणी मंगळवारी अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने एका पत्रकार परिषदेत करण्यात आली.

आटपाडी तलावासाठी उपसाबंदीचे आदेश
आटपाडी, ३ फेब्रुवारी / वार्ताहर

आटपाडी तलावातील पाणी राखून ठेवावे व उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी. अन्यथा, आत्मदहन करण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन देशमुख यांनी दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने पाणी साठा राखीव ठेवत उपसाबंदीचे आदेश दिले आहेत.गेल्यावर्षी पुरेसा पाणीसाठा असताना वारेमाप पाणी उपसा केल्याने आटपाडीकरांना पाण्यासाठी टँकरची मदत घ्यावी लागली होती. केवळ मूठभर धनदांडग्यांसाठी पाटबंधारे खाते, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संगनमत केल्याने पाणीटंचाई उद्भवली होती. शहरातील अरुंद रस्त्यांमुळे टँकरने पाणी देणे अशक्य झाल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेत जनतेच्या वतीने नेहमी शिवसेनेत असो वा काँग्रेसमध्ये असो पाणी चोरांविरोधात आवाज उठविणाऱ्या मोहन देशमुख यांची आग्रही विनंती मान्य करीत जिल्हाधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी पाणी उपसा बंदी व उपलब्ध पाणी साठा आरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आटपाडीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यशवंत सहकारी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेचे र्निबध
मिरज, ३ फेब्रुवारी / वार्ताहर

आर्थिक स्थिती सावरण्यास असफल ठरलेल्या यशवंत सहकारी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारपासून निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधामुळे बँकेच्या ठेवीदारांना कमाल एक हजार रूपयापर्यंतच रक्कम मिळू शकणार आहे. मिरज अर्बन बँकेपाठोपाठ शहरातील ही दुसरी वित्तीय संस्था आर्थिक संकटात सापडली आहे.पतसंस्था म्हणून १९६७ मध्ये स्थापन झालेल्या या पतपेढीचे यशवंत सहकारी बँक म्हणून १९८३ मध्ये रूपांतर झाले. नऊ हजार ८३० सभासद असणाऱ्या या बँकेची आर्थिक स्थिती सावरण्याचे प्रयत्न गेली अडीच वर्षे सुरू होते. मात्र ठेवीदारांचा ठेवी परत मिळविण्यासाठी वाढता दबाव व कर्जवसुलीत आलेले अपयश यामुळे आर्थिक स्थिती सावरण्यात अडचणी निर्माण झाल्या.बँकेच्या १४ कोटी ५७ लाख रूपयांच्या ठेवी असून कर्ज नऊ कोटी ५६ लाख रूपये आहे. शासकीय कर्जरोख्यात पाच कोटी व व्याज पाच कोटी ८० लाख रूपये आहे. बँकेचा संचित तोटा चार कोटी सात लाख रूपये आहे. बँकेचे ५२ कर्मचारी असून खर्च कमी करण्यासाठी स्वेच्छा निवृत्ती योजना लागू केली आहे. बँकेचे अध्यक्ष दीपक शिंदे- म्हैसाळकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कर्जमाफीचे धोरण जाहीर झाल्यामुळे कर्जवसुलीवर विपरीत परिणाम झाला. बँकेकडून ८० लाख रूपयांचे शेतीकर्ज माफ झाले. मात्र हा निधी अद्याप प्राप्त झाला नाही. याशिवाय शेतीकर्जाची वसुलीही थांबली. रिझव्‍‌र्ह बँकेने आर्थिक स्थिती सावरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली असून थकित कर्जवसुलीसाठी कडक धोरण अवलंबले जाणार आहे.

साताऱ्यात महिला बचतगट शिक्षकांचा शनिवारी महामेळावा
सातारा, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे विभागातील पाच जिल्ह्य़ांतील महिला बचत गटांचा भव्य मेळावा जिल्हा परिषदेच्या मैदानावर तर क्रांतिस्मृती मैदानावर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्य़ातील शिक्षकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर घेण्यात येत असलेल्या या मेळाव्याकडे जिल्ह्य़ाचे लक्ष लागून राहिले आहे. कारण या मेळाव्यासमोर केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, गृहमंत्री जयंत पाटील, जलसंपदामंत्री रामराजे नाईक निंबाळकर, राज्य उत्पादनशुल्क मंत्री गणेश नाईक, महसूल व शिक्षणमंत्री डॉ. पतंगराव कदम, राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांच्याबरोबरच पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही या मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा या मेळाव्यात गौरव करून त्यांना आदर्श शिक्षण परंपरा चालवण्याचा व नावलौकिक वाढविण्याचा कानमंत्र दिला जाणार आहे.या मेळाव्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ८ फेब्रुवारीस उद्धव ठाकरे यांची तर ९ फेब्रुवारीस उदयनराजेंची जंगी सभा होणार आहे.