Leading International Marathi News Daily                                बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

व्यापार - उद्योग

क्रीडा

अग्रलेख

विशेष लेख

लोकमानस

व्यक्तिवेध

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

सचिनला ढापला, तरी कप आपला
युवी-वीरूने केली लंकेची धुलाई
कोलंबो, ३ फेब्रुवारी/पी.टी.आय.

दस्तुरखुद्द सचिन पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा सलग तिसऱ्यांदा बळी ठरला. पण धोनीच्या संघाचे ‘शॉक ऑब्जव्‍‌र्हर’ आता एवढे मजबूत झाले आहेत की सचिनच्या विकेटनंतरही भारताने विक्रमी ३६३ धावांची मजल मारली. विरेंदर सेहवाग आणि युवराजसिंग यांनी लंकेच्या गोलंदाजांची आज अक्षरश: ससेहोलपट केली. पुढचे किमान काही दिवस तरी लंकेच्या गोलंदाजांना ‘जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी’ आपणच दिसत राहू, अशी चोख व्यवस्था या दोघांनी केली. भारतात काही महिन्यांपूर्वी एका सामन्यात सहा बळी मिळवित दहशत निर्माण केलेला अजंता मेंडिस आणि फिरकीचा बादशहा मुरलीधरन हे दोघेही अगदी सामान्य श्रेणीचे, निष्कपट गोलंदाज वाटू लागले, एवढा धाक या दोघांनी बसविला. या दोघांची कामगिरी वाया जाणार नाही, याची काळजी मग युसूफ पठाण आणि धोनीने घेतली आणि प्रेमदासा स्टेडियमवरील आजपर्यंतची सर्वोच्च धावसंख्या उभारली. एवढय़ा भक्कम पाठबळानंतर इशांत, झहीर यांनी आपापले बळी वसूल केले नसते तरच आश्चर्य होते. पण डावखुरा लेगस्पिनर प्रज्ञान ओझाने लंकेच्या फलंदाजांना ‘मामा’ बनवित पुढच्या दोन सामन्यांसाठी धोक्याचा इशारा आजच देऊन ठेवला. पाच सामन्यांची ही मालिका भारताने आजच खिशात घातली असली तरी ‘निर्भेळ’ यश मिळविणे हेच आपले ध्येय असल्याचे धोनीच्या संघाने जणू जाहीरच केले.

महाराष्ट्राचा महाप्रकल्प
‘मिहान’ला राजकारण्यांचा कोलदांडा!
रवींद्र पांचाळ
मुंबई, ३ फेब्रुवारी
आर्थिक महासत्ता असलेल्या जगातील निवडक देशांच्या पंक्तीत जाण्याच्या दिशेने भारताचे एक पाऊल ठरणार असलेल्या नागपूरमधील ‘मिहान’ या महाराष्ट्राच्या महाप्रकल्पाची घोडदौड वेगाने सुरु असतानाच त्याला खास भारतीय पद्धतीचा कोलदांडा घालण्याचे उद्योग काहींनी सुरु केले आहेत. सुमारे ३९ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असलेल्या आणि सुमारे एक लाख वीस हजार नोकऱ्या उपलब्ध करणार असलेल्या या आंतरराष्ट्रीय हब विमानतळाच्या मार्गातील अडसर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निग्रहपूर्वक दूर सारावे लागणार आहेत.

करवाढ नसलेला पालिकेचा अर्थसंकल्प
महिलांसाठी पहिल्यांदाच स्वतंत्र अंदाजपत्रक
मुंबई, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी
देशातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा १९ हजार कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प आज पालिकेचे आयुक्त जयराज फाटक यांनी स्थायी समितीला सादर केला. या वर्षीही मुंबईकरांवर कोणतेही नवीन कर लादण्यात आलेले नाहीत वा सध्याच्या करांमध्ये अजिबात वाढ करण्यात आलेली नाही. जागतिक मंदीमुळे पालिकेच्या जकातीच्या उत्पन्नात घट झाली असली तरी आगामी वर्षांंत मालमत्ता कराचे उत्पन्न वाढणार असल्याचा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे. येत्या दोन वर्षांत मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी या अर्थसंकल्पात अनेक योजना असल्याचा दावाही त्यांनी केला. यंदाचा अर्थसंकल्प ७१.१८ कोटींचा शिलकी असून गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या अर्थसंकल्पात २९१८.१० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

माजगावकर आणि कंपनीच्या ‘कटाचा’ सरवटेंना सुखद धक्का!
मुंबई, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

‘राजहंस’ प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, जागतिक व्यंगचित्रांचे संग्राहक व अभ्यासक मधुकर धर्मापुरीकर आणि चित्रकार रविमुकुल यांनी एक कट रचला आणि त्या कटामुळे ज्येष्ठ चित्रकार वसंत सरवटे यांना ‘सुखद धक्का’ बसला. निमित्त होते सरवटे यांच्या ८२ व्या वाढदिवसाचे. मंगळवारी सरवटे यांच्या पार्ले येथील निवासस्थानी ही सर्व मंडळी पोहोचली. कुटुंबीयांसमवेत घरगुती पद्धतीने वाढदिवस साजरा करीत असलेले सरवटे या ‘अनाहूत’ सुहृदांच्या आगमनाने क्षणभर चकीत झाले. अभीष्टचिंतन झाल्यावर माजगावकरांनी आपल्या पोतडीतून एक पुस्तक बाहेर काढले, वसंतरावांना हा आणखी एक सुखद धक्का होता. सरवटे यांच्या राजकीय व्यंगचित्रांचा संग्रह असलेले ‘रेषा लेखक वसंत सरवटे’ हे देखणे पुस्तक म्हणजे चकीत करणारी ‘वाढदिवस भेट’ होती! वसंत सरवटेंना कोणतीही कल्पना न देता या तिघांनी या पुस्तकाची कल्पना प्रत्यक्षात आणली.

अर्थमंत्र्यांच्या नावाने कोटय़वधींचे ‘वळसे’ घेणारा ठकसेन कोण?
समर खडस
मुंबई, ३ फेब्रुवारी

अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाने एका व्यावसायिकाला कोटय़वधींचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठगाची तक्रार स्वत: वळसे यांनीच मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांकडे केली असून दिलीप वळसे पाटील यांच्या नावाने दूरध्वनी, एसएमएस, इ-मेल अशा सगळ्या आयुधांचा वापर करून खंडणी मागणारा हा ‘झोलर’ कोण याचा शोध मात्र अद्याप पोलिसांना लागलेला नाही. सीटी लिमोझीन नावाची कार भाडय़ाने देणाऱ्या कंपनीचे मालक मसूद सय्यद यांना डिसेंबर महिन्यात ते अमेरिकेला असताना त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला.

नक्षलवाद्यांविरुद्ध जनतेत कमालीचा असंतोष
देवेंद्र गावंडे
चंद्रपूर, ३ फेब्रुवारी

गेल्या काही दिवसांपासून अतिशय क्रूर पध्दतीने हिंसक कारवाया घडवून आणणाऱ्या नक्षलवाद्यांविरुद्ध गडचिरोलीच्या ग्रामीण भागातील जनतेत कमालीचा असंतोष धगधगत आहे. मात्र या असंतोषाला संघटित करण्याचे काम सरकारकडून म्हणावे तेवढय़ा प्रभावीपणे झालेले दिसत नाही. गेल्या काही महिन्यापासून नक्षलवाद्यांनी गडचिरोलीच्या दुर्गम भागात पुन्हा निरपराध आदिवासींचे हत्यासत्र सुरू केले आहे. नक्षलवादी हत्या अतिशय क्रूर पध्दतीने करतात. आदिवासींना निर्दयीपणे ठार मारण्याच्या नक्षलवाद्यांच्या मोहिमेविरुद्ध आधी जनता उघडपणे बोलणे टाळायची. आता सततच्या हिंसेने त्रस्त झालेल्या जनतेत फरक जाणवू लागला आहे.

‘सत्यम’ला मिळाली १५ नवी कंत्राटे
नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी/पीटीआय

सत्यम कॉम्प्युटर्स कंपनीच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच या कंपनीला जानेवारीपासून आऊटसोर्सिगची पंधरा नवी कंत्राटे मिळाली आहेत. अमेरिका, युरोप व उर्वरित जगातील बाजारपेठांमधून ही कंत्राटे मिळाली आहेत, असे कंपनीने आज सांगितले.
सत्यमच्या प्रवक्त्याने हैदराबाद येथे सांगितले, की कंपनीला अमेरिकेतून तीन नवीन कामे मिळाली असून, त्यात विमा व औषध उद्योगातील प्रत्येकी एका कामाचा समावेश आहे. तसेच कंपनीला एका कंत्राटासाठी मुदतवाढही मिळाली आहे. या सकारात्मक घडामोडीमुळे आता सत्यम कंपनी विकत घेण्यास सरसावलेल्या कंपन्यांनाही प्रोत्साहन मिळणार आहे. एल अँड टी, महिंद्रा, स्पाईस समूह तसेच हिंदूुजा या कंपन्या सत्यम कंपनी ताब्यात घेण्यास इच्छुक आहेत.युरोपात सत्यम कंपनीला दोन कामे मिळाली आहेत. त्यात एक रसायन उत्पादन क्षेत्रातील आहे, तर दुसरे सेवा क्षेत्रातील आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. जपान, आफ्रिका, मध्यपूर्व, आशिया-पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड या भागांतूनही दहा कंत्राटे सत्यम कंपनीला मिळाली आहेत. सत्यम कंपनीला नवीन कामे मिळाल्याच्या या वृत्ताने आता तेथील कर्मचाऱ्यांचे मनोधैर्यही उंचावले आहे.

दहावी-बारावी परीक्षांवर शाळांचा बहिष्कार
मुंबई, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

दहावी-बारावीच्या परीक्षा हातातोंडावर आल्या असतानाच या परीक्षांसाठी वर्गखोल्या न देण्याचा निर्णय मुंबईतील शाळांनी घेतला आहे. ‘महामुंबई शिक्षण संस्था संघटने’च्या पुढाकाराने आयोजित केलेल्या संस्थाचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांना २००४ सालापासून वेतनेतर अनुदान देण्यात आलेले नाही. त्यामुळे इमारतीचे बांधकाम, फर्निचर, खडू, पिण्याच्या पाण्याची टाकी, शौचालय इत्यादी महत्त्वपूर्ण कामांसाठी निधी उपलब्ध होत नाही. राज्य सरकारच्या या अन्यायी धोरणाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प. म. राऊत यांनी सांगितले. विनाअनुदानित शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वाढीव शुल्काला मान्यता मिळावी, निवडणुकीच्या कामासाठी जुंपलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ताबडतोब या कामातून सुटका करावी, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या रखडलेल्या मान्यतांबाबत ताबडतोब निर्णय घ्यावा इत्यादी मागण्यांचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ’ या संघटनेनेही देवीसिंग शेखावत यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यातील सर्व शाळांमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी खोल्या उपलब्ध करू न देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.

सहाव्या वेतन आयोगासाठी राज्यशासकीय कर्मचाऱ्यांचा मोर्चा
मुंबई, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सहावा वेतन आयोग राज्यशासनाच्या कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात यावा, याविषयीचा प्रस्ताव उद्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे येणार आहे. या प्रस्तावावर उद्याच्या बैठकीत शिक्कामोर्तब व्हावे यासाठी आज शासकीय कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. केंद्राप्रमाणे राज्यशासनाच्या कर्मचाऱ्यांनाही सहावा वेतन आयोग लागू व्हावा याविषयीचा प्रस्ताव गेल्या आठवडय़ात राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर होणार होता. पण अर्थमंत्री या बैठकीस उपस्थित नसल्यामुळे प्रस्तावावर चर्चा झाली नाही. सहावा वेतन आयोग लागू करण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असून त्यावर त्वरित चर्चा होऊन शिक्कामोर्तब करावे, अशी मागणी राज्यकर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी केली. या मोर्चामुळे आज सरकारी कार्यालयातील कामकाज काही काळ ठप्प झाले होते.

विद्यार्थ्यांच्या मांडीवर गरम मेण ओतले
हैदराबाद, ३ फेब्रुवारी / पी.टी.आय.

पैसे चोरल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशात एका लहानग्या बालिकेला मारहाण झाली असतानाच अशाच आरोपावरून नर्सरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या मांडीवर एका शिक्षिकेने गरम मेण ओतल्याची घटना आंध्रप्रदेशात घडली आहे. या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या विद्यार्थ्यांने पैसे चोरल्याचा शिक्षिकेला संशय होता. त्याने कबुली न दिल्याने त्याच्या मांडीवर मेणबत्तीचे गरम मेण तिने ओतले. त्यामुळे त्याची मांडी चांगलीच भाजली. विद्यार्थ्यांने ही घटना पालकांना सांगितल्यानंतर तिच्याविरुद्ध त्यांनी विकाराबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली. शिक्षिकेचे नाव रोझी रेड्डी असून तिच्यावर पोलिसांनी विद्यार्थ्यांला जाणीवपूर्वक जखमी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून ती पूर्ण झाल्यावरच शिक्षिकेला नंतर अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८