Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

करवाढ नसलेला पालिकेचा अर्थसंकल्प
महिलांसाठी पहिल्यांदाच स्वतंत्र अंदाजपत्रक
मुंबई, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

देशातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा १९ हजार कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प आज पालिकेचे आयुक्त जयराज फाटक यांनी स्थायी समितीला सादर केला. या वर्षीही मुंबईकरांवर कोणतेही नवीन कर लादण्यात आलेले नाहीत वा सध्याच्या करांमध्ये अजिबात वाढ करण्यात आलेली नाही. जागतिक मंदीमुळे पालिकेच्या जकातीच्या उत्पन्नात घट झाली असली तरी आगामी वर्षांंत मालमत्ता कराचे उत्पन्न वाढणार असल्याचा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे. येत्या दोन वर्षांत मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी या अर्थसंकल्पात अनेक योजना असल्याचा दावाही त्यांनी केला. यंदाचा अर्थसंकल्प ७१.१८ कोटींचा शिलकी असून गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या अर्थसंकल्पात २९१८.१० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प १६ हजार ८३१.५० कोटींचा होता. त्यात यंदा १७.३४ टक्के वाढ झाल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना, दोन कनिष्ठ महाविद्याले सुरू करणे, आपत्कालीन व्यवस्था बळकट करणे आणि पालिकेच्या प्रकल्पांची स्वतंत्र फलश्रुती निश्चित करण्यासाठी ‘आऊटकम अ‍ॅडव्हायझरी बोर्ड’ स्थापन करणे आदी घोषणा आयुक्तांनी केल्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या वेळी केल्या.
महिलांसाठी पहिल्यांदा स्वतंत्र अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. मात्र महिलांसाठी त्यात कुठल्याही स्वरुपाच्या नवीन योजना जाहीर केलेल्या नाहीत. उलटपक्षी प्रसूतीगृहांच्या दुरुस्ती व देखभालीचा खर्चाचा या अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. शाळांमधील स्वच्छता याचे आता खासगीकरण करण्यात आले आहे. पालिकेने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासाठी ७५ लाख तर एशियाटिक सोसायटीसाठी २५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मालमत्ता करदात्यांच्या पाल्यांसाठी पालिकेने विशेष योजना जाहीर केली असून दहावी, बारावी परीक्षेत ९० टक्के गुण मिळविणाऱ्या पाल्यांना १० हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार आहेत. जागतिक मंदीमुळे जकातीचे उत्पन्न कमी होत असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न जास्तच आहे. या वर्षी हे उत्पन्न चार हजार ३०० कोटी तर मालमत्ता कराचे उत्पन्न दोन हजार ४५० कोटी, जल आणि मलनि:सारण आकार ७५५ कोटी असे प्रमुख उत्पन्न होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शिक्षण खात्यावर १४०० कोटी, आरोग्य ४४६ कोटी, शाळांची दुरुस्ती २१९ कोटी, पर्जन्य जलवाहिन्या १५२१कोटी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मागासवर्गीयांचे कल्याणासाठी पालिकेने काही कोटींची तरतूद केली आहे. मात्र नेमके काय करणार ते स्पष्ट केले नाही. तसेच महिलांसाठी खास अर्थसंकल्प सादर केल्याचे श्रेय आयुक्त घेत आहेत, महिलासांठी काय योजना सुरू करणार याचा काहीच उल्लेख आयुक्तांच्या भाषणात नाही. याविषयी नगरसेवकांनी योजना सूचवाव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. या वर्षीचा अर्थसंकल्प १९ हजार कोटींचा असला तरी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील खर्च फक्त ४२ टक्केच झालेला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाने टीका केली आहे. ‘हा अर्थसंकल्प म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते राजहंस सिंग यांनी केली आहे. तर मुंबईच्या विकासाचा हा अर्थसंकल्प आहे,असा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी केला आहे.