Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

माजगावकर आणि कंपनीच्या ‘कटाचा’ सरवटेंना सुखद धक्का!
मुंबई, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

‘राजहंस’ प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, जागतिक व्यंगचित्रांचे संग्राहक व अभ्यासक मधुकर धर्मापुरीकर आणि चित्रकार रविमुकुल यांनी एक कट रचला आणि त्या कटामुळे ज्येष्ठ चित्रकार वसंत सरवटे यांना ‘सुखद धक्का’ बसला.
निमित्त होते सरवटे यांच्या ८२ व्या वाढदिवसाचे. मंगळवारी सरवटे यांच्या पार्ले येथील निवासस्थानी ही सर्व मंडळी पोहोचली. कुटुंबीयांसमवेत घरगुती पद्धतीने वाढदिवस साजरा करीत असलेले सरवटे या ‘अनाहूत’ सुहृदांच्या आगमनाने क्षणभर चकीत झाले. अभीष्टचिंतन झाल्यावर माजगावकरांनी आपल्या पोतडीतून एक पुस्तक बाहेर काढले, वसंतरावांना हा आणखी एक सुखद धक्का होता. सरवटे यांच्या राजकीय व्यंगचित्रांचा संग्रह असलेले ‘रेषा लेखक वसंत सरवटे’ हे देखणे पुस्तक म्हणजे चकीत करणारी ‘वाढदिवस भेट’ होती! वसंत सरवटेंना कोणतीही कल्पना न देता या तिघांनी या पुस्तकाची कल्पना प्रत्यक्षात आणली. ‘माणूस’ या साप्ताहिकात सरवटेंनी १९६९ ते १९७२ या काळात राजकीय व्यंगचित्रे काढली होती आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता. सरवटे यांच्या व्यंगचित्रांचा जो संग्रह प्रसिद्ध झाला त्यात या चित्रांचा समावेश नसल्याचे धर्मापुरीकर यांच्या लक्षात आले व त्यांनी ते माजगावकरांना सांगितले. या चित्रांचा संग्रह प्रकाशित करून तो ३ फेब्रुवारी रोजी म्हणजे वसंतरावांच्या वाढदिवशी भेट देऊया, असा ‘कट’ या दोघांनी रचला आणि मग त्यात चित्रकार रविमुकुल यांनाही सहभागी करून घेण्यात आले. चित्रकार रविमुकुल यांनी पाच वर्षांपूर्वी सरवटे यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांनीच घेतलेले सरवटे यांचे रंगीत छायाचित्र पुस्तकात ‘कृष्णधवल’ करून वापरण्यात आले आहे. विजय तेंडुलकरांनी सरवटे यांना ‘रेषा लेखक’ म्हटले होते, तेच शीर्षक पुस्तकाला देण्यात आले. या आकस्मात भेटीत मग मनमोकळ्या साहित्यिक गप्पा रंगल्या. सरवटे, माजगावकर यांनी पु. ल. देशपांडे, मो. ग. रांगणेकर, श्री. दा. पानवलकर, तेंडुलकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तेंडुलकरांनी सरवटे यांची एक सविस्तर मुलाखत घ्यावी व त्याचे एक पुस्तक करावे, अशी योजना होती, तेंडुलकर त्यास राजी झाले होते, परंतु ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही, असे माजगावकर यांनी सांगितले. कलावंताची कदर करणाऱ्या या अकस्मात भेटीने सुखावलेल्या सरवटे यांनी मग महाराष्ट्रातील व्यंगचित्र कलेच्या स्थितीबाबत भाष्यही केले. सरकारी पातळीवर व्यंगचित्रांचे स्वतंत्र महत्त्व आणि अस्तित्व मान्य होताना दिसत नाही याची खंतही व्यक्त केली.
या अनौपचारिक अभीष्टचिंतनात व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, प्रकाशक राजेंद्र मंत्री, पत्रकार सारंग दर्शने हेही सहभागी झाले होते. ‘लोकसत्ता’ परिवाराच्या वतीने ‘तंबी दुराई’ यांनी सरवटे यांना शुभेच्छा दिल्या.