Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

अर्थमंत्र्यांच्या नावाने कोटय़वधींचे ‘वळसे’ घेणारा ठकसेन कोण?
समर खडस
मुंबई, ३ फेब्रुवारी

अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाने एका व्यावसायिकाला कोटय़वधींचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठगाची तक्रार स्वत: वळसे यांनीच मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांकडे केली असून दिलीप वळसे पाटील यांच्या नावाने दूरध्वनी, एसएमएस, इ-मेल अशा सगळ्या आयुधांचा वापर करून खंडणी मागणारा हा ‘झोलर’ कोण याचा शोध मात्र अद्याप पोलिसांना लागलेला नाही.
सीटी लिमोझीन नावाची कार भाडय़ाने देणाऱ्या कंपनीचे मालक मसूद सय्यद यांना डिसेंबर महिन्यात ते अमेरिकेला असताना त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतची ओळख महाराष्ट्राचे अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील बोलतो आहे, अशी सांगितली. स्वत: अर्थमंत्री आपल्याला फोन करतो म्हटल्यावर थोडेसे सुखावलेल्या मसूद यांना मात्र लगेचच धक्का बसला कारण समोरच्या व्यक्तीने आता निवडणुका जवळ आल्या असून पक्षासाठी १० कोटी रुपये मदत द्यावी, असे सांगितले. मात्र आपण परदेशात असून भारतात परत आल्यावर बोलू, असे सय्यद यांनी सांगितले.
काही दिवसांनी सय्यद पुन्हा मुंबईत परतल्यावर त्यांना वाटले होते की पक्षासाठी तथाकथित अर्थमंत्र्यांनी मागितलेल्या मदतीचे प्रकरण संपले असेल. पण लगेचच त्यांना पुन्हा एसएमएस यायला सुरुवात झाली. तसेच त्यांना एक इ-मेलही आला. अखेर त्यांना वळसे यांच्या शासकीय निवासस्थानी भेटण्यास बोलाविले गेले. तेथे सय्यद गेले आणि त्यांनी एका खादीचा झब्बा पायजमा घातलेल्या व्यक्तीची भेटही घेतल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते. मात्र त्यानंतरही १० कोटींच्या रकमेत फारसा बदल न झाल्याने सय्यद यांनी कुणाची तरी ओळख काढली. त्या व्यक्तीला वळसे यांनी अशी मागणी केल्याचे ऐकताच आश्चर्याचा धक्काच बसला. वळसे यांच्या ओळखीच्या या व्यक्तीने तात्काळ वळसे यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि वळसे यांनी सय्यद यांना तातडीने भेटायला बोलावून घेतले. जेव्हा पहिल्यांदा सय्यद ‘खऱ्या’ दिलीप वळसे पाटील यांना भेटले तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. कारण दिलीप वळसे म्हणून ज्या व्यक्तीचा आवाज त्यांनी ऐकला होता वा ज्यांची त्यांनी भेट घेतली होती ती व्यक्ती ही नव्हेच हे त्यांच्याही आता लक्षात आले होते. दिलीप वळसे पाटील यांच्याशी याबाबत आज संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सिटी लिमोझीनचे मालक आपल्याला भेटायला आले होते व त्यांनी आपल्याला हा सर्व प्रकार सांगितला. त्यांच्या मोबाईलवर ज्या क्रमांकावरून संबंधित एसएमएस व फोन आले होते. त्यावर आपण आपल्या मोबाईलवरून संपर्क साधला. समोरच्या व्यक्तीला मी माझी ओळखही दिली की मी राज्याचा अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील बोलतोय. आपल्या मोबाईलवरून अशा प्रकारचे फोन केले गेल्याची तक्रार आहे हे सांगितल्यावर समोरची व्यक्ती अत्यंत उद्धटपणे माझीच हजेरी घ्यायला लागली. त्यामुळे आपण तो फोन कट केला व मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या सह आयुक्तांशी तात्काळ संपर्क साधला आणि हे प्रकरण त्यांच्याकडे सुपूर्द केले. मात्र अशा प्रकारे अर्थमंत्र्यांच्या नावाचा दुरुपयोग करणारा हा महाभाग नक्की कोण, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले की नाही, त्याच्यावर नक्की कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत मुंबई पोलीस कोणतीही माहिती देण्यास तयार नाहीत.