Leading International Marathi News Daily                                  बुधवार, ४ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

नक्षलवाद्यांविरुद्ध जनतेत कमालीचा असंतोष
देवेंद्र गावंडे
चंद्रपूर, ३ फेब्रुवारी

गेल्या काही दिवसांपासून अतिशय क्रूर पध्दतीने हिंसक कारवाया घडवून आणणाऱ्या नक्षलवाद्यांविरुद्ध गडचिरोलीच्या ग्रामीण भागातील जनतेत कमालीचा असंतोष धगधगत आहे. मात्र या असंतोषाला संघटित करण्याचे काम सरकारकडून म्हणावे तेवढय़ा प्रभावीपणे झालेले दिसत नाही.
गेल्या काही महिन्यापासून नक्षलवाद्यांनी गडचिरोलीच्या दुर्गम भागात पुन्हा निरपराध आदिवासींचे हत्यासत्र सुरू केले आहे. नक्षलवादी हत्या अतिशय क्रूर पध्दतीने करतात. आदिवासींना निर्दयीपणे ठार मारण्याच्या नक्षलवाद्यांच्या मोहिमेविरुद्ध आधी जनता उघडपणे बोलणे टाळायची. आता सततच्या हिंसेने त्रस्त झालेल्या जनतेत फरक जाणवू लागला आहे. दोन दिवसापूर्वी मरकेगावला एकाच वेळी पंधरा पोलिसांची हत्या नक्षलवाद्यांनी केली. त्याची तीव्र प्रतिक्रिया या भागात उमटली असल्याचे या परिसरात फिरताना दिसून आले. ग्यारापत्ती येथे आश्रमशाळेत काम करणारा एक कर्मचारी भेटला. गेल्या सतरा वर्षांपासून तो याच गावात राहात आहे. नक्षलवाद्यांनी हत्या केलेले पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुडधेकर त्याच्या चांगल्या परिचयाचे होते. या अधिकाऱ्याचा गावातील सर्वाशी चांगला संवाद होता. त्यांची हत्या झाल्याचे कळताच गावात कुणी जेवले नाही. चांगली व जनतेत मिसळणारी माणसे मारून नक्षलवाद्यांना नेमके काय साधायचे आहे? असा प्रश्न या कर्मचाऱ्याने केला. एकदा मोठी फौज आणून या साऱ्यांचा ‘खातमा’ केला पाहिजे, असेही तो संतापून म्हणाला. सात लोकांना पकडून नेल्यामुळे मरकेगावात बरीच अस्वस्थता होती. भेटणारा प्रत्येकजण या अटकेविषयी बोलत होता पण, त्यापैकी कुणीही नक्षलवाद्यांच्या बाजूने बोलत नव्हते. गावातील महिला बंदुकीतील गोळय़ांच्या आवाजाने त्रस्त झाल्याचे सांगत होत्या. दोन दिवसापूर्वी नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली तेव्हाच आमच्या पोटात भीतीचा गोळा उठला होता. अखेर ती भीती खरी ठरली, असे भीत भीत किती दिवस जगायचे, एकदा याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे, असे गावातील तरुण म्हणत होते. आता पोलिसांचे अटकसत्र संपले की नक्षलवादी गावात येणार, त्यांचाही जाच सहन करावा लागणार. असे कात्रीत किती दिवस जगायचे अशी निर्वाणीची भाषा गावातील तरुणांकडून बोलली जात होती. यंदा दुष्काळामुळे धानाचे पीक आले नाही त्यामुळे दिवसातून एकदा जेवावे लागते. उपासमारीचे चटके सहन करत या दहशतीला आणखी किती काळ तोंड द्यायचे? असा प्रश्न हे तरूण करत होते.
मरकेगावच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पंधरापैकी बारा जवान गडचिरोली जिल्हय़ातील होते. यातील बहुसंख्य आदिवासी होते. त्यामुळे काल दिवसभर या जिल्हय़ात ठिकठिकाणी हीच चर्चा होती. धानोरा येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. चौका चौकात जमलेले तरूण या घटनेविषयी बोलत होते. काहीही झाले तरी आदिवासीच मरणार अशी चर्चा या तरुणांमध्ये होती. बोलते केलेल्या प्रत्येकाला आपण काहीतरी करावे असे वाटत होते पण, नेमके काय करावे हे सूचत नव्हते.