Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

प्रादेशिक

‘बीएसएनएल’ची आता ‘आयपीटीव्ही’ सेवा
मुंबई, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

‘इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन’ (आयपीटीव्ही) सेवा ६ फेब्रुवारीपासून कल्याण, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, सोलापूर आणि औरंगाबाद या शहरांत सुरू करण्यात येईल अशी घोषणा भारत विदेश संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) महाव्यवस्थापक चंद्र प्रकाश यांनीआज येथे केली. ही सेवा ‘वाईस टीव्ही’ नावाने बीएसएनएल ब्रॉडबॅण्ड ग्राहकांच्या घरोघरी पोहोचणार असून, मनोरंजनाखेरीज ग्राहकांना या टीव्हीच्या माध्यमातून एसएमएस, गेम्स, रेडिओ, व्हिडिओ डाऊनलोड यासारख्या अनेक सुविधांचाही लाभ घेता येणार आहे.

लिट्ल चॅम्प्सनी घेतला गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा आशीर्वाद
मुंबई, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

‘तुम्हा सगळ्यांना शास्त्रीय संगीत शिकायचे आहे, हे चांगलेच आहे. पण शास्त्रीय संगीत म्हणजे नमके काय? क्लासिकल म्हणजे सर्वात उच्च. त्याहून वरचढ काही नसते. शास्त्रीय संगीत म्हणजे नुसती सूर ओळखण्याची गोष्ट नाही. हे संगीत म्हणजे स्वरभाषा ओळखण्याचे शास्त्र. ‘सा रे ग म प’ यात जे काही असते त्या सूरांचा अभ्यास म्हणजे शास्त्रीय संगीताचा अभ्यास. या सूरांचा अभ्यास करणे ही सोपी गोष्ट मुळीच नाही पण ती अशक्य गोष्ट अजिबात नाही. मला जर हे जमले तर तुम्हाला का जमणार नाही? नुसत्या स्वरांमधून आपल्याला आपल्या अंतरातले मांडता आले पाहिजे..’

राष्ट्रपती करणार बेकायदा पॅगोडाचे उद्घाटन!
मुंबई, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

बोरिवली (प.) गोराई येथे एस्सेल वर्ल्डतर्फे उभारण्यात आलेले ‘पॅगोडा’तील विपश्यना केंद्र ना विकास क्षेत्रावर असून सीआरझेडचे उल्लंघनही झाले असल्याचे मुंबई महापालिकेने कबुल केले आहे. येत्या ८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होत असून नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या वास्तूच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींनी येऊ नये, अशी मागणी धारावी बेट बचाव समितीने केली आहे. याउपर राष्ट्रपती या कार्यक्रमास हजर राहिल्या तर कार्यक्रमाच्या दिवशी धारावी बेटावरील रहिवाशी दिवसभर उपास करून आत्मक्लेषाचा मार्ग अवलंबतील, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

रोजगाराच्या नावावर उद्योगांना त्रास दिल्यास कठोर कारवाई- मुख्यमंत्री
मुंबई, ३ फेब्रुवारी/ खास प्रतिनिधी

जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवरही महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात उद्योग येत असून भुमीपुत्रांनाच रोजगार द्यावा, अशी मागणी करत जर कोणी उद्योगांना अडचण निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला तर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे दिला. राज्य शासनाने आज पाच कंपन्यांशी सामंजस्य करार केला. यामुळे राज्यात सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून अडीच हजार जणांना थेट रोजगार मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गडचिरोलीत विमान धावपट्टी उभारणार
मुंबई, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देता यावी, याकरिता गडचिरोली येथे विमान धावपट्टी बनविण्याचे आदेश मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.मंत्रालयात आज एमएडीसीच्या संचालक मंडळाची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २४ वी बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिला. बैठकीस एमएडीसीचे उपाध्यक्ष आर. सी. सिन्हा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव ए. एम. खान, वित्त विभागाचे प्रधान सचिव विद्याधर कानडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती शिवाजी, नगरविकास विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असीम गुप्ता व नागपूरचे जिल्हाधिकारी प्रवीण दराडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढय़ात आवश्यक पोलीस बळ तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी गडचिरोली येथे तातडीने जमीन संपादन करून धावपट्टी उभारली जाईल.

प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी उभे राहणार निवासी संकुल
मुंबई, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांसाठी वांद्रे-कुर्ला संकुलात उभ्या राहत असलेल्या नियोजित निवासी संकुलाच्या कामाचा पायाभरणी समारंभ आज केंद्र सरकारच्या महसूल विभागाचे सचिव पी. व्ही. भिडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी प्राप्तिकर विभागाचे मुख्य आयुक्त बी. पी. गौर हे उपस्थित होते.
नोकरी करीत असताना चांगले नागरी जीवन जगण्याची प्रत्येक कर्मचाऱ्याची इच्छा असते. प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांना हक्काची घरे उपलब्ध होणार असल्याने निवासाची त्यांची प्रमुख समस्या सुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन भिडे यांनी यावेळी बोलताना केले. मुंबईमध्ये घर उपलब्ध होणे म्हणजे दुरापास्त बाब बनली आहे. अशा परिस्थितीत प्राप्तीकर विभागातील अधिकाऱ्यांसाठी वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मोक्याच्या ठिकाणी निवासी संकुल उभे राहत आहे, ही खरोखरच अभिनंदनीय बाब असल्याचे गौर यांनी सांगितले. या संकुलासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ते एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा करावा लागला. केंद्र सरकारनेही या निवासी संकुलासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्याप्रसंगी प्राप्तीकर विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी विशेष कृती दल स्थापण्याची भाजपची मागणी
मुंबई, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

चंदनतस्कर विरप्पन याचा बिमोड करण्याकरिता कर्नाटक, आंध्र व तामिळनाडू या राज्यांनी जसे विशेष कृती दल स्थापन केले होते त्याच धर्तीवर नक्षलवाद्यांचा बिमोड करण्याकरिता आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि महाराष्ट्र या राज्यांनी एकत्र येऊन विशेष कृती दल स्थापन करावे व लष्कराची मदत घ्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी आज केली.नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १५ पोलिसांचा बळी गेल्याच्या दुर्दैवी घटनेच्या पाश्र्वभूमीवर भाजपने विशेष कृती दलाची मागणी केली आहे. भांडारी म्हणाले की, सध्याचा नक्षलवाद्यांचा लढा समाजातील शोषित व पिडीतांसाठी सुरू नसून खंडणी उकळण्याचे काम ते सर्रास करीत आहेत. चंदन व शिसे याची तस्करी आणि शस्त्रास्त्रांचा व्यापार हेच उद्योग सध्या नक्षलवादी करीत आहेत. नक्षलवादाची समस्या सर्वप्रथम महाराष्ट्रातील तीन तालुक्यांत सुरू झाली. सध्या राज्यातील १३ तालुके नक्षलवादग्रस्त आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्राने पुढाकार घेऊन आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या नक्षलग्रस्त राज्यांना एकत्र आणून नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाईकरिता विशेष कृती दल स्थापन करावे. एकाच वेळी १५ पोलिसांची कत्तल करून नक्षलवाद्यांनी सरकारला आव्हान दिले आहे. त्यामुळे नक्षलवाद्याविरोधात कठोर कारवाई करण्याची हीच वेळ आहे.

हृदयविकारग्रस्त रुग्णाला मदतीचे आवाहन
मुंबई, ३ फेब्रुवारी/प्रतिनिधी

विलास दिगंबर कुलकर्णी हे अल्पभूधारक शेतकरी असून काही कामानिमित्त ते पुण्यात आले असता त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यावर तातडीने तेथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. त्यांच्यावर ‘बायपास’ शस्त्रक्रिया करण्याची गरज असून त्यासाठी किमान दीड लाख रुपयांची आवश्यकता आहे. विलास कुलकर्णी हे अपंग असून एवढे पैसे उभे करणे त्यांच्या कुटुंबियांना जवळपास अशक्यप्राय आहे. दानशूर व्यक्तींनी त्यांना सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‘दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल’च्या नावाने धनादेश, डीडी. पे-ऑर्डर कृपया ‘संजय उपासनी, सी-३०५ सुविधा अपार्टमेंट, कॅनरा बँकेजवळ, बिबवेवाडी, पुणे - ३७’ या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी ९४२२००२०१९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मनसेच्या मागणीमुळे मुंबई विमानतळावर मराठी उमेदवारांची भरती होणार
मुंबई, ३ फेब्रुवारी/ खास प्रतिनिधी

मुंबई विमानतळावर होणाऱ्या फायरमन प्रशिक्षणार्थीच्या भरतीत केवळ मराठी मुलांनाच घेतले पाहिजे, तसेच मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या पोलिसांच्या मुलांना व अग्निशमन दलातील बहाद्दूर जवानांच्या मुलांना या भरतीत प्राधान्य हवे, अशी मागणी करत मनसे हवाई कर्मचारी सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मराठी तरुणांना प्रशिक्षणार्थी म्हणून घेण्याचे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीच्या व्यवस्थापनाने मान्य केले. कोणत्याही मराठी वृत्तपत्रात जाहिराती न देता मुंबई विमानतळावर व्यवस्थापनातर्फे प्रशिक्षणार्थी फायरमन पदासाठी मुलाखती घेण्यात येत होत्या. यामागे मराठी तरुणांना डावलण्याचा डाव असल्याचा आक्षेप घेत मनसेच्या हवाई कर्मचारी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मुलाखतीच्या ठिकाणी जाऊन मुलाखती थांबविल्या. हवाई कर्मचारी सेनेचे अध्यक्ष नीतिन सरदेसाई यांच्यासह संदीप दळवी, विलास चव्हाण, मृणाल तांबे आदी शेकडो कार्यकर्त्यांनी नोकरभरतीत स्थानिक मराठी तरुणांना डावलणे सहन केले जाणार नाही, अशी भूमिका घेत मराठी वर्तमानपत्रात जाहिराती का दिल्या नाहीत, असा सवाल व्यवस्थापनाला विचारला. तसेच २६ नोव्हेंबरच्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात जीवाची पर्वा न करता आग विझविण्याचे काम केलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या मुलांना प्राधान्य देण्याची मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली. या आक्रमक भूमिकेनंतर व्यवस्थापनाने मुलाखती थांबवून आगामी भरतीत मराठी तरुणांनाच घेतले जाईल, असे आश्वासन दिल्याचे मनसेच्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

सिनेमॅक्स थिएटरच्या व्यवस्थापकाचा खून
मुंबई, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

अंधेरी येथील सिनेमॅक्स थिएटरच्या व्यवस्थापकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आज सायंकाळ यारी रोडवरील सवरेदय सोसायटी मैदानाजवळ आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंदार पाटील (३३) असे या व्यवस्थापकाचे नाव आहे. आज सायंकाळी वर्सोवा गावातील सवरेदय सोसायटी मैदानाजवळ त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. अज्ञात इसमाने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले असून खुनामागील कारण अद्याप समजून येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘महावितरण’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी अजेय मेहता
संजय सेठी ‘महापारेषण’वर
मुंबई, ३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

‘महावितरण’चे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी अजेय मेहता यांनी प्रकाशगड येथे डॉ. अजय भूषण पांडे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. त्यापूर्वी मेहता हे ‘महानिर्मिती’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. ‘महापारेषण’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी सनदी अधिकारी संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.‘महानिर्मिती’ कंपनीमध्ये कार्यरत असताना मेहता यांनी जवळपास ६३०० मेगावॉटच्या प्रकल्पांचे नियोजन केले होते. त्यापैकी ३५०० मेगावॉटची कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. अहमदनगरचे जिल्हाधिकारी आणि नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे.संजय सेठी यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे जिल्हाधिकारी, ठाणे, कोल्हापूर आणि नागपूरचे महापालिका आयुक्त म्हणूनही काम केले आहे.