Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

नवनीत

केरळ वा मलबार प्रांतात कालडी या पूर्णा नदीच्या उत्तरतीरी वसलेल्या खेडय़ात पं. शिवगुरू व अंबिकादेवींना भगवान शिवांच्या कृपाप्रसादाने पुत्ररत्न झाले. त्यांचे नाव शंकर ठेवले. बालपणी ते तेजस्वी, बुद्धीमान होते. पाचव्या वर्षी त्यांचे उपनयन झाले. वडिलांच्या अचानक मृत्यूने दु:खाचा आघात शंकरांच्या मनावर झाला. आईने त्यांना गुरुगृही पाठविले. दोन वर्षांत वेदाध्ययन पूर्ण केले. पूर्णा नदी

 

त्यांच्या घरापासून लांब होती. ती त्यांनी घरापाशी आणली. आईच्या परवानगीने संन्यास घेतला. संन्यास धारण करून आईला सांभाळले. आईचे औध्र्वदेहिक केले. ही फार मोठी क्रांती होती. नर्मदाकिनारी गुरू गोविंदनाथांनी त्यांच्यावर कृपा केली. त्यांनी स्वात्मसाधना केली. विशुद्ध ज्ञानाच्या निखळ अनुभवातून त्यांना जो साक्षात्कार घडला तो मानवतावादी दृष्टीने मौलिक ठरला. विश्वाचा अर्थ जाणून घेण्याच्या जिज्ञासेपोटी आत्मतत्त्वाचे दर्शन त्यांना घडले. यातून त्यांनी सर्वाना परब्रह्म मानले. ‘न मे जातिभेद:’ अशी हाक दिली. पद्मपाद (काशी), भट्टपाद (प्रयाग), मंडणमिश्र व त्यांची पत्नी सरस्वती (माहिष्मती) यांसारखे शिष्य विचाराने विचारांशी प्रमाण वाद करीत मिळविले. प्रभाकराला निजबोध केला. त्याला ‘हस्तामलक’ हे नाव दिले. शृंगेरी, जगन्नाथपुरी, द्वारका, बद्रिनाथ अशी चार हिंदुपीठे स्थापिली. शृंगेरीला सुरेश्वराचार्य, जगन्नाथपुरीला पद्मपाद, द्वारकेला हस्तामलक, बद्रिनाथाला तोटकाचार्य असे मुख्य आचार्य नेमले. अनेक मतांचे सप्रमाण खंडण केले. काश्मीरच्या सर्वज्ञ पीठावर आरोहण केले. ब्रह्मसूत्रभाष्य, दशोपनिषदभाष्य, गीताभाष्य, विवेकचुडामणी असे विविध ग्रंथ लिहिले. ‘‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या। जीवो ब्रrौव नापर:।।’’ हा अद्वैत सिद्धान्त प्रतिपादिला. भावमधुर, अप्रतिम देवतांची स्तोत्रे लिहिली. पंचायतन पूजा निर्माण केली. अखंड भारतभर भ्रमण केले. भारत जोडला. दीर्घ शिष्यपरंपरा निर्माण केली. ब्रह्म अद्वितीय आहे. ते एकमेव आहे. तेथे नाना म्हणजे अनेक काही नाही, असे नसून नसताना जे जे दिसते ते ते भ्रमाने म्हणजे अज्ञानाने आहे. यास्तव ज्ञानानेच मोक्ष आहे. या शंकराचार्याच्या तत्त्वज्ञानाने हिंदू धर्माला उज्ज्वलता प्राप्त झाली. भारत एकात्म सूत्रात आचार्यानी ओवला. मानवी मनांना जगायची उभारी दिली.
यशवंत पाठक

मंगळ व पृथ्वी या दोन ग्रहांत साम्य असल्याचे म्हटले जाते. हे साम्य काय आहे?
मंगळ व पृथ्वी यांतील दृश्य स्वरूपातले साम्य म्हणजे दोन्ही ग्रहांना असलेल्या ध्रुवीय टोप्या. जशा आपल्या अंटार्टिका व आर्क्टिक प्रदेशांत बर्फमय टोप्या आहेत, तशाच टोप्या मंगळाच्या ध्रुवांना आहेत व त्या दुर्बणितून दिसू शकतात. मंगळावर पृथ्वीप्रमाणे ऋतुचक्र असल्यामुळे तिथल्या हिवाळय़ात या टोप्यांचा आकार वाढलेला दिसतो. पाण्याच्या बर्फापासून तयार झालेल्या या टोप्यांवर गोठलेल्या कार्बन-डाय-ऑक्साईडचा थर जमतो. पृथ्वीप्रमाणेच मंगळाला कार्बन-डाय-ऑक्साईडयुक्त वातावरण आहे, पण ते अत्यंत विरळ आहे. मंगळावरील कमाल तापमान मात्र पृथ्वीवासीयांना सुसहय़ ठरेल असे २० अंश सेल्सिअस एवढे असते. पृथ्वीप्रमाणे मंगळावरही धुळीची वादळे होतात. ही वादळे आपल्या वादळांपेक्षा जास्त तीव्र असतात. या वादळांमुळे धुळीचे प्रचंड थर निर्माण होतात व कालांतराने ते नाहीसेही होतात. या बदलणाऱ्या थरांमुळे मंगळावर काळसर पट्टे येत व जात असावेत, असे दुर्बीण निरीक्षकांना वाटते. याच प्रकाराला पूर्वी मंगळावरील ‘कृषी लागवड’ समजण्यात आले होते. पृथ्वी आणि मंगळ यातले आणखी एक प्रमुख साम्य म्हणजे मंगळावरील नैसर्गिक कालव्याचे जाळे. पूर्वी पृथ्वीवरील निरीक्षकांनी पाहिलेले व मंगळावरील माणसांनी बांधलेले हे कालवे नसून, मंगळावर गेलेल्या यानांनी शोधून काढलेले हे कालवे आहेत. (हे कालवे दुर्बणिीतून दिसत नाहीत.) या कालव्यातून कोणे एकेकाळी पाणी वाहिले असावे. मंगळावर मातीत झाकल्या गेलेल्या हिमनद्याही आढळल्या आहेत. या हिमनद्या पाण्याच्या बर्फापासून तयार झालेल्या आहेत. तसेच मंगळावर पूर्वीच्या काळात पृथ्वीप्रमाणेच समुद्र अस्तित्वात असण्याची शक्यताही वर्तविली गेली आहे.
अभय देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

नाथ संप्रदाय, हटयोगाचे गाढे अभ्यासक, जगद्गुरू योगिराज गगनगिरी महाराज ४ फेब्रुवारी २००८ रोजी वयाच्या १०३ व्या वर्षी समाधिस्त झाले आणि अध्यात्मिक क्षेत्रातील प्राचीन ऋषिकुल परंपरेची आणखी एक चिरा ढासळली. सम्राट चालुक्याच्या वंशात १९०५च्या सुमारास गणपती व अनसूया या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. श्रीपाद गणपत पाटणकर हे त्यांचे पूर्ण नाव. पित्याचे छत्र हरवल्यावर वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी घरदार सोडून अध्यात्माचा मार्ग पत्करला. सातपुडा, विंध्य पर्वत ते हिमालयापासून नेपाळ, भूतान असा प्रवास करून नाथ संप्रदायाबरोबर वेगवेगळय़ा योगी महाराजांकडून हटयोगाचाही अभ्यास केला. स्वामी चित्रानंदांना त्यांनी आपले गुरू मानले. समाज प्रबोधनासाठी कोल्हापुरातील गननबावडा येथे त्यांनी आश्रम काढला. साधारणत: ४०-५० वर्षांपूर्वी खोपोलीत एका पेशवेकालीन शिवमंदिराच्या परिसरात महाराज प्रकटले. तेथे त्यांनी केलेल्या जलतपश्चर्येमुळे महाराजांचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात गेले. जवळ जवळ एक तप महाराजांनी पाण्यात राहून तपश्चर्या केली. त्यात शरीराचे अनेक अवयव नाहीसे झाले. विशेषत: हातांचे व पायांचे पंजे माशांनी खाल्ले, असे आश्रमातील भक्तगण सांगतात. १९९३च्या नाशिक कुंभमेळय़ातील अग्रपूजेचा मान त्यांनाच मिळाला होता. १९९७ मध्ये शिकागो येथील विश्वधर्म संसदेने ‘विश्वगौरव’ या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. असा मान स्वामी विवेकानंद यांच्यानंतर फक्त गगनगिरी महाराजांना मिळाला होता. त्यांच्या निधनाने एका युगपुरुषाला आपण मुकलो.
संजय शा. वझरेकर

शाळेतून घरी आल्यावर बोलायला, खेळायला कुणीच नसतं म्हणून पल्लवी फार उदास व्हायची. बाबांचा व्यवसाय होता, महिन्यातला बराच काळ ते बाहेरगावी असायचे. शहरात असायचे तेव्हा खूप उशिरा घरी यायचे. आईचे ब्युटीपार्लर होते. पल्लवी शाळेतून यायची तेव्हा नेमकी आईकडे बायकांची गर्दी सुरू व्हायची. आपल्याकडे आईचे लक्ष जाईल या आशेने ती दाराशी घुटमळायची. आई आपल्याला विचारेल,‘‘शाळेतून दमून आलीस का?’’ म्हणेल, ‘‘थांब हं राणीला शिरा करून देते.’’ मग आपण तिच्या कमरेभोवती मिठी घालून म्हणू, ‘‘आई, आज बागेत जाऊया का आपण? कंटाळा येतो गं मला घरी एकटीला.’’ पल्लवीचे विचार मनातच राहायचे. आई कामात इतकी गर्क असायची की पल्लवी दाराशी उभी आहे हे तिच्या लक्षातसुद्धा यायचे नाही.
पल्लवी कंटाळते, गप्प गप्प असते हे आईबाबांच्या लक्षात आले होते. एके दिवशी तिला घेऊन बाबा नर्सरीत गेले. तिथून तिच्यासाठी तिला आवडली म्हणून टोमॅटोची रोपे घेऊन आले. जमीन खुरपून, वाफे तयार करून, खतमाती घालून बाबांनी आणि तिने रोपे लावली. रोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर पल्लवी वाढणाऱ्या रोपांकडे पाहात बसे. त्यांना पाणी देई. त्यांच्याशी गप्पासुद्धा मारे. हां हां म्हणता रोपे वाढली. पल्ल्वीच्या कमरेला लागू लागली. हिरव्यागार पानांनी भरून गेली. पल्लवीने एके दिवशी सकाळी पाहिले तर झाडांना इवले हिरवे गोल टोमॅटो लागले होते. तिचा आनंद आभाळभर झाला. आई-बाबा म्हणाले, ‘‘लालभडक टोमॅटो आपल्याला रोज खायला मिळतील.’’ मग पल्लवी आईची पदार्थाची ‘रुचकर’, ‘वेगळे पदार्थ’, ‘खास कोशिंबिरी, चटण्या, मुरांबे’ अशी पुस्तके वाचून टोमॅटोचे निरनिराळे पदार्थ शोधू लागली. तिने टोमॅटोच्या वडय़ा, टोमॅटो सॉस, टोमॅटो जॅम करण्यासाठी चंद्रभागाबाईंना पदार्थ कसे करायचे ते वाचूनही दाखवले. बरेच दिवस गेले. टोमॅटो मोठे होईनात आणि लालही होईनात. बाबा म्हणाले, ‘‘बागेत सूर्यप्रकाश कमी पडतोय. ते वाढणार नाहीत.’’ पल्लवीला रडूच कोसळलं. आईने तिला जवळ घेतले. म्हणाली, ‘‘वेडे, रडतेस कशाला? हिरव्या टोमॅटोची चटणी सुंदर होते. भाजीही होते. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आई, चंद्रभागाबाई, पल्लवी यांनी मिळून चटणी केली. छोटय़ा छोटय़ा बाटल्या भरून ‘पल्लवीची टोमॅटो चटणी’ अशा चिठ्ठय़ा लावून आत्या, मावशी, काकू साऱ्यांच्या घरी नेऊन दिली.
तुम्हाला नवे काही शिकायचे असेल तर कल्पनाशक्ती वापरा. इतरांच्या कल्पना ऐकून घ्या. प्रश्न विचारायला लाजू नका. त्यातून तुम्ही बरेच काही शिकाल.
आजचा संकल्प : इतरांच्या कल्पना मी ऐकून घेईन आणि काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com