Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

ऐरोलीत पालिकेची नवी रक्तपेढी
नवी मुंबई/प्रतिनिधी

 

येत्या वर्षांत ऐरोली भागात नवी मुंबई महापालिकेतर्फे दर्जेदार रक्तपेढी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजय नाहटा यांनी आज ‘वृत्तान्त’शी बोलताना दिली. नेरुळ तसेच ऐरोली भागात १०० खाटांच्या दोन रुग्णालयांचे कामही लवकरच सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून नाहटा यांच्या कारकीर्दीस आज दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षांत अनेक योजना राबवून नाहटा सातत्याने चर्चेत राहिले. ठाणे-बेलापूर रस्त्याचे वादग्रस्त काम, तसेच मोरबे जलवाहिन्यांच्या दर्जाविषयी निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे नाहटा यांच्या कारकीर्दीला वादाची किनारही मिळाली. या पाश्र्वभूमीवर येत्या वर्षांत शहरात अत्याधुनिक अशी रक्तपेढी उभारण्याचा आपला मानस आहे, अशी माहिती नाहटा यांनी दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशी येथे ३०० खाटांचे मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात रक्तपेढी कार्यरत आहे. असे असले तरी संपूर्ण नवी मुंबईत ही एकमेव रक्तपेढी असल्याने रुग्णांना रक्तासाठी बहुतेक वेळा खासगी रुग्णालये व रक्तपेढय़ांवर अवलंबून राहावे लागते, तसेच काही आगारांमध्ये रक्तातील पेशींचे प्रमाण कमालीचे घसरते. अशा वेळी वाशीतील एखाद दुसरी रक्तपेढी वगळता या पेशींसाठी रुग्णांना मुंबईकडे धाव घ्यावी लागते.
या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेमार्फत शहरात आणखी एक रक्तपेढी उभारण्यात येणार आहे, असे नाहटा यांनी सांगितले. ऐरोली ते बेलापूपर्यंतच्या वेगवेगळ्या उपनगरांमधील रुग्णांना वाशी येथे एकमेव अशी शासकीय रक्तपेढी उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या वर्षांत ऐरोली भागातील माता-बाल रुग्णालयात रक्तपेढी उभारण्यात येणार आहे. ऐरोली, घणसोली, दिघा तसेच नाहूर, मुलुंड भागातील रुग्णांनाही या रक्तपेढीचा लाभ मिळू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, येत्या सहा महिन्यांमध्ये ऐरोली, तसेच नेरुळ भागात प्रत्येकी १०० खाटांची दोन रुग्णालये उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. महापालिकेच्या मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात या रुग्णालयांची घोषणा करण्यात आली होती. मात्र या रुग्णालयांची बांधणी कशी असावी, हे ठरविण्यासाठी वास्तुविशारदांची नियुक्ती करतानाच महापालिकेस तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लागला. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत या संदर्भातील प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता या दोन्ही रुग्णालयांच्या रचनेवर काम सुरू झाले आहे, असे नाहटा यांनी सांगितले. निविदा प्रक्रिया लागलीच उरकून हे काम सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबईकर दरदिवशी वाचवितात १७ लाख लिटर पाणी!
जयेश सामंत

नवी मुंबई परिसरात पाण्याच्या वापरावर मीटर पद्धत बंधनकारक करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा फॉम्र्युला भलताच यशस्वी ठरू लागला असून, प्रत्येक दिवशी नवी मुंबई महापालिकेचे सुमारे १७ लाख लिटर पाण्याची बचत होऊ लागली आहे. ‘मोरबे’ धरणाच्या जोरावर येत्या वर्षभरात शहरातील सर्व उपनगरांमध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्याचा संकल्प महापालिकेने सोडला आहे. या योजनेसाठी मीटर पद्धतीशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा प्रशासनाने पुढे केला आणि राज्यकर्त्यांच्या गळीही उतरविला. अखेर ऐरोलीपासून बेलापूपर्यंत शहरातील आठ उपनगरांमध्ये पाण्यासाठी मीटरची जोडणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत वाशी (९३८१), नेरुळ (९९५४), बेलापूर (५५७९), ऐरोली (३९३७) अशा चार उपनगरांमध्ये २८ हजारांहून अधिक संख्येने मीटर बसविण्यात आले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख संजय देसाई यांनी ‘वृत्तान्त’ला दिली. नवी मुंबईत सिडकोने उभारलेल्या वसाहतींमध्ये सुमारे ५२ हजार कुटुंबे वास्तव्य करतात. या ठिकाणी ठराविक दरानेच पाणी बिलाची आकारणी होत असते. यामुळे पाण्याच्या वापरावर कोणतेही बंधन राहात नसे, असा पुर्वानुभव होता. महापालिकेने मागील सहा महिन्यांत या घरांमध्ये २८ हजार मीटर बसविल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसण्यास आता सुरुवात झाली आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली. यापूर्वी या उपनगरांमध्ये प्रत्येक व्यक्ती सरासरी २४० लिटर पाण्याचा वापर करीत असे. मीटर बसविल्यानंतर हे प्रमाण १७६ लिटर एवढे झाले आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले. महापालिकेने आपल्या मोठय़ा जलवाहिन्यांभोवती ६७ ठिकाणी जलमापक बसविले आहेत. याचेही सकारात्मक परिणाम दिसू लागले असून, पाणी गळतीचे प्रमाण २१ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर आले आहे. यापूर्वी शहरात ५१ टक्के पाण्याचा महापालिकेस हिशोब मिळतच नव्हता. या पाण्याचा वापर होत होता, मात्र त्याद्वारे कोणत्याही स्वरूपाचे उत्पन्न महापालिकेस मिळत नव्हते. हे प्रमाणही आता कमी झाले असून, आजही २१ टक्के पाण्याचा वापर हिशोबबाह्य आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मीटरच्या वापरामुळे दररोज १७ लाख लिटर पाण्याची बचत होत आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये कोपरखैरणे, घणसोली भागात २० हजार मीटर बसविण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कामोठय़ातील रंगाच्या कंपनीला आग
पनवेल/प्रतिनिधी

कामोठय़ातील जवाहर इंडस्ट्रियल एरियातील आरको इंडिया या कारखान्याला सोमवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत माल जळून खाक झाला.कळंबोली अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. कामगार तेथे नसल्याने जीवीत हानी टळली. कळंबोलीच्या प्लॉट क्र. १०४ वर दुसऱ्या मजल्यावर आरको इंडिया हा कारखाना आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास या कारखान्यात अचानक आग लागली. यात छपाईसाठीचा रंग, रसायने व फिनेल जळून खाक झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी कळंबोली अग्निशमल दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.