Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ फेब्रुवारी २००९

आयुक्तसाहेब, आता वाट कसली पाहताय?
अंबडमधील लूटमारीनंतर स्थानिकांचा स्ोंतप्त सवाल
प्रतिनिधी / नाशिक

शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाढीस लागलेले गुन्हेगारीचे प्रकार आणि त्यावर सर्वच स्तरांतून झालेली तीव्र टीका यामुळे मध्यंतरी पोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी वेळ पडल्यास या पोलीस ठाण्याची सूत्रे आपण स्वत: हाती घेऊ असेही जाहीर केले होते, त्याची आठवण करून देत आयुक्त आता आणखी कसली वाट पाहात आहेत, असा संतप्त सवाल परिसरात उपस्थित करण्यात येत आहे. त्याला पाश्र्वभूमी आहे ती, अंबड औद्योगिक वसाहतीत पुन्हा कामगारांना लुटण्याच्या घडलेल्या घटना व त्याची प्रतिक्रिया म्हणून स्थानिक उद्योजकांनी अंबड पोलीस ठाण्यावर केलेल्या निदर्शनांची.

मुंबई दहशतवादी हल्ला ‘कॅमेऱ्याच्या नजरेतून’
वार्ताहर / नाशिकरोड

दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असला तरी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची दाहकता अजून कायम आहे. या हल्ल्याने केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण देश हादरला. या हल्ल्याची भीषणता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अजूनही समोर येणे सुरूच आहे.दहशतवाद्यांच्या हल्ल्याला पोलीस व कमांडोंनी दिलेल्या प्रत्युत्तराचे दर्शन सर्वाना टीव्हीवरून झाले. टीव्हीवरून दर्शन न झालेला वेगळा थरार छायाचित्रकारांनी टिपला. भीषणता, मनाला अस्वस्थ करणारे प्रसंग, दहशतवाद्यांशी झूंज, हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय, नरीमन हाऊस, सीटी स्टेशनमधील थरार नाटय़ातील काही निवडक क्षणचित्रांचे प्रदर्शन नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आले आहे.

दारव्हेकर साहित्य अभिवाचन स्पर्धेत महाराष्ट्र कल्चर सांघिक विजेते
चाळीसगाव / वार्ताहर

येथील रंगनाथ कलासक्त न्यास आयोजित पुरूषोत्तम दारव्हेकर स्मृती अखिल भारतीय साहित्य अभिवाचन महोत्सव २००९ स्पर्धेत सांघिक प्रथम पारितोषिक पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरने मिळविले. अभिनेते अशोक शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. मुकुंद करंबळेकर हे होते.महाराष्ट्र कल्चरलच्या कलावंतांनी चि. त्र्यं. खानोलकर यांची ‘चाफा’ ही कथा सादर केली. दिग्दर्शन सचिन जोशी यांनी केले तर कथावाचन जागृती देशमुख, वर्षां दाभोळकर व सागर कान्होले यांनी केले. संगीताची साथ राहुल मोरय्ये यांनी केली. कुठल्याही माध्यमातून अभिनय करताना नाटकाचे ज्ञान असणे गरजेचे असते.

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा पक्षश्रेष्ठींना इशारा
वार्ताहर / सटाणा

धुळे लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची कार्यकर्त्यांची मागणी असून त्यादृष्टीने व्यूहरचना केली जात आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला न सोडल्यास निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी पदाधिकाऱ्यांना गृहीत धरू नये, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, आ. संजय चव्हाण, डॉ. विलास बच्छाव आदी उपस्थित होते. पक्षाची धुळे लोकसभा मतदार संघात भक्कम स्थिती असल्याचे शेटे यांनी सांगितले. राष्ट्रवादीला असलेली अनुकूलता मित्रपक्षाने समजून घेतली पाहिजे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे जर यावेळी अन्याय झाला तर कार्यकर्ते नाराज होऊन पक्षातून बाहेर पडतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. धुळे लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीला सोडण्याचा आग्रह धरण्यात आला असून त्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे.

चांदवड तालुक्यात आठ हजार बायोगॅस संयंत्र उभारण्याची योजना
चांदवड / वार्ताहर

सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी कॉमन मिथेन अ‍ॅव्हाइडेन्स कार्यक्रमांतर्गत आठ हजार बायोगॅस संयंत्र उभारणीचा मानस असल्याचे कार्यक्रम संयोजक अरविंद रकिबे यांनी सांगितले. येथील नेमिनाथ जैन विद्यालयाच्या सभागृहात सरपंच, ग्रामसेवक, शेतकऱ्यांच्या कार्यशाळेचे उद्घाटन राज्यस्तरीय विशेष तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. टी. जी. मोरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण सल्लागार उमेशकुमार शर्मा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय व्यवस्थापक जे. एच. पाटील, गोबरगॅस तंत्रज्ञ वसंत गोदकर, प्राचार्य सु. ह. गुळेचा, तहसीलदार जे. सी. निकम, सभापती जयराम ठोके, उपसभापती प्रकाश देवढे, गटविकास अधिकारी एच. सी. लोखंडे आदी उपस्थित होते. प्रास्तविक व सूत्रसंचलन बी. एन. गांगुर्डे यांनी केले. यावेळी उमेशकुमार शर्मा यांनी बायोगॅस उभारणीकामी लागणाऱ्या निधी बाबत माहिती दिली. कॉमन मिथेन अ‍ॅव्हाइडेन्स कार्यक्रमांतर्गत १० कोटी रुपये खर्च करून आठ हजार बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा मनस त्यांनी व्यक्त केला. पशुधन असलेल्या शेतकऱ्याला २५ टक्के रक्कम भरावयाची असून ७५ टक्के रक्कमेचे कर्ज मिळणार आहे. उर्वरित कर्जाची फेड क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम या अंतर्गत येणाऱ्या महसुलातून करण्याची व्यवस्था होऊ शकते. तसेच त्याला जामीनदाराची आवश्यकता नाही असेही त्यांनी सांगितले. वातावरणातील मिथेन व प्रदूषणामुळे निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन या कार्यक्रमांतर्गत मोठय़ा प्रमाणावर बायोगॅस निर्मितीचा कार्यक्रम चांदवड तालुक्यात साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाची माहिती व अर्ज घेण्यासाठी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन अरविंद रकिबे यांनी केले आहे.

‘नैसर्गिक जीवनशैली घडविण्यात कारवी लायब्ररीचे योगदान’
नाशिक / प्रतिनिधी

कारवी रिसोर्स लायब्ररीच्या माध्यमातून सकस व दर्जेदार साहित्यासह निसर्ग व पर्यावरण विज्ञान विषयक संदर्भ ग्रंथांचा खजिनाच उपलब्ध झाला आहे, असे प्रतिपादन लेखक तथा पर्यावरण तज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांनी केले. नैसर्गिक जीवनशैली घडविण्यात या लायब्ररीचे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले. कुलकर्णी यांनी नाशिकरोड येथील ‘कारवी रिसोर्स लायब्ररीला’ नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थी व सभासदांशी मनमोकळा संवाद साधला. आपली जीवनशैली जास्तीतजास्त नैसर्गिक ठेवून आपण निसर्गाचा समतोल साधला पाहिजे. चंगळवाद थांबवला पाहिजे. अन्न, उर्जा, पाणी यांच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करायला हवी. पर्यावरणाची माहिती पोहोचविण्याचे महत्वाचे काम ‘कारवी’ करत आहे, असे ते म्हणाले. अजित बर्जे यांनी प्रास्तविक, शोभना बर्जे यांनी स्वागत केले. पूर्णिमा कुलकर्णी, संचालिका अनघा बर्जे यांनीही मनोगत व्यक्त केले. अधिक माहितीसाठी २४५५००५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांसाठी आवाहन
प्रतिनिधी

जळगावस्थित शहरातील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी आवाहन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय सेवादास दलुभाऊ जैन साहित्य गौरव पुरस्कारासाठी जानेवारी २००४ ते डिसेंबर २००६ या कालावधीत प्रकाशित झालेल्या कादंबरीच्या ३ प्रती लेखकांनी पाठवायच्या असून कथालेखकांनी जानेवार २००७ ते ऑक्टोबर २००८ या कालावधीत प्रकाशित झालेल्या कथासंग्रहाच्या ३ प्रती पाठवायच्या आहेत. दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी रोख रुपये ७१७१, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे. मराठीतूनच प्रकाशित झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार आहे. निकाल जून २००९ पर्यंत जाहीर होईल, तर ऑगस्ट २००९ मध्ये जळगावी पुरस्कार प्रदान सोहळा होईल. सहभागासाठी प्रवेश खुला असून लेखकांनी वा प्रकाशकांनी साहित्य दि. ३१ मार्च २००९ पर्यंत सतीश जैन, अध्यक्ष सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, ९ क, खोटे नगर (सुरक्षा नगर), जळगाव, ४२५००२ (खानदेश) या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क- दूरध्वनी- ९४०३०२१५३१.

आश्रमशाळा शिक्षक संघटनेतर्फे आंदोलन
नाशिक / प्रतिनिधी

आश्रमशाळांच्या वेळेत बदल, २३५२ पदांची तातडीने भरती, व्यपगत केलेली मुख्याध्यापक व इतर संवर्गाची पदे पुनर्जिवित करणे, मानधन शिक्षकांना सेवेत कायम करणे आदी प्रश्नांवर राज्य शासनाने निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घ्यावा या मागणीसाठी आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेतर्फे ७ फेब्रुवारीपासून आदिवासी विकास विभागाच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. आदिवासी विकास विभागात शिक्षक संवर्गावर सातत्याने अन्याय केला जात असून त्यांचे विविध प्रश्न प्रलंबित ठेवले जात असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. आश्रमशाळांची वेळ सकाळी अकरा ते सायंकाळी पाच करावी, सहावा वेतन आयोग, महामार्ग भत्ता फरक, आश्रमशाळेतील मृत मुलांच्या वारसास एक लाख रूपये, आश्रमशाळांना मुलभूत सुविधा पुरविणे, अनुदानित आश्रमशाळांमधील मान्यताप्राप्त शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने वेतन देणे असे प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. डॉ. डी. एल. कराड व आ. जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत आंदोलन केले जाणार आहे.

वृत्तपत्र वितरकाची नाशिक-शेगाव सायकल भ्रमंती
नाशिक / प्रतिनिधी

चार दिवसात नाशिक ते शेगाव हे ४०० किलोमीटर अंतर सायकलवरून पूर्ण करण्याचा संकल्प करीत येथील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक प्रल्हाद भांड हे नुकतेच शेगावकडे रवाना झाले. भांड हे डीजीपीनगर येथील रहिवासी असून त्यांच्या सायकल यात्रेचे हे सातवे वर्ष आहे. रोज ९० ते १०० किलोमीटर प्रवास करून एवढे अंतर अवघ्या चार दिवसात पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. वृत्तपत्र वितरण या अत्यंत जिकिरीच्या व कष्टाच्या व्यवसायातून वेळ काढून भक्ती, श्रद्धा व निश्चय असेल तर भारत भ्रमण देखील सायकलवर घडू शकते असे त्यांनी सांगितले. नाशिक, मालेगाव, धुळे, मुक्ताईनगर, शेंगाव येथील पारायण सोहळा समाप्तीनंतर परतीचा प्रवास ते एस. टी. ने. करतात. यंदाच्या सायकल यात्रेचा शुभारंभ सकाळचे संपादक विश्वास देवकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी समर्थ बँकेचे संचालक अरूण भांड, नगरसेवक तानाजी फडोळ, नाशिक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम खुर्दळ, नंदू शिंदे, भिकाजी दातीर, शांताराम मटाले, दिलीप भांड, राजेंद्र भांड आदी उपस्थित होते.

सामाजिक सुरक्षा विधेयकात सुधारणेविषयी निदर्शने
नाशिक / प्रतिनिधी

सामाजिक सुरक्षा विधेयकामध्ये सुधारणा होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिशा फाऊंडेशन व लोकविकास सामाजिक संस्थेमार्फत निदर्शने करण्यात आली. सामाजिक सुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी व्यवस्थित झालेली नसून त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने त्रुटी दुरूस्त करण्यात याव्यात व सामाजिक सुरक्षा विधेयकाचा फायदा तळागाळातील सर्वाना मिळावा अशी निदर्शकांची मागणी आहे. बीपीएल किंवा एपीएल असा भेदभाव न करता सर्व कामगारांना त्याचा लाभ मिळावा व बी.पी.एल. धारकांसाठी उत्पादन मर्यादा एक लाखापर्यंत करण्यात यावी, असे लोकविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मिलींद बाबर यांनी सांगितले. भटक्या विमुक्त जमाती संघाचे अध्यक्ष रफीक शेख यांनी लोकांनी सरकारपुढे आपल्या समस्या शांततेने मांडाव्यात असा सल्ला दिला. सूत्रसंचलन निशीकांत पगारे यांनी केले. आभार दादाजी रणदिवे यांनी मानले.

शहाद्यात रात्रीतून चार गाडय़ा लंपास
शहादा / वार्ताहर

एकाच रात्रीतून चार मोटारसायकली लंपास करून चोरटय़ांनी पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेला कडवे आव्हान दिले आहे. त्यावरक कडी म्हणजे पोलिसांनी एकच गुन्हा नोंदवून इतर मोटारसायकल मालकांना त्याच फिर्यादीत साक्षीदार करून मोटारसायकलींची किंमत फक्त १५ हजार रुपये दाखविली आहे. शहरात गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत सुमारे १०० मोटारसायकली चोरीस गेल्या. मात्र एकाचाही तपास लागलेला नाही. शनिवारी रात्री शहरातील भरतनगर मधून जितेंद्र चव्हाण, रमकूबाई नगरमधील सखाराम चौधरी, संजय चित्ते यांच्या मोटार सायकली चोरीस गेल्या. प्रदीप पाटील यांच्या मोटारसायकलमधील इंधन संपल्याने ती गाडी चोरटय़ांनी शहराबाहेर सोडून दिली होती. मात्र इतर तीन गाडय़ा चोरटय़ांनी लांबविल्या. चालक पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यास गेले असता फक्त एकाच मोटार सायकल चोरीची नोंद करण्यात येऊन तिची किंमत फक्त १५ हजार रुपये दाखविण्यात आली. तर इतर दोघांची नावे त्याच फिर्यादीत साक्षीदार म्हणून टाकण्यात आली. त्यामुळे मोटारसायकल मालकांनी पोलीस यंत्रणेविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. दोन महिन्यांपूर्वी शहाद्यातील पत्रकारांनी चोरी सत्राविरुद्ध आंदोलन छेडले होते. जिल्हा पोलीस प्रमुख केशव पाटील यांनी त्यावेळी तात्पुरती दाखल घेतली पण त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.

माधव पगार यांची नियुक्ती
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी तालुक्यातील मकरंदवाडी (सुभाषनगर) येथील माधव पगार यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या सभेत प्रांतिक अध्यक्ष मोहन शिंगोटे व कार्यकारी अध्यक्ष भास्कर औताडे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. माधव पाटील यांनी पोलिस पाटीलांच्या विविध समस्या, अडचणी सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले.